रतन टाटा
ठरलं म्हणजे ठरलं, वचन म्हणजे वचन (a promise is a promise )!! ऑटोएक्स्पो २००८ या भारतातील वाहन आणि वाहन व्यवहार संबंधीत महामेळाव्यात एक लाखाची नॅनो जगासमोर सादर करताना, रतन टाटांनी काढलेले हे उद्गार आहेत. नॅनो बद्दल बरेच काही, लिहून बोलून झाले आहे. नॅनो हे रतन टाटांनी सत्यात आणलेले वाहन क्षेत्रातले दुसरे स्वप्न.
पहिले कोणते? सांगतो. असेच एका कार्यक्रमात रतन म्हणाले होते की आम्ही अशी गाडी तयार करू, जी दिसण्यामध्ये मारुती झेन सोबत, अतंर्गत जागा आणि आराम यासाठी अँबेसिडॉर सोबत आणि किमती मध्ये मारुती ८०० सोबत स्पर्धा करेल. नॅनो सादर होण्याआधी लोकांनी ज्या प्रमाणे त्या संबंधीत गोष्टी हास्यास्पद ठरवल्या होत्या, त्याप्रमाणेच पूर्वी सुद्धा झाले होते. असे होऊन सुद्धा हि दोन्ही स्वप्ने सत्यात उतरवण्याची किमया रतन टाटांनी केली आहे. रतन टाटांचे हे उद्गार होते १९९५ दरम्यानचे. या काळात भारतीय वाहन बाजारपेठेत आणि लहान गाड्यांच्या श्रेणीत फक्त आणि फक्त मारुती उद्योगच्या मारुती ८०० या सर्व अंगांनी छोट्या गाडीचे राज्य होते. आपल्या सारख्या सर्वसामान्य माणसाने चारचाकी घेतली असे सांगितले की न विचारता उत्तर ठरलेलेच होते. मारुती ८००. क्वचित एखादी वेगळी गाडी म्हणजे फियाट उनो.
बाजाराची अवस्था इतर अभारतीय कंपन्यांनी आधीच ओळखली होती. देवू (आता जनरल मोटर्स), ह्युंदाई या सारख्या कोरियन कंपन्यांनी आपापली उत्पादने भारतात आणण्याचे पण केले. फियाटने सुद्धा आपले नवे उत्पादन भारतासाठी तयार केले. अन थोड्या थोड्या काळाने देवू मॅटिझ, ह्युंदाई सँट्रो, फियाट पॅलिओ या गाड्या बाजारात आल्या. भारतीयांनी ही वाहने भावली. अन जोरदार खरेदी सुरू झाली. बाजारातले वातावरण तापू लागले आणि याच तापलेल्या वातावरणात डिसेंबर १९९८ साली भारतीयांनी, भारतीयांसाठी बनवलेली पहिली छोटी चारचाकी - टाटा इंडिका बाजारात आली. ज्या गाडीची लोकं आतुरतेने वाट पाहत होती ती गाडी बाजारात येताच लोकांनी झडप घातली. फक्त गाडी आरक्षित करण्यासाठी अनेकांनी पैसे ओतले. ते एवढे होते की गाडी बनवण्या करता केलेली सर्व गुंतवणूक एका झटक्यात जमा झाली. अर्थात त्यातले काहींचे पैसे परत द्यायचे होते. पण जागतिक बाजारपेठेत हा एक मोठा विक्रमच होता.
टाटा इंडिका
लोकांनी या गाडीमध्ये रस घेण्याचे आणखी एक कारण होते. ते म्हणजे या गाडीसाठी पेट्रोल आणि डिझेल असे दोन इंधन पर्याय होते अन डिझेल इंजिनामध्ये नावाजलेले टाटा येथे यशस्वी होतील या बद्दल लोकांना खात्री होती. रतन टाटांच्या म्हणण्या प्रमाणे हि गाडी होतीच. पण यापेक्षा सुद्धा आनंददायक एक गोष्ट होती. ती म्हणजे टाटा मोटर्सच्या जागतिक दर्जाच्या तपासणी केंद्रात या गाडीने सुरक्षिततेच्या चाचण्या समाधानकारक आणि यशस्विरीत्या पार पाडल्या होत्या.
