खेळ मांडियेला वाळवंटी

नंदन होडावडेकर

नैऋत्य अमेरिकेतल्या यूटाह, कोलोरॅडो, अ‍ॅरिझोना आणि न्यू मेक्सिको ह्या राज्यांत लाखो मैलांवर पसरलेलं कोलोरॅडो नदीचं पठार हा जैववैविध्याचा एक सुरेख नमुना आहे. ग्रँड कॅन्यनसारखी महाप्रचंड घळई, सर्वदूर पसरलेल्या लाल मातीतून डोकावणारे महाकाय खडक आणि नैसर्गिकरीत्या झीज होऊन त्यातून तयार झालेल्या आकर्षक कमानी, वेगवेगळ्या खनिजांमुळे त्या खडकांवर चढलेले रंग, नजर पसरेल तिथवर पसरलेल्या शुभ्र वाळूच्या वाळवंटाचं स्थितप्रज्ञ सौंदर्य, उल्का आदळून तयार झालेलं मैलभर व्यासाचं विवर, नैसर्गिक प्रक्रियेने झाडांच्या खोडांचं टणक दगडांत झालेलं रूपांतर -- एक ना अनेक.

 
भाग १

नैऋत्य अमेरिकेतल्या यूटाह, कोलोरॅडो, अ‍ॅरिझोना आणि न्यू मेक्सिको ह्या राज्यांत लाखो मैलांवर पसरलेलं कोलोरॅडो नदीचं पठार हा जैववैविध्याचा एक सुरेख नमुना आहे. ग्रँड कॅन्यनसारखी महाप्रचंड घळई, सर्वदूर पसरलेल्या लाल मातीतून डोकावणारे महाकाय खडक आणि नैसर्गिकरीत्या झीज होऊन त्यातून तयार झालेल्या आकर्षक कमानी, वेगवेगळ्या खनिजांमुळे त्या खडकांवर चढलेले रंग, नजर पसरेल तिथवर पसरलेल्या शुभ्र वाळूच्या वाळवंटाचं स्थितप्रज्ञ सौंदर्य, उल्का आदळून तयार झालेलं मैलभर व्यासाचं विवर, नैसर्गिक प्रक्रियेने झाडांच्या खोडांचं टणक दगडांत झालेलं रूपांतर -- एक ना अनेक.


डेलिकेट आर्च, यूटाह

. . .

कोलंबसाच्या स्वारीआधी उत्तरेला अलास्कापासून दक्षिणेत थेट चिलीपर्यंत अमेरिका खंडाच्या भूभागावर किमान पाचशे तरी रेड इंडियन जमाती पसरलेल्या होत्या. त्या काळात, म्हणजे पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात त्या सार्‍यांची एकत्रित संख्या चार ते अकरा कोटींच्या घरात होती असा अंदाज आहे. 'रेड इंडियन' या एकाच नावाखाली जरी या सार्‍यांची मोळी बांधली जात असली तरी भाषा, घरबांधणीची पद्धत, अंतर्गत शासनव्यवस्था यांच्यात प्रत्येक जमातीत कमालीचा फरक होता.

साधारण पाचशे सतरा वर्षांपूर्वी याच महिन्यात (१२ ऑक्टोबर १४९२ रोजी) कोलंबस बहामा बेटांजवळ पोचला. (कोलंबस दिन वा इतर नावांखाली हा दिवस संपूर्ण अमेरिका खंडात साजरा होतो.) 'रिकॉन्क्वेस्टा' अर्थात आयबेरियन द्वीपकल्पावरून मुस्लिम सत्ता हटवण्यात यश आल्यामुळे आत्मविश्वासाने सज्ज झालेले अनेक स्पॅनिश आणि पोर्तुगीज दर्यावर्दीही पुढील काही वर्षांत या नवीन खंडाकडे आकर्षित झाले. मेक्सिकोतल्या आस्तेक साम्राज्याचा अपेक्षेपेक्षा सहजपणे झालेल्या पराभवामुळे स्पॅनिशांची सत्ता उत्तर अमेरिकेकडे पसरली. आधुनिक शस्त्रांबरोबरच युरोपातून आलेल्या कांजिण्या, गोवर, देवी यासारख्या अपरिचित रोगजंतूंनी उडवलेला हाहाकारही याला कारणीभूत ठरला.

