जपानी शिकताना

सौ. गौरी ऋषिकेश दाभोळकर

अनेकांकडून ऐकले होते की जपानी कठीण भाषा आहे. त्यात अक्षरांची संख्याच तीन हजार आहे. शब्द, वाक्यरचना, व्याकरण सगळंच वेगळं आणि कठीण आहे. त्यात लिहायला-वाचायला चित्रलिपी आहे. आधी पासून एक ना दोन गोष्टी सतत कानावर पडत असतात, मात्र जपान आणि जपानी माणसाबद्दलचं सुप्त आकर्षण मनात घर करून होतं; त्यामुळे हे धाडस करायचं ठरवलं आणि जपानी भाषेबरोबरचा माझा प्रवास सुरू झाला.

 
'कार्यालयात जपानी शिकायची इच्छा कोणाला आहे?' असे विचारणारे इमेल येताच माझ्याही नकळत मी इच्छा दर्शवली. त्यांच्या निकषात बसत नसतानाही शिक्षिकाबाईंशी बोलून परवानगी काढली. अनेकांकडून ऐकले होते की जपानी कठीण भाषा आहे. त्यात अक्षरांची संख्याच तीन हजार आहे. शब्द, वाक्यरचना, व्याकरण सगळंच वेगळं आणि कठीण आहे. त्यात लिहायला-वाचायला चित्रलिपी आहे. आधी पासून एक ना दोन गोष्टी सतत कानावर पडत असतात, मात्र जपान आणि जपानी माणसाबद्दलचं सुप्त आकर्षण मनात घर करून होतं; त्यामुळे हे धाडस करायचं ठरवलं आणि जपानी भाषेबरोबरचा माझा प्रवास सुरू झाला.

पहिल्या दिवशी वह्या-पुस्तकं घेऊन शाळेत गेल्यासारखे वर्गात बसलो होतो. बर्‍याच दिवसांनी ऑफिसात असूनही कॉलेजसारखं जबाबदारीविना शिकायला बसल्यावर खूप बरं वाटत होतं. समोर फळ्यावर वेगवेगळ्या आकृत्या, जपानी अक्षरांचे तक्ते, जपानचा नकाशा वगैरे होता. दिलेल्या वेळेच्या अचूक ठोक्याला "हाजिमेमाश्ते!" करत 'फुजिता'सेन्सेई आत शिरली. आणि दोन-तीन अगम्य वाक्यं जपानीत बोलली. सगळे जण तिच्याकडे पाहतच राहिले आणि मग तिने गोड हसून त्यांचे इंग्रजी भाषांतर सांगायला सुरूवात केली. 'हाजिमेमाश्ते' हा एखाद्या व्यक्तीशी पहिल्यांदा ओळख करताना वापरतात, हे तिने सांगितले. त्याचबरोबर स्वतःचे नाव व ती आमची जपानी शिक्षिका आहे, हेही सांगितले. एव्हाना लक्षात आलं होतं की तिचं इंग्रजी यथातथाच आहे; पण हे सगळं तुटक इंग्रजी आणि बरेचसे हातवारे यांनी आम्हाला समजलं. यावरून लक्षात आलं होतं की जपानी वर्गात थोडीफार नाट्यकला आजमावावी लागणार आहे. पण एकूणच मजा येत होती. सुरूवातीला कोणतीही लिपी वगैरे न शिकवता फुजिताने संभाषणावर भर दिला आणि आम्हाला दोन वर्गांत वह्याच उघडाव्या लागल्या नाहीत.

आमच्या कानावर अगदी थोडे का होईना, पण काही जपानी शब्द थेट जपानी शिक्षिकेकडून पडल्यानंतर तिसर्‍या वर्गापासून आमची अक्षरओळख सुरू झाली. जपानी लेखन तीन लिप्यांमध्ये विभागले गेले आहे. पहिली हिरागाना - या लिपीत मूळचे जपानी शब्द लिहिले जातात. ही आपल्या बाराखडीसारखी असते. बाराखडी ऐवजी जपानीमध्ये पाच खडे असतात. 'आ','ई','उ','ए','ओ'. मात्र गंमत अशी की प्रत्येकासाठी वेगळे अक्षर. म्हणजे का आणि की लिहिताना पूर्णपणे वेगळे चिन्ह. मूळ व्यंजनाला उकार, ईकार अशी सोय नाही. याचबरोबर आपल्या अक्षरांपेक्षा बरीच कमी अक्षरे यात दिसत होती. जसे 'ल', 'व' वगैरे अक्षरे नव्हतीच; शिवाय 'अ'कारही नव्हता. ही तर नवलाईची फक्त सुरूवात होती. दुसरी लिपी 'काताकाना'. यातही हिरागानाप्रमाणे आणि हिरागानाइतकीच वर्णाक्षरे आहेत. मात्र ही लिपी खास परकीय शब्दांसाठी वापरली जाते. जपानीमध्ये अनेक इंग्रजी, जर्मन, सिंहली वगैरे शब्द जसेच्या तसे वापरले जातात. हे शब्द काताकानामधे लिहिले जातात. याशिवाय परदेशी व्यक्तींची, शहरांची, देशांची नावे लिहिताना काताकानाच वापरली जाते. तिसरी लिपी आहे - जी सर्वात जास्त वापरली जाते, ती म्हणजे 'कांजी'. हीच ती प्रसिद्ध चित्रलिपी. यातथे जवळजवळ ३००० अक्षरसमूह, शब्द वगैरेंसाठी एक चित्र/खूण आहे आणि प्रत्येक खुणेचा अर्थ संदर्भाने बदलतो.

