भाग १
होमर आणि त्याचे महाकाव्य इलियड.
ट्रॉय असे असावे
(कल्पनाचित्र)
सुमारे ३२०० वर्षांपूर्वी डार्डनेल्स सामुद्रधुनीच्या प्रदेशात ट्रॉय नावाचे एक शहर होते. तिथला राजा होता प्रायम आणि शहरातले रहिवासी नागरिक शेती, व्यापार, मासेमारी अशा व्यवसायांवर सुखी जीवन जगत होते. ग्रीक देवांना त्यांचे हे सुखी आयुष्य पाहून मत्सर वाटते असे आणि म्हणून शहर उद्ध्वस्त करण्याचा विचार त्यांच्या मनात येऊ लागला.
प्रायमची राणी हेक्यूबाला एक दिवशी विचित्र स्वप्न पडले. तिच्या शरीरातून आग आणि धूर बाहेर पडत आहेत आणि सगळया ट्रॉयला जाळून टाकत आहेत असे तिला दिसले. राजपुरोहिताने ह्याचा असा अर्थ लावला की तिला होणारे मूल ट्रॉयच्या नाशाचे कारण ठरेल.
काही दिवसांनंतर हेक्यूबा गरोदर झाली आणि योग्य वेळी तिला मुलगा झाला. आपल्या एका विश्वासू सेवकाकडे प्रायमने त्याला सोपवले आणि त्याला मारून टाक अशी आज्ञा त्याला दिली. निष्पाप बालकाची सेवकाला दया आली आणि त्याला मारून टाकण्याऐवजी त्याने त्याला आयडा पर्वतावर नेऊन सोडून दिले. ग्रीक देवतांचा प्रमुख देव झेउस ह्याच पर्वतावर राहतो. पॅरिस नावाचा हा बालक मोठा होऊन एक उमदा तरूण झाला आणि मेंढया पाळून उपजीविका करू लागला.
एके दिवशी ग्रीक देवतांपैकी तीन सुंदर देवता हेरा, अथीना आणि ऍफ्रोडाइटी ह्यांच्यात सर्वात सुंदर कोण असा वाद सुरू झाला आणि उत्तरासाठी त्या झेऊसकडे आल्या. त्याने स्वतः ह्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा धोका न पत्करता तिघींनाही पॅरिसकडे निर्णयासाठी पाठविले. आपल्या बाजूने त्याने निर्णय द्यावा म्हणून तिघींनीही त्याला वेगवेगळी प्रलोभने दाखविली. ’जगातली सर्वात सुंदर स्त्री - स्पार्टाचा राजा मेनेलॉसची ह्याची पत्नी हेलन - तुला मिळवून देईन’ ह्या ऍफ्रोडाइटीच्या प्रलोभनाचा त्याच्यावर सर्वात परिणाम झाला आणि त्याने ’तिघींमध्ये ऍफ्रोडाइटी सर्वात सुंदर देवता आहे’ असा तिच्या बाजूने निर्णय दिला.
पॅरिसला घेऊन ऍफ्रोडाइटी स्पार्टाला गेली. राजा मेनेलॉसने पॅरिसचे चांगले स्वागत केले. अतिशय देखण्या पॅरिसच्या प्रेमात पडायला हेलनला वेळ लागला नाही आणि लवकरच दोघेही स्पार्टा सोडून ट्रॉयला निघून आले.
हा ग्रीसच्या नगरराज्यांचा अपमान होता. तिला परत मिळवण्यासाठी ग्रीसमधले सर्व वीर मेनेलॉसच्या बाजूने ट्रॉयविरुद्ध रणात उतरायला सज्ज झाले. एक हजार जहाजांमध्ये बसून सगळे ट्रॉयला आले आणि समुद्रकिनारा आणि ट्रॉय नगर ह्यांच्यामधील मोकळया मैदानात त्यांनी आपला तळ ठोकला. ट्रॉय नगर आपल्या अभेद्य तटबंदीच्या मागे सुरक्षित होते. दोन्ही बाजूच्या प्रमुख योद्ध्यांमध्ये ट्रॉयच्या बाजूस होता पॅरिसचा थोरला भाऊ हेक्टर आणि ग्रीक बाजूला होता अजिंक्य असा थीटिस देवतेचा पुत्र ऍकिलीज.