पुढे यथावकाश दोन-अडीचशे वर्षांनी स्पेन, फ्रान्स, मेक्सिको, इंग्लंड आणि या नवीन वसाहतीत स्थायिक झालेल्या रहिवाशांत आपापसांत अनेक युद्धं होऊन अमेरिकेची संयुक्त संस्थानं जन्माला आली, पण सँटा फेच्या बंडासारखे तुरळक अपवाद वगळता या मूळ रहिवाशांची दखल अधूनमधून स्थानिक पातळीवर होणारा उपद्रव या पलीकडे कोणीच फारशी घेतलेली दिसत नाही.

जॉर्ज वॉशिंग्टन ह्या पहिल्या अध्यक्ष्याच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र अमेरिकेने रेड इंडियन्सची इच्छा असो वा नसो, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे धोरण अवलंबण्याचे ठरवले. कागदोपत्री कदाचित प्रशंसनीय वाटू शकेल अशा ह्या धोरणाने मात्र पुढच्या तीस-चाळीस वर्षांत वेगळे वळण घेतले. १८३० मध्ये अँड्र्यू जॅक्सन अध्यक्ष असताना दक्षिणेच्या राज्यांना डोळ्यासमोर ठेवून 'इंडियन रिमूव्हल अ‍ॅक्ट' पारित करण्यात आला. स्वतंत्र अमेरिकेचा प्रशांत महासागराच्या दिशेने विस्तार होत असताना मिसिसिपी नदीच्या काठावर असलेल्या रेड इंडियन वसाहतींचा अडथळा विकासाच्या नावाखाली त्यांना थेट दूरवरच्या ओक्लाहोमा राज्यात विस्थापित करण्यात आले. त्या खडतर प्रवासात रोगराई आणि उपासमारीमुळे कित्येक लोक दगावले. 'ट्रेल ऑफ टीअर्स' अर्थात अश्रूंची वाट या नावाने आजही ही घटना स्मरणात आहे.

कमीअधिक फरकाने सार्‍याच जमातींना यातून जावं लागलं. खुद्द आपल्याच देशात नागरिकत्व मिळण्यासाठी त्यांना पहिलं महायुद्ध संपेपर्यंत वाट पहावी लागली. पुढे सत्तरच्या दशकात मात्र 'इंडियन सेल्फ-डिटर्मिनेशन अ‍ॅक्ट'मुळे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या इंडियन कॅसिनोजवरील नियंत्रण व करआकारणी हटवण्याच्या निर्णयामुळे चित्र थोडेसे पालटले. आजच्या घडीला, एकेकाळी मूळचा रहिवासी असलेला हा समाज एकूण लोकसंख्येच्या जेमतेम १% उरला आहे. या वीस-एक लाखांतले एक चतुर्थांश लोक राखीव वसाहतींत राहतात. अनेक कारणांमुळे हा समाज आजही सर्वाधिक मागासलेला आहे. कनेक्टिकट, सू फॉल्स सारखी राज्यांची/शहरांची नावे; सिकोया किंवा रेडस्किन्ससारखी राष्ट्रीय उद्यानं अथवा संघाची नावं वगळता एरवी या समाजाचं अस्तित्वही फारसं जाणवत नाही. अपवाद अ‍लास्कासारख्या राज्यांचा आणि नैऋत्य अमेरिकेतील दीड लाख एकरावर पसरलेल्या 'नावाहो नेशन'चा.

. . .


