सा रम्या नगरी!

भाग २

या दारातून आपण आत शिरलो असतो की समोर दिसले असते एक आयुष्यातील सुखे हेच परमोच्च मानणारे, सुखप्राप्तीसाठी वाटेल ती किंमत देणारे व कल्पनाही करता येणार नाही असे एक जग. समोर दिसणार्यान चित्रातील या उंच चौथर्‍यावरच्या इमारतींची प्रमाणबद्धता, भव्यता बघून आश्चर्यचकित व्हावे का पदोपदी दिसणार्‍याच तिथल्या वैभवाच्या खुणा बघून स्तिमित व्हावे असेच आपल्याला वाटले असते. या साम्राज्याच्या वैभवाला व किर्तीला साजेसे असलेली राजधानी बांधण्याची किमया अखमनशाही स्थापत्यविशारदांनी मोठ्या उत्तम रितीने साधली होती. अखमन साम्राज्याच्या शक्तीचे व वैभवाचे ही राजधानी हे एक सांकेतिक चिन्ह होते. दर्शक अतिशय भारावून जावा असेच ते बांधलेले होते. सर्व अधिकृत कार्यक्रम राजेशाही थाटाचे करता यावेत व ते तसे झालेले लोकांना दिसावेत अशा पद्धतीनेच पारसा चे स्थापत्य आहे.


चित्र क्र. 7 प्रवेश जिना, सर्व राष्ट्रांचे प्रवेश द्वार व उजव्या बाजूस
आपादना (संगणक निर्मित)

चित्र क्र.9 आपादना अवशेष

चित्र क्र.8 आपादना स्थापत्य (संगणक निर्मिती)

चित्र क्र. 10 आपादना प्रवेश कक्ष

चित्र क्र, 11 आपादना छताचे आधार

चित्र क्र.12 आपादना छत

द्वारातून आत शिरल्यावर उजव्या हाताला दिसत असे एक अवाढव्य स्थापत्य. हे स्थापत्य 'आपादना' या नावाने ओळखले जात असे. पारसा मधल्या स्थापत्यांमधले सर्वात भव्य व मनावर ठसा उठवणारे स्थापत्य हेच होते असे मानले जाते. या सभागृहाच्या मध्यभागी, एक चौरस आकाराचा, 60 फूट उंच अशा 36 खांबांनी आधार दिलेले छत असलेला एक कक्ष होता. या खांबांच्या शिरावर बसवलेले महाकाय लाकडी घोडे व पक्षी या छताला आधार देत असत. या चौरस कक्षाच्या बाहेर अनेक व्हरांडे , जिने व गच्च्या होत्या. साम्राज्याच्या कानाकोपर्‍यातून सम्राटाकडे आपली गार्‍हाणी घेऊन येणार्‍याच प्रजेला व शिष्टमंडळांना (काही शिष्टमंडळे हजार हजार लोकांची सुद्धा असत.) अखमनशाही सम्राट या 'आपादना' मधेच भेटत असत. 'आपादना' मधल्या भिंती, रंगीबेरंगी व चमकणार्‍या अशा टाइल्सनी सजवलेल्या होत्या. तसेच या भिंतींच्या वर निरनिराळ्या प्रतिष्ठित व्यक्ती, योद्धे, सैनिक व मांडलिक राजे यांची पूर्णाकृती चित्रे कोरलेली होती.

आपादना सभागृहाच्या आग्नेय कोपर्‍यात तचेरा ( Tachera) या नावाची एक लहान आकाराची वास्तू होती. ही वास्तू ग्रॅनाइट व संगमरवर सारख्या पाषाणांच्यामधून अत्यंत सौंदर्यपूर्ण पद्धतीने बनवलेली होती. या वास्तूचे प्रयोजन काय होते हे अचूकपणे सांगता येत नाही परंतु या वास्तूत सम्राट आपल्या कुटुंबातील नवरोज सारखे धार्मिक विधी करत असत व आपले सेनानी, मंत्री व शासकीय अधिकारी यांच्याशी सल्लामसलत करत असत असे मानले जाते त्यामुळे या वास्तूला मुगल रिवाजाप्रमाणे दिवाण- ई-खास असे म्हणणे योग्य ठरावे. या वास्तूच्या खांबांच्या व भिंतींच्या अवशेषांवर अशा अनेक महत्वाच्या व्यक्तींची चित्रे कोरलेली आहेत. तसेच या वास्तूला आधार देणार्‍या खांबांच्या शिरावर मानवी मस्तकाच्या आकाराचे आधार बसवलेले होते.

