विस्थापितांना सुस्थापित करणारा एक प्रकल्प

विकास देशपांडे

मानवी संस्कृतीच्या उगमापासून स्थलांतर आणि पर्यायाने विस्थापन होतच राहिले आहे. वरकरणी अशा विस्थापित होण्याची काही कारणे दिसली तरी मुळाशी गेले तर त्यात मुख्यतः दिसतो तो दुर्बलपणा - कधी पैशाच्या अभावाने आलेला तर कधी राजकीय बलाच्या अभावाने, कधी लोकसंख्येत अल्पसंख्य म्हणून तर कधी धर्माने आणि/अथवा वंशाने अल्पसंख्य म्हणून.

 
भाग १

मानवी संस्कृतीच्या उगमापासून स्थलांतर आणि पर्यायाने विस्थापन होतच राहिले आहे. वरकरणी अशा विस्थापित होण्याची काही कारणे दिसली तरी मुळाशी गेले तर त्यात मुख्यतः दिसतो तो दुर्बलपणा - कधी पैशाच्या अभावाने आलेला तर कधी राजकीय बलाच्या अभावाने, कधी लोकसंख्येत अल्पसंख्य म्हणून तर कधी धर्माने आणि/अथवा वंशाने अल्पसंख्य म्हणून. पण वास्तवीक यातील सर्व अभाव असले पण एक संघटन म्हणून प्रभाव असेल तर चांगल्या अथवा वाईट कारणाने असा समाज स्वतःच्या चूक अथवा बरोबर हक्कांसाठी प्रभावीत ठरू शकतो असे ही जगभरचा इतिहास सांगतो.

ह्या लेखातील वास्तव हे मात्र कुठलाच प्रभाव नसल्याने होणार्‍या सामाजिक वाताहातीशी संबंधित आहे आणि त्यावर सामाजिक उद्यमशीलता म्हणत तयार केलेल्या एका चांगल्या प्रकल्पाची ओळख करून देणारा आहे. विस्थापीत आहेत भूतान मधे शतकभर राहणार्‍या नेपाळी वंशातील पण आता भूतानीच असलेला समाज आणि प्रकल्पाचे नाव आहे "भूतानी विस्थापीत पुनरज्जीवन प्रकल्प" अथवा इंग्रजीत "Bhutanese Refugee Empowerment (BRE) Project"

थोडे भूतान विषयी


भूतानचा नकाशा

४६,५०० चौरस किमी इतकेसे क्षेत्रफळ (साधारण महाराष्ट्राच्या एक शष्ठमांश) असलेला हा टूमदार देश हिमालायाच्या पायथ्याशी निव्वळ निसर्गाच्या सान्निध्यात वसलेला आहे. पूर्व, पश्चिम, दक्षिण या दिशांनी हा भारताने वेढलेला आहे तर उत्तरेकडे चीनच्या तिबेट स्वायत्त प्रांताशी जोडलेला आहे. या देशाचे सगळ्यात घनिष्ठ राजनैतिक संबंध हे भारताशी आहेत. अनेक वर्षे ह्या देशाचे राजनैतिक संबंध हे भारताकडूनच पाहीले जायचे आणि आजही भारताकडून पाहीले जातात. तेच बाह्य संरक्षणासंदर्भात. आजही अमेरिकेसारख्या देशाचे या देशाशी प्रत्यक्ष संबंध नसून ते भारतातील अमेरिकन वकीलातीकडूनच चालतात. इतर शेजारी असलेल्या चीन आणि नेपाळशीपण अजूनही पुर्ण भुतान मधे आजही राजेशाही आहे जरी ती गेल्या दशकापासून हळूहळू बदलत थोड्याफार प्रमाणात लोकशाहीकडे झुकू लागली असली तरी. तरी देखील सामान्य जनतेस पासपोर्ट दिला जात नाही आणि देशाच्या बाहेर जाता न येण्याची सोय करून एकंदरीतअधुनिक जगापासून दूरच ठेवले आहे.

सुमारे सहाव्या शतकापासून या देशात तिबेटमधून बुद्धधर्माने प्रवेश केला. राजेशाहीत राजधर्म हाच लोकधर्म होतो, या न्यायाने आजता गायत बुद्ध धर्म या देशाचा राष्ट्रधर्म म्हणून पाळला गेला आणि पोसला गेला. देशाची संस्कृती सांभाळण्याच्या नादात रस्ते, वीज, गाड्या, फोन्स आदी १९६० पर्यंत येऊ शकले नाहीत तर आंतर्जाल १९९९ पर्यंत. अनेक वर्षे परदेशी (विशेष करून पाश्चिमात्य) पर्यटकांना प्रवेशबंदी होती. आजही पर्यटन हे केवळ परवानगी आणि गटागटाने करता येते. पाठीवर सामान घेऊन दर्‍याकपार्‍या, डोंगरांमधे एकटेच फिरायला जाणे आजही शक्य नाही. या देशाचे अजून एक ऐतिहासीक वैशिष्ठ्य म्हणजे त्याच्या सर्व ज्ञात इतिहासामाधे ह्या देशावर कधी आक्रमण झालेले नाही अथवा तो कधी पारतंत्र्यात गेला नाही. अर्थात आता या देशाचे सीमावादाने चीन बरोबर वितुष्ट आहे. एकंदरीत शांत जीवनपद्धतीमुळे इथल्या आधीच्या राजाने, १९७२ साली विकास मोजण्याचा एक वेगळाच प्रकार शोधला आणि त्याला नाव दिले, "Gross National Happiness"!

