कोण ही झांतपी अन कोण ही यशोधरा? पुरुषप्रधान संस्कृती आणि इतिहासाच्या बुरख्याआड हरवलेल्या दोघीजणी! आणखी अशा कितीतरी असतील ज्यांनी आपल्या कर्तबगार पतीसाठी मोठे त्याग केले आणि त्याची नोंदसुद्दा कुठे नाही. झांतपी तरी दूर अथेन्स नगरीतील "सॉक्रेटीस" नावाच्या तत्त्ववेत्त्याची बायको आणि त्याच्या तीन पोरांची आई. पण यशोधरा ('यशोदा' नव्हे!) ही तर भगवान गौतम बुद्धाची पत्नी. दोघींचा काळ साधारण इ.स.पू. पाचवं-सहावं शतक. इतिहासकार आणि तत्त्ववेत्ते यांनी सॉक्रेटीस आणि बुद्धाला अमर केलेले आहे. पण ह्या दोघींबद्दल फारच थोडे संदर्भ आढळतात. खरं तर त्या दोघी जर खंबीर आणि स्वतंत्र मनाच्या नसत्या तर कदाचित ते दोघे महापुरुष झालेच नसते.
झांतपी आणि सॉक्रेटीस
"झांतपी" या शब्दाचा अर्थच कजाग, कटकटी, त्रासदायक, भांडकुदळ बाई! ती सॉक्रेटीसपेक्षा जवळजवळ चाळीस वर्षांनी लहान असावी असे म्हटले जाते. तिच्या माहेरी सुस्थिती असावी आणि तिचे घराणे सॉक्रेटीसपेक्षा प्रसिद्ध असावे. कारण त्याकाळी पहिल्या मुलाला दोन आजोबांपैकी जो जास्त कर्तबगार असेल त्याचे नाव दिले जायचे. तिच्या मुलाचे नाव तिच्या वडलांवरुन ठेवले होते. अशी ही सधन घरातील तरूण झांतपी वयस्क सॉक्रेटीसकडे कशी आली याबद्दल विशेष माहिती उपलब्ध नसली तरी तिच्यात काहीतरी खास बात असल्याखेरीज त्याने तिला पसंत केली नसणार.
सॉक्रेटीसच्या आयुष्यातील शेवटच्या काही दिवसांवर त्याच्या पट्टशिष्याने- प्लेटोने "द लास्ट डेज ऑफ़ सॉक्रेटीस" हे पुस्तक लिहिले. आपल्याकडे मकरंद साठे यांनी त्यावर "सूर्य पाहिलेला माणूस" असे नाटक लिहिले आहे. प्लेटोने तिचा उल्लेख एक चांगली पत्नी आणि चांगली माता म्हणूनच केला. पण त्या नंतरच्या शिष्यांनी मात्र तिच्या चिडचिडीचे व कजागपणाचेच भांडवल केले. शेक्सपियरने तर "टेमिंग ऑफ़ द श्रू" मधले कॅथरीनाचे पात्र झांतपीवरून बेतले. त्यानंतर झांतपी हे नाव आणखीच बदनाम झाले.
सॉक्रेटीस जन्मभर गरीबच राहिला आणि आपली तत्त्वे बाळगून उपदेश करत राहिला. झांतपी कशीबशी संसाराचा गाडा ओढत राहिली. कधीमधी त्याच्या शिष्यांनी दिलेल्या मूठभर धान्यावर पोरांना पोसत होती. तिचे मातृहृदय मुलांना चांगलेचुंगले खायला मिळावे म्हणून तिळतिळ तुटत असे. पण सॉक्रेटीसला पटणार नाही म्हणून तिने कुणापुढे हात पसरले नाहीत. त्याला अथेन्सवासीयांनी कारावासात टाकले व शेवटी तेथेच त्याला विष देण्यात आले. त्याची व त्याच्या कुटुंबाची सुटका व्हावी म्हणून शिष्य क्रिटोने खूप प्रयत्न केले. क्रिटो झांतपीला म्हणतो की आपण मुलांना आणि सॉक्रेटीसला घेऊन दूर गावाला जाऊ. पण झांतपी स्पष्ट नकार देते. ती म्हणते, "सॉक्रेटीस डरपोक नाही आणि तो काही तत्त्वांपासून दूर जाणार नाही....मग मी कशाला भिऊ?" ती तुरुंगात त्याच्याकडे अंतिम भेटीला जाते तेव्हाही सॉक्रेटीस तिला हाकलतो. त्याला तिला रडतांना पहायचे नसते अन ही तर इतकी बहाद्दर की अजिबात रडत नाही. झांतपीला सॉक्रेटीसचे तत्त्वज्ञान नक्कीच कळलेले असावे. म्हणूनच सॉक्रेटीसचा आत्मा अमर आहे अन मरतोय तो फक्त त्याचा नश्वर देह अशी तिची खात्री होती. तिने जन्म-मरणामागची सत्यता पक्की जाणलेली होती. म्हणूनच ती नशिबाला बोल लावतांना किंवा हात-पाय गाळतांना दिसत नाही.
