आयुधे, औजारे आणि यंत्रे

भाग २

माणसाने अग्नीवर नियंत्रण मिळवल्यानंतर त्याचा उपयोग प्रत्यक्ष संहार करण्यासाठी सुध्दा केला जाऊ लागला. सर्वसामान्य माणसाकडे लाकूड, कापूस, खाद्य तेल यासारखे जे ज्वलनशील पदार्थ असत त्यांचा संहारक उपयोग विरोधकांच्या घराला किंवा साठ्याला आग लावण्यापुरताच मर्यादित असे. अशा वस्तू युध्दभूमीवर वाहून नेण्यात विशेष फायदा नव्हता. पण कांही अत्यंत ज्वालाग्राही पदार्थांचा शोध लागल्यानंतर त्यांचा उपयोग लढाईसाठी होऊ लागला. शत्रूच्या खेम्याला आग लावणे, त्याच्या सैन्यातील जनावरांना बिथरवणे, त्याची शस्त्रास्त्रे उध्वस्त करणे, त्याच्या तटबंदीला सुरुंग लावून त्यात खिंडार पाडणे अशासारखी कामे करता येऊ लागली. एकाद्या नळीमध्ये हा स्फोट घडवून आणला तर त्यातून एकादे अस्त्र दूर भिरकावता येईल अशी कल्पना कुणाला सुचली, तरी अशी भक्कम नळकांडी कुठून आणायची हा प्रश्न होता. निसर्गात उपलब्ध असलेली वेळूची नळी वापरली तर मोठ्या स्फोटामुळे तिच्या जागच्या जागीच ठिक-या होऊन गेल्या असत्या. मात्र अशा छोट्याशा नळीत थोडीशी दारू भरून ती बाणाच्या टोकाशी ठेऊन शत्रूवर सोडायचे प्रयोग चीनमध्ये झाले. लक्ष्यावर जाऊन आपटल्यावर ती पेट घेत असे किंवा धनुष्यातून सोडल्यावर जळत जळत पुढे जात असे. त्याला एक प्रकारचे अग्नीअस्त्र म्हणता येईल.


आकृती २: रहाट आणि कुंभाराचे चाक

माणसाला प्राचीन कालखंडातच चाकाचे महत्व समजले. लाकडापासून बनवलेल्या चाकांच्या आधारावर उभे असलेले गाडे त्याने बनवले आणि बैल, रेडे, घोडे, उंट यासारख्या पशूंच्या बलाचा वापर करून त्यावरून वाहतूक सुरू केली. अशाच तत्वावर बांधलेल्या रथात बसून राजे महाराजे युध्दभूमीवर आपल्या सैन्याचे नेतृत्व करू लागले. पराक्रमी वीरांना अतीरथी, महारथी यासारखी बिरुदे देत असत. औजारे बनवण्याच्या कामात चाकाचा चांगलाच उपयोग झाला. कुंभाराचे लाकडाचे चाक, विहिरीतून पाणी उपसण्याचा रहाट ही कांही उदाहरणे झाली. पण ती चाके तयार करण्यासाठी सुताराने चाकावर फिरणा-या यंत्रांचाच उपयोग केला असणार. लेथ या प्रकारच्या यंत्रात लाकडाच्या ठोकळ्याला गोलाकार देता येतो आणि ड्रिल या प्रकारच्या यंत्राने त्यात गोल आकाराचे भोक पडते. त्या भोकात वर्तुळाकार दांडा बसवता येतो. या दोन प्रकारच्या यंत्रांचा उपयोग करून वेगवेगळ्या आकाराची आधी लाकडाची आणि नंतर लोखंडासह धातूंची चाके आणि गोल आकाराचे दांडे यासारखे दंडगोल तयार होऊ लागले.

पूर्वीच्या काळात ही यंत्रे माणसांनी हातानेच फिरवावी लागत हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे किती मोठ्या आकारमानाची व वजनाची वस्तू त्यातून निर्माण करता येईल यावर मर्यादा येत असे. एक मोठे चाक आणि एक लहान चाक पट्ट्याने एकमेकांना जोडून या मर्यादा वाढवण्याचे तंत्र तयार झाले. दाते असलेली चाके (गियरव्हील्स) तयार करून ती थेट एकमेकांना जोडली जाऊ लागल्यावर त्यांची मालिका करता येणे शक्य झाले. त्यांचा उपयोग करून एकादे लहान चक्र खूप वेगात फिरवणे तसेच अवाढव्य आकाराचे चक्रदेखील हाताच्या जोराने (हळूहळू) फिरवणे या दोन्ही गोष्टी साध्य करता आल्या. चाकाला विशिष्ट प्रकारचा दांडा जोडून चाक फिरवताच तो दांडा पुढे मागे किंवा वरखाली सरकवता येऊ लागला किंवा दांड्याला सरळ रेषेत गती देऊन त्याला जोडलेले चक्र गोल फिरवणे शक्य झाले. अशा अनेक प्रकारच्या सुधारणा होत होत औजारांच्या जोडीला यंत्रे आली. यंत्रांच्या सहाय्याने लोखंडाला अनेक प्रकारचे आकार देता येणे शक्य झाल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रांची रचना करणे शक्य झाले. शेती, विणकाम, सुतारकाम, लोहारकाम वगैरे अनंत व्यवसायात लागणारी औजारे तयार करण्याचे काम सोपे झाले. या यंत्रांचा उपयोग आयुधे तयार करण्यासाठी प्रामुख्याने होऊ लागला. त्यातून चाकू, सु-या, कात्र्या वगैरे बनू लागल्याच, पण कट्यारी आणि तलवारींना आकार देणे, त्यांना धार लावणे वगैरे कामे मोठ्या प्रमाणावर करता येऊ लागली. शस्त्रांचे कारखाने उभे राहिले.