नेपाळी स्थलांतरीत - गरज आणि अडचण


आम्हाला आमच्या देशात जाऊ दे - नेपाळ मधील भूतानी निर्वासित

एक सतराव्या शतकाचा थोडा काळ सोडला तर विसाव्या शतकाच्या सुरवातीपर्यंत नेपाळी स्थलांतरीतांनी भुतान मधे कधी प्रवेश केला नव्हता. मात्र विसाव्या शतकाच्या पहाटेस सरकारी कंत्राटदारांनी दक्षिणेकडील जंगलाचा भाग साफ करून शेतजमीन तयार करण्यासाठी म्हणून नेपाळींना मजुरीवर आणले. त्यावेळेस आलेले कामगार बघता बघता तेथेच स्थायीक झाले आणि दक्षिणेकडील भागातील नवीन भुतानी प्रजा म्हणून सामावून गेले. फक्त एका बाबतीत हे सहजीवन कमी पडत होते आणि ते म्हणजे धर्माच्या बाबतीत. दक्षिणेतील नवभुतानी जनता ही हिंदू धर्म मानणारी होती तर उर्वरीत भुतानी जनता आणि राजसत्ता ही बौद्ध परंपरेतील. पर्यायाने या नवीन प्रजेस पुर्ण हक्क मिळत नव्हते. पण सुदैवाने हे १९५८ साली बदलले आणि या पुर्वीच्या नेपाळींना पूर्ण नागरीकत्व देण्यात आले. नंतरचा काही काळ हा दोन संस्कृतींना एकत्र आणण्यात गेला. वास्तवीक भारत-नेपाळ-भुतान या तीन देशांमधे वीना कागदपत्रे अथवा औपचारीकता न ठेवता जाणे-येणे हे कित्येक शतके चालू होते. नेपाळी मजुरांचे पण येथे येणे आणि वसणे असेच चालू राहीले. मात्र १९७०-८०च्या काळात दक्षिणेतील वाढलेल्या नेपाळी संख्येस पहाता त्याने स्थानीक जनतेच्या राहणिमानावर परीणाम घडेल असे राजाला वाटू लागले आणि त्याने १९८८ साली वटहुकूम काढून नेपाळी वंशाच्या जनतेला ते अधिकृतपणे भुतानमधे आले हे सिद्ध करणे जरूरीचे केले. जर तसे कोणी सिद्ध करू शकले नाही तर त्यांना अगदी १९५८च्या कायद्याप्रमाणे जरी नागरीकत्व मिळाले असले तरी ते रदबातल करायची व्यवस्था केली. त्याच बरोबर अजून भुतानची बौद्ध संस्कृती ही सगळ्यांनी मानणे क्रमप्राप्त केले. नेपाळींना शिकवणार्‍या संस्कृत आणि हिंदू धार्मिकशाळा बंद केल्या. इतकेच काय राजवंशाची वेषभुशा ही पण सगळ्यांसाठी नियमाने सक्तीचे केले. "One Nation One People" धोरणांतर्गत, जर कोणी उत्तरेकडील भुतानी रहीवाश्यांसारखे कपडे घातले नाहीत तरी देखील गुन्हा ठरू लागला. त्यातून सामान्य जनांचे हाल चालू झाले. अर्थातच यामुळे स्थानीक नेपाळी जनता अस्वस्थ होऊ लागली.

१९९० मधे निदर्शने झाली. त्याला सरकारी प्रत्युत्तरे म्हणून अटकसत्र आणि त्यात अडकलेल्यांचे कायद्याच्या बाहेर राहून हाल चालू झाले. १९९२ पर्यंत अनेक दक्षिणेकडील नेपाळी वंशाचे भुतानी बघता बघता निर्वासीत झाले. भारत सरकारने निर्वासीतांना येण्यापासून प्रबंधीत केले. पर्यायाने त्यांना केवळ नेपाळ राहीले. एका पिढीतील या जनतेच्या देशासाठी त्यांचीच दुसरी पिढी ही परकीय होती... शेवटी संयुक्त राष्ट्रसंधाच्या मध्यस्थीने नेपाळने या निर्वासीतांसाठी छावण्या उभारल्या. त्या छावण्यांच्या अंतर्गतच राहण्याची सक्ती या निर्वासीतांना होती. असे एक दशकाहून अधिक काळ राहील्यावर आणि "आम्हाला आमच्या देशात (भूतानमधे) जाउंद्यात" ही मागणी पूर्णपणे मान्य होत नाही पाहील्यावर विरोध आणि उद्रेक वाढू लागला. त्यावेळेस अमेरिका आणि इतर काही प्रगत राष्ट्रांनी काही निर्वासीतांना त्यांच्या त्यांच्या देशात सामावून घेण्याचे ठरवले.

