सा रम्या नगरी!
भाग १
चित्र क्र. 1 अखमन साम्राज्य
भारतीय द्वीपकल्पात आर्य किंवा वैदिक संस्कृतीचा प्रसार इ.स.पूर्व 1300 पासून सुरू झाला असे आता सर्वसाधारणपणे मानले जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या द्वीपकल्पाच्या वायव्येला असलेल्या व हिंदुकुश पर्वतराजींच्या पलीकडच्या बाजूस या वैदिक संस्कृतीची सख्खी बहीण शोभेल अशी एक संस्कृती किंवा एक धर्म याच सुमारास उदयास येत होता. सध्याच्या इराणचा पूर्वेकडचा भाग व अफगाणिस्तानचा दक्षिणेकडचा भाग या मधे झरतृष्ट या प्रेषिताच्या किंवा धर्मगुरूच्या नेतृत्वाखाली या नवीन अग्निपूजक संस्कृतीचा किंवा धर्माचा झपाट्याने प्रसार होत गेला. या धर्मगुरूने आपल्या या धर्माचे सार, अव्हेस्ता या धर्मग्रंथामधे लिहिलेल्या गाथांमधे सांगितलेले आहे.
त्या काळी या भूप्रदेशात, बाल्ख(Bactria), मदा(Medes), पार्थवा(Parthia) व पर्शिया(Persia) अशी चार स्वतंत्र राज्ये होती व त्यांची आपापसात सतत युद्धे चालू असत. ही राज्ये, सध्याच्या इराक मधील भागात असलेल्या असुरी (Assyrian) साम्राज्याची मांडलिक राज्ये होती असे मानले जाते. या राज्यांपैकी कोणत्या राज्यामधे झरतृष्ट्राचा हा धर्म जास्त लोकप्रिय होता हे सांगणे, या कालातला इतिहास अतिशय धूसर असल्याने, अतिशय अवघड आहे.
चित्र क्र. 3 पारसा शहराच्या अवशेषांचे विहंगम दृष्य
चित्र क्र. 4 पारसा शहराचा संगणकाच्या सहाय्याने तयार केलेला त्रिमिती देखावा
चित्र क्र. 5 खालच्या पातळीवरून पारसा शहराचा चौथरा
(प्रवेश जिना डाव्या बाजूला)
इ.स.पूर्व 648 मधे त्यावेळेस पर्शियाच्या गादीवर आलेला राजा कुरुश(Cyrus) याने आजूबाजूंच्या राज्यांवर आक्रमणे करून त्यांचा युद्धांमधे पराभव केला व त्यांना आपली मांडलिक राज्ये करून घेतली व स्वत:चे अखमनशाही(Achaemenes ) साम्राज्य स्थापन केले. या कुरुश राजाने झरतृष्टाच्या कालानंतर जवळजवळ 500 ते 700 वर्षांनंतर, प्रथम अधिकृत रित्या, झरतृष्टाच्या धर्माला आपल्या राज्याचा अधिकृत धर्म म्हणून मान्यता दिली. त्यामुळे हा धर्म पुढे पर्शियाचा किंवा पारशी धर्म म्हणून ओळखला जाऊ लागला व अव्हेस्ता हा या धर्माचा सर्वात महत्वाचा धर्मग्रंथ म्हणून मानला जाऊ लागला.
चित्र क्र. 6 संगणकाद्वारे निर्माण केलेले सर्व
राष्ट्रांचे प्रवेशद्वार
इ.स.पूर्व 648 मधे स्थापन झालेले अखमनशाही साम्राज्य, इ.स.पूर्व 330 पर्यंत म्हणजे तिसरा दरुष(Darius III) हा राजा गादीवर असेपर्यंत म्हणजे सुमारे 318 वर्षे अस्तित्वात होते. या साम्राज्याचा विस्तार पूर्वेला सिंधू नदीच्या काठापासून ते उत्तरेला अमु दर्या नदीच्या पलीकडे, दक्षिणेला इराणच्या खाडीपर्यंत व पश्चिमेला पार डॅन्य़ूब नदीच्या मुखापर्यंत पसरला होता. राज्यकारभाराचे विकेंद्रीकरण करून प्रत्येक भागासाठी क्षत्रप या मांडलिक राजाची नियुक्ती हे याच साम्राज्यात प्रथम अस्तित्वात आणले गेले. स्थिरता व उत्तम राज्यकारभार यामुळे या साम्राज्यात मोठी सुबत्ता होती. कलांना व स्थापत्याला अखमनशाही राजांनी अतिशय प्रोत्साहन दिल्याने हे साम्राज्य सांस्कृतिक व सर्व कलागुणांना प्रोत्साहन देणारे एक साम्राज्य असे मानले जाते.
