लोकायत उर्फ चार्वाक दर्शन
दर्शन म्हणजे तत्त्वज्ञान. मी कोण, मेल्यानंतर शरीरातून काय जाते, जगाची उत्पत्ती कशी झाली, अशा गोष्टींचा विचार दर्शने करतात. अशी दर्शने अनेक आहेत. वेदप्रामाण्य़ मानणारी, देवावर व परलोकावर विश्वास ठेवणारी ती आस्तिक. लोकायत हे एकमेव दर्शन या तिन्हींना नाकारते. बौद्ध व जैन दर्शने वेदप्रामाण्य व देव नाकारतात पण परलोकावर विश्वास ठेवतात. त्यांना नास्तिक म्हणायची पद्धत आहे.
दर्शन ही विचारधारा असते, त्यामुळे त्याचा सहसा एक कर्ता/लेखक नसतो. अनेक विचारवंतांचे एकाच धाटणीचे विखुरलेले विचार एक आचार्य एकत्र करतो. त्यावर अनेकजण टीका लिहितात. त्यांचे स्पष्टीकरण दुसरा लिहितो. दर्शन तयार होते. आपल्या मतांचे मंडन व दुसर्या मतांचे खंडन हा यातील प्रत्येक विद्वानाचा आवडता खेळ. आद्य शंकराचार्य अद्वैताचे मंडन करणार व सांख्यांचे खंडन.
बृहस्पती हा आद्य प्रवर्तक म्हणून दर्शनाचे दुसरे नाव बार्हस्पत्य. लोकांचे म्हणजे जनसामान्यांचे म्हणून लोकायत व महाभारतातील चार्वाक या व्यक्तीच्या विचारसरणीशी जुळते म्हणून चार्वाक दर्शन. बर्याच विद्वानांच्या मते चार्वाक हे व्यक्तीचे नाम नसून या विचारसरणीचे आचार्य ते चार्वाक. असो, याचा दर्शनातील विचारांशी संबंध नाही.
हे एक पुरातन दर्शन आहे. महाभारतात द्रौपदी धर्माला सांगते की, "मी वडीलांच्या घरी भावाबरोबर याचा अभ्यास केला आहे". असाही उल्लेख सापडतो की निनिराळ्या आश्रमांत इतर शास्त्रांबरोबर या दर्शनाचा अभ्यास होत असे व त्यावर मोठे वादविवाद होत असत. तसेच कौटिलीय अर्थशास्त्रात व न्यायसूत्रात लोकायताचा आदराने उल्लेख केला आहे.
बौद्ध व जैन धर्माच्या उदयानंतर मात्र लोकायतावर सडकून टीका झाली. बौद्ध भिक्षूंनी लोकायत वाचू नये असे सांगण्यात आले. नंतर पुराणांनी व इतर लेखकांनी लोकायतावर ते भोगवादी आहे म्हणून इतकी टीका केली की हळूहळू लोकायताचा अभ्यास बंद पडला व त्याचे ग्रंथही लुप्त झाले. आज दुर्दैवाने आपल्याला या दर्शनाचा अभ्यास करायचा म्हणजे इतर दर्शनकार काय म्हणतात ते वाचूनच करावा लागतो. हे योग्य नव्हे पण त्याला इलाज नाही. बृहस्पती सूत्रातील २५-३० सूत्रे निनिराळ्या टीकांमध्ये मिळतात. तेवढाच मूलस्रोत. बाकीचे दुय्यम.
आता दर्शनांबद्दल काही प्राथमिक माहिती घेऊ. कशाला 'मानायचे' त्याला म्हणतात प्रमाण. हे ज्ञानाचे साधन. तीन प्रमाणे सर्वसाधारणपणे सगळी दर्शने मानतात.
(१) प्रत्यक्ष - इंद्रियांद्वारे येणारा अनुभव म्हणजे प्रत्यक्ष
(२) अनुमान - बुद्धीच्या सहाय्याने उपलब्ध माहितीवरून केलेला अंदाज म्हणजे अनुमान
(३) आगम-आप्तवचन-शब्द - त्या त्या शाखेच्या ज्ञानी पुरुषाचे वचन म्हणजे आगम. सहा वैदिक व दोन अवैदिक दर्शनांना ही तीनही प्रमाणे मान्य असतात. लोकायत फक्त प्रत्यक्ष प्रमाण मानतो, (तसे काही बाबतीत अनुमान चालते, पण काही अपवादात्मक गोष्टीतच.) हा मोठा फरक. वेदांत सांगितले आहे म्हणून काहीही ऐकायला लोकायत तयार नाही.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चेतनावाद - अचेतनकारणवाद. सर्व दर्शने जगाची उत्पत्ती, जीवाचे-जाणीवेचे रहस्य उलगडतांना 'चेतने'चा भाग मान्य करतात. लोकायत फक्त पृथ्वी, आप, तेज, वायू यांच्या संघातापासून (अचेतनेपासून) जीवस्वरूप जाणीव निर्माण होते असे म्हणते. लक्षात घ्या. म्हणजे देव - ईश्वर बादच झाले की !
