खेळ मांडियेला वाळवंटी

भाग २


स्वस्तिक, कॅन्यन डू शे

तिथल्या एका घराच्या अवशेषावर स्वस्तिक पहायला मिळतं. सोबतच्या काकूंना या जमातीचा नाझी जर्मनीशी काही संबंध आला होता का असा गहन प्रश्न पडतो. मात्र हे आमच्या संस्कृतीतील एक चिन्ह आहे, यापलीकडे गाईडलाही माहीत नसतं. हिंदू संस्कृतीतही स्वस्तिकाला शुभचिन्ह म्हणून मान्यता आहे हे सांगितल्यावर समस्तांस अचंबा जाहतो. आमच्या सुदैवाने तिथे जवळजवळ त्या अवशेषांइतकेच वृद्ध नावाहो आजोबा असतात. आमच्या शंकांचा गाईडतर्फे अनुवाद होतो. चमकत्या डोळ्यांनी म्हातारबाबा हातवारे करून पण शांत स्वरात सविस्तर उत्तर देतात.

उभी रेषा जन्माची, प्रगतीची. आडवी मृत्यूची, विनाशाची. चार छोट्या रेषा अनाहत चालणार्‍या गतीच्या. आपल्या 'रिक्ता: भवन्ति भरिता:, भरिताश्च रिक्ता:'च्या चक्रनेमिक्रमेणाची आठवण करून देणारे. अजूनही एक अर्थ चारही दिशांना भटकणार्‍या या जमातीच्या अस्थिर जीवनाचे प्रतीक म्हणून.

. . .

पुढचा टप्पा असतो तो कोलोरॅडोतल्या मेसा व्हर्डे राष्ट्रीय उद्यानाचा. शब्दशः अर्थ हिरवे पठार. ओसाड 'कॅन्यन डू शे'च्या पूर्ण विरूद्ध. खुरट्या हिरवळीचे डोंगर, रुंद दर्‍या. चिनले सोडून निघालेल्या अनासाझींच्या एका समूहाने इथे मुक्काम का केला, त्याची ही उघड कारणं. इथे पर्यटकांच्या राहण्याच्या सोयीही उत्तम. हाडं खिळखिळी करणार्‍या जीपच्या प्रवासाऐवजी चाळीसेक प्रवाशांना वाहून नेणारी वातानुकूलित बस. इथल्या किवा आणि घरांचे अवशेषही अधिक सुस्थितीतले, पक्क्या रस्त्याच्या अधिक जवळ. थोडक्यात अधिक 'टूरिस्टी'.

इथेही चिनलेमधल्या इतिहासाची उजळणी होते. थोडीफार पूर्वकल्पना असली तरी तिथला पाचमजली क्लिफ पॅलेस, सूर्यमंदिर आणि अद्यापही सुस्थितीत असलेल्या किवा पाहून थक्क व्हायला होतंच. गायडेड टूरमध्ये भटकायला मिळालेल्या वेळात, जमिनीखाली असलेल्या 'किवा'त उतरायला मिळतं. बाहेर तापलेलं ऊन असूनही त्या अडोबी बांधकामाच्या रचनेमुळे आत गारवा असतो. पूर्वजांच्या आत्म्यांना आवाहन करण्यासाठी तसंच इतर धार्मिक विधींसाठी वापरली जाणारी ही एक छोटेखानी किवा. पाचशेहून अधिक लोकांना सामावून घेणार्‍या अनेक मोठ्या किवाही एकेकाळी अस्तित्वात होत्या.

. . .