यशोधरा आणि गौतम बुद्ध
य़शोधरा ही सिद्धार्थाची आतेबहिण. तिची आई राणी पमिता ही सिद्धार्थाच्या वडिलांची-शुद्धोधन राजाची बहिण. राजघराण्यातील असूनही ती अतिशय साध्या वेषात गरीब वस्तीवर जाऊन तिथल्या मुलांची सेवा करत असे. तिने जगातील दु:ख जवळून पाहिले होते. लग्नाआधी दोन वर्षं तरी ती हे काम करत होती. सोळाव्या वर्षी तिचे समवयस्क सिद्धार्थाशी शुभमंगल झाले. राजवाड्यात नेहमीच मेजवान्या होत. त्यावेळी तरुण पुरुष आणि नर्तकी जमत. पण तिच्या मनातील गरिबांविषयीची कळकळ आणि समाजसेवेचा ओढा याचे तिने कधीच प्रदर्शन केले नाही. ती नुसतीच तत्त्वज्ञानाची जाणकार नव्हती तर तिचे आचरणसुद्धा अगदी शुद्ध अन पवित्र होते. बुद्धाच्या मनातील निरंतर सुखाचा शोध घेण्याची आस तिला चांगलीच माहित होती. कित्येक कथाकार म्हणतात की ती तान्ह्या राहुलला घेऊन झोपलेली असतांना बुद्धाने राजगृह सोडले. उलट तिला सिद्धार्थाचा बेत नक्कीच माहीत होता पण निघतांना त्याला त्रास होऊ नये व इतर माणसे जागी होऊ नयेत म्हणून तिनेच झोपेचे ढोंग केले असावे. तसेच बुद्धाच्या नवजात बालकाचे उत्तम संगोपन व्हावे याकडे तिने आपले लक्ष केंद्रीत केले. शुद्धोधन राजाला मुलगा सोडून गेल्याचे अतोनात दु:ख झाले पण यशोधरेने घट्ट मनाने राहुलला मोठे केले. इतकेच नव्हे तर तिने त्यालाही कोवळ्या वयात संघात पाठवले. यशोधरा आणि राणी गौतमी (बुद्धाची मावशी अन त्याच्या आईमागून शुद्धोधनाची राणी) ह्या दोघी नंतर भिक्षुणी झाल्या. शेवटपर्यंत गौतमीने यशोधरेला साथ दिली. त्यांनी बुद्धाचा धर्म बायकांमध्ये पसरवला. त्यांनी संसार आणि परमार्थ दोन्ही साधला.
सॉक्रेटीस आणि बुद्ध यांनी जगाला मोठे संदेश दिले यात शंकाच नाही. पण जीवन कसं जगायचं याबद्दल त्या दोघांच्या बायकांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. त्यांचे ते बोल स्वानुभवाचे असतील. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे अशा कर्तृत्ववान, पण काळाच्या बुरख्याआड दडलेल्या स्त्रिया असतात. त्यांची माहिती आपण मिळवली तर आपलेही जीवन संपन्न होईल. ज्यांच्या जीवनात दिवाळीची समृद्धी कधीच आली नाही अशा ह्या महास्त्रियांची आठवण ठेवून आपण ही दिवाळी साजरी करुया.
संदर्भ:
१)"द लास्ट डेज ऑफ़ सॉक्रेटीस" लेखक प्लेटो, इंग्रजी भाषांतर ह्यु ट्रेण्डनिक, पेंग्विन क्लासिकस १९५४
२) नाटक "सूर्य पाहिलेला माणूस" , लेखक मकरंद साठे, दिग्दर्शक अतुल पेठे, निर्माता अभय पाटील १९९९
३)"ओल्ड पाथ व्हाईट क्लाऊडस", लेखक थिच न्हाट हान्ह , पॅरालॅक्स प्रेस १९९१
चित्रे : विकिपीडिया
लेखिका गेली अकरा वर्षे "द इंटरनॅशनल स्कूल बंगलोर" ह्या शाळेत भौतिकशास्त्र व थेयरी ऑफ नॉलेज हे विषय शिकवत आहेत. आय.आय.टी.बॉम्बे आणि अमेरिकेच्या बफेलो विद्यापीठात भौतिकशास्त्राचे शिक्षण. वाचन, खगोलशास्त्र, रोबोटीक्स, शास्त्रीय संगीत, ट्रेकींग-पर्यटन, समाजसेवा इ. विषयांची मुलांना गोडी लागावी यासाठी प्रयत्न करत असतात. चित्रकला, लांब पल्ल्याच्या शर्यती, योगासने, एरोबिक्सची आवड. महाभारत, प्राचीन भारताचा इतिहास, ग्रीक तत्त्वज्ञान हे काही खास आवडीचे विषय. लोकसत्ता, मराठी विज्ञान पत्रिकेतून लिखाण.