ध्यानम् सरणम् गच्छामी

प्रभाकर नानावटी

शहरी गोंगाटापासून लांब कुठेतरी एखाद्या खेडेगावातील वा थंड हवेच्या ठिकाणच्या वातावरणात आपल्या निवासाची व जेवणा-खाण्याची (चांगली!) सोय करण्यात येणार आहे व त्यासाठी एकही पैसा मोजावा लागणार नाही (परंतु शिबिराच्या शेवटच्या दिवशी थाळीत - लाजेकाजेस्तव का होईना - दान-देणगी टाकावीच लागते!) असे जाहीरपणे खरोखरच कुणी सांगत असल्यास आपल्याला असे वाटेल की 'चला जाऊन बघू या काय आहे ते' . जेथे आजकाल प्रत्येक पाऊल व श्वासासाठी पैसे मोजावे लागतात तेथे कुणीतरी आपल्याला दहा दिवस चकटफू खाऊ पिऊ घालतात याचे आश्चर्य वाटू लागते. कारण अगदी जवळचे नातेवाईक - मित्रमंडळीसुद्धा तुम्हाला दहा दिवस संभाळण्याची जोखीम पत्करण्यास तयार होत नसतात. याशिवाय तुमचे वैयक्तिक दु:ख, ताण - तणाव, अस्वस्थता, चिंता, सुप्त वा उघड (शारीरिक) डिसऑर्डर्स, यावर आधुनिक उपाय सुचवून एक नवी व्यक्ती म्हणून दहा दिवसानंतर पाठवण्याची हमी देत असतील तर अगावू नाव नोंदणी करण्यासाठी रांगा लागतील. विपश्यनेच्या दहा दिवसाच्या शिबिरासाठीची जाहिरात अशाच प्रकारात मोडते.

भाग १

शहरी गोंगाटापासून लांब कुठेतरी एखाद्या खेडेगावातील वा थंड हवेच्या ठिकाणच्या वातावरणात आपल्या निवासाची व जेवणा-खाण्याची (चांगली!) सोय करण्यात येणार आहे व त्यासाठी एकही पैसा मोजावा लागणार नाही (परंतु शिबिराच्या शेवटच्या दिवशी थाळीत - लाजेकाजेस्तव का होईना - दान-देणगी टाकावीच लागते!) असे जाहीरपणे खरोखरच कुणी सांगत असल्यास आपल्याला असे वाटेल की 'चला जाऊन बघू या काय आहे ते' . जेथे आजकाल प्रत्येक पाऊल व श्वासासाठी पैसे मोजावे लागतात तेथे कुणीतरी आपल्याला दहा दिवस चकटफू खाऊ पिऊ घालतात याचे आश्चर्य वाटू लागते. कारण अगदी जवळचे नातेवाईक - मित्रमंडळीसुद्धा तुम्हाला दहा दिवस संभाळण्याची जोखीम पत्करण्यास तयार होत नसतात. याशिवाय तुमचे वैयक्तिक दु:ख, ताण - तणाव, अस्वस्थता, चिंता, सुप्त वा उघड (शारीरिक) डिसऑर्डर्स, यावर आधुनिक उपाय सुचवून एक नवी व्यक्ती म्हणून दहा दिवसानंतर पाठवण्याची हमी देत असतील तर अगावू नाव नोंदणी करण्यासाठी रांगा लागतील. विपश्यनेच्या दहा दिवसाच्या शिबिरासाठीची जाहिरात अशाच प्रकारात मोडते.

परंतु घी देखा लेकिन बडगा नही देखा या म्हणीप्रमाणे ते दहा दिवस कसे असतील याची कल्पना नाव नोंदणीच्या वेळी असणार नाही. तरीही बिळातील विंचू चावत असला तरी बोटाला थंड लागते म्हणून इतरांना सांगत सुटणार्‍याप्रमाणे या दहा दिवसांच्या विपश्यना शिबिराचे काही जण गुणगान करत असतात. वैयक्तिक अनुभवांना (अनुभूती!) प्राधान्य देत असताना स्वत:ची बुद्धी गहाण ठेवत असतो याची कल्पना त्यांना नसते. (कल्पना असली तरी त्याकडे दुर्लक्ष केले जाते.) विपश्यना म्हणजे वैयक्तिक उन्नतीबरोबर जगाचे कल्याण करणारा (एकमेव!) मार्ग आहे अशी त्यांची समजूत झालेली असते. म्हणूनच इतरांना पण यात सहभागी होण्यास ते प्रोत्साहन देत असतात.

