भारतातले मूळ रहिवासी

भाग २


मानवी पेशींची संरचना

काही बाह्य कारणांनी एखाद्या पिढीत, वारसाने मिळालेल्या या डी.एन.ए. मधे, रसायनांच्या साखळीचा एखादा अनुक्रम बदलतो. याला जेनेटिक म्युटेशन(Genetic Mutation) असे नाव आहे. या अनुक्रम बदलाला जेनेटिक मार्कर असेही नाव आहे. हा मार्कर हे आपल्या हातात असलेले अतिशय शक्तीमान असे संशोधन हत्यार आहे असे म्हटले तरी चालेल. हा मार्कर ज्यांच्या ज्यांच्या डी.एन.ए मधे सापडतो ते सर्व जण, एका विविक्षित पुरुष किंवा स्त्री पूर्वजाचे वंशज आहेत असे खात्रीपूर्वक म्हणता येते. व या सर्व वंशजांना एका आनुवंशिक गटाचे (Haplogroup) असे मानले जाते. सरासरीने प्रत्येक 100 वर्षात एखादा तरी असा मार्कर सापडतोच. आफ्रिकेत सापडलेल्या या आदिमानवाच्या गटापासून म्युटेट होत होत एस आणि टी पर्यंत गट आता सापडले आहेत. आदिमाताच्या एल गटापासून आता एन गटापर्यंत मायटोकॉन्ड्रियल डी.एन.ए. चे गट आढळले आहेत.

या गटांच्या सहाय्याने प्रत्येक पुरुषवारसा साखळी(Male Lineage) व प्रत्येक स्त्री वारसासाखळी(Female Lineage) या पृथ्वीच्या पाठीवर,कोठून व कशा पसरत गेल्या हे शोधून काढता येणे आता शक्य झाले आहे.

स्टीफन ओपेनहायमरचे (Stephan Oppenheimer) संशोधन

ओपेनहायमर या संशोधकाने या बाबतीत खूपच मार्गदर्शक संशोधन केले आहे. त्याच्या संशोधनाच्या आधारावर आपण खालील अनुमाने काढू शकतो.

  1. 1,60000 वर्षांपूर्वी पृथ्वीवरील सर्व मानवांची आदिमाता व आदिपिता पूर्व आफ्रिकाखंडात वास्तव्य करून होते. या आदिमातेचा गट एल1 हा होता.
  2. 85000 वर्षांपूर्वी एक गट आफ्रिका ओलांडून सध्याच्या येमेन मधे पोचला. सध्याचे सर्व उत्तर आफ्रिका खंडाचे रहिवासी या गटाचे वंशज आहेत.
  3. 80000 वर्षांपूर्वी या गटाचे लोक दक्षिणेस येउन भारताच्या समुद्रकिनार्याहने श्री लंका व तिथून मलेशिया, इंडोनेशिया,बोर्निओ, व्हिएटनाम या मार्गाने दक्षिण चीनपर्यंत पोचले.
  4. 74000 वर्षांपूर्वी टोबा ज्वालामुखीच्या उद्रेकाने या पसरलेल्या लोकांपकी भारत , पाकिस्तान , पश्चिम मलेशिया, इंडोनेशिया मधील सर्व मानव संपूर्णपणे नष्ट झाले. मात्र या अतिरिक्त पसरलेले लोक कदाचित जिवंत राहले असण्याची शक्यता आहे.
  5. 52000 वर्षापूर्वी परत एकदा, आफ्रिकेतील मानवांचा एक गट येमेन, अफगाणिस्तान कडून आणि पूर्व एशिया मधून एक दुसरा गट भारतीय उपखंडात परत आला.

या विचारांप्रमाणे, असे स्पष्ट दिसते की दोन गट भारतात शिरले. एक गट मलेशियाकडून भारतात आला तर दुसरा अफगाणिस्तान, इराण मार्गाने.


मानवी स्थलांतर

युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय मधील मानव वंश शास्त्र विभागात काम करणारे प्रोफेसर स्टॅनले ए. ऍम्बरोज यांच्या विचाराप्रमाणे टोबा या ज्वालामुखीच्या उद्रेकाने फक्त भूमध्य आफ्रिकेजवळच्या काही बेटांवर, अंदाजे 2000 या संख्येपर्यंतच, मानव जिवंत राहू शकले होते. बाकी सर्व भूप्रदेशांवरील मानव, 1000 वर्षांच्या बर्फयुगात नष्ट झाले होते. त्यामुळे नंतरच्या काळात भारतात आलेले मानव एकाच गटाचे म्हणजे अफगाणिस्तान, इराण याच मार्गाने आले असणार.

थोडक्यात म्हणजे, ओपेनहायमरच्या विचाराप्रमाणे भारतात आलेले मूळ रहिवासी दोन गटात आले होते तर ऍम्बरोज यांच्या विचाराप्रमाणे एकाच गटात आले होते. या मानवाना भारताचे मूळचे रहिवासी म्हणता येईल.