अर्थात पहिल्या दिवशी इतकं विस्ताराने सगळं सांगून तिने आम्हाला घाबरवलं नाही. तिने हिरागानापासून सुरूवात केली. सुरूवातीला प्रत्येक अक्षरालाच नाही तर प्रत्येक वर्णाला वेगळे चिन्ह पाहून चक्रावायला होत होतं. मात्र काही दिवसातच हिरागाना आणि काताकानामध्ये रुळलो. तक्त्यात न बघता सहज शब्द लिहिता येऊ लागले. अक्षरओळखी बरोबर काही शब्दही ओळखीचे होऊ लागले होते, आणि आम्ही रोजच्या वापरात त्यांचा गमतीशीर उपयोग करू लागलो होतो. 'आरे' आणि 'सोरे' हे 'इथे' आणि 'तिथे'साठी वापरले जाणारे जपानी शब्द. आम्ही मात्र ते इलेक्ट्रॉनिकमध्येही वापरू लागलो. म्हणजे एखादा सिग्नल/वेव्हफॉर्म बरोबर दिसू लागला की आम्ही एकमेकांना सांगायचो "'आरे वा', सिग्नल आला की! " :) [जपानीमध्ये 'वा' हे अव्यय जोडले जाते.] त्यामुळे जपानीमध्ये "इथे सिग्नल आला की" आणि मराठीत "अरे वा! सिग्नल आला की!". सगळेच खूप एन्जॉय करत होते. त्यात फुजिताही खूप मजा करत असे. एकदा तिला बेडूक काही समजावता येईना. इंग्रजी शब्द तिला माहीत नव्हता आणि आम्हाला जपानी कळत नव्हते; तर तिने चक्क बेडूकउडी मारून दाखवली. एकीकडे भारतीय किंवा इंग्रजी शिक्षक नसल्याने थोडेसे हिरमुसलो होतो, पण पुढे क्लायंटबरोबर किंवा प्रत्यक्ष जपानला गेल्यावर संभाषण करण्याची वेळ आली, तेव्हा फुजिता शिक्षक असण्याचा फायदा कळला होता. छापील भाषा आणि बोलीभाषा ह्या प्रत्येक भाषेत वेगळ्या असतात. आता कोणी विचारलं तर मी सांगेन की थोडा त्रास झाला तरी हरकत नाही पण परकीय भाषा भाषा त्या त्या देशाच्या स्थानिक व्यक्तीकडूनच शिका.

शब्दांच्या ओळखीबरोबरच हळूहळू व्याकरण सुरू झालं. मराठीसारखी कर्ता-कर्म-क्रियापद अशी सरळ रचना. प्रत्येक शब्दाला लागणारी अव्यये मात्र असंख्य वाटावीत इतकी! त्यात एखाद्या भाषेने आदरयुक्त असावं म्हणजे किती? अगदी दारूलादेखील 'साके' हा शब्द असताना तिला प्रसंगानुरुप आदरार्थी रूप देऊन 'ओसाके' म्हणायचं. मराठीसारखंच इथेही प्रश्न विचारताना 'का' येतो. उदा. 'ओगेंकी देस् का' म्हणजे 'ठीक आहे का?' अर्थात ह्यातही आदरार्थी 'ओ' आहेच! मराठी असल्याने ही रचना (कर्ता-कर्म-क्रियापद) सोपे वाटत होते, त्याचबरोबर मराठीतील काही शब्दही भेटत होते. जसे 'सेवा' हा शब्द मराठी आणि जपानी मध्ये सारखाच, त्याच अर्थाचा. असे शब्द तिथून इथे आले का इथून तिथे हे भाषातज्ज्ञांनी ठरवावं; पण आम्हांला असे शब्द शोधायला मजा वाटत होती.

