भारतातले मूळ रहिवासी

चंद्रशेखर

भारतातले मूळ रहिवासी कोण? हा प्रश्न गेली दोन शतके तरी विचाराधीन आहे. या प्रश्नाचे उत्तर देण्याचा एक प्रयत्न एकोणिसाव्या शतकात इंग्रजांचे राज्य आल्यानंतर केला गेला. भारतात विंध्य पर्वताच्या उत्तरेस रहाणारे उत्तर भारतीय व दक्षिणेस रहाणारे दक्षिण भारतीय यांच्या दिसण्यात व चालीरितीत भिन्नता दिसत असल्याने ते निरनिराळ्या वंशाचे असावेत असा अंदाज काही भारतीय व युरोपियन विचारवंतांनी केला. संस्कृतपासून निर्माण झालेल्या भाषांचे व्याकरण आणि इंग्रजी वगळता, इतर युरोपियन भाषांचे व्याकरण यात बरेच साम्य असल्याने, या भाषा जिथे प्रामुख्याने बोलल्या जातात तो एक उत्तर भारतीय गट व द्रविड मूलाच्या भाषा जिथे बोलल्या जातात तो दक्षिण भारतीय दुसरा गट असा विचारही केला गेला.

 
भाग १

भारतातले मूळ रहिवासी कोण? हा प्रश्न गेली दोन शतके तरी विचाराधीन आहे. या प्रश्नाचे उत्तर देण्याचा एक प्रयत्न एकोणिसाव्या शतकात इंग्रजांचे राज्य आल्यानंतर केला गेला. भारतात विंध्य पर्वताच्या उत्तरेस रहाणारे उत्तर भारतीय व दक्षिणेस रहाणारे दक्षिण भारतीय यांच्या दिसण्यात व चालीरितीत भिन्नता दिसत असल्याने ते निरनिराळ्या वंशाचे असावेत असा अंदाज काही भारतीय व युरोपियन विचारवंतांनी केला. संस्कृतपासून निर्माण झालेल्या भाषांचे व्याकरण आणि इंग्रजी वगळता, इतर युरोपियन भाषांचे व्याकरण यात बरेच साम्य असल्याने, या भाषा जिथे प्रामुख्याने बोलल्या जातात तो एक उत्तर भारतीय गट व द्रविड मूलाच्या भाषा जिथे बोलल्या जातात तो दक्षिण भारतीय दुसरा गट असा विचारही केला गेला.

हिंदू धर्माचे वेद किंवा उपनिषदे यांसारखे जे प्रमुख धर्मग्रंथ मानले जातात, ते सर्व अशा एका समाजाचे वर्णन करतात, जो बाहेरून कोठून तरी भारतात आला होता. हा समाज आधी प्रामुख्याने अग्नीउपासक असलेल्या भटक्या टोळीवाल्यांचा होता व त्यामुळे पशुधन हे त्यांचे सर्वात महत्वाचे धन होते. य़ा समाजातील पुरुषांना या सर्व धर्मग्रंथात आर्य असे नाव असल्याने हा संपूर्ण गटच आर्य म्हणून ओळखला जाऊ लागला. या आर्य समुदायाच्या टोळीवाल्यांच्या, भारतातील मूळ रहिवाश्यांशी, सतत लढाया होत राहिल्या. साहजिकच हे मूळ रहिवासी अत्यंत असंस्कृत, रानटी होते अशी वर्णने आर्यांच्या ग्रंथातून आली व ती रूढ झाली. या मूळच्या रहिवाशांना असुर, राक्षस वगैरे नावानी आर्य संबोधत असल्याने त्यांची तीच नावे पुढे रूढ झाली. आर्यांनी या मूळ रहिवाश्यांबरोबर सतत चालू असलेल्या लढायांत अखेर काही प्रमाणात विजय मिळवला व भारताच्या काही भागावर तरी वर्चस्व प्रस्थापित केले.

