टॅटू - एक कायमस्वरुपी शृंगार
भाग १
"मला माझ्या दंडावर सिंहाचे तोंड गोंदवून घ्यायचे आहे. " काही वर्षांपूर्वी माझ्या एका मित्रवर्यांनी आपली इच्छा सहजच माझ्यासमोर मांडली.
"ईईईईव! हे काय भलतंच. नसती फ्याडं सुचतात एक एक. जंकी, ड्रगी, हिप्पी, फ्याशनच्या जगतातील काही बिघडलेले कलावंत यांच्याखेरीज कोणीही टॅटू लावत नाहीत. अमेरिकेत एखादे फ्याड निर्माण झाले की लग्गेच आपण त्याचे कित्ते गिरवायलाच हवेत, नाही का? आपल्या अंगावर काहीतरी कोरून घ्यायचे, त्याचे साइड इफेक्ट्स, इन्फेक्शन झाले तर पंचाईत. एडसचा बागुलबुवा आहेच वर. आपल्या कातडीत सुया टोचून रंग खुपसून घेण्याचा रानटीपणा आणि त्यातून काही वर्षांनी आपण कसला मूर्खपणा करून बसलो असे वाटले तर पश्चात्ताप करत बसायचं. तो टॅटू पुसून टाकणे इतके सोपेही नाही. " मी तोंड सोडले आणि त्या दटावणीमुळे बहुधा त्यांची इच्छा तिथेच विरून गेली आणि त्यांनी हलक्या सुरात केलेली तक्रारही.
"ठीक आहे नाही लावून घेत टॅटू पण ते जंकी, हिप्पींचे संदर्भ जरा चुकताहेत असे वाटत नाही का आणि आपल्याकडील लहान मुलांचे कान-नाक टोचण्याच्या रानटीपणाबद्दल काय वाटते? "

अँजेलिना जोलीच्या पाठीवरील प्रसिद्ध गोंदवण
त्यानंतर अनेक वर्षे अनेक प्रसंगांतून हे टॅटू कोणत्यानं कोणत्या प्रसंगांतून डोळ्यासमोर येत राहिले. एखाद्या बाईच्या कपाळावर गोंदवलेली चंद्रकोर, हातावर गोंदवलेले हिरवट निळसर नाव, भटक्या जमातीतील स्त्रियांच्या हातावर आणि पायांवर गोंदवलेली नक्षी, दिवारमधल्या अमिताभच्या हातावरील "मेरा बाप चोर है।" हे गोंदवण, नाझी कॅंपमधील कैद्यांच्या हातावर गोंदवलेले क्रमांक, बेकहॅमचा हातावर कोरलेला देवनागरी लिपीतील व्हिक्टोरिया या बायकोच्या नावाचा टॅटू, ऍंजेलिना जोलीच्या पाठीवरील ख्मेर लिपीतील संस्कृत श्लोक, बेकहॅमचा कित्ता गिरवून सैफने हातावर कोरून घेतलेल्या करिनाच्या नावाच्या टॅटूची वदंता, मायकेल स्लेटरच्या छातीवरील ३५६ हा नंबर, हल्लीच आलेल्या गजीनीमधील अंगावर गोंदवून आपली स्मरणशक्ती काबूत ठेवण्याचा आमीरने अवलंबलेला मार्ग आणि रस्त्यावर, मॉलमध्ये, कार्यालयात दिसणाऱ्या असंख्य जनतेने अंगावर ल्यालेला हा कायमस्वरुपी शृंगार कधीना कधी नजरेस पडतोच. अगदी, आताच प्रकाशित झालेल्या डॅन ब्राऊनच्या "द लास्ट सिम्बॉल" या कथानकामध्येही टॅटूंना विशेष महत्त्व आहे.
टॅटूइंग किंवा गोंदवणे या कलेबद्दल टोकाचे विचार मांडणार्या अनेक व्यक्ती भेटतात. आपले अंग टोचून कायमस्वरुपी रंगवण्याविषयी नाराजी व्यक्त करणारी माझ्यासारखी माणसे किंवा टॅटू लावणे "कूल" आहे म्हणून दिमाखात आपल्या अंगावरचे गोंदवण मिरवणारे. या टॅटूंविषयी सामोआ या पॉलिनेशियन बेटावरील भाषेत एक म्हण आहे - एकवेळ तुमच्या शरीरावरील दागिना मोडून तुमची साथ सोडण्याचा संभव आहे पण गोंदवण तुमची साथ कबरीपर्यंत करेल.