या दरम्यान देवू कंपनी बंद पडली. पण सँट्रोने मात्र चांगली मुसंडी मारली होती. सहाजिकपणे इंडिका डिझेलची तुलना या पेट्रोल गाड्यांसोबत होऊ लागली. १४०० सी सी क्षमतेच्या या इंजिनाचा खूप आवाज होतो ही ग्राहकांची मुख्य तक्रार होती. सदैव ट्रक बनवणारी कंपनी चांगली कार नाही बनवू शकत असा अपप्रचार होऊ लागला होता. प्रत्येक नवे उत्पादन नेहमीच बदलांच्या जीवनचक्रातून जाते. त्या प्रमाणे इंडिका सुद्धा गेली आणि बाजारात आली नवी इंडिका, इंडिका व्ही टू. हि गाडी अल्पावधीतच लोकप्रिय झाली आणि बघता बघत १८ महिन्यात १००००० गाड्या विकल्या गेल्या. या गाडी मध्ये अनेक तांत्रिक सुधारणा होत्या. जसे की, सुपर ड्राइव्ह इंजीन, अधिक चांगले शॉकऍबसॉर्बर्स, जास्त रुंदीच्या टायर इत्यादी. अत्यंत आरामदायी आणि भरपूर अंतर्गत जागा असलेली अशी या गाडीची ओळखच तयार झाली. ५ जणांच्या कुटुंबाला सहजपणे वाहून नेणारी अशी हि इंडिका म्हणजे मोठ्या गाडीची सुविधा आणि चालकाला छोटी गाडी चालवण्याचा आनंद असा दुहेरी फायदा होता/आहे.
आधीच सुरक्षिततेच्या चाचण्या यशस्विरीत्या पार करणाऱ्या या इंडिकामध्ये २००२ साली आणखीन सुरक्षित बनवण्यात आले. गाडीने ऑफसेट क्रॅश टेस्टची यशस्वी परीक्षा दिली, त्या सोबत अधिक प्रभावी वातानुकूलित यंत्रणा आणि चांगली ब्रेकिंग सुविधा ही देखील २००२ सालच्या सुधारणांमधली ठळक वैशिष्ट्ये होती. या दरम्यान डिझेल इंडिकाने बाजारात अक्षरशः धुमाकूळ घातला होता. स्पर्धा वाढली होती. नवीन सँट्रो, वॅगन आर या सारखी वाहने स्पर्धकांनी बाजारात उतरवली. तर मारुती उद्योगाने मारुती झेनचे उत्पादन थांबले. मारुती उद्योगाचे वर्चस्व बाजारावर होते पण मारुती उद्योगच्या साम्राज्याला टाटा मोटर्स आणि ह्युंदाई ने चांगलीच टक्कर दिली होती. आता बाजारात नवी छोटी चारचाकी म्हटले की पेट्रोलवाल्यासाठी सँट्रो आणि डिझेलवाल्यासाठी इंडिका असे समीकरणच बनून गेले होते. २००३ साला पासून रोव्हर कंपनीने इंग्लंडात या गाडीची सिटी रोव्हर नावाने आयात सुरू केली होती.
टाटा नॅनो
काही वर्षांपूर्वी पर्याय नसलेल्या बाजारपेठेत आता अनेक पर्याय उपलब्ध झाले होते. स्पर्धा सुद्धा वाढली होती आणि मग २००४ साली इंडिकाने कात टाकली. अनेक नवीन वैशिष्ट्यांसह थोडी वेगळी दिसणारी इंडिका बाजारात आली. या गाडीमध्ये अंतर्बाह्य अशा अनेक सुधारणा होत्या. लोकांना ही गाडी सुद्धा आवडली. इंडिकाचा खप वाढतच राहिला आणि मग २००५ साली डिझेलचे टर्बो इंजीन या गाडीला बसवण्यात आले. या प्रकारच्या गाड्यांमध्ये असा प्रकार पहिल्यांदाच रस्त्यावर आला आणि लोकप्रिय झाला. इंडिकाच्या या प्रवासात आणखी एक महत्त्वाचा मैलाचा दगड आला तो २००६ साली. यावेळी इंडिका झीटाचे बाजारात आगमन झाले. इंडिका झीटामध्ये १२०० सी सीचे पेट्रोल इंजीन लावण्यात आले होते. अल्पावधीतच या प्रकारातली शक्तिशाली आणि चांगली इंधन क्षमता असलेली असा नावलौकिक या गाडीने कमावला आणि आपल्या स्पर्धकांसमोर सर्वात मोठे आव्हान उभे केले.
