बोली भाषेला जपले पाहिजे!

प्रा. डॉ. दिलीप बिरुटे

प्रमाणभाषा आणि बोली हे एकमेकांच्या साह्याने प्रवास करणारे भाषिक आविष्कार आहेत. समाजातील बहुविध संस्कृतींना जोडणारा एक अनुबंध आहे, म्हणून त्याचे स्वरूप वेगवेगळे असले तरी प्रमाणभाषेपासून बोलीला वेगळे करता येणार नाही. समाजातील लोक आतल्या आत वेगवेगळे गट करून राहत असतात त्याची कारणे सामाजिक, राजकीय, आर्थिक, व्यावसायिक, शैक्षणिक, जातीय, अशी कोणतीही असल्यामुळे त्यांची स्वतःची गटापुरती एक भाषा तयार होते. ही भाषा प्रमाणभाषेपेक्षा वेगळी असते म्हणून त्या भाषेला बोलीभाषा म्हटले जाते.

 
भाषा; मानवी भाव-भावनांची समर्थ अभिव्यक्ती ही भाषेद्वारे साधली जाते. भाषेचे मानवी जीवनातील महत्त्व वादातीत आहे. भाषा व्यक्तीपरत्वे, भौगोलिक परिस्थिती, स्त्री, पुरुष, जात-धर्म, भाषेचे नियम इ. कारणांमुळे बदलासहित, स्वतःचे व्यवहार पूर्ण करत असते. पूर्वी भाषा प्रत्येक मैलावर बदलते असे म्हटले जायचे, आता या जालयुगात प्रत्येक व्यक्तीबरोबर बदलते असे म्हणावे लागेल.

असे असले तरी प्रमाणभाषा बोलायची, लिहायची की बोलीभाषा लिहायची, बोलायची - यावर सतत चर्चा घडत असतात. प्रमाणभाषेबाबत असे म्हटले जाते की ' ज्या भाषेत ग्रंथनिर्मिती होते, जी शासन व्यवहाराचे माध्यम असते, कायदा व न्याययंत्रणेत असते व जिला बहुसंख्य समाजाने मान्यता दिली आहे, ती प्रमाण भाषा. तर प्रमाणभाषेशी साम्य ठेवणारी परंतु समाजातील लहान घटकांकडून दैनंदिन व्यवहारात केवळ बोलण्यासाठी आणि अपवादात्मक लेखनात वापरली जाणारी भाषा म्हणजे बोली. जी भाषा उच्चारण, शब्दसंग्रह, यांत प्रमाणभाषेपेक्षा वेगळी आहे ती भाषा म्हणजे बोलीभाषा. बोली भाषेतील स्वाभाविकता, जिवंतपणा, आकलनाचे क्षेत्र, लोकव्यवहाराबरोबर अनौपचारिकपणे वापरले जाते. प्रादेशिकतेची मर्यादा ज्या भाषेवर पडते ती "बोली".

प्रमाणभाषा आणि बोलीभाषा यांच्यात सीमारेषा आखणे कठिण असते. एका बोलीचे संस्कार दुसर्‍या बोलीवर होत असतात. त्याचा परिणाम प्रमाणभाषेवर होत असतो. बोली ही मौखिक परंपरेने विकसित होत असताना ती केवळ मागासलेल्या लोकांची भाषा, अशिक्षित लोकांची भाषा असा समज करून दिलेला दिसतो. प्रमाणभाषा बोलणारे लोक सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक दृष्टींनी पुढारलेले असतात. त्यांच्या तुलनेने इतर बोली बोलणारे लोक याबाबतीत मागासलेले असतात. त्यामुळे अशा सांस्कृतिक, शैक्षणिक इत्यादी दृष्टीने मागासलेल्या लोकांच्या बोलीला दर्जेदार मानायला समाजातील प्रभावी गट तयार नसतो. पण भाषाभ्यासाने हे सिद्ध झालेले आहे की, प्रमाणभाषा ही स्थानिक बोलींमुळेच विकसित झालेली असते. म्हणजे मूळच्या बोलीचेच प्रमाणभाषेत रुपांतर झालेले असते. उदा. यादवांच्या राजवटीत मराठीत बोलीला ग्रांथिक भाषेचा दर्जा प्राप्त झालेला होता.

