विस्थापितांना सुस्थापित करणारा एक प्रकल्प

सेवाविषयी थोडक्यात...


सेवा इंटरनॅशनल

'नरसेवा हीच नारायणसेवा' हे ध्येय ठेवून, १९९१ साली लंडनमधे 'सेवा इंटरनॅशनल' ही सेवाभावी संस्था चालू करण्यात आली. बघता बघता तिचे जाळे १५ देशांत त्या त्या देशांतील संलग्न संस्थामार्फत पसरले. अमेरिकेत 'सेवा इंटरनॅशनल युसएसए' ही २००३ साली येथील आयकर खात्याच्या ५०१(c)(३) खाली विनानफा तत्त्वावर चालणारी सेवाभावी संस्था म्हणून नोंदवण्यात आली. 'सेवा इंटरनॅशनल भारत' ह्या भारतीय संघटनेशी सेवा संलग्न आहेच आणि तिच्यामार्फत १५,००० सेवाभावी कार्यकर्ते आणि ८० विविध कार्यक्रम/योजना यांद्वारे कुठली आपत्ती नसताना कार्यरत असते. अर्थातच आपत्तीच्या वेळेस ही चक्रे बदलावी लागतात. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या दोन राज्यांत आत्ता आलेल्या पुरात जी मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे, त्याला तोंड देण्यासाठी असेच काम सध्या चालू आहे. हे सर्व काम येथील सेवाभावी कार्यकर्ते स्वतःचा वेळ खर्च करून कुठल्याही मोबदल्याविना करत असतात. उदाहरणच जर द्यायचे झाले तर रेडक्रॉसला दिलेल्या $१ मधील जवळपास $०.७० हे त्यांच्या कार्यालयीन खर्चात जातात. या उलट सेवाचे फार फार तर $०.०२/०.०३ (२-३ सेंटस) जात असतील.

भूतानी विस्थापित पुनरुज्जीवन प्रकल्प (BRE)

तर अशा या पूर्वपीठिकेवर "सेवा" ने BRE प्रकल्प चालू केला. हेतू असा की, या समाजाला परत स्वतःच्या पायावर उभे रहायला मदत करायची. यांचे प्रश्न हे जसे आर्थिक होते तसेच ज्या भागात रहात आहेत तेथे असलेल्या हवामानात जुळवून घेण्याचे होते. इंग्रजी शिकणे, संगणक, आंतरजालाचा उपयोग, त्यातून कामे शोधणे आदी शिकणे क्रमप्राप्त होते. त्यातच कधी कुठे जन्म आणि कुठे मृत्यू तर कधी कधी आजारपणे, तंटे-बखेडे या सर्वच मानवी अनुभवांना तोंड देत पुढे जाणे व शिकणेही महत्त्वाचे होते.


संयमाने आनंद दाखवणारे भूतानी निर्वासित

तरीदेखील एक कौतुकास्पद गोष्ट या लोकांत दिसून आली, ती म्हणजे सतत हसतमुख राहणे आणि अगतिकता न दाखवणे. न्यू हँपशायर राज्यात आलेल्या अशाच निर्वासितांना भेटायला म्हणून गेलेल्या सेवाच्या कार्यकर्त्यांनी, त्यांना काय मदत हवी म्हणून विचारले. त्याला उत्तर देताना हसत म्हणाले, "आता सर्व खुशाल आहे. फक्त देवळात जाऊन अनेक महिने/वर्षे लोटली. देवळात घेऊन जाता येईल का?" अर्थात दोन बसेस करून तशी व्यवस्था करण्यात आली. जवळच्या स्वामीनारायण मंदिरात तसेच साईबाबा मंदिरात जाणार्‍या भक्तांनी त्या दिवशी त्यांचा फक्त पाहुणचार नाही केला, पण नंतर त्यांच्या मदतीलाही उभे ठाकले.