आकृती ३: तोफ आणि इंजिन

धातूंपासून नळ्या तयार करता येऊ लागल्यावर लहानमोठ्या आकाराच्या तोफा तयार करण्यात यश मिळाले. अवजड तोफा वाहून नेण्यासाठी त्यांना गाड्यावर ठेवले जात असे किंवा चाके जोडली जात आणि जनावरांना जुंपून त्या ओढून नेल्या जात. तोफेच्या नळकांड्यात दारू ठासून भरत आणि त्याच्या पुढे दगडाचा किंवा लोखंडाचा गोळा ठेवला जाई. दारूच्या आतपर्यंत जाणारी एक कापसाची वात असे. ती पेटवली की जळत जळत तिची ज्वाला दारूपर्यंत पोचे आणि तिचा क्षणार्धात स्फोट होऊन त्या ज्वलनातून खूप वायू निर्माण होत. ते वायू मर्यादित जागेत कोंडले गेल्याने त्याचा दाब वाढत जाई आणि त्या दाबाच्या प्रभावाखाली तो गोळा वेगाने बाहेर फेकला जात असे. नळीतून जातांना मिळालेल्या दिशेने दूरवर जाऊन तो खाली पडत असे. आभाळातून अचानक आलेल्या या यमदूताचा प्रतिकार करणे शत्रूला शक्यच नसल्यामुळे त्याची दाणादाण उडत असे. शत्रूसैन्यावर दुरून मारा करण्यात तोफ अतीशय परिणामकारक असली तरी ती धनुष्यबाणाची जागा घेऊ शकत नव्हती. ती अवजड असल्यामुळे वेगाने वाहून नेता येत नसे आणि घनदाट जंगलात किंवा डोंगराळ भागात नेणे तर कठीणच असे. शिवाय एक बार उडाला की दुसरा बार भरायला वेळ लागत असे. त्यामुळे हातघाईच्या लढाईत तिची अडचणच होत असे. लहान आकाराच्या नळ्यांचा उपयोग करून हँडगन्स, बंदुका आणि पिस्तुलांची निर्मिती करण्यात आली. ही शस्त्रे आणि त्यांसाठी लागणारा दारूगोळा सैनिक आपल्या सोबत घेऊन जाऊ शकत. मोठ्या तोफांचा उपयोग खास कामांसाठी केला जाऊ लागला. युध्द चालले नसतांना फुरसतीच्या काळात या तोफा किल्ल्यांच्या तटबंदीच्या आड आणि बुरुजांवर नेऊन ठेवल्या जात. चालून येणा-या शत्रूसैन्यावर दुरून गोळाफेक करून त्यांची वासलात लावली जात असे. तसेच किल्ल्याला वेढा घालून बसल्यावर त्याच्या लाकडी दरवाज्याला किंवा विटांच्या तटबंदीला तोफेच्या सहाय्याने खिंडार पाडून आंत प्रवेश मिळवला जात असे.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग होत राहिले. तोफेसारख्या नळीतून वेगाने गोळा सोडण्याएवजी एक दट्ट्या हळूहळू पुढेमागे ढकलणे, त्याला दांड्याद्वारे चक्राला जोडणे, पाणी उकळून त्याची वाफ करणे, ती मजबूत पात्रात साठवणे, पाइपातून दुसरीकडे नेणे, तिच्या दाबावर आणि प्रवाहावर झडपांद्वारे नियंत्रण ठेवणे अशा निरनिराळ्या क्षेत्रातील प्रयोगातून मिळालेल्या माहितीची एकमेकींशी सांगड घालण्याचे प्रयत्न होत होते. अशा प्रयत्नांमधून वाफेच्या दाबाने सिलिंडरमधून पिस्टनला आतबाहेर ढकलून त्याला जोडलेले चाक फिरवण्यात यश मिळाले. त्या यंत्राची रचना अशी केलेली होती की एकदा हे इंजिन सुरू केले की जोपर्यंत बॉयलरमध्ये वाफ तयार होत राही तोपर्यंत तो पिस्टन सतत आतबाहेर करत राही आणि त्याला एका दांड्याने जोडलेले चक्र सतत फिरत राही. हे सगळे आज सोपे वाटत असले तरी त्यासाठी निरनिराळ्या आकारांच्या भागांची कल्पना करून त्याबरहुकूम त्यांची निर्मिती कार्यशाळेत करता येणे आवश्यक होते. यंत्रांच्या विकासाने एवढी मजल मारल्यानंतरच ते शक्य झाले. वाफेचे इंजिन बनवल्यानंतर त्याच्या रूपाने ऊर्जेचा एक नवा अखंड स्रोत सापडला. त्यापूर्वी अग्नीचा उपयोग फक्त ऊष्णता निर्माण करण्यासाठी होत असे. आता अग्नीच्या शक्तीवर चाके फिरू लागली. वाहत्या वा-यावर फिरणा-या पवनचक्क्या आणि पाण्याच्या प्रवाहाने फिरणारी जलचक्रे त्याआधी निघाली होती, पण अग्नीवर चालणारे इंजिन सोयिस्कर जागी ठेवणे आणि केंव्हाही हवा तितका वेळ चालवणे शक्य असल्यामुळे ते जास्त सोयीचे होते.

 

पुढे: पृष्ठ ३