या राज्याचा संस्थापक कुरुश या राजाने आपल्या राज्याची राजधानी पाथ्रागड (Pasargadae ) येथे स्थापन करण्याचे ठरवले. परंतु त्याच्या हातून हे काम पूर्ण झाले नाही. युद्धात त्याचा मृत्यू झाल्यावर त्याचे दफन येथे करून या ठिकाणी त्याचे स्मारक उभारण्यात आले.
पहिला दरुष या अखमनशाही राजाने आपली राजधानी पारसा(Persepolis) किंवा तख्त- ए- जमशेद या ठिकाणी इ.स.पूर्व 550 मधे स्थापण्याचे ठरवले. हे ठिकाण सध्याच्या इराणमधल्या शिराझ या शहराच्या सुमारे 70 किलोमीटर इशान्येला येते. या वर्षापासून ते इ.स.पूर्व 330 पर्यंत म्हणजे 220 वर्षे, हे शहर शक्तीमान अशा अखमनशाही साम्राज्याची राजधानी होते. खशायरशा (Xerex) या अखमनशाही राजाने पारसाच्या भव्य स्थापत्यात मोठी मोलाची भर घातली. अखमनशाही साम्राज्याच्या कोंदणातले पारसा हे सर्वोत्तम रत्न होते याबद्दल दुमत असण्याचे काहीच कारण नाही. या शहराबद्दल जास्त माहीती करून घेण्यासाठी या लेखाचा प्रपंच.
पारसा शहर पुलवर या कुर-आब नदीच्या एका उपनदीच्या काठी वसवलेले होते. या शहराचे वैशिष्ट्य म्हणजे ते नदीच्या पात्राच्या पातळीला न वसवता, या पातळीपासून 20 मीटर उंच व 1,25000 वर्ग मीटर एवढ्या क्षेत्रफळाच्या अशा एका विस्तृत चौथर्यावर वसवले गेले होते. हा चौथरा निर्माण करण्यासाठी एका बाजूला असलेल्या कुह- ए- रहमत या पर्वताचा आधार घेण्यात आला होता तर बाकी सर्व बाजूंना, 5 ते 13 मीटर उंचीच्या रुंद भिंती बांधून त्यावर हा चौथरा बांधण्यात आला होता. मधली सर्व जागा धातूंच्या पट्ट्यांनी एकमेकांना जखडलेले मोठे पाषाण, दगड, मुरुम व माती यानी भरून घेऊन, अतिशय सपाट असा हा चौथरा एवढ्या उंचीवर बनवला गेला होता. इ.स.पूर्व 518 मधे या चौथर्यावर प्रवेश करण्याच्या मुख्य प्रवेशद्वाराचे किंवा प्रवेश जिन्याचे काम शहराच्या पश्चिम सीमेवर सुरू झाले. हा जिना दुहेरी होता व 20 मीटर उंचीचा होता.या जिन्याला अंदाजे 7 मीटर रुंद व फक्त 31 से.मी. उंच अशा 111 पायर्या होत्या. पायर्यांची उंची इतकी कमी ठेवण्याचे कारण असे मानले जाते की शहरात प्रवेश करणार्या व शाही इतमाम व उंची वस्त्रे परिधान केलेल्या शाही पाहुण्यांना त्यांचा राजेशाही थाट बिघडू न देता व घामाघूम न होता सहजतेने हा जिना चढता यावा.
आपण जर अशी कल्पना केली की आपणच असे शाही पाहुणे आहोत व हा जिना चढून वर आलो आहोत. तर वर आल्यावर आपल्याला काय दिसले असते? हा भव्य जिना चढून आल्यावर प्रथम दिसली असती थोडी मोकळी जागा व त्याच्या मागे असलेले 14 मीटर उंचीचे विशाल राजद्वार. या राजद्वाराचे नाव होते सर्व राष्ट्रांचे द्वार(Gate of all Nations). या द्वाराच्या दोन्ही बाजूंना 7 मीटर उंचीचे दोन वृषभ राखण करण्यासाठी म्हणून स्थापन केलेले होते. या राजद्वाराचा उल्लेख काहीजण खशायरशा सम्राटाचे द्वार म्हणून करतात कारण या द्वारावर खशायरशा या सम्राटाने " मी महान खशायरशा , सर्वात श्रेष्ठ, अनेक राजांचा राजा व या दूरवर व सभोवती पसरलेल्या महान पृथ्वीचा राजा, असा आहे." हा शिलालेख कोरून घेतलेला आहे.
पुढे: पृष्ठ २