आजतागायत जॉर्जिया, टेक्सस, न्यू हँपशायर, मॅसॅच्युसेट्स, ओहायो, अ‍ॅरिझोना, कॅलिफोर्निया, ऑरेगन, केंटकी आदी राज्यांत सेवाच्या कार्यकर्त्यांनी या विस्थापितांना सुस्थापित करण्याचा चंग बांधला होता आणि अजूनही हे कार्य चालू आहे. अर्थात जसजसे या विस्थापितांपैकी कोणी स्वतःच्या पायावर उभे राहत आहेत, तसतसे ते एकमेकांना मदत करायला पुढे येत आहेत. सेवाच्या सहकार्याने त्यांना अनेक गोष्टी दिल्या: आर्थिक मदत, कडक थंडीत लागणारे कपडे, संगणक, शिक्षण, नोकरी मिळवून देण्यासाठीची मदत, सुरुवातीस गाडीने जा-ये, नंतर गाडी शिकवणे, वाहनपरवाना मिळवून देणे, त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करणे इ. इ.


नव्या जगात नव्या जोमाने

आता अनेक ठिकाणी यातील काही जण मोलमजुरीपासून सर्व प्रकाराच्या कामात सहभागी होऊ लागले आहेत. स्वत:च्या कुटुंबियांना परत नवं जीवन देऊ लागले आहेत. तरीही बर्‍याच जणांची भूक शेती करण्याची होती, कारण पिढ्यानपिढ्या भूतानमध्य ते शेतीच करत आले होते. मात्र ती स्वत:च्या जमिनीवर. येथे काहीच नाही अशी अवस्था. क्लिव्हलंड, ओहायो येथे आलेल्या काही विस्थापितांनी हे तेथील स्थानिक प्राध्यापक आणि 'सेवा इंटरनॅशनल युएसए' चे अध्यक्ष डॉ. श्रीनाथ यांना बोलून दाखवले. तात्काळ डॉ. श्रीनाथ यांना त्यांच्या माहितीतील एक स्थानिक शेतकरी आठवला, ज्याला त्याच्याकडची शेतजमीन भाडेपट्टीवर द्यायची होती. आता तेथील भूतानी निर्वासित त्या शेतकर्‍यासाठी काम करू लागले आहेत. हे यश पाहून, बघता बघता ७० भारतीय कुटुंबियांनी समभाग घेऊन या भूतानींसाठी पुढील वर्षातील बियाणे आणि लागणारी अवजारे इ. घेण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. 'ख्रिश्चन सायन्स मॉनिटर' या दैनिकाच्या मते यातून लवकरच ते स्वत: जमीन घेऊ शकतील आणि स्वत:च्या पायावर उभे राहू शकतील.

एकंदरीत...

असा प्रश्न सहज पडू शकतो की यातून नक्की काय मिळते? नुसतेच स्वान्त:सुखाय? अर्थातच नाही. या प्रश्नाचे उत्तर हे जसे तात्त्विक आहे, तसेच व्यावहारिकही. त्यात बरेच काही बोध घेण्यासारखेही आहे. सेवाचे उद्दिष्टच 'नरसेवा हीच नारायणसेवा' असे आहे. मला येथे स्वामी विवेकानंदांचे कर्मयोगावरील एका लेखातले वाक्य आठवते: "Let us give up all this foolish talk of doing good to the world. It is not waiting for your or my help; yet we must work and constantly do good, because it is a blessing to ourselves. That is the only way we can become perfect." थोडक्यात आपण इतरांना मदत करत असताना नकळत स्वतःला देखील मदत करत असतोच. कधी कधी ही मदत आधी म्हटल्याप्रमाणे स्वान्तःसुखाय म्हणू असते, तर कधी तत्वे पाळण्याच्या बाबतीत असू शकते. काही जणांच्या बाबतीत निव्वळ कर कमी होण्याची देखील असू शकते! पण याहूनही एक वेगळी मदत अशा गोष्टींमधून आपण सामुदायिकपणे समाजालाही करत असतो आणि कुठेतरी स्वामीजींनी म्हटल्याप्रमाणे 'पर्फेक्शन'च्या मार्गावर चालत असतो.