एकूणच जपानी भाषेची सवय होत होती आणि संभाषणातही प्रगती होती; आणि एक दिवस फुजिताने 'कांजी' शिकवायला सुरूवात केली. ३००० चित्रे शिकायची, लक्षात ठेवायची आणि योग्य वेळी वापरायची ह्या विचारानेच तोंडचे पाणी पळाले. खरं सांगायचं तर, आज मला जपानी शिकायला सुरूवात करून २ वर्षे झाली, पण ४००-५०० कांजींच्यावर मला कांजी येत नाहीत. कांजी हा एक अजब प्रकार आहे. ह्यातील एक चित्र ३-४ वेगवेगळ्या प्रकारे वापरलं जातं. कधी दोन चित्रं मिळून एक शब्द बनतो तर तीच दोन चित्रं वेगळी-वेगळी काढली असता, ती पूर्णपणे वेगळा अर्थ घेऊन आपल्यापुढे स्वतंत्र शब्द म्हणून उभी असतात. त्यात कांजीचे उच्चारही संदर्भाने बदलतात; आणि हे कमी म्हणून की काय, प्रत्येक कांजीचा एक जपानी उच्चार असतो आणि एक चिनी. आधी वाटलं ह्या कांजी का शिकायच्या? हिरागाना काताकाना आहे ना! पण जेव्हा जपानी पुस्तकं पाहिली, ऑफिसमधील कागदपत्रे-दस्तऐवज पाहिल्यावर समजून चुकलं की सगळे लिखाण कांजीतच आहे आणि हिरागाना फक्त अव्ययांपुरते वापरले जाते. मग कांजीची पारायणे करण्यावाचून पर्याय नव्हता.

आता जपानी बर्‍यापैकी बोलायला येऊ लागलं होतं. वाचायलाही थोडं फार येत होतं. त्याच वेळी जपानला जायचा योग आला आणि इतके दिवस शिकलेल्या पुस्तकी जपानीचं प्रात्यक्षिक करून दाखवणं भाग होतं. माझी शिक्षिका जपानी असूनही तिथे गेल्यावर जाणवलं की माझे शब्दोच्चार (अनेक भारतीयांपेक्षा) योग्य (स्थानिक) असले तरी बोलण्याची ढब, बोलीभाषेतील वाक्यरचना पूर्ण वेगळी होती. एक तर हे लोक बोलताना खूप हेल काढून बोलतात, त्यामुळे नेहमीचे वाचलेले ओळखीचे शब्दही अनोळखी बनून समोर यायचे. त्यात मी एका जपानी गावात होते (अर्थात गाव हे कुठल्याही शहराप्रमाणे सुसज्ज, टापटीप होते हा भाग अलाहिदा). त्यामुळे तिथे कोणाला इंग्रजीचा गंधही नव्हता. तिथल्या यंत्रातून फोन कसा करावा, हे आमच्या हॉटेलातील सगळ्या स्टाफने मिळून मला २० मिनिटांत समजावले! लौकिकाप्रमाणे जपानी माणूस इतका मदत करणारा आहे की काहीही झालं तरी तुम्हाला हवं ते मिळेल, याची खात्री बाळगावी. क्लायंट म्हणून समोर बसलेला जपानी जितका शिस्तशीर आणि कडक तितका तोच माणूस बाहेर भेटला की पूर्ण वेगळा असतो; इतका की त्याला ओळखता येऊ नये. एकदा तर त्यांना मी कबड्डी कशी खेळतात, ते जपानीत समजावून सांगितले. तर अशा जपानी लोकांनी मलाही सांभाळून घेतलं आणि माझ्या जपानीलाही.

मात्र या अनुभवाने केवळ माझे अनुभवविश्वच विस्तारले नाही तर माझे जपानी चहु-अंगाने बहरले. फुजिता भारतात जे शिकवण्याचा जीव तोडून प्रयत्न करत होती ते मला जपानने काही दिवसांत शिकवले. आता मी जपानीत बर्‍यापैकी रुळले आहे. भारतातच असले तरी रोज जपानी क्लायंटशी व्यवस्थित संवाद साधते. मात्र त्याच वेळी एक नवी भाषा शिकताना आलेले अनुभव आठवून अजूनही मजा येते. तुम्हालाही ती आली असेल अशी अपेक्षा करते आणि तूर्तास इथेच 'सायोनारा' करते.

 

वास्तव्य: पुणे
शिक्षण: बी.ई., एंबेडेड इलेक्टॉनिक्स इंजिनियरींग क्षेत्रात कार्यरत
जपानी भाषेची तिसरी परिक्षा दिली आहे. त्या दरम्यान आलेल्या अनुभवांना व्यक्त करताना त्या भाषेची सौंदर्यस्थळे जाणवली. भाषेच्या माहिती सोबत ती स्थळे दाखवणारा हा लेख.