गजीनीमधील आमीरची गोंदवणे
लोकप्रिय किंवा पॉप संस्कृतीत अंगावर टॅटू गोंदवणे हे आत्मप्रकटनाचे किंवा स्वत:ला व्यक्त करण्याचे साधन समजले जाते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत शरीर रंगवण्याची ही कला अनेकांना भुरळ घालते. प्रदर्शने, आर्ट-गॅलरीज, संग्रहालये अशा अनेक माध्यमांतून गोंदवण्याच्या या कलेला प्रचंड प्रसिद्धी मिळालेली आहे. एखाद्यावरील आपल्या निःसीम प्रेमाची ग्वाही देण्यासाठी, जीवनात झालेले अचानक झालेले चांगले-वाईट बदल, प्रिय व्यक्तीचा विरह किंवा मृत्यू, ईश्वरावरील किंवा सुष्ट आणि दुष्ट शक्तींवरील श्रद्धा किंवा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, दुष्ट किंवा तांत्रिक शक्तींपासून संरक्षण मिळावे म्हणून आणि अशा नानाविध घटना आणि कारणांना व्यक्त करण्यासाठी टॅटू हा एक मार्ग समजला जातो. या प्रक्रियेत वेदना सामावली असल्याने टॅटू हे शौर्य आणि धीराचे प्रतीक असल्याचेही मानले जाते. पाठीवर किंवा स्त्रियांच्या मानेमागे गोंदवलेले नाजूकसे फूल किंवा फुलपाखरू, पायाच्या घोट्यावर गोंदवलेले असेच एखादे नाजूकसे चिन्ह किंवा पुरुषांच्या दंडावर, छातीवर गोंदवलेले प्राण्यांच्या चेहऱ्यापासून ते ग्रीक आणि चिनी भाषेतील मुळाक्षरांपर्यंत चिन्हे वगैरे हे समोरच्याला आकर्षित करण्यासाठी करवून घेतलेले असतात. यांतील काही चिन्हांचा परामर्श लेखात पुढे घेऊच. गोळ्या आणि चॉकलेट्समधून मिळणारे टॅटूंचे तात्पुरते स्टिकर्स आणि या वेडाचा फायदा घेऊन च्युईंग गम किंवा फ्रूटबार खाऊन जिभेवर तात्पुरते टॅटू उमटवण्याचा प्रयोग यांतून टॅटूंची कला लहान मुलांतही प्रसिद्धी पावली आहे.
प्राचीन काळापासून शृंगाराचे मानवाला वेड असल्याचे अनेक पुरावे देता येतात. हस्तिदंती फण्या, अत्तराच्या आणि काजळाच्या कुप्या, सुगंधी तेले, लेप, रंग यासारख्या सौंदर्य खुलवणार्या साधनांचे आणि कायमस्वरुपी शारीरिक शृंगार म्हणता यावे असे कान, नाक किंवा शरीराचे इतर भाग टोचणे, अंग गोंदवणे यांचेही मानवाला आकर्षण असल्याचे सिद्ध झाले आहे. भारतात हातावर, पायांवर आणि शरीराच्या अन्य भागांवर मेंदीची नक्षी काढणे ही देखील टॅटूसदृश कला मानली जाते. शाईने गोंदवण्यासारखी ती कायमस्वरुपी नसते एवढेच. अन्यथा, परदेशांत मेंदीला इंडियन टॅटू या नावाने सर्रास संबोधले जाते. मेंदीच्या नक्षींचे डाय वापरून अंग रंगवण्याची कलाकुसरही प्रसिद्ध आहे. इजिप्त, लिबियापासून भारतापर्यंत सर्व प्रदेशांत गेली हजारो वर्षे धार्मिक, सांस्कृतिक कार्यांत मेंदी लावण्याची प्रथा जोपासलेली आहे. भारतात मेंदीला सौभाग्यलंकार मानले जाते.
नवपाषाणयुगातील सुमारे ५३०० वर्षांपूर्वी सापडलेल्या ऑत्झी या आदिमानवाच्या पाठीवर पट्ट्याप्रमाणे गोंदवलेल्या लहान रेषांचा समूह आणि पायांवर गोंदवलेली काही चिन्हे हे टॅटूचे जगातील सर्वात आद्य उदाहरण मानले जाते. इटली आणि ऑस्ट्रिया यांच्या सीमेवर आल्प्स पर्वतात सापडलेल्या या मृतदेहाच्या अंगावर मोजून ५७ गोंदवल्याच्या खुणा सापडल्या आहेत. या गोंदवणांचे ऑत्झीच्या शरीरावरील स्थान ऍक्युपंक्चर पॉईंटसपाशी असल्याने कदाचित शारीरिक उपचार म्हणूनही ही गोंदवणे केलेली असावीत असा एक मतप्रवाह दिसतो. प्राचीन इजिप्त आणि लिबियामध्ये सापडलेल्या ममींच्या शरीरांवरही गोंदवल्याच्या स्पष्ट खुणा दिसून येतात.
पुढे: पृष्ठ २