'आपादना' या खुल्या सभागृहाच्या पूर्वेला 100 खांब असलेले एक मोठे स्थापत्य किंवा हॉल होता. या वास्तूची भव्यता फक्त 'आपादना' च्या मानाने कमी होती एवढेच. परंतु या वास्तूच्या मध्यभागी असलेला कक्ष मात्र 'आपादना' पेक्षाही मोठा होता. या वास्तूवरचे छत हे 100, तीन रंगात रंगवलेल्या लाकडी खांबांच्या आधारावर बसवलेले होते. हे सर्व खांब भव्य व कोरीव काम केलेल्या पाषाणांच्या खोबणींच्यात बसवलेले होते. एका पाषाणात असे 10 खांब बसवलेले होते. हे लाकडी खांब 14 मीटर उंच होते. मध्यवर्ती दरबार हॉल कक्षात प्रवेश करण्यासाठी 12 पाषाण द्वारे बसवलेली होती. या द्वारांच्यावर, अखमनशाही राजे निरनिराळ्या राक्षसांशी युद्ध करत असल्याची चित्रे कोरलेली होती. पारसा मधल्या सर्वच कोरीव कामामधे असे राक्षस व रानटी जनावरे यांची चित्रे दिसतात. या सभागृहात प्रवेश केल्यावर सम्राटाला आदर दाखवण्यासाठी तळहात कपड्यांच्या बाह्यांच्या आत दडवून व नतमस्तक होऊनच चालणे आवश्यक असे. या सभागृहामधेच सम्राटाचे सिंहासन ठेवलेले असे. या सिंहासनावरचे किंवा इतर कोरीव काम सम्राट सभागृहात नसतानाच बघणे शक्य होते. सम्राटाच्या उपस्थितीत हा अत्यंत मोठा अनादर मानला जात असे. हा कक्ष म्हणजे सम्राटाचा दिवाण-ई- आम होता असे म्हणता येईल.

सिंहासन असलेल्या सभागृहाच्या साधारण नैऋत्येला व चौथर्‍यावरील सर्वात उंच अशा भागावर अखमनशाही सम्राटांची निवासस्थाने बांधलेली होती. खशायरशा या सम्राटाचे निवासस्थान अतिशय कौशल्यपूर्ण कारागिरीने बांधलेले होते. 36 खांबांच्या आधारावर बांधलेल्या या इमारतीत एक मुख्य दिवाणखाना, इतर काही कक्ष, अनेक खांबांच्या आधारावर बांधलेली एक गच्ची होती. या निवासस्थानाच्या कांम्पाऊंड भिंतीला लागून असलेल्या बाजूला राणी महाल किंवा जनानखान्याचे कक्ष बांधलेले होते. बाजूला असलेल्या दुसर्‍याच एका इमारतीत, बहुदा मुदपाक खाना व भोजन गृह होते कारण या इमारतीच्या भिंतींच्यावर खाद्यपदार्थ घेऊन जाणार्‍या सेवकांची चित्रे कोरलेली होती. सम्राटांच्या मेजवान्या याच इमारतीत दिल्या जात. या इमारतीच्या बाहेर असलेल्या अंगणात खशायरशा या सम्राटाचा एक पूर्णाकृती पुतळा बसवलेला होता. इ.स. पूर्व 330 मधे अलेक्झांडरने हे शहर जिंकल्यावर त्याची मोडतोड करण्यात आली.