आर्यांचे भारतातील आगमन, त्यांच्या येथील मूळच्या रहिवाश्यांबरोबरच्या लढाया व अखेरीस त्यांनी प्रस्थापित केलेले आपले वर्चस्व याचे सगळे तपशीलवार वर्णन धर्मग्रंथात आलेले असल्याने त्याची सत्यता नाकारण्यात काहीच अर्थ नाही. परंतु आर्यांच्या या एका समुदायाचा हा इतिहास, उत्तर भारतीय व दक्षिण भारतीय या स्वरूपात आपणच निर्माण केलेल्या दोन गटांच्या माथ्यावर बसवून, आर्य-अनार्य यातील लढाया या उत्तर भारतीय व दक्षिण भारतीय यांमधील होत्या असे निदान काढून, आर्यांचा इतिहास हा संपूर्ण भारतातील लोकांचाच इतिहास आहे या बादरायणी निर्णयापर्यंतही कांही भारतीय व युरोपियन संशोधक पोचले. हा बादरायणी संबंध चुकीचा असू शकण्याचा काहीच पुरावा नसल्याने या विचाराला बर्याचपैकी लोकमान्यताही मिळाली.

मागच्या शतकात झालेल्या शास्त्रीय प्रगतीमुळे, सर्व गोष्टींकडे नव्याने बघण्यास संशोधकांनी सुरवात केली. सध्या पाकिस्तानात असलेल्या, सिंधु नदीच्या काठच्या मोहंजो-दारो व हड्डापा येथील उत्खननात एका प्रगत संस्कृतीचे अवशेष मिळाले. कार्बन डेटिंगच्या शोधामुळे हे पुरातन अवशेष कोणत्या कालखंडातील असतील हे सांगणे शक्य झाले. सिंधु नदीच्या काठच्या मेहरगड या ठिकाणचे अवशेष, इ.स. पूर्वी 5500 या नंतरच्या कालखंडातील असावेत असे अनुमान काढण्यात आले. आर्य टोळ्या भारतात आल्याचा कालखंड इ.स.पूर्व 1700-1300 असा नवीन अंदाजाप्रमाणे मानला जातो. सिंधु नदीकाठची इतकी प्रगत संस्कृती, जर आर्य भारतात येण्याच्या हजारो वर्षे आधी भारतात अस्तित्वात असली, तर भारतातील मूळचे रहिवासी, असंस्कृत, रानटी होते, आर्यांच्यामुळे भारतात प्रगत संस्कृती आली, वगैरे सारख्या विचारांना काहीच बैठक उरत नव्हती. त्यामुळे या विचारांतील हवाच गेली व आर्यांचा इतिहास हा प्राचीन भारताचा इतिहास असू शकत नाही या विचाराने जोर धरला.


टोबा लेक

कोरी पाटी

भारतात मानवी वस्ती असल्याचे अवशेष काही ठिकाणी सापडतात. जुन्नर जवळच्या कुकडी नदीच्या खोर्यासत सापडलेली अश्मयुगीन मानवी हत्यारे, दीड ते दोन लाख वर्षांपूर्वीची असावी असे संशोधक मानतात. त्यामुळे मानवाचे अस्तित्व भारतीय उपखंडात या कालापासूनच होते हे सिद्ध झाले आहे. परंतु इ.स.पूर्व 74000 या कालखंडात, इंडोनेशिया मधल्या सुमात्रा बेटावर, टोबा या ज्वालामुखीचा महा विशाल स्फोट झाला. या स्फोटामुळे भारतीय उपखंडातले सर्व सजीव संपूर्णपणे नष्ट झाले. पुढची 1000 वर्षे तरी भारतीय उपखंडात, कोणतेही मोठे सजीव व वनस्पती अस्तित्वात राहिले नाहीत. या शोधाने, एक प्रकारची कोरी पाटीच संशोधकांच्या हातात आली. टोबाच्या उद्रेकाच्या कालखंडाच्या आधी जे कोणी मानव या उपखंडात अस्तित्वात असतील ते समूळ आणि संपूर्ण नष्ट झालेले असल्याने, त्यांचा विचार करण्याची काही गरजच उरली नाही. भारतातले मूळ रहिवासी, या कालखंडानंतरच भारताबाहेरून येऊन भारतात स्थायिक झाले आहेत.