मंडळी, इंडिका बाजारात आली, बाजाराच्या चढ उतारांमधून बरेच अडथळे पार करून आजवर बराच प्रवास करून आली. या प्रवासात आपण इंडीकाची वेगवेगळी रुपे पाहिली. पण या प्रवासाने अनेक इतिहास घडवले. इंडीका बाजारात येण्याआधी टाटा मोटर्सला कोट्यवधी रुपयांचा कधी नव्हे असा तोटा झाला होता. इंडिकाने टाटा मोटर्सला भरघोस फायद्यात तर आणलेच. त्यासोबत अशी एक औद्योगिक क्रांती घडवून आणली जी आपल्यातल्या अनेकांना माहीत नाही. इंडिकाचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून रतन टाटांनी टाटा ऑटोकॉंप या उद्योगाची रचना केली. जागतिक दर्जाची भारतीय गाडी बनवण्यासाठी मोजक्या जागतिक दर्जाच्या सुटे भाग निर्मात्या-विक्रेत्यांना टाटांच्या छत्री खाली एकत्र आणले आणि एक अनोखी मोट बांधली. याचे फलित म्हणून जागतिक दर्जाची तरी सुद्धा पूर्णं भारतीय बनावटीची गाडी भारतीयांना मिळालीच, त्यासोबत, अनेक रोजगार तयार झाले, टाटांच्या स्पर्धकांना सुद्धा हवे त्या दर्जाचे सुटे भाग सहजासहजी उपलब्ध झाले. येणाऱ्या काळात भारताला जागतिक बाजारपेठेचे मुख्यस्थान बनवायला इंडिकाचे हे असे अप्रत्यक्ष योगदान आपण कधीच विसरू शकणार नाही.
प्रत्येक वाहन निर्माता आणि बाजारपेठ आपल्या वाहनाचे जीवनकाल ठरवते. त्यानंतर त्या प्लॅटफॉर्मवर तयार होणाऱ्या गाड्यांना मागणी कमी होते अथवा लोकांना नवे उत्पादन हवे असते. भारतात आता ही वेळ आली आहे. इंडीकाची नवी पिढी इंडिका विस्टा आता बाजारात आली आहे. लवकरच ती ग्राहकांपर्यंत जाईल. फियाट कंपनीला या बाजारात यश लाभले नाही. पण फियाट पूर्णपणे अयशस्वी सुद्धा नाही झाली. सुझुकी स्विफ्टमध्ये आणि नव्या इंडिका विस्टामध्ये सुद्धा टाटांच्या स्वतःच्या डिझेल इंजीन सोबत, फियाटचे क्वाड्राजेट डिझेल वापरण्यात येऊ लागले. फियाटचे स्वतःचे पेट्रोल इंजीन सुद्धा विस्टाच्या पेट्रोल प्रकारात वापरले गेलं आहे. १९९८ च्या दरम्यान सुरू झालेली हि स्पर्धा अशा प्रकारे ग्राहकाच्या फायद्याची बनली आहे.
संपूर्ण भारतीय बनावटीच्या इंडिकाचा हा प्रवास आता टाटा मोटर्सला नक्कीच प्रगतिपथावर घेऊन जाईल आणि एका भारतीय वाहन उद्योगाला जगातल्या पहिल्या ५ पैकी बनवण्याचे रतन टाटांचे स्वप्न पूर्णं करण्यास हातभार लावेल यात शंकाच नाही.
संदर्भ - महाजाल