उत्तर कोकणातील पोर्तुगीज वसाहत - वसई

प्रियाली

भाग २


पोर्तुगीज मुद्रा

वसईचा वेढा सोपा नव्हता; तब्बल दोन वर्षे मराठ्यांनी कसून लढा दिला. वसईच्या किल्ल्याच्या तीन बाजूंनी समुद्र आणि दलदल असल्याने किल्ला काबीज करणे कठीण होते. शेवटी अर्नाळा, वर्सोवा वगैरे किल्ल्याच्या आजूबाजूचा प्रदेश मराठे व्यापत गेले. यामुळे पोर्तुगीज सैन्याच्या रसदीवर परिणाम झाला. शेवटी चर खणून आणि सुरुंग लावून तटाला भगदाडे पाडून मराठे आत घुसले. हे करताना मराठ्यांच्या सैन्याची मोठी हानी झाली, तरीही मराठ्यांनी १७३९ मध्ये किल्ला जिंकून घेतला. तत्कालीन नोंदींनुसार मराठ्यांचे १२००० सैनिक कामी आले तर ८०० पोर्तुगीज कामी आले. (या नोंदीत पोर्तुगीजांकडून लढलेल्या इतर सैन्याची नोंद नसावी.) विजयानंतर मराठा सैन्याने पोर्तुगीजांच्या चर्चवरच्या घंटा उतरवल्या आणि त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली. त्यातील एक घंटा नाशिकच्या नारोशंकराच्या मंदिरात असून ती मराठी भाषेत “नारोशंकराची घंटा” या वाक्प्रचाराने प्रसिद्ध आहे. तर दुसरी घंटा अष्टविनायकांतील बल्लाळेश्वराच्या मंदिरात आहे.

मात्र ज्याला धार्मिक युद्धाचे नाव दिले जाते त्या युद्धातील तहाच्या अटी फारच सौम्य होत्या. या अटींनुसार पोर्तुगीज सैन्याला वसई सोडून जाण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली, या सह त्यांची चल मालमत्ता आणि संपत्ती सोबत घेऊन जाण्याची परवानगीही देण्यात आली. आठ दिवसांनंतर मराठ्यांनी किल्ला आणि घरादारांची लूट केली. बरेचसे पोर्तुगीज गोव्याच्या दिशेने चालते झाले. दोनशे वर्षांहून अधिक काळ वसईवरील पोर्तुगीज अंमल अशा रीतीने संपला, परंतु पोर्तुगीज संस्कृतीच्या खाणाखुणा आजही वसईत शिल्लक आहेत.

पुढे माधवराव पेशव्यांनी अनेक हिंदू कुटुंबांना वसईत वसण्यासाठी उद्युक्त केल्याचे सांगितले जाते. यावेळी पुण्याहून आणि कोकणातून अनेक हिंदू कुटुंबे वसईत स्थलांतरित झाली. सक्तीने किंवा फसवणूकीने बाटवलेल्यांना हिंदू धर्मात परत घेण्याचेही प्रयत्न माधवरावांनी केल्याचे दाखले मिळतात. मराठ्यांनी शर्थीने जिंकून घेतलेली वसई फार काळ त्यांच्या हाती टिकली नाही. खिळखिळीत झालेल्या पेशवाईला शह देऊन १७८० मध्ये इंग्रजांनी वसई जिंकून घेतली आणि वसईवर इंग्रजांचा अंमल आला. १८०२ मध्ये यशवंतरावाने पुण्यावर हल्ला केल्यावर दुसरा बाजीराव पळून वसईला इंग्रजांना शरण गेला. वसईच्या या दुसर्‍या तहात मराठेशाही बुडाली आणि पेशवे ईस्ट इंडिया कंपनीच्या हातातले बाहुले बनले. त्यानंतर वसईला काही काळ बाजीपूर या नावानेही ओळखले जाई.


किल्ल्याच्या आतील भाग

वसई आणि तिच्याजवळील माणिकपूर, पापडी, निर्मळ, रमेदी येथे पोर्तुगीजांनी बांधलेली सुरेख जुनी चर्चेस अद्यापही प्रार्थनास्थळे म्हणून वापरात आहेत.

वसईचा किल्ला

वसईचा किल्ला भुईकोट असून तो समुद्रकिनार्‍याशी बांधलेला आहे. तीन बाजूंनी समुद्र आणि दलदलीने वेढलेला आणि एका बाजूने वसई गावाकडे उघडणारा अशी किल्ल्याची रचना आहे. किल्ल्याला दोन प्रमुख प्रवेशद्वारे असून एक जमिनीच्या दिशेने (गावाकडे) आणि दुसरे बंदराच्या दिशेने आहे. किल्ल्याच्या चोहीबाजूंनी पूर्वी तट होते आणि तटांची उंची ३० फुटांच्या वर आहे.