अकसीर इलाज

सर्वांचे कल्याण व्हावे, दु:खी कुणी असू नये, आपले जीवन सार्थ (मंगल!) व्हावे, स्वार्थाबरोबर परमार्थ साधता यावे इत्यादी प्रकारच्या संपूर्ण मानवी समाजालाच कवेत सामावून घेणार्‍या उद्देशाबद्दल कुणाचेच दुमत असण्याचे कारण नाही. याच बरोबर आपल्या वुद्धीमत्तेत (कमीत कमी परीक्षेत अपेक्षित गुण मिळवण्याच्या क्षमतेत) वाढ व्हावी, आपल्याला आरोग्यमय जीवन लाभावे, सुदीर्घ जीवन जगता यावे, आपले धंदे - उद्योग उर्जितावस्थेत पोचावेत, संसार नीटनेटका चालावा, हाती घेतलेले काम तडीस नेण्यास अडचणी येऊ नयेत, कुठल्याही प्रकारचे ताण तणाव (आयुष्यभरात!) येऊ नयेत, कुणाच्याही दबावाखाली काम करण्याची, निर्णय घेण्याची वेळ येऊ नये इत्यादी अपेक्षा बाळगत असल्यास त्यात गैर काही नाही. काही कारणामुळे असाधारण परिस्थिती उद्भवल्यास पैसा-श्रम-वेळ इत्यादींची अवास्तव मागणी न करता सुलभ उपाय योजून मार्ग काढत असल्यास कुणाला आवडणार नाही? परंतु या सर्व गोष्टी साध्य होण्यासारखा रामबाण उपाय खरोखरच अस्तित्वात असू शकेल का?

वरील सर्व किंवा यातील बहुतेक गोष्टी आम्ही परिश्रमपूर्वक शोधून काढलेल्या उपचार पद्धतीमुळे सहजपणे साध्य होऊ शकतात असे छातीठोकपणे सांगणारे अनेक व्यक्ती, संस्था, संघटना आजकाल मोठ्या प्रमाणात प्रचार करत असतात. यातील काहींची पोच आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत असते. एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीसारखे त्यांच्या जगभर ( विशेषकरून अमेरिकेत!) शाखा असतात. त्यांचे स्वत:चे सॅटलाइट चॅनल्स असतात. व आठवड्यातील साती दिवशी व दिवसातले चोवीस तास स्वत:चीच टिमकी वाजवत असतात. (किंवा रतीब घातल्यासारखे रोज दोन चार तास इतर टीव्ही चॅनल्स अडवून ठेवतात). त्यांच्या (शेकडो, हजारो, नव्हे लाखो) भक्तगणांना एका भुलभुलैयाच्या जगात नेऊन सोडतात ( व लाखोंनी पैसे कमावतात) पृथ्वीतलावर स्वर्ग उतरवण्याची त्यांची भाषा ऐकत असताना आपण किती क्षुद्र आहोत याची जाणीव होत राहते.

या संस्था-संघटनांच्या प्रचार पत्रिकेवर नजर टाकल्यास मोठमोठे लेखक, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, डॉक्टर्स, यशस्वी व्यावसायिक, कलाक्षेत्रातील नट-नट्या, इत्यादींच्या शिफारशी असतात. हा कोर्स वा शिबिर पूर्ण केल्यामुळे अमुक अमुक रोग (आश्चर्यकारकरित्या ) कमी झाला, माझ्या अमुक अमुक अडचणी दूर झाल्या, भरभराटी झाली.... इत्यादी प्रकारच्या साखरपेरणीमुळे सामान्य माणूस सहजच उत्सुक होतो. प्रशस्तीपत्रक बहाल करणारे उच्च मध्यम वर्ग वा उच्च वर्गातून आलेले असतात. या उच्चभ्रूंची प्रशस्ती पत्रकं वाचत असताना या गोष्टी नेमके काय आहेत, त्यांनी केलेले दावे खरे आहेत का,त्यासाठी काय किंमत मोजावी लागते, केवळ ऐकीव वा स्वत:च्या अनुभवावर विसंबून न राहता चिकित्सकपणे वा विचारपूर्वक यांची तपासणी केली आहे का, असे अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात.