लोकायतच्या माहितीकरिता बृहस्पतीसूत्रातील काही सूत्रांचे भाषांतर बघू.
(१)पृथ्वी, आप, तेज, वायू या चार तत्त्वांच्या संयोगासच शरीर, इंद्रिय, विषय या संज्ञा आहेत.
(२) त्यातून चैतन्याची निर्मिती होते.
(३) चेतनायुक्त शरीर म्हणजेच पुरुष.
(४) शरीर व इंद्रिये यांचा संघात हाच चेतन क्षेत्रज्ञ.
(५) प्रत्यक्ष हे एकमेव प्रमाण.
(६) परलोक नाही.
(७) इहलोकीचे व परलोकीचे शरीर व त्यामधील चित्त वेगवेगळे असल्यामुळे आत्म्याचे अस्तित्व सिद्ध होत नाही.
(८) काम व अर्थ हेच पुरुषार्थ आहेत.
(९) दण्डनीती हीच एक विद्या आहे.
(१०) वार्ता (कृषी, गोरक्ष, वाणिज्य) यातच समाविष्ट आहे.
(११) तीन वेद हा धूर्तांचा प्रलाप आहे.
(१२) फलप्राप्ती होत नसल्याने धर्माचे आचरण करू नये.
(१३) उद्याच्या मोरापेक्षा हातचे कबुतर बरे.
(१४) संशयास्पद निष्कापेक्षा निश्चितरुपाने मळणारे कार्पापण बरे.
निवृत्तीवादी बौद्ध धर्माला हे विचार न पटणारे असल्याने त्यांनी लोकायतवर कठोर प्रहार केले. बुद्धपूर्व लोकायताला दिला गेलेला सन्मान विसरून नंतरच्या सर्वांनी बौद्धांचीच री ओढली. नंतर लोकायताचे मूळ ग्रंथ मिळेनासे झाले. आता विरोधकांनी केलेले आरोप हे त्यांनीच केलेल्या लोकायत दर्शनाचे, म्हणून दिलेल्या अवतरणांवर आधारित होऊ लागले. याचे एक उदाहरण म्हणजे लोकायताची विचारसरणी म्हणून दिला जाणारा श्लोक माधवाचार्य असा देतात
यावज्जीवेत् सुखं जीवेदृणं कृत्वा घृतं पिबेत् ।
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः ॥
सरळसरळ भोगवादी विचार. पण ५०० वर्षे आधीच्या जयंतभट्टाच्या न्यायमंजिरीत हा श्लोक असा आहे
यावज्जीवेत् सुखं जीवेत् नास्ति मृत्युरगोचरः ।
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः ॥
इथे सुखाने जगा म्हणण्यात इहवाद आहे, भोगवाद नाही.
काही विवादास्पद विचार लोकायतच्या संदर्भात मांडले गेले आहेत. त्यांचा विचार करू.
(१) लोकायत हे आर्यपूर्व सिंधू संस्कृतीच्या लोकांचे. जोवर सिंधू संस्कृतीच्या लोकांच्या लिपीचा उलगडा होत नाही तोवर हा एक तर्कच.
(२) लोकायताचा स्रोत सांख्य व तंत्र. चूक. ही दोन्ही दर्शने चेतनावादी आहेत व तंत्राचा उद्देश मोक्ष मिळवणे आहे. अचेतनवादी व मोक्षावर विश्वास नसलेल्या लोकायताशी दुवा जुळवता येत नाही.
(३) लोकायत हे वेदांच्या विचारसरणीच्या बाहेरचे, कारण ते इहवादी आहे. बरोबर वाटत नाही कारण वेद सर्वस्वी इहवादी आहेत. यज्ञ करायचा, प्रार्थना म्हणायच्या त्या ऐहिक (व नंतर परलोकात तसलेच) सुख मिळवण्याकरता.
काही लोकायताबद्दल माहिती देणारी मराठी पुस्तके :
(१) चार्वाक इतिहास व तत्वज्ञान - सदाशिव आठवले
(२) माधवाचार्यांच्या सर्वदर्शनसंग्रहाचे भाषांतर - र. प. कंगले
(३) मागोवा - नरहर कुरुंदकर
(४) लोकायत - स. रा. गाडगीळ
(५) वेध चार्वाकाचा - उदय कुमठेकर
शरद