एक नवीन अभ्यास

काही दिवसांपूर्वीच कौन्सिल ऑफ इंडस्ट्रियल ऍन्ड सायंटिफिक रिसर्च या सरकारी संस्थेच्या विद्यमाने एक अभ्यास आयोजित केला गेला. या अभ्यासात संपूर्ण भारतभर विखुरलेल्या 132 व्यक्तींच्या डी.एन.ए. चे अध्ययन केले. या व्यक्तींपैकी काही व्यक्ती अदिवासी समाजातून निवडल्या गेलेल्या होत्या. या समाजातील लोक गेली हजारो वर्षे पिढ्यानपिढ्या त्याच गावात रहात असून त्यांचे लग्न संबंध त्यांच्या समाजापुरतेच मर्यादित आहेत. या शिवाय 6 निरनिराळ्या भाषा बोलणारे व 13 राज्यांत विखुरलेले व समाजाच्या निरनिराळ्या स्थरातील लोकही या 132 व्यक्तीत होते.

या संशोधनातून पुढे आलेले काही मुद्दे असे आहेत.

  1. पूर्वजांच्या दोन छोट्या गटांचे हे सर्व 132 जण वंशज आहेत. या दोन गटांना मूळ उत्तर भारतीय व मूळ दक्षिण भारतीय असे नाव देण्यात आले आहे.
  2. मूळ उत्तर भारतीय गटाचे साम्य मध्य एशियामधील लोकांशी मिळतेजुळते आहे.
  3. मूळ दक्षिण भारतीय गटाचे साम्य अंडमान बेटांवरील लोकांशीच फक्त आहे.
  4. मूळ दक्षिण भारतीय 65000 वर्षापूर्वी भारतात व अंडमान द्वीपावर आले तर मूळ उत्तर भारतीय 40000 वर्षापूर्वी भारतात आले. भारतातील सर्व लोक पूर्वजांच्या दोन गटांचे पूर्णपणे मिश्रण झालेले असे वंशज असून, त्यांच्यात काहीही फरक नाही.

या सर्व मुद्द्यांचा विचार केला तर ओपेनहायमरचे विचार जास्त बरोबर असण्याची शक्यता वाटते. टोबाच्या उद्रेकानंतर, जसे भूमध्य आफ्रिकेत थोडे मानव तग धरून राहिले तसेच काही इंडोनेशियात दक्षिणेला किंवा बोर्निओला तग धरून राहिले असावेत. हे लोक 65000 वर्षांपूर्वी व आफ्रिकेकडून आलेले लोक मध्य एशिया व अफगाणिस्तान-इराण मार्गाने 40000 वर्षांपूर्वी भारतात आलेले असावेत. त्यांच्यात हळूहळू रोटीबेटीचे व्यवहार चालू होऊन आताचे सर्व भारतीय या पूर्वजांचे वंशज असावेत.

भारतात अनेक परकीय लोक येतच राहिले. इराणमधले पारशी, चित्पावन, बेने इज्राएल, आश्रय घेण्यासाठी, तर ग्रीक, तुर्कमेनिस्तानचे मुगल, अफगाणिस्तानचे अफगाणी व इराणचे इराणी लोक भारत जिंकण्यासाठी आले. हे आलेले सर्व लोक, हळूहळू इथल्या समाजात मिसळून गेले. पारशी लोकांसारख्या काही गटांनी आपले वेगळेपण जपण्याचा जाणून बुजून प्रयत्न केला. त्यांच्यात आनुवंशिक दोष दिसून येऊ लागले. भारतीय समाजाने या सर्व लोकांच्या चांगल्या गोष्टी आपल्याशा केल्या. इ.स. पूर्व 1700 या कालात किंवा नंतर, आर्यांच्या टोळ्या अशाच भारतात आल्या व स्थिरावल्या. त्यांचा धर्म, धर्मग्रंथ भारतीयांनी स्वीकारले व आपलेसे केले एवढाच अर्थ यातून निघतो.

उत्तर भारतीय आर्य नव्हेत किंवा दक्षिण भारतीय अनार्य नव्हेत. हे आर्य-अनार्य खूळ आता डोक्यातून काढून टाकण्याची गरज आहे असे मला वाटते. सर्व भारतीय, जगातल्या इतर लोकांप्रमाणेच, आफ्रिकेतल्या L1 हा अनुवंशिक गट असलेल्या एकाच आदिमातेची आणि A हा अनुवंशिक गट असलेल्या एकाच आदिपित्याची लेकरे आहेत हेच सत्य आहे.

समाप्त

 
चंद्रशेखर आठवले
ई-मेल:- shekhar.athavale@gmail.com
लेखक आता निवृत्त. शिक्षण:-इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर, स्वत:चा इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या उत्पादनाचा व्यवसाय होता.
छंद :- इंग्रजी व मराठी मधून लेखन, पेपर मॉडेल्स बनवणे,फ्रेट वर्क, ऍस्ट्रॉनॉमी.
ब्लॉग्स :- http://chandrashekhara.wordpress.com
http://chandrashekharasandprints.wordpress.com