ध्यानधारणा

अशा प्रकारच्या प्रश्नांना उत्तरं शोधत असताना या सर्व उपचार पद्धतीत ध्यानधारणेला फार महत्व दिले जाते असे दिसून येते. प्राचीन काळचे ऋषी-मुनी, बौद्ध भिक्षू, तीर्थंकर ध्यानधारणेबरोबर उग्र जप-तप, पूजा-अनुष्ठान, व्रत - उपास इत्यादी करून काही विशेष सिद्धी व ज्ञान मिळवत होते. व त्यातून त्यांनी आपले जीवन सार्थकी करून घेत होते. पण या गोष्टी आधुनिक युगामध्ये सामान्य जनांच्या आवाक्यात नाहीत. परंतु मूळ ध्यानधारणेचा गाभा आहे तसाच ठेऊन काही तुरळक बदल केल्यास आपलेही जीवन सुरळीत, आनंददायी, सुखी, समाधानाची होऊ शकते. असा या प्रकारच्या उपासकांचा दावा आहे.

विपश्यना पद्धतीतही ध्यानधारणेवरच भर दिला जातो. ध्यानधारणेमुळे आत्मविश्वास, एकाग्रता, आशावाद, मनोधैर्य, मनावर संस्कार, दु:खाबद्दल निरिच्छ वृत्ती इत्यादी लाभ होऊ शकतात अशी आग्रहाची मांडणी केली जात असल्यामुळे विपश्यनेत गैर काहीही नाही असे वाटणे साहजिकच आहे. एखाद्या विशिष्ट ठिकाणी विशिष्ट कालावधीत श्वासोच्छ्वासासंबंधी काही ठराविक क्रिया केल्यास शारीरीक व मानसिक स्वास्थ्य मिळते व त्यातून वैयक्तिक व सामाजिक लाभ होत असल्यास त्याला विरोध का करावा अशी मानसिकता तयार होऊ लागते. याच मानसिकतेतून व त्या लाभावर विश्वास ठेऊन अनेक डॉक्टर्स, इंजिनियर्स, कॉलेज व विद्यापीठातील प्रोफेसर्स - विद्यार्थी, स्त्रिया (गर्भवतीसुद्धा!), तरुण - तरुणी याकडे आकर्षित होतात. यात अंधश्रद्धा नाही, धार्मिक विधी नाही, कर्मकांड नाही, पैशाची सक्ती नाही, उपास - तपास नाही, अमुक दिवशीच वा अमुक ठिकाणीच करायला हवे याचा आग्रह नाही, सर्व काही स्वइच्छेने होत असल्यामुळे यावर पटकन विश्वास बसू लागतो. परंतु थोडेसे खोलात जाऊन विचार करू लागल्यास याच्या मर्यादा हळू हळू कळू लागतात.

ध्यानधारणा ही कुणाच्याही गळी उतरवण्यास सुलभ गोष्ट आहे हे प्रथम मान्य करायला हवे. अनादी काळापासून ध्यानधारणा सर्वांच्या परिचयाची आहे. जगभरातील बहुतेक धर्मांनी ध्यानप्रकाराचा पुरस्कार केला आहे. धार्मिक मान्यतेमुळे हा एक चांगला संस्कार आहे असे वाटत आले आहे. अगदी 1-2 मिनिटापासून ते दिवसातील 16-18 तास वेळेची अपेक्षा करणारे विविध ध्यानप्रकार आहेत. परंतु अलिकडे ध्यानधारणेला बाजारी स्वरूप आल्यामुळे काही तरी भव्य दिव्य यातून निर्माण होते असे सुशिक्षिताना वाटत आहे. परंतु ध्यानधारणेमुळे खरोखरच काही ठाशीव फरक जाणवतो का? हा प्रश्न आता विचारावासा वाटतो. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यापूर्वी या प्रश्नाला अजून काही पदर आहेत, याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. ध्यानधारणेच्या उपयुक्ततेबद्दलच्या विधानामध्ये काही तथ्य आहे का? याची वैज्ञानिकदृष्ट्या तपासणी करावी लागेल. तसेच ध्यानधारणेमध्ये वैज्ञानिक असे काही असू शकेल का? हाही प्रश्न विचारता येईल. वैद्यकीयदृष्ट्या त्याचे काही दुष्परिणाम होत असल्यास त्याची माहिती करून घ्यावी लागेल.