अधूनमधून सफाईदार विनोदांची पखरण करत, हॉलिवूडपटांचे संदर्भ देत पन्नाशीतला रेड इंडियन गाईड आमची फेरी आवरती घेतो. टिप देऊन पांगापांग झाल्यावर, मनाचा थोडा हिय्या करूनच मी त्याला प्रश्न विचारू लागतो. प्रथम आडूनआडून, मग थोडे थेट. संपूर्ण खंडाची मालकी असताना आता रेड इंडियन्सच्या नशिबी आलेलं वसाहतींतलं जिणं. गोर्‍या आक्रमकांबद्दल वाटणारी कटुता. संस्कृती जपायची की समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हायचं हा गोंधळ. मोजक्या लोकांनी कॅसिनोद्वारे पैसे कमावून स्वतःच्या भरलेल्या तुंबड्या. वसाहतींच्या स्वयंशासनाचे हक्क झगडून मिळवले तरी नेत्यांच्या भ्रष्टाचारामुळे पदरी पडलेली निराशा. आणि तत्सम विषय.


क्लिफ पॅलेस, मेसा व्हर्डे राष्ट्रीय उद्यान

त्याच्या उत्तरांतून आधी माहीत असलेलं चित्र अजूनच विदारकपणे समोर येत जातं. अमेरिकेतल्या सगळ्या समाजांत रेड इंडियन्स सर्वात मागासलेले आहेत. बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड मोठं आहे. सुमारे साठ ते पंचाहत्तर टक्के. परिणामी व्यसनाधीनताही फार बोकाळली आहे. (या भागात गाडी चालवताना मद्यधुंद रेड इंडियन वाहनचालकांपासून सावधान रहा, अशी सूचना इथे येण्यापूर्वी मिळाली होतीच). विद्यापीठात तुरळक जागा राखीव आहेत. पण त्याही भरत नाहीत, कारण निम्म्याहून अधिक विद्यार्थी माध्यमिक शाळेतच गळतात. नवीन पिढी अधिकाधिक पाश्चात्य अमेरिकन संस्कृती आपलीशी करत आहे. जे वसाहतीत राहिलेत त्यांनाही गाईड्ससारखे बेभरवशाचे उत्पन्न असणार्‍या नोकर्‍या वगळता ठोस उत्पन्नाचे साधन नाही. शिवाय जमातीजमातींतली भांडणे, दुफळ्या इ. आहेतच. परिणामी सरकारी मदतीच्या कृत्रिम प्राणवायूशिवाय भाषा, अस्मिता, संस्कृती टिकणे दुरापास्त आहे.

या दोन राष्ट्रीय उद्यानांनंतर गेल्या काही वर्षांत या चार राज्यांतील अधिक वसाहतींना भेट देता आली. थोड्याफार फरकाने प्रत्येक ठिकाणचे चित्र सारखेच. आदिवासींना पर्यटकांचे आकर्षण म्हणून त्यांची संस्कृती टिकवण्याच्या नावाखाली तसेच अप्रगत ठेवायचे की आपल्या मुळांपासून वेगळं झाल्यावर जे तुटलेपण येतं त्याकडे दुर्लक्ष करून त्यांना मुख्य प्रवाहात सामील करून घेण्याचे प्रयत्न जारी ठेवायचे ही द्विधा स्थिती इथल्या प्रशासनातही जाणवते. या निर्णयाचा अधिकार थेट लोकांवरही सोपवूनही त्यांच्या अवस्थेत फारसा काही फरक पडलेला नाही.

. . .

हे अमेरिकन इंडियन्स आणि इथे भारतातून येऊन स्थायिक झालेले ते इंडियन अमेरिकन्स. १४९२ साली भारताशी व्यापार करायला वेगळा मार्ग शोधण्यासाठी कोलंबस निघाला आणि अमेरिकेला येऊन पोचला. त्यानंतर सहाच वर्षांनी वास्को द गामा कालिकतला पोचला. या दोन्ही 'इंडियां'वर युरोपियनांनी राज्य केलं, पण आजच्या घडीला दोन्ही समाजांत जमीन-अस्मानाचा फरक आहे. यामागचं प्रमुख कारण काय? सोळाव्या शतकातल्या भारताइतकी प्राचीन संस्कृती जरी नसली तरी जवळजवळ सव्वा कोटी लोकसंख्येचं आस्तेक साम्राज्य त्याकाळच्या विशालतम राज्यांपैकी एक होतं. त्यांनी बांधलेले पिरॅमिड्स आजही त्यांच्या प्रगतीचे पुरावे देतात. पण स्पॅनिश सैन्याच्या जेमतेम दोनशे सैनिकांनी ह्या प्रचंड साम्राज्याला आपल्यासमोर गुडघे टेकायला लावले. प्रगत शस्त्रे हे एक ढोबळ कारण झालं. पण यामागची अधिक खोलवरची कारणे कोणती?