दोन्ही बाजूच्या योद्ध्यांचे हर्षामर्ष आणि देवतांनी वेळोवेळी युद्धात केलेले हस्तक्षेप ह्यांमुळे दहा वर्षे ट्रॉयसमोरच्या मैदानात समुद्राच्या काठावर अनिर्णायक युद्ध चालू राहिले. ह्यामध्ये एकदा पॅरिस आणि मेनेलॉस ह्यांच्यामध्ये एकेकटयांचे समोरासमोर युद्ध झाले. पॅरिसचा पराभव हॊऊन अखेर तेथेच प्रश्न सुटायचा पण आयत्या वेळेस ऍफ्रोडाइटीने पॅरिसला पळून जायला मदत केली आणि तो वाचला. आपल्या बाजूच्या अन्य योद्ध्यांशी मतभेद झाल्यामुळे ऍकिलीज युद्धभूमीपासून दूर बसला होता. त्याने आपले कवच वापरण्यासाठी आपला मित्र पेट्रॊक्लसला दिले होते. पेट्रोक्लस आणि हेक्टरचे युद्ध झाले आणि पेट्रॊक्लसला मारून हेक्टरने ते कवच मिळविले. त्यामुळे क्रोधित झालेल्या ऍकिलीजने युद्धात पुन: प्रवेश करून अखेर हेक्टरला गाठले आणि त्यांच्यात निर्णायक झुंज होऊन हेक्टर मारला गेला.
ऍकिलीज आणि रथामागे ओढला जाणारा हेक्टरचा
मृतदेह
आपला मृत देह ट्रॉयला परत द्यावा ही त्याची विनवणी झुगारून त्याचे मृत शरीर ट्रॉयला परत देण्यापूर्वी आपल्या रथामागे बांधून सूडाने पेटलेल्या ऍकिलीजने ट्रॉयभोवती अनेक वेळा फिरवले. ऍकिलीजची आई थीटिस हिने त्याच्या जन्माच्या वेळी त्याला एका पायाने धरून स्टिक्स नदीच्या पात्रात बुडविले होते जेणेकरून त्याचा पाण्यात बुडालेला शरीराचा भाग अभेद्य बनला होता. त्याच्या धरलेल्या पायाची टाच मात्र पाण्यात न बुडल्यामुळे अन्य मर्त्य माणसांसारखीच राहिली होती. काही काळानंतर संधि साधून पॅरिसने ऍकिलीजच्या त्याच टाचेवर बाण मारून त्याचा मृत्यु घडवून आणला. लवकरच पॅरिसचाही मृत्यु ओढवला.
इतका नरसंहार झाला आणि १०हून अधिक वर्षे लोटली तरी ट्रॉयची तटबंदी तितकीच अभेद्य अशी उभी होती आणि ग्रीकांना अजूनही विजयश्री हुलकावण्या देत दूरच राहिली होती. आता शक्तीऐवजी युक्तीने युद्ध जिंकण्याचा बेत ग्रीकांनी आखला. एक दिवशी ट्रॉय शहर सकाळी जागे झाले आणि त्यांना असे दिसले की सर्व ग्रीक सैन्य एका रात्रीत एक मोठा लाकडाचा बनवलेला घोडा मागे ठेऊन युद्धभूमि सोडून निघून गेले आहे. युद्ध संपले ह्या आनंदात ट्रॉयवासी तो घोडा ओढून नगरात घेऊन आले आणि विजयोत्सवात बुडून गेले. रात्र होताच घोडयाच्या पोटात लपून बसलेले ग्रीक सैनिक बाहेर पडले. झोपेत असलेल्या ट्रॉयच्या अनेक सैनिकांचा त्यांनी वध केला आणि ट्रॉय नगर पेटवून दिले. स्वत: राजा प्रायमही मारलेल्यांच्यामध्ये होता. येथेही ऍफ्रोडाइटी पुन: हेलनच्या साहाय्याला धावून आली. तिच्या मदतीने हेलन पुन: मेनेलॉसकडे परतली आणि त्यानेही आनंदाने तिचा स्वीकार केला. तिच्यासह सर्व विजयी ग्रीक वीर नंतर परत आपापल्या ग्रीक नगरांकडे परतले.