वाय क्रोमोसोम डी.एन.ए (Y Chromosome DNA) आणि मायटोकॉन्ड्रियल डी.एन.ए(Mitochondrial DNA)

भारताबाहेरचे कोणते लोक भारतात येऊन यानंतर स्थायिक झाले होते हे जर शास्त्रीय पद्धतीने शोधून काढावयाचे असले तर त्यासाठी शास्त्रीय बैठक असलेली शोधपद्धती आवश्यक आहे व तीच अनुसरली पाहिजे. मानवी शरीर हे पेशींपासून बनलेले असते हे सर्वज्ञात आहे. या पेशीमधले दोन घटक या अभ्यासासाठी उपयुक्त ठरतात.

प्रत्येक पेशीमधे एक केंद्रबिंदू असतो. या केंद्रबिंदूत 23 रंगद्रव्यांच्या (Chromosomes) जोड्या असतात. प्रत्येक रंगद्रव्यात, डी.एन.ए.(D.N.A) या द्रव्याची सर्पिल आकाराची एक लांबलचक साखळी असते. एका रंगद्रव्यांच्या जोडीत एक रंगद्रव्य पित्याकडून आलेले व एक मातेकडून आलेले असते. प्रत्येक रंगद्रव्याच्या साखळीत ऍडिनिन (ए), गुवानिन (जी), सायटोसिन (सी), थायमिन (टी) ही प्रमुख व महत्वपूर्ण रसायने असतात. ही सर्व रसायने वेगवेगळ्या अनुक्रमाने साखळीमधे गुंफलेली असतात. उदाहरणार्थ, सीजीएटी... सीएजीटीटीसीए... जीटीसीएएजीटी वगैरे. अशा अनुक्रमांच्या पद्धतीने या रसायनांच्या अनेक साखळ्या असतात. त्या काही वेळा मूळस्वरूपी पूर्ण शृंखला रूपात किंवा लघुस्वरूपी पुनरावृत्तीय शृंखला या स्वरूपात असतात. रंगद्रव्याची शेवटची म्हणजे 23वी जोडी त्या शरीराचे लिंग ठरवते. स्त्रीच्या शरीरात या 23व्या जोडीत दोन्ही समान रंगद्रव्ये असतात व त्यांना एक्स(X) रंगद्रव्य म्हणतात. पुरुषाच्या शरीरात, या जोडीतील एक रंगद्रव्य एक्स प्रकारचे व दुसरे त्याहून भिन्न म्हणजे वाय(Y) प्रकारचे असते. बापाकडून आपल्या पुरुष वारसाला मिळालेला हा वाय क्रोमोसोम, हुबेहुब त्याच्या स्वत:च्या वाय क्रोमोसोमसारखा असतो. म्हणजेच आजोबा, बाप, मुलगा, काका, चुलत भाऊ या सगळ्यांच्या शरीरातील पेशीत बरोबर हुबेहुब असा तोच वाय क्रोमोसोम असतो. यालाच पुरुष वारसासाखळी (Male Lineage) म्हटले जाते.

शरीरातील प्रत्येक पेशीमधे केंद्रबिंदूच्या बाहेर जी द्रव्ये असतात त्यात काही घन पदार्थही असतात. त्यांना मायटोकॉन्ड्रिया (Mitochondria) असे म्हणतात. या मायटोकॉन्ड्रिया मधे सुद्धा डी.एन.ए.च्या साखळ्या असतात. आईकडून आपल्या फक्त स्त्री वारसाला हा मायटोकॉन्ड्रियल डी.एन.ए. मिळतो व तो हुबेहुब आईच्या स्वत:च्या मायटोकॉन्ड्रियल डी.एन.ए. सारखाच असतो. म्हणजेच आजी, आई, मुलगी, मावशी, मावसबहिणी या सर्वांत हा मायटोकॉन्ड्रियल डी.एन.ए,. हुबेहुब सारखाच असतो. यालाच स्त्री वारसासाखळी (Female Lineage) असे म्हटले जाते.

थोडक्यात सांगायचे तर वाय रंगद्रव्य पुरुष वारसासाखळी ठरवण्यास व मायटोकॉन्ड्रियल डी.एन.ए. स्त्री वारसासाखळी ठरवण्यास अत्यंत महत्वाचे ठरतात.

 

पुढे: पृष्ठ २