पुस्तक परिचय- फलज्योतिष शास्त्र की अंधश्रद्धा?

प्रकाश घाटपांडे

पृष्ठ २

डॉ. वि.म.दांडेकर यांनी या पुस्तकाचे केलेले परीक्षण अनुवादाच्या आधी टाकलेले आहे ते प्रथम वाचून मग अनुवाद वाचणे बरे. दांडेकरांचे मत असे: 'फलज्योतिष हे शास्त्र आहे असे अद्याप सिद्ध झालेले नसले तरी ते शास्त्र नाही असेही अद्याप कोणी सिद्ध केलेले नाही!` -- म्हणजे पुन: तोच गुळमुळीतपणा! गेली दोन-अडीच हजार वर्षे भरभराटीत असलेले हे प्रकरण अद्यापही शास्त्र म्हणून सिद्ध झालेलेच नाही म्हणे! मग आता इथून पुढे ते शास्त्र 'आहे` असे सिद्ध करायला कोणी अवतार घेणार आहे का? असा प्रश्न मनात येतोच. पण ग्यानबाची मेख इथेच तर आहे!

परीक्षणात दांडेकरांनी एक आक्षेप असा घेतला आहे की, पुस्तकात कॉस्माबायॉलॉजीची जी प्रदीर्घ चर्चा आली आहे ती मूळ विषयाशी असंबद्ध आहे. ग्रह व तारे यांचे परिणाम व्यक्तिश: प्रत्येक माणसावर होतात असे गृहीत धरूनच ते परिणाम 'वर्तवणे` ही या शास्त्राची 'सिद्धता` आहे, तिच्यात हे शास्त्र यशस्वी झाले आहे की नाही हा खरा मुद्दा आहे, बाकीची चर्चा व्यर्थ आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांचा हा आक्षेप योग्य असला तरी लेखकांच्या बाजूने असे म्हणावे लागेल की १८६ वैज्ञानिकांच्या त्या पत्रकातील चुकीच्या विधानाचा प्रतिवाद करण्यासाठी ही चर्चा करणे लेखकांना आवश्यक वाटले असावे.

गॉकेलिनच्या निष्कर्षांची चर्चा करून झाल्यावर डॉ. दांडेकरांनी एक मोठा मार्मिक प्रश्न विचारला आहे तो असा:- समजा, ग्रहयोगांवरून तुम्हाला असे कळले की अपघात होण्याची शक्यता तुमच्या बाबतीत दोन टक्के अधिक आहे, पण मग तो अपघात टाळण्यासाठी काय करावे किंवा काय करू नये, हे तुम्हाला ठरवता येईल का? हा प्रश्न विचारण्याचे कारण असे की गॉकेलिनने 'मार्स इफेक्ट` या नावाचा जो गाजलेला शोध लावला आहे त्याचे स्वरूप असेच अत्यल्प परिमाणातले आहे, म्हणून त्याचा व्यावहारिक असा काहीही उपयोग नाही हेच दांडेकरांना सुचवायचे आहे. असे असले तरी, गॉकेलिनच्या संशोधनातून जो काय पुरावा पुढे आलेला आहे त्याच्यावरून या शास्त्राच्या मुळाशी काहीतरी तथ्य असावे अशी आपली खात्री झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शेवटी उपसंहार श्री. व.दा.भट यांनी केला आहे. त्यात त्यांनी एक महत्त्वच मुद्दा मांडला आहे: फलज्योतिषशास्त्राचा खरेखोटेपणा सिद्ध करणे हे काम 'एम्पीरिकल` म्हणजे फक्त चाचण्यांच्या द्वारे केलेल्या संशोधनातून होणे शक्य नाही असे त्यांना वाटते. हा मुद्दा त्यांनी एक अगदी समर्पक उदाहरण देऊन मांडला आहे. तो सहमत होण्यासारखा आहे. पाश्चात्य देशात गेली पन्नास वर्षे हे संशोधन चालूच आहे पण त्यातून काहीही निर्णायक असे निष्कर्ष निघालेले नाहीत. फलज्योतिषाला प्रतिकूल असलेले असे निष्कर्ष जरी लोकांच्यापुढे ठेवले तरी ते त्या आकडेवारीवर आणि टक्केवारीवर विश्वास ठेवायला तयार होणार नाहीत. तिकडे डॉ. दांडेकरांच्या म्हणण्याप्रमाणे एम्पीरिकल संशोधनाखेरीज दुसरा कोणताही मार्ग या शास्त्राचा खरेखोटेपणा सिद्ध करण्यासाठी आपल्याला उपलब्ध नाही! म्हणजे इथे मार्गच खुंटला! ही अशी उलट-सुलट विधाने वाचल्यावर, 'आता हा यक्षप्रश्न कायमचाच अनुत्तरित राहणार` असा निष्कर्ष हे पुस्तक वाचल्यावर जर वाचकांनी काढला तर त्यात नवल नाही! म्हणून हे परीक्षण वाचणार्‍या वाचकांना आम्ही मुद्दाम सांगतो की, या यक्षप्रश्नाचा सोक्षमोक्ष लावण्याचा एक वेगळा मार्ग उपलब्ध आहे, पण त्या मार्गाने जाणार्‍याला आपल्या डोक्याला थोडी तोशीस द्यावी लागेल! या तथाकथित शास्त्राच्या मूलभूत सिद्धान्तांचाच खोटेपणा जर तर्कशुद्ध पद्धतीने लोकांच्यापुढे मांडला व तो त्यांना पटला तर हा यक्षप्रश्न कायमचाच निकालात निघेल. आम्ही तेच कार्य हाती घेतले आहे. खेदाची गोष्ट एवढीच आहे की सुशिक्षित लोक या बाबतीत उदासीन आणि अलिप्त आहेत. ते आपला अलिप्तपणा सोडतील तो सुदिन असे म्हणायचे!

'फलज्योतिष, शास्त्र की अंधश्रद्धा ?` अनुवादिका: यशोदा भागवत
अनुवादित पुस्तकाचे मूळ नाव :- ऍस्ट्रॉलॉजी, सायन्स ऑर सुपरस्टिशन ? लेखक एच.जे.आयसेन्क व डी.के.बी. निआस.
प्रथमावृत्ती १९८२.
अनुवादित पुस्तकाचे प्रकाशक-
मॅजेस्टिक प्रकाशन, एकत्रित पृष्ठे - २७९ मूल्य- दोनशे रुपये.