चित्र क्र. 13 100 खांबांच्या दरबार हॉलचे पटांगण

चित्र क्र. 14 100 खांबाच्या हॉलचा प्रवेश विभाग

चित्र क्र.15 100 खांबांच्या हॉलचे अवशेष

चित्र क्र.16 राजकोषावरची चित्रकला

चित्र क्र. 17 शाही मेजवानी कक्षाचे प्रवेशद्वार

चित्र क्र. 18 जनानखाना किंवा राणी महाल

या इमारतीच्या बाजूलाच व राज सिंहासन ठेवलेल्या 100 खांबांच्या दरबार हॉलच्या मागच्या बाजूस, राजकोषाची इमारत होती. अखमनशाही सम्राटांची संपत्ती या इमारतीत सुरक्षित ठेवलेली असे. याच इमारतीत सम्राटाच्या शरीरसंरक्षकांच्या तुकड्यांचे शस्त्रागारही होते. या राजकोषाच्या भिंतीवर अखमन सम्राटांची सुंदर चित्रे रंगवलेली होती. इ.स.पूर्व 330 मधे अलेक्झांडरने जेंव्हा पारसा शहर ताब्यात घेतले तेंव्हा त्याला या इमारतीत 1,20000 सोन्याच्या विटा मिळाल्या होत्या. अखमनशाही सम्राट, सोन्याची नाणी फक्त जेंव्हा काही मोठा प्रकल्प हातात घेतला असे त्यावेळी बनवून खर्चासाठी वापरत असत. अन्यथा सर्व सोने विटांच्या स्वरूपात साठवले जाई.

पारसा शहराच्या चौथर्‍यावरून पूर्व दिशा सोडून बाकी कोणत्याही दिशेला बघितले तरी हिरवेगार असलेले नदीचे खोरे दृष्टीक्षेपात येत असे व त्यामुळे हा सर्व परिसर अतिशय रमणीय भासत असे. सर्व इमारती व रस्ते हे उत्कृष्ट शिल्पकलेच्या नमुन्यांनी सजवलेले दिसत असत. सुबत्तेच्या या खुणा, अखमनशाही सम्राटांची ही राजधानी मोठ्या गर्वाने आपल्याला अंगाखांद्यांच्यावर बाळगते आहे हे लगेच लक्षात येत असे.

हे सुंदर शहर अलेक्झांडरच्या सैन्याने जिंकून ताब्यात घेतल्यावर अलेक्झांडरची अशी अपेक्षा होती की हा विजय मिळवल्यावर पारसा मधल्या लोकांच्या मनात त्याला अखमनशाही सम्राटाचे स्थान मिळेल. मात्र त्याची ही अपेक्षा फोल ठरली. असे झाल्यामुळे अलेक्झांडर अतिशय निराश झाला व रागावला. अलेक्झांडर दारूच्या नशेत असताना त्याने प्रथम आपल्या सैनिकांना शहर लुटण्याची परवानगी दिली. यानंतरही पारसा च्या नागरिकांनी अलेक्झांडरला सम्राट म्हणून मानण्याचे मान्य केलेच नाही. त्यांच्या लेखी तो फक्त एक ग्रीक लुटारूच राहिला. लढाई जिंकली असल्याने मौज मजा करण्यासाठी मदिरेबरोबर काही ग्रीक वेश्यांना पाचारण करण्यात आले होते. या पैकी एका स्त्रीने, दारूच्या नशेत, अलेक्झांडरला हे पारसा शहर जाळून टाकण्याची प्रथम विनंती केली. अलेक्झांडर स्वत: दारूच्या नशेतच होता व त्याचा स्वत:वरील ताबा पूर्णपणे सुटलेला होता. तशा परिस्थितीत त्याने या स्त्रीची विनंती लगेच मान्य केली व स्वत: तो आणि ती स्त्री यांनी प्रथम या शहराला आग लावली. हे झाल्यावर अखेरीस त्याने सैन्याला हे सुंदर शहर जाळून नष्ट करण्याची आज्ञा दिली.
इ.स.पूर्व 330 मधे या सुंदर शहराचे शेवटी भग्नावस्थेत रूपांतर झाले.

 
समाप्त