वैज्ञानिक संशोधन

गेली पन्नास वर्षे ध्यानधारणेवर वैज्ञानिक संशोधन केले जात आहे. ध्यानधारणेत अक्षरश: शेकडो प्रकार आहेत. त्यामुळे संशोधन पुढे सरकत नाही. जितक्या व्यक्ती तितके प्रकार असा काहिसा विचित्र अनुभव संशोधकांना येत आहे. तरीसुद्धा काही प्रमाणात संशोधन चालूच आहे. ढोबळ मानाने ध्यानधारणेचे दोन प्रकार करता येतात. एका प्रकारात मनात एखादी वस्तू - मूर्ती, मंत्र, शब्द वा असले काही तरी धरले जाते व त्याचेच स्मरण पुन्हा पुन्हा दिवसातून जमेल तेवढ्या वेळ केले जाते. यामुळे मनात इतर भावना वा विचार व बाहेर घडणार्‍या बारीक सारीक घटनांच्याकडे लक्ष न जाता एकाग्रता साधली जाऊ शकते. (या ध्यानधारणेत चित्त विचलित होऊ नये म्हणून डोळे बंद करणे अपेक्षित असते. ) दुसर्‍या प्रकारात असे एखाद्याच गोष्टीकडे मन केंद्रित न करता सर्व गोष्टींना मुक्त प्रवेश दिला जातो. मन:पूर्ततेला महत्व देत मनात येणार्‍या अनुभवांना एकाग्रतेचे लक्ष मानले जाते. य़ा प्रकारची ध्यानधारणा करत असताना ध्यानोपासक एका ठिकाणी बसून डोळे उघडे ठेऊनच ध्यान करत असतो. तो आपल्या मनात उमटलेले विचार, डोळ्यासमोर दिसणारे दृष्य, ऐकू येणारे शब्द यात काहीही फरक करत नाही. त्यांना दूर सारत नाही. अशा प्रकारच्या ध्यानधारणेत अनुभवांचा प्रवाह अव्याहतपणे वाहत असतो. या अनुभवांचे वर्णन, विश्लेषण वा चिकित्सा करता येत नाही, अशी त्यांची ठाम समजूत असते.

पहिल्या ध्यान प्रकारात आपल्यासमोर असलेले जग पूर्णपणे नाहिसे झालेले आहे, या समजूतीला जास्त महत्व दिले जाते. परंतु दुसऱ्या प्रकारात आपल्यासमोर दिसणारे जग नाहिसे न होता अगदी नवे कोरे ताजे, यापूर्वी कधीच न पाहिलेले अशा स्वरूपात दिसते असा त्यांचा दावा आहे. बौद्ध धर्माशी संबंध जोडणारे झेन, विपश्यना यासारखे ध्यान प्रकार या दुसर्‍या प्रकारात मोडतात. गुरू परंपरेतील ध्यान पहिल्या प्रकारात मोडते.

या दोन्ही प्रकारात एखादा आगंतुक विचार मनात आला तरी त्याला मुद्दाम बाजूला न सारता किंवा त्याला दाबून न ठेवता नैसर्गिकरित्याच आपोआप मनातून निघून जावे अशी अपेक्षा केली जाते. काही वेळेपुरते का होईना मन स्थिर ठेवण्यासाठी थोडासा कालावधी त्यासाठी देणे हा उद्देश त्यामागे असतो. अनेक प्रकारचे विचार व भावना आपले लक्ष विचलित करण्यासाठी टपून बसलेले असतात. त्यात आपण गुंतत जातो, वाहवत जातो. केव्हा गुंतलो हेसुद्धा आपल्याला कळत नाही. त्यातून मनोविकाराची शक्यता असते. मनोविकारातून मनस्वास्थ्य बिघडते, बिघडलेले मनस्वास्थ्य शरीरस्वास्थ्य बिघडू पाहते. अशाप्रकारे हे चक्र चालू होते. परंतु त्या विचारांना व भावनांना मोकळीक देणे हा एक त्यावरचा उपाय असू शकतो. काही काळानंतर ते विचार व त्या भावना परत येणार नाहीत असे यात गृहित धरले जाते.