एका सुंदर स्त्रीच्या मोहातून ट्रॉय नगराचा झालेला असा विनाश हा कवि होमर ह्याच्या इलियड ह्या महाकाव्याचा विषय. ट्रॉयला 'इलिअन' ह्या नावानेही ओळखले जात असे त्यावरून होमरने आपल्या महाकाव्याला 'इलियड' असे नाव दिले. इसवी सनपूर्व १५०० ते १२०० हा ट्रोजन युद्धाचा काळ असा तर्क आहे. इलियड आणि ओडिसी ह्या दोन महाकाव्यांचा युरोपच्या संस्कृतीवर आणि वाङ्मयावर खोलवर परिणाम झालेला आहे.
जग ट्रॉयला विसरले पण श्लीमन नाही.
ट्रोजन युद्ध इलियड काव्यामुळे स्मरणात राहिले पण कालौघात ट्रॉय नगर स्मृतिशेष झाले. ग्रीक शहरराज्ये नामशेष झाली. अन्य अनेक साम्राज्ये निर्माण झाली आणि नाहीशीही झाली. रोमन साम्राज्य संपले. त्यानंतरचे कॉन्स्टॅंटिनोपल-केन्द्रित बिझांटियमही एक हजार वर्षांच्या इतिहासानंतर अस्ताला गेले आणि त्याची जागा ऑटोमन साम्राज्याने घेतली. युरोपात अंधारयुग १५व्या-१६व्या शतकानंतर विरू लागले आणि ग्रीक-लॅटिनच्या अभ्यासाबरोबरच ट्रॉय नगरविषयक कुतूहलही निर्माण झाले. युरोपीय संस्कृतीचा एक मूल स्रोत असे ट्रॉय होते तरी कसे आणि कोठे असा एक नवाच ध्यास अभ्यासकांमध्ये निर्माण झाला.
१८२२ त जर्मनीमध्ये मेक्लेनबुर्ग येथे जन्मलेला हाइन्रिख श्लीमन ह्याच ध्यासाने झपाटलेला होता. बहुसंख्य अभ्यासक ट्रॉय हे एक कल्पनेने निर्माण झालेले नगर आहे आणि ट्रॉयच्या युद्धाची कथा ही एक काल्पनिक कथा आहे असे मानत असतांना श्लीमनची मात्र खात्री होती की ते युद्ध ही खरीखुरी घटना आहे आणि ट्रॉयचे अवशेष कोठेतरी शिल्लक आहेत. ते शोधून काढणे हे त्याने आपल्या आयुष्याचे कार्य ठरवून घेतले. प्राथमिक शाळेत असतांना इलियडची गोष्ट त्याच्या वाचनात आली आणि तेव्हापासून ट्रॉयने त्याला झपाटून टाकले.
पण प्रत्यक्ष कार्याला हात घालण्यास आवश्यक ते स्थैर्य मिळविण्यात त्याची पहिली बरीच वर्षेखर्च पडली. घरची आर्थिक स्थिती बेतास बात त्यामुळे शाळा संपल्यावर कोठल्या विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी जाण्याऐवजी वयाच्या २२व्या वर्षापर्यंत त्याला अनेक लहानसहान नोकर्या कराव्या लागल्या. १८४४त बी.एच.श्रोडर ह्या आयात-निर्यात व्यवसायात त्याला नोकरी मिळाली आणि तिच्या कामासाठी तो रशियात सेंट पीटर्सबर्गला जाऊन पोहोचला. क्रिमीअन युद्धामुळे काळया बाजारात पैसा कमावण्याच्या अनेक संधी तेथे होत्या. त्यांचा हुशारीने उपयोग करून तेथे त्याने बरीच माया जमा केली. त्याच वेळी कॅलिफोर्नियाचा प्रसिद्ध ’गोल्ड रश’ ऐन भरात होता. तिकडे जाऊन त्या गंगेतही त्याने हात धुवून घेतले. ठिकठिकाणच्या शेअर बाजारामध्ये सट्टेबाजी करूनही त्याने बरीच संपत्ती मिळविली. १८५२त रशियामधील एका प्रतिष्ठित कुटुंबात त्याचा विवाह झाला पण त्या पत्नीला श्लीमनच्या जुन्या गोष्टींच्या संशोधनात काही स्वारस्य नसल्याने सतरा वर्षात ते लग्नही मोडले.
अशा रीतीने वयाच्या ५०व्या वर्षापर्यंत भरपूर पैसा मिळविल्यानंतर श्लीमन आपली पुरातत्त्वसंशोधनाची हौस भागविण्यासाठी मोकळा झाला.