चित्रात दाखवल्याप्रमाणे किल्ल्याला दहा बुरूज आहेत. त्यांची नावे नोस्सा सिन्होरा दोरेमेदिया, रैस मागो, सेंट गोंसोले, माद्रद दीय, एलिफांत, सेंट पेद्रू, सेंट पॉल्स, सेंट सेबस्तियन आणि दहावा सेंट सेबस्तियन कावलिरो बुरूज, अशी या बुरुजांची नावे होती. बुरुजांवर तोफा आणि बंदुका ठेवल्या जात. प्रत्येक बुरुजावर आठ सैनिक, त्यांचा एक कप्तान अशी फौज तैनात असे. मराठ्यांशी झालेल्या लढाईत सेंट सेबस्तियन बुरूज सुरुंगाने उडवून मराठ्यांच्या फौजा आत शिरल्याचे सांगितले जाते.


किल्ल्याच्या आतील भाग

किल्ल्याला दोन मुख्य दरवाजे असून सेंट जॉन बुरुजाच्या बाजूला बंदराच्या दिशेने उघडणारा दर्या दरवाजा आहे. किल्ल्यात न्यायालय, तीन चर्च, हॉस्पिटल, कारागृह, दारूचे कोठार वगैरे विशेष इमारती असून बाकी इमारतींचे अवशेषही दिसून येतात. किल्ल्यात चोर वाटा आणि काळोखी चक्री जिने आहेत. महादेवाचे आणि वज्रेश्वरीचे मंदिरही आहे. मराठ्यांनी किल्ला जिंकून घेतल्यावर बुरुजांना मराठी नावे दिली होती. कोकणातला, बंदरावर स्थित असा हा किल्ला तत्कालीन राजवटींना समुद्रावर आणि व्यापारावर लक्ष ठेवण्याच्या कामी अतिशय उपयुक्त असावा असा अंदाज बांधता येतो. तरीही पेशव्यांच्या हातात असताना या किल्ल्याचा म्हणावा तसा वापर झालेला दिसत नाही.

हा मूळचा किल्ला मुसलमानी पद्धतीने बांधलेला असला तरी पोर्तुगीजांनी त्याची बरीचशी मोडतोड करून युरोपीय पद्धतीच्या स्थापत्यशास्त्राचा वापर करून किल्ल्याची पुनर्बांधणी केल्याचे दिसते. अर्धगोलाकार कमानींचे दरवाजे, खिडक्या, सज्जे, बुरूज रोमन स्थापत्यशास्त्राचा वापर करून बांधल्याचे दिसते. इंग्रजांच्या हाती लागल्यावर किल्ल्याची व्यवस्था चांगली राखली गेली नाही. दलदल आणि त्यात माजणारे रान यामुळे किल्ल्याची पडझड होत होती. त्यात सन १८६० मध्ये इंग्रजांनी हा किल्ला एका इंग्रज अधिकारयाला, कर्नल लिटलवूडला भाड्याने दिला. त्याने किल्ल्यात ऊसाची शेती केली आणि साखर कारखाना उभारण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी त्याने किल्ल्यातील दगड लोकांना विकण्यास सुरुवात केली. तसेही लोक बांधकामासाठी पडलेले दगड उचलून घेऊन जात होतेच. पूर्वी वसईला भक्कम दगडी वाडे आणि कोट दिसत. ते दगड किल्ल्यातून उचलून आणल्याच्या गोष्टी ऐकायला येत. आज हे दगड आणि वाडे दिसेनासे होऊन तेथे सिमेंट काँक्रिटची जंगले उभी राहिली आहेत.


किल्ल्याचे अवशेष

किल्ल्याची व्यवस्था स्वातंत्र्योत्तर काळातही फारशी राखली गेली नाही. अनेक वर्षे हा किल्ला दुर्लक्षितच राहिला. सुयोग्य व्यवस्था राखली न गेल्याने जागोजागी माजलेले रान, तट फोडून बाहेर आलेली झाडांची मुळे, दलदल यामुळे किल्ल्याची आणखीनच दुर्दशा होत गेली. दिलेल्या चित्रात किल्ल्याचे भग्न अवशेष आणि वाढलेले रान दिसते. १५-२० वर्षांपूर्वी किल्ल्याच्या बर्‍याचशा परिसरात मानवी संचार शक्य नव्हता. गेल्या काही वर्षांत उभारला गेलेला चिमाजी आप्पांचा पुतळा व स्मारक आणि भारतीय पुरातत्त्व खात्याने या किल्ल्याची व्यवस्था हाती घेऊन थोडी डागडुजी आणि रानाची साफसफाई केल्याने या उपेक्षित किल्ल्याकडे लोकांचे थोडेफार लक्ष वळले आहे. तरीही ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या मुंबईजवळच्या या किल्ल्याला पर्यटन स्थळ बनवावे या दृष्टीने भक्कम प्रयत्न होणे आवश्यक आहेत. किल्ल्याच्या राहिलेल्या अवशेषांची डागडुजी करून, भिंती, बुरूज, तट यांची साफसफाई करून, जागोजागी ऐतिहासिक माहिती देणाऱ्या पाट्या लावून, पर्यटकांसाठी विश्रांती व्यवस्था करून या किल्ल्याकडे लोकांचे लक्ष वेधणे आणि एक महत्त्वाचा ऐतिहासिक वारसा जपणे शक्य आहे.

संदर्भ:

वसईची मोहीम – य. न. केळकर
Notes on the history and antiquities of Chaul and Bassein – Joseph Gerson Cunha.
वसईचा इतिहास

चित्रे:
नकाशा आणि इतर काही चित्रे विकिपिडीयावरून घेतली आहेत.

| २