प्रमाणभाषा आणि बोली हे एकमेकांच्या साह्याने प्रवास करणारे भाषिक आविष्कार आहेत. समाजातील बहुविध संस्कृतींना जोडणारा एक अनुबंध आहे, म्हणून त्याचे स्वरूप वेगवेगळे असले तरी प्रमाणभाषेपासून बोलीला वेगळे करता येणार नाही. समाजातील लोक आतल्याआत वेगवेगळे गट करून राहत असतात त्याची कारणे सामाजिक, राजकीय, आर्थिक, व्यावसायिक, शैक्षणिक, जातीय अशी कोणतीही असल्यामुळे त्यांची स्वतःची गटापुरती एक भाषा तयार होते. ही भाषा प्रमाणभाषेपेक्षा वेगळी असते म्हणून त्या भाषेला बोलीभाषा म्हटले जाते. इतिहास पाहता असे दिसते की, राज्यलालसेमुळे किंवा अन्य कारणांमुळे एक समाज जेव्हा दुसर्‍या समाजावर आक्रमण करतो तेव्हा भाषेची सरमिसळ होते आणि एक वेगळीच बोली जन्माला येते. त्याचबरोबर आपापसातले दळणवळण कमी झाल्याने त्यांची भाषा वेगळी होत जाते आणि बोलीची निर्मिती होते. बोलीभाषा निर्माण होण्याचे एक कारण म्हणजे परभाषेचा स्वीकार, व्यावहारीक कारणे, अस्तित्वाचा प्रश्न अशा एखाद्या कारणाने समाज आपल्या भाषेचा त्याग करतो आणि दुसरी भाषा स्वीकारतो. पण अशा स्वीकारलेल्या भाषेबरोबर स्वभाषेतील लकब, उच्चार, काही विशेष तसेच टिकून राहतात. त्याबरोबर त्याची एक नवी बोली तयार होते.

प्रमाणभाषा व बोलीभाषेमध्ये श्रेष्ठ, कनिष्ठ, शुद्ध, अशुद्ध असा भेदभाव असू नये. कारण दोन्हीही भाषा लोकव्यवहाराचे माध्यम असतात. प्रमाणभाषा आणि बोलीभाषा वेग-वेगळ्या स्वरूपाची असली तरी प्रमाणभाषेच्या पोषणाचे काम बोलीभाषा करत असतात. त्याचबरोबर दोन वेगवेगळ्या बोली बोलणार्‍यांना आपले भाषिक व्यवहार पूर्णं करण्यासाठी प्रमाणभाषेचीही मदत होते असते.

बोलीच्या बाबतीत असा एक समज आहे की, बोलीचा लेखनासाठी वापर करू नये अशी एक रूढ समजूत आहे. पण जगभर असे दिसून येते की आपापल्या बोलीतून आपले अनुभव समर्थपणे मांडल्याचे दिसून येतात. कोणतेही लेखन पेलण्याची क्षमता बोलीभाषेमध्ये असल्यामुळे आपल्या सामाजिक, व्यावहारिक, व्यावसायिक, कौटुंबिक इत्यादी गरजांच्या परिपूर्ततेसाठी आपल्या बोलीचा वापर करायचा की प्रमाणभाषेचा आश्रय घ्यायचा याचा सारासार विचार करून तसा निर्णय बोली बोलणाऱ्यांनी घ्यायचा असतो.

बोलीभाषेचा उत्तम उपयोग केला जात असेल तर समाजाच्या वेगवेगळ्या घटकांची ओळख होते. त्यांच्या जीवनमानाची, अनुभवांची ओळख होते. म्हणजेच समाजाचे वस्तुनिष्ठ निरीक्षण करायचे असेल तर त्या त्या समाजाचा अभ्यास करण्यासाठी त्या बोलीचा उपयोग होतो, कारण भाषा समाजाचा आरसा असते. समाजाची एकूण स्थिती कशी आहे, समाजाची संपन्नता, ज्ञान, अज्ञान, सुसंस्कृतपणा असंस्कृतपणा हे सर्व केवळ भाषेच्या जोरावर जोखता येतात. म्हणून समाजाच्या ओळखीसाठी त्या त्या भाषेच्या विविध बोलींचा उपयोग होतो. समाजातील सर्व घटकांना समान पातळीवर आणायचे असेल तर त्यांचे प्राथमिक शिक्षण प्रमाणभाषेमधून देण्याऐवजी त्या त्या बोलींमधून दिले जावे. असे झाले तर बोलीचे आपोआप महत्त्व वाढेल. व्यवसायातील उणीवा दूर व्हाव्यात, व्यवसाय वाढावा, नव्या जगाची ओळख वाढवायची असेल तर व्यवसायनिष्ठ बोलींचा अभ्यास फायदेशीर ठरेल.

बोलीभाषेचा अभ्यास साहित्य-समृद्धीकरता उपयुक्तच राहिला आहे. साहित्य जेव्हा समाजजीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करते तेव्हा बोलीभाषेचे योगदान मोठे राहिलेलेच आहे. बोलींच्या अभ्यासामुळे मध्ययुगीन व अर्वाचीन वाङमयाच्या संशोधनास व समीक्षेस नवी शक्ती मिळत आहे. बोलींमुळे लोकसाहित्याबरोबर, पूर्वजांच्या वाङमयाकडे अभ्यासाच्या दृष्टीने पाहण्यासाठी बोलीची मदत होऊ शकेल. केवळ साहित्यच नव्हे तर धर्मशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल, नक्षत्रविज्ञान यासारख्या विषयांसाठी बोलीचा उपयोग नक्कीच करून घेता येईल.

शेवटी असे म्हणावे वाटते की, बोलींचा अभ्यास हा समाजातील मानवी आविष्कारांच्या विविधतेचा अभ्यास आहे. तेव्हा खानदेशी, वर्‍हाडी, पुणेरी, चित्पावनी याबरोबर त्याच्या पोटभाषा, आपल्या अभ्यासाच्या कक्षा रुंदावण्यासाठी अभ्यासकांची वाट पाहत आहेत.