आयुधे, औजारे आणि यंत्रे

आनंद घारे

आदिमानवाने जेंव्हा पहिल्यांदा हातात एक दांडके धरून त्याने जोराचा दणका दिला असेल, तेंव्हा त्यातून दोन गोष्टी साध्य झाल्या. फक्त आपल्या हाताने तो जेवढ्या जोराने प्रहार करू शकला असता त्यापेक्षा जास्त परिणामकारक तडाखा त्याने दिला आणि दुसरी म्हणजे त्याचा हात जेथपर्यंत पोचू शकला असता त्याच्या पलीकडे त्याचा मारा पोचला.

 
भाग १
आदिमानवाने जेंव्हा पहिल्यांदा हातात एक दांडके धरून त्याने जोराचा दणका दिला असेल, तेंव्हा त्यातून दोन गोष्टी साध्य झाल्या. फक्त आपल्या हाताने तो जेवढ्या जोराने प्रहार करू शकला असता त्यापेक्षा जास्त परिणामकारक तडाखा त्याने दिला आणि दुसरी म्हणजे त्याचा हात जेथपर्यंत पोचू शकला असता त्याच्या पलीकडे त्याचा मारा पोचला. अशा दोन प्रकारांनी त्याची क्षमता वाढली. हिंस्र पशूपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी किंवा दुबळ्या प्राण्याला मारून त्याचे भक्षण करण्यासाठी त्याने हा वार केला असला तर ते त्याचे आयुध झाले आणि झाडाचे फळ तोडण्यासाठी किंवा काटेरी झुडुप बाजूला करण्यासाठी असेल तर ते त्याचे औजार झाले. क्षमतेपेक्षा जास्त परिणाम साधणे हाच या दोन्हीमागील मुख्य उद्देश असतो. ज्या कामासाठी संपूर्ण क्षमतेचा उपयोग करण्याची गरज नसते ती करतांना आयुधे आणि औजारांच्या वापराने आपले काम सोपे होते. या दोन्हीमधला अन्यौन्य संबंध अनादिकालापासून चालत आला आहे.


आकृती १: आदिमानव

इतर प्राण्यांच्या मानाने मनुष्यप्राणी अधिक बुध्दीमान असल्यामुळे निरीक्षण, परीक्षण, आकलन वगैरेंद्वारे तो नव्या गोष्टी शिकत गेला आणि नवे प्रयोग करून आपली क्षमता वाढवत गेला. हातातले दांडके कठीण आणि बळकट असेल आणि त्याचे टोक अणकुचीदार किंवा धारदार असेल तर ते जास्त परिणामकारक ठरेल, ते फेकून मारले तर त्याचा मारा कांही अंतरावर असलेल्या लक्ष्यापर्यंत जाऊ शकेल वगैरे गोष्टींचा विचार करून तो वेगवेगळ्या प्रकारच्या आयुधांच्या सुधारित आवृत्या काढत गेला. इतर प्राणी मात्र निसर्गदत्त नखे, शिंगे, सुळे वगैरेंचाच उपयोग करीत राहिले. त्यामुळे त्यांना नामोहरम करणे माणसाला अधिकाधिक सोपे होत गेले, हिंस्र पशूंची भीती कमी झाली. गाय, बैल, घोडा आदि कांही पशूंना तर त्याने वेसण घातले आणि कधी त्यांच्या पाठीवर चाबकाचे फटकारे मारून तर कधी मायेचा हात फिरवून व प्रेमाने खायला चारा देऊन त्यांना आपल्या सेवेला जुंपले. सुरुवातीच्या काळात निसर्गात आपोआप वाढलेल्या अरण्यात अन्न शोधत फिरत असतांनाच माणसाने निरनिराळ्या वनस्पतींचा बारकाईने अभ्यास केला आणि त्यातल्या आपल्या उपयोगाच्या वनस्पतींची मुद्दाम लागवड करून त्यापासून धान्य, भाजीपाला, फळफळावळ वगैरेंची पैदास करायला सुरुवात केली. अशा प्रकारे त्याचे जीवन इतर पशूंपेक्षा खूप वेगळे झाले. ते करण्यासाठी आयुधांची तसेच औजारांची निर्मिती करून तो त्यांचा उपयोग करत गेला.