जेव्हा भारतात चांगल्या कामासाठी पैसे पाठवण्याबरोबरच स्थानिक समाजकार्यातही आपण रस घेत असतो, तेव्हा नकळत आपण आपल्यातील आठवड्याच्या ८ ते ५ च्या बाहेर असलेले बळ आणि कर्तृत्व येथील समाजापुढे, स्थानिक ते केंद्रीय नेतृत्वापुढे ठेवत असतो. विस्थापितांना स्वबळावर उभे करायला कधी मदतीचा वेळ वाढवा तर कधी कुणा संस्थेस अनुदान देऊन कामे करून घ्या यासारख्या गोष्टी स्टेट डिपार्टमेंट तसेच इतर केंद्र/राज्य/स्थानिक सरकारी खात्यांना; या ना त्या रुपाने कराव्या लागतात. पण भूतानींना सुस्थापित करताना एक संघटना उभी राहते आणि ज्या समाजातून ती तयार झाली आहे; प्रामुख्याने त्या समाजाच्या मदतीने एक नागरी कर्तव्य पार पडते. ह्याचा उपयोग केवळ भूतानी विस्थापित, सरकार किंवा सेवा आणि दानशूर व्यक्तींनाच नुसता नसतो तर कुठेतरी सगळ्या स्थलांतरित भारतीय समाजालाही होत असतो.

आज सेवाने त्यांच्या सक्रिय मदतीने, पर्यायाने भारतीयांचे अमेरिकेत स्वत:च्या समाजाबाहेर असलेले एक आगळेवेगळे योगदान दाखवून दिले आहे. अशी नक्की आशा करतो की ही केवळ सुरूवात आहे. यातूनच पुढे स्थानिक पातळीवर, संकटात मदत आणि शांततेत विकास घडवून आणण्यासाठी भारतीय आणि त्यांच्या विविध संस्था कार्यरत होऊन आपल्या समाजाचे म्हणून एक आदरणीय स्थान निर्माण करतील.

- विकास देशपांडे

संदर्भ:

http://features.csmonitor.com/gardening/2009/09/28/bhutanese-refugees-fi...

http://www.sewausa.org/life-refugee-camp

http://www.bhutaneserefugees.com/timeline.php
IDOC internazionale, Volumes 24-25

 
समाप्त

 
विकास देशपांडे हे बॉस्टन, अमेरिका येथे राहतात. स्थापत्य, पर्यावरण, सातत्य (सस्टेनेबिलीटी), ऊर्जा या विषयात त्यांचे काम असून. वाड्मय, लेखन, राजकारण आणि समाजकारण हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. अमेरिकेत ते भारतीय संस्कृती, भाषा आणि सामाजिक सेवेच्या कामांशी संबंधीत संस्थात सक्रीय असतात. तसेच पर्यावरण विषयक, उद्यमशीलता, सामाजिक उद्यमशीलता या संदर्भातील विविध सामाजिक उपक्रमात देखील ते सक्रीय आहेत.

Comments

माहितीपूर्ण लेख

शिर्षकावरुन धरणात जमिनी गेलेल्या लोकांचे प्रश्नावर काय तोडगा असेल असे वाटले होते.
असो, भुतानमधी विस्थापितांचे प्रश्न आणि त्यांच्यासाठी काम करणा-या संस्थां, या बद्दलची
एक चांगली ओळख, एक आशादायी लेख..!!!

माहितीपूर्ण लेखाबद्दल लेखकाचे आभार...!

-दिलीप बिरुटे

माहिती

भूतान ह्या देशा बद्द्ल बरीच चांगली माहिती वाचायला मिळाली. भूतान वासियांचे प्रश्नेपण समजलीत