टॅटू - एक कायमस्वरुपी शृंगार
भाग २
प्राचीन संस्कृतीत गोंदवून घेण्याची कारणे मात्र निराळी असावीत असा तर्क मांडला जातो. धार्मिक विधी म्हणून, ईश्वराशी जवळीक साधण्यासाठी, एखादा ताईत किंवा मंत्र म्हणून, त्यागाच्या भावनेतून, आपण एका कबिल्याचे, जमातीचे आहोत हे ठसवून देण्यासाठी, गुलामांची-दास्यांची ओळख पटवण्यासाठी किंवा शिक्षा म्हणूनही अंग चिन्हांकित करण्याची प्रथा अस्तित्वात आली असावी.

इजिप्शियन ममीच्या बोटांवरील टॅटू
टॅटू हा शब्द पाश्चिमात्य जगतात प्रथम आला तो पॉलिनेशियन बेटांमधील ताहिती येथील भाषेतून. कॅप्टन जेम्स कूक हा ब्रिटिश रॉयल नेव्ही मधील प्रसिद्ध नाविक होता. त्याने पॉलिनेशियन बेटांना दिलेल्या भेटींत अंग गोंदवलेली माणसे प्रथम पाहिली आणि इथूनच टॅटू हा शब्द आणि कला दोन्ही युरोपात शिरल्या. ताहितियन भाषेतील या शब्दाचा मूळ अर्थ फराटे मारणे असा होतो. इ. स. पूर्व १२०० पासून पॉलिनेशियन संस्कृतींमध्ये टॅटूंना स्थान असल्याचे दिसते. हाडे तासून त्याच्या सुया आणि काजळाचा वापर करून गोंदवण्याची प्रक्रिया केली जात असे. न्यूझीलंडमधील माओरी जमातीत तोंडावर गोंदवणे हे भाग्याचे लक्षण मानले जाते आणि गोंदवणावरून माणसाचे समाजातील स्थान ओळखण्याची पद्धत होती. मायन संस्कृतीत ईश्वराशी जवळीक साधण्यासाठी आणि धार्मिक रीतिरिवाज म्हणून गोंदवण्याची पद्धत होती. जपानमध्येही गोंदवण्याची कला फार प्राचीन समजली जाते आणि गोंदवण्याचे पहिले पुरावे इ. स. पूर्व ३००० मधील आढळतात.
ख्रिस्ताचा क्रूस, भळभळा वाहणारे हृदय, अनेक सांस्कृतिक आणि धार्मिक चिन्हे, आद्याक्षरे, नावे आणि असे अनेक टॅटू प्रत्येकाने आजवर पाहिले असतील परंतु टॅटूंच्या या विविध नक्षींना अर्थ असतो किंवा त्यातून एखादी भावना व्यक्त केलेली असते. काही प्रसिद्ध नक्षींबद्दल थोडक्यात माहिती पाहू:
जहाजाचा नांगर: जहाजाचा नांगर हे सावधानतेचे आणि सुरक्षिततेचे निशाण मानले जाते. खलाशी आणि जहाजावरील इतर कर्मचार्यांच्या मते नांगर हे जहाजाला बुडण्यापासून वाचवणारे सुचिन्ह आहे.

जहाजाचा नांगर
फुलपाखरू: फुलपाखरू हे माणसाच्या आत्म्याशी संबंधीत असल्याचे मानले जाते. आनंद, तारुण्य व्यक्त करण्याचे चिन्ह म्हणूनही फुलपाखराचा वापर केला जातो.
गुलाब: हे निःसीम प्रेमाचे प्रतीक मानले जाते तसेच सौंदर्य आणि निकोपतेचे चिन्हही. प्रेमाची आणि सौंदर्याची रोमन देवता व्हीनस हिचे प्रतीक म्हणून गुलाबाचे गोंदवण केले जाते.
सर्प: साप आपली कात टाकून नवा जन्म धारण करतो या भावनेतून साप किंवा नाग यांचे गोंदवण हे अमरत्वाशी संबंधीत मानले जाते. साप हे शक्तीचे प्रतीकही मानले जाते.