आदिमानवाने हातात मिळालेल्या दांडक्याचा तडाखा दुस-या माणसालाही मारला असेलच. पण तोसुध्दा बुध्दीमान असल्यामुळे त्याने जास्त चांगले दांडके हातात घेऊन प्रतिकार केला असणार. अशा प्रकारे माणसामाणसांमधील शस्त्रस्पर्धा आदिमानवाच्या काळापासून सुरू झाली आणि अजून ती चाललीच आहे. माणसाची जसजशी प्रगती होत गेली तसतसा त्याच्या हातातील आयुधांच्या रूपात फरक पडत गेला. अग्नी कसा पेटवायचा, कसा प्रज्वलित ठेवायचा आणि कसा विझवायचा हे आत्मसात केल्यानंतर आणि त्यात कशाकशाची आहुती घालता येते याचे ज्ञान झाल्यानंतर त्याचा उपयोग करून पूर्वी अशक्य असलेली अनेक कामे तो करू लागला. खनिज पदार्थांपासून विविध धातू, मुख्यतः लोखंड आणि त्यापासून पोलाद तयार करण्याच्या कलेने त्याच्या जीवनात प्रचंड फरक पडला. त्यापासून तलवार, कट्यार, खंजीर यासारखी आयुधे तयार करता आली आणि त्याचे कणखर टोक अग्रभागी बसवल्यामुळे बाण आणि भाला यांची मारक शक्ती अपरंपार वाढली. त्याचप्रमाणे लाकूड तोडण्यासाठी कु-हाड, जमीन खणण्यासाठी कुदळ व पहार, दगडमातीचा ढिगारा उपसण्यासाठी फावडे, ती वाहून नेण्यासाठी पाटी, स्वयंपाक करण्यासाठी तवा, परात, कढई वगैरे असंख्य आयुधे, औजारे व उपकरणे त्यापासून तयार करता येऊ लागली. प्राचीन इतिहासकाळाच्याही आधी या प्रकारच्या अनेक गोष्टी माणसाच्या वापरात आल्या होत्या. इतिहासातात नोंदल्या गेलेल्या सर्व लढाया अशा आयुधांचा उपयोग करूनच लढल्या गेल्या होत्या. ही आयुधे तयार करण्यासाठी विविध प्रकारची औजारे त्या काळात उपलब्ध असणारच. या दोन्हींचा विकास एकमेकांच्या बरोबरीने होत राहिला.

लोखंड तयार करण्याचे काम घरोघरी करता येत नाही. लोखंडाचे खनिज सगळीकडे सापडत नाही. ते अत्यंत उच्च तपमानापर्यंत तापवण्याचे काम घरातल्या चुलीत होऊ शकत नाही. ते खास प्रकारच्या भट्टीतच करावे लागते. त्यानंतर वितळलेल्या लोखंडाचा अती ऊष्ण रस साच्यात ओतायचे काम साध्या हाताने किंवा लाकडाच्या औजाराने करणे शक्य नसते. त्यासाठी खास प्रकारची साधनसामुग्री लागते. ती आधी तयार व्हायला हवी. प्राचीन काळात कुठल्याच प्रकारची स्वचालित यंत्रसामुग्री अस्तित्वात नसल्यामुळे सारी कामे माणसाच्या हातातले बळ आणि त्याची सहनशक्ती यांच्या मर्यादेत राहूनच करावी लागत. त्यामुळे कांही थोड्या ठिकाणीच अल्प प्रमाणात लोखंड तयार केले जात असे आणि व्यापाराद्वारे ते इतरत्र पोचत असे. लोखंडाच्या गोळ्याला तो मऊ होण्याइतपत तापवून ऐरणीवर ठेवणे आणि घणाच्या घावाने त्याला हवा तसा आकार देणे ही कामे तुलनेने सोपी आणि अनेक ठिकाणी करता येण्याजोगी असल्यामुळे लोहारकाम मात्र गांवोगांवी होऊ लागले आणि त्यातून शस्त्रे आणि औजारे तयार होऊ लागली. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात कोठल्याही धातूचा उपयोग आजच्या मानाने कमीच असे. घरोघरी मातीच्या चुली तर असतच, पण मातीचीच गाडगी, मडकी असत. श्रीमंत लोकांकडे रांजण असतील. धान्यधुन्य ठेवण्यासाठी दगडामातीपासून बांधलेली कोठारे, हौद किंवा पेवे असत.

शस्त्र चालवण्यातली निपुणता, बाहूबल, मनाचा खंबीरपणा, जिद्द, समयसूचकता वगैरे अनेक वैयक्तिक गुणांचा युध्दात विजय संपादन करण्यात मोठा वाटा असतो हे जरी खरे असले तरी सैनिकाच्या हातात चांगले शस्त्र आले तर या सगळ्या गुणांचा परिणाम कांही पटींनी वाढतो. ज्या सैन्याकडे उच्च दर्जाची शस्त्रे होती, त्यांचीच युध्दात सरशी होत गेली असे इतिहासात बहुतेक वेळा घडले आहे. त्यामुळे सर्व शासनकर्त्यांना आपले सैन्य अत्याधुनिक शस्त्रास्त्राने सुसज्य ठेवणे आवश्यक असे. ज्यांनी इकडे दुर्लक्ष करून विलासोपभोगाकडे अधिक लक्ष दिले त्यांची अधोगती होत गेली, कांहींची तर दुर्गती झाली.

 

पुढे: पृष्ठ २