भित्तीचित्रे, कॅन्यन डू शे

या नावाहो नेशनमधलं चिनले हे ईशान्य अ‍ॅरिझोनातलं एक अगदी छोटं गाव. राजधानी फिनिक्सपासून सात तासांच्या अंतरावर. वस्ती जवळजवळ संपूर्ण रेड इंडियन. ओसाड पडलेला पेट्रोल पंप, अंगणात तण माजलेली घरं, मोकाट फिरणारी गुरं यासारख्या दारिद्र्याच्या खुणा सहज दिसून येणार्‍या. 'कॅन्यन डू शे' नावाची राखीव वसाहत इथून अगदी जवळ. मात्र रेड इंडियन गाईड सोबत असल्याशिवाय आत जायचा परवाना मिळत नाही. मी आणि एक प्रौढ अमेरिकन दांपत्य असे तिघेच अशा एका टूरसाठीचे प्रवासी होतो. सोबतीला जीप हाकणारी रेड इंडियन गाईड.

उंच ताशीव कडे आणि मधल्या लाल मातीतून आचके देत जाणारी जीप असा आमचा फारसा सुखद नसलेला प्रवास सुरू झाला. हळूहळू इथे वास्तव्य केलेल्या अनेक जमातींची माहिती मिळू लागली.

. . .

सध्या अनासाझी म्हणून ओळखली जाणारी जमात साधारण तीन हजार वर्षांपूर्वी या भूप्रदेशात स्थायिक झाली असली तरी तिची भरभराट मात्र गेल्या सहस्रकाच्या सुरुवातीला झाली. सुरुवातीला पठारावरील विषम हवामानापासून बचाव करण्यासाठी जमिनीच्या खाली अथवा गुहांत राहणं जरी अनासाझींनी पसंत केलं असलं तरी हळूहळू निसर्गाशी जुळवून घेत त्यांनी जमिनीवरच्या साठवणीच्या जागांना घराचं रूप दिलं. जुन्या घरांचा मग प्रार्थनेसाठी, निसर्गपूजनेसाठीची जागा ('किवा') म्हणून उपयोग होऊ लागला.

मूळची भटकी जमात मग शेतीकडे वळली. मक्याचं पिक घेतलं जाऊ लागलं. त्या जोडीने इतरही कौशल्यं आत्मसात झाली. जमातीची लोकसंख्या वाढली, आधीच्या एकसंध समूहात लहान गट तयार झाले. त्यातला एक ईशान्येला आताच्या कोलोरॅडो राज्यातल्या 'मेसा व्हर्डे' या पठरावर स्थायिक झाला.

इ.स. ११०० च्या सुमारास वस्त्यांचं स्वरूपही मोठं झालं. अडोबी पद्धतीने म्हणजे वाळू, चिकणमाती, काटक्या यांच्या मिश्रणाने बांधलेली घरं उभी राहिली. कोलोरॅडोतल्या मेसा वर्डे इथे स्थायिक झालेल्या समूहाने तर दीडशे खोल्यांचा 'क्लिफ पॅलेस', वीसहून अधिक 'किवा' आणि एक सूर्यमंदिर उभारलं. न्यू मेक्सिकोतली 'चाको कॅन्यन' ही जागा या सार्‍या वसाहतींचं प्रमुख केंद्र बनलं. दळणवळणाच्या सोयीसाठी सुमारे चारशे मैल लांबीच्या पक्क्या रस्त्यांचं जाळं विणण्यात आलं.

पुढे काही ज्ञात-अज्ञात कारणांनी अनासाझींनी ही राहती जागा सोडली. हवामानातील बदल, व्यापारातील मंदी, इतर जमातींची आक्रमणे ही काही संभाव्य कारणं. त्यांची जागा मग नावाहो जमातीने घेतली. सोळाव्या शतकात मेक्सिकोमार्गे स्पॅनिश येईतो नावाहो आणि इतर काही जमातींची वस्ती इथे होती. त्या काळातली भित्तीचित्रं आताही पहायला मिळतात.

घोडा हा प्राणी स्पॅनिशांकरवीच अमेरिकेत आला. या अपरिचित प्राण्याला पाहून वाटलेल्या आश्चर्याचं प्रतिबिंबही काही भित्तीचित्रांत चित्रांत पडलेलं दिसतं.

 

पुढे: पृष्ठ २