सिंह: सिंह हा वनाचा राजा मानला गेल्याने सिंहाचे चिन्ह हे पुरुषत्वाचे, शौर्याचे, विजयाचे आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते.
मासा: मासा हे प्राचीन ख्रिश्चन संस्कृतीचे प्रतीक ख्रिस्ताशी संबंधीत असल्याने माशाच्या रेखाकृतीला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे.
ड्रॅगन: मानवाला भीती वाटेल असे आग ओकणार्या किंवा पंख विस्तारलेल्या ड्रॅगनचे गोंदवण हे भीतीवर मात केल्याचे किंवा संकटातून पुढे जाण्याचे चिन्ह मानले जाते.
सूर्य, चंद्र, तारे: सिंहाप्रमाणेच सूर्य हे देखील पुरुषत्वाचे, शौर्य आणि विजयाचे प्रतीक मानले जाते तर चंद्रकलांचा वापर जीवनातील टप्पे दाखवण्यासाठी केला जातो आणि चांदण्या हे आशेचे आणि आत्मिक आनंदाचे प्रतीक मानले जाते.
अग्नी: अग्नी हे जीवनाचे प्रतीक मानले जाते. जीवनातील चांगल्या-वाईट क्षणांची आठवण म्हणून या गोंदवणाचा वापर होतो.
पक्षी: पक्षी हे प्रेमाचे, शांततेचे, ज्ञानाचे, आशेचे आणि आत्मसाक्षात्काराचे प्रतीक मानले जाते.
लहान-मोठ्यांपासून सर्वांना आकर्षित करणार्या या टॅटूंबरोबर आरोग्याची सुरक्षितता आणि त्यामागील धोक्यांचे आकलन हे अतिशय महत्त्वाचे आहे हे या ठिकाणी विसरून चालणार नाही. शरीरात किंवा त्वचेत सुया खुपसण्यातून अनेक त्वचारोग, टीबी, हेपॅटॅटिस आणि HIV ची आणि इतर रोगांची लागण होण्याची शक्यता असते . अमेरिकेत टॅटू स्टुडिओ उघडण्यासाठी विशेष परवानापत्र लागते तर सरकारमान्य नसलेल्या स्टुडियोंतून टॅटू लावून घेतल्यास त्या व्यक्तीस पुढील १२ महिन्यांपर्यंत रक्तदानाची मुभा नसते. टॅटू गोंदवणारी व्यक्ती कायद्याने सज्ञान असण्याची अट घातलेली आढळते किंवा काही वेळेस पालकांच्या परवानगीने टॅटू करवून घेता येतो. केवळ आरोग्यविषयक कारणांसाठीच नाही तर बर्याचदा असा वैयक्तिक निर्णय भविष्यात चुकीचा वाटू शकतो आणि म्हणून हा निर्णय घेताना सावधानता बाळगणे गरजेचे आहे.
गेल्या आठवड्यात एका मिटिंगमध्ये ग्रेग नावाचा एक अतिशय बुद्धिमान आणि कर्तबगार सहकारी प्रोजेक्टमधील काही महत्त्वांच्या घटकांवर समरसून चर्चा करत होता. कामाचे काही पेपर्स माझ्या दिशेने सरकवताना त्याच्या शर्टाची बाही थोडी वर सरकली आणि त्याच्या दंडावरील राखेतून जन्म घेणारा लाल-निळा फिनिक्स पक्षी माझी नजर वेधून गेला हे त्याच्या लक्षात आले.
“आय ऍम फिनिक्स,” ग्रेग मंद हसत कुजबुजला आणि एका लेखाचा जन्म झाला.
संदर्भ :
बॉडी पिअर्सिंग ऍंड टॅटूज - जे. डी. लॉयड
द बॉडी आर्ट बुक - जीन-क्रिस मिलर
टॅटू - इंग्रजी विकिपीडिया
चित्रे:
अँजेलिना जोली - www.dailymail.co.uk येथून साभार.
गजीनीमधील आमीरचे चित्र - विकिपीडियावरून
इजिप्शियन ममीचे चित्र - www.smithsonianmag.com येथून साभार.
जहाजाचा नांगर - www.tatsandtags.com येथून साभार.[