ध्यानधारणेत ध्यान करण्याचे कौशल्य हस्तगत करण्यावर नेहमीच भर दिला जात असतो. जसजशी ध्यानधारणेतील कुशलता वाढत जाते तसतसे आपल्याला 'अनुभव' येऊ लागतात. अतीव आनंद, देहाच्या हलकेपणाचा अनुभव, हवेत तरंगल्यासारखे वाटणे, आहे त्या परिस्थितीला जुळवून घेण्याची मानसिकता, त्रयस्थपणे जगाच्या घडामोडीकडे बघण्याची वृत्ती वगैरे प्रकारचे अनुभव विकसित होऊ लागतात, असे ध्यानधारणेच्या पुरस्कर्त्यांचे म्हणणे आहे. या अनुभवांचे वर्णन (म्हणजे नेमके काय कुणास ठाऊक!) शब्दात पकडता येत नाही असे त्यांचे म्हणणे असते. त्यातील नेमकेपणा प्रत्येक ध्यानपद्धतीप्रमाणे बदलत जातो. त्यातील अत्युच्च अनुभव म्हणजे समाधी(?) निर्वाणावस्था ( ?) वा साक्षात्कार ( ?) . अशा गोष्टींचे उदात्तीकरण करत त्यांचे प्रलोभन सर्वासमोर ठेवले जाते. बहुतेक ध्यानपद्धतीत या सर्वांवर धार्मिकतेचा मुलामा चढवला जातो. धार्मिक मान्यतेमुळे ध्यानधारणेतील जास्त अनुभवी स्वत:ला इतरापासून वेगळे, श्रेष्ठ असे समज करून घेतात. काही ध्यानपद्धतीत मात्र अशा अनुभवांना विशेष महत्व दिले जात नाही. त्यांच्या मते हाही एक नैसर्गिक वाढीचाच प्रकार असून त्याबद्दल जास्त न बोलण्याची गरज नाही. बाजारीकरणामुळे ध्यानधारणेच्या अशा अनुभवांना प्रसिद्धी मिळत राहते. त्याची जाहिरात केली जाते. दुसरीकडे जपानच्या झेन पद्धतीसारख्या प्रकारात ध्यान म्हणजे केवळ (स्वस्थ) बसणे एवढ्या पुरतेच मर्यादित अर्थाने बघितले जाते.

यातच ध्यान प्रकारातील विसंगती दडली आहे. उद्देश स्पष्ट नाही, उद्देशाच्या मार्गाचा पत्ता नाही, एकवाक्यता नाही. ध्यानधारणेच्या पुरस्कर्त्यांना खोदून खोदून विचारल्यास अनुभवांच्या मार्गाने जातानाच प्रगती होत राहील, असे संदिग्ध काही तरी सांगितले जाते. ही संदिग्धता नकारात्मक असते. उद्देश साफल्यासाठी निश्चित असा एकच मार्ग असावा लागतो. उदाहरणार्थ एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्यासाठी हजारो मार्ग असू शकतील. परंतु सर्वात कमी अंतराचा मार्ग एकच असतो. कुठल्याही मार्गाने जा कुठलेही ठिकाण येईल त्याच ठिकाणी तुला जायचे होते असे कुणी म्हणू लागल्यास त्यात नक्कीच तार्किक विसंगती आहे असे म्हणता येईल. ध्यानधारणेत प्रयत्न करताना मार्ग बदलत गेल्यास यातला नेमका योग्य मार्ग कोणता व योग्य बदल कोणते याची पूर्व कल्पना असणे गरजेचे आहे. जाणीवेची एखादी उन्नतावस्था किंवा मोजमाप करण्यासारखे एखादे कौशल्य किंवा जगाकडे वेगळ्या प्रकाराने पाहू शकणारी अंतर्दृष्टी असले काहीही ध्यानधारणेतून निश्चित प्रयत्नानंतर साध्य होईलच असे ठामपणे सांगता येत नाही. सर्व काही बेभरवशाचा व्यवहार, संदिग्ध, धूसर!

 

पुढे: पृष्ठ २