सूर्यमंदिर, मेसा व्हर्डे राष्ट्रीय उद्यान


किवा, मेसा व्हर्डे राष्ट्रीय उद्यान

साठा प्रश्नांच्या ह्या कहाणीची बरीचशी उत्तरं जेअर्ड डायमंड ह्या प्रसिद्ध वैज्ञानिकाच्या 'गन्स, जर्म्स अँड स्टील' ह्या सुरेख पुस्तकात सापडतात. युरेशियाच्या आडव्या रचनेमुळे कृषिआधारित संस्कृतीला मिळालेली अधिक मोकळी जागा, अमेरिका खंडात शेतीची कामे ज्यांच्यामुळे वेगाने होतील अशा घोडे, बैल यासारख्या जनावरांची असलेली उणीव, अशा जनावरांच्या उपलब्धतेमुळे युरोपातील शेतकर्‍याची तुलनेने अधिक मोठ्या लोकसंख्येला अन्नपुरवठा करण्याची क्षमता आणि त्यातून उभा राहिलेला अधिक व्यामिश्र, प्रगत समाज; मध्यपूर्वेतल्या 'फर्टाईल क्रेसेन्ट' भागाशी असलेल्या (जिथे सर्वप्रथम मानवी संस्कृतीचा पाळणा हलला) भौगोलिक जवळीकीमुळे लिपीचं आणि स्टीलची अधिक परिणामकारक शस्त्रे बनवण्याचं तंत्रज्ञान (स्वबळावर इंकांची प्रगती केवळ ब्रॉंझच्या शस्त्रांपर्यंतच होऊ शकली); यापूर्वी पाळीव प्राण्यांशी संपर्क न आल्यामुळे कांजिण्यासारख्या रोगांना तोंड
देण्यास असमर्थ असलेली रोगप्रतिकारशक्ती यासारखी अनेक कारणं तथाकथित वर्णवर्चस्वाच्या सिद्धांताला खोटं ठरवतात.

. . .

परस्परांशी जोडलेल्या तीन महाकाय खंडांपेक्षा अमेरिका खंडावर मानवी संस्कृती वेगळ्याच स्वरूपात उभी राहिली. तिच्या भौगोलिक विलगतेमुळे तिची स्वतःची अशी काही वैशिष्ट्यं निर्माण झाली खरी, पण त्याचबरोबर याच कारणामुळे परकीयांचं आक्रमण थोपवायला ती असमर्थ ठरली. भारतीय संस्कृतीप्रमाणे आक्रमणं पचवून, आपलं स्वरूप काळाप्रमाणे बदलणेही यामुळेच या समूहाला अशक्य झाले असावे. मानवी संस्कृतीच्या उत्क्रांतीतला हा एक खेळ. त्याचा एक छोटा भाग मांडियेला गेला, रंगला, बदलला, मोडीस आला तो नैऋत्य अमेरिकेच्या ह्या वाळवंटी भागात. संधी मिळेल तेव्हा त्याच्या या उरलेल्या खुणा नक्कीच अनुभवाव्यात अशा.

[समाप्त]

(लेखातील सर्व छायाचित्रांचे संपूर्ण हक्क लेखकाच्या स्वाधीन.)

संदर्भ --
१. अनासाझी अमेरिका - डेव्हिड स्टुअर्ट
२. गन्स, जर्म्स अँड स्टील - जेअर्ड डायमंड
३. डेझर्ट यूएसए (http://www.desertusa.com)
४. विकीपीडिया (http://en.wikipedia.org)