अमेरिकेत आल्यावर...

अमेरिकेन सरकार जेंव्हा निर्वासीतांना येण्यास परवानगी देते तेंव्हा अर्थातच त्यांच्या अटी आणि नियम मान्य केल्यावरच. त्या आधी आलेल्या अनुभवांच्या तुलनेत किंबहूना अजिबातच जाचक नसतात पण त्यात "कोरडा मानवतावादी दृष्टीकोन" असतो. कोरडा अशासाठी कारण सामान्य माणसाचे जीवन हे काही निव्वळ स्टेट डिपार्टमेंट अथवा इतर सरकारी खात्यांचे व्यवहार नसतात तर त्यात भावना देखील असतात. पूर्णपणे वेगळ्या वातावरणात वाढून नंतर स्वतःचे रोपटे दुसरीकडे लावणे आणि परत नव्या दमाने वाढवणे हे तितकेसे सोपे नसते. एकांतवासात पंधराएक वर्षे जगल्यावर एकदम अधुनिक देशात येऊन असे जगू लागणे हे भुतानी विस्थापितांना अवघडच जाणार होते. तरी देखील सरकार शक्यतोवर कुटूंबे, नातेवाईक एकत्र राहतील का याचा प्रयत्न करतात, सुरवातीचे चार एक महीने राहता येईल का याची सोय करतात. पण बाकी ६०००० लोकांना एका ठिकाणी ठेवणे शक्यच नसते तेंव्हा त्यांना या खंडप्राय देशाच्या विविध कानाकोपर्‍यात विभागून टाकण्यात आले...

एकीकडे किमान विस्थापित म्हणून राहणे तरी संपलेले तर दुसरीकडे भूतानला परतण्याच्या आशेवर पाणी, अशा आशा-निराशेच्या खेळात वेगळा देश, भाषा, संस्कृती आदींनी ही जनता हवालदील झाली होती. मात्र अचानक जॉर्जिया राज्यातील काही सेवा इंटरनॅशनल युएसए ("सेवा") च्या कार्यकर्त्यांना कोणी तरी संपर्क साधून या स्थानिक विस्थापितांना मदत करता येईल का म्हणून विचारले. कधी भारतात अथवा कॅरेबिअन, श्रीलंका आदी देशात मदत कर तर कधी अमेरिकेतील कट्रीनासारख्या आपत्तीत हातभार लाव अशा एकीकडे स्वतःचे करीयर करत असताना दुसरीकडे काहीतरी समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करणार्‍या या संघटनेतील कार्यकर्त्यांना हे आव्हान वाटले आणि त्यातून "भूतानी विस्थापीत पुनरज्जीवन" प्रकल्प जन्माला आला. या प्रकल्पाचा आवाका हा आत्तापर्यंत केलेल्या समाजकार्यापेक्षा खूपच वेगळा होता. इतर वेळेस मदत करताना त्यामधे अनेक सेवाभावी संघटना, सरकार यांची सहज मदत होते कारण त्यात एकदम धक्का देणारी आपत्ती दिसत असते अथवा जो काही विकास होत असतो, तो हळू हळू होणार हे गृहीतच असते. इथे मात्र प्रकरण वेगळे होते. सरकारने सुरवातीची मदत जरी नक्की केली असली तरी कायम स्वरूपी सारखी मदत करणे कुठल्याच सरकारला शक्य नसते. सेवाभावी संघटनांची मदत मिळवायची झाली तर स्थानिक पातळीवर संख्या विखुरलेली म्हणून त्याची गरज कळणे अवघड आणि संस्कृतीक फरक. त्यातही जरी मिशनरी सेवाभावी संघटनांनी मदत करायची ठरवली तरी यांना स्वतःची संस्कृती सोडायची अजिबातच तयारी नाही. जर इतके वर्ष बौद्ध धर्म म्हणून स्विकारू शकत नाही म्हणून जर ही वेळ येऊन परक्या देशात यावे लागले आणि आता धर्म बदलला तर मग इतक्या वर्षांचा अट्टहास एका अर्थी कशाला केला हा प्रश्न... त्यात अजून एक आव्हान होते म्हणजे या साठी देणग्या गोळा करायचे - भुतानबद्दल तुम्हा-आम्हाला काय माहीती असते म्हणून भुतानी विस्थापितांना मदत करणार? ....

 

पुढे: पृष्ठ २