दुरितांचे तिमिर जावो...

विकास

"बलसागर आणि विश्वात शोभून राहू शकेल" अशा भारताचा ल. सा. वि. शोधण्यासाठी व्यवस्थापकीय दृष्टिकोनातून विचार करायचा झालाच तर तीन टप्प्यांत करावा लागेल: पहिला असेल आज आपण कोण आहोत, दुसरा असेल आपल्यात अजून काय कमी आहे आणि तिसरा असेल या अपूर्णतेस तोंड देऊन परिपूर्ण होण्याच्या मध्ये नक्की कुठले अडथळे आपल्याला आहेत ज्यांना "पूर्णपणे" दूर करून आपल्याला पुढे जायचे आहे.

 
उपक्रमाच्या पहिल्यावहिल्या दिवाळी अंकाला शुभेच्छा, तसेच दिवाळीच्या आणि येणार्‍या नवीन वर्षाच्या उपक्रम संपादक, उपक्रमी आणि तमाम वाचक वर्गाला मनःपूर्वक शुभेच्छा! येते वर्ष उपक्रमी आणि तमाम भारतातील आणि जगभरच्या भारतीयांना, तसेच जगाला सुखसमृद्धीचे आणि शांतीपूर्वक जावो अशी मनोमन प्रार्थना!

प्रस्तुत दिवाळी अंकासाठी लिहिण्याचा विचार करता करता अनेक विचार जा-ये करत होते आणि अजूनही येत आहेत. पण कुठेतरी सर्वाचा ल. सा. वि. हा भारत खरेच कसा "बलसागर, विश्वात शोभणारा" होईल आणि २०२० सालापर्यंत विकसित होईल हेच विचार घोळत राहिले आहेत. त्यामुळे हा लेख म्हणजे ह्या संदर्भात मनात येत असलेल्या विचारांचे स्फुट आहे. त्यात नकारात्मक आणि टीकात्मक भूमिका घेण्याचा प्रयत्न नाही की अमुक एक म्हणजेच चांगले अथवा आदर्श किंवा बरोबर असे म्हणण्याचा आंधळा अट्टाहास नाही.... कदाचित वाचकांना असेही वाटू शकेल की भारताबाहेर राहण्यार्‍याला भारत २०२० साली विकसित होवोत का २०४० साली, किंवा कधीच न होवोत, काय पडले आहे? त्याचे सरळ उत्तर असे आहे की जोपर्यंत एखादी व्यक्ती जगाच्या पाठीवर कुठेही भारतीय वंशाची असेल तोपर्यंत तिला भारतीय म्हणूनच ओळखले जाईल - त्या व्यक्तीस आवडो अथवा न आवडोत. थोडक्यात भारत विश्वात शोभणारा राहोत म्हणण्यात माझा व्यक्तिगत स्वार्थ आहे आणि तो स्वार्थ साध्य होतो न होतो याचा विचार करायचा आणि त्याला माझ्या दत्तक देशाशी कुठेही कृतघ्नता न करता योग्य असा प्रयत्न करायचा माझा हक्कच नाही तर जबाबदारी आहे...
तर वर म्हटल्याप्रमाणे असा "बलसागर आणि विश्वात शोभून राहू शकेल" अशा भारताचा ल. सा. वि. शोधण्यासाठी व्यवस्थापकीय दृष्टिकोनातून विचार करायचा झालाच तर तीन टप्प्यांत करावा लागेल: पहिला असेल आज आपण कोण आहोत, दुसरा असेल आपल्यात अजून काय कमी आहे आणि तिसरा असेल या अपूर्णतेस तोंड देऊन परिपूर्ण होण्याच्या मध्ये नक्की कुठले अडथळे आपल्याला आहेत ज्यांना "पूर्णपणे" दूर करून आपल्याला पुढे जायचे आहे.

आज आपण कोण आहोत?

१९४७ नंतरच्या आधुनिक भारताचा या संदर्भात विचार केला तर काय आढळते? पाहिला काळ हा समाजवादी विचारसरणी, अर्थव्यवस्था आणि एकंदरीत व्यक्तिगत आदर्श/व्यक्तीला आदर्श-पूजनीय करण्याच्या स्वप्नांनी वेढलेला होता. त्याचे काही तत्कालीन चांगले फायदे झाले. उ. दा. आपण बर्‍यापैकी स्वतःला स्वतंत्र ठेवून स्वतःचे म्हणून वेगळे स्थान जगात ठेवू शकलो, ज्या तत्काळ गोष्टींची गरज होती अशी नेहरूंच्या भाषेतील "आधुनिक तीर्थक्षेत्रे" आपण तयार करू शकलो. तरी देखील एकंदरीतच सामान्य माणूस हा सत्ता, राजकारण आणि एकंदरीतच राष्ट्रीय व्यवहारापासून लांब जाऊ लागला. त्यानंतर स्वातंत्र्यानंतरची मळभ असल्यासारखे वातावरण तयार झाले खरे पण त्याला सर्वप्रथम राजीव गांधी, नंतर राव सरकार आणि नंतर वाजपेयी सरकारने छेद देऊन आधुनिक करण्याकडे विशिष्ट विकास साधण्याकडे लक्ष दिला. पर्यायाने आपल्याकडे तंत्रशिक्षण सहज उपलब्ध झाले, त्यातून संगणक क्रांती झाली. त्याच वेळेस मुक्त अर्थव्यवस्था पण आली आणि इन्फ्रास्ट्रक्चर चांगले होऊ लागले. काही अंशी माध्यमांनी त्यांचे काम बजावले. लवकरच चंद्रयान हे चंद्राकडे झेपावलेले असेल! त्यात चांगली भर म्हणून कधीकाळी स्वप्नात पण येऊ शकले नसते असे झाले - सामान्य माणसाचा प्रतिनिधी (मुलगा, मुलगी, सून, जावई, शेजारी, वगैरे) जगभर सहजतेने जाऊ लागला आपण जगाशी जोडले गेलो आणि स्वतःच्या कुंपणाबाहेर पडल्याने आपल्यातल्या उणीवा समजू लागल्या - केवळ स्वच्छता आणि आधुनिकतेच्याच नाहीत तर स्वातंत्र्य म्हणजे काय, या संदर्भातीलपण!

आपल्यात अजून काय कमी आहे?

जेव्हा विकसित देशात आपण हिंडायला लागलो, तेव्हा कधी काळी व. पु. काळ्यांनी अमेरिकेला जाऊन गेल्यावर काय अनुभवले ह्या प्रश्नाचे उत्तर दिले तेच मिळाले. व. पु. म्हणाले होते की अमेरिकेहून मी अस्वस्थता घेऊन आलो. कारण काय तर सार्वजनिक व्यवस्था! यावर रकानेच्या रकाने भरता येतील पण प्रदूषणासंदर्भातील अनास्था, कामातील गुणात्मक फरक, आपले घर जसे देखणे पाहिजे तसाच आपला परिसर, सभोवताल वगैरे सर्वच देखणे असावे ह्या संदर्भातील रास्त अट्टाहासाचा अभाव, साम्यवाद आणि चुकीच्या पद्धतीने राबवलेला समाजवाद जितका व्यापक हिताच्या आड येऊ शकतो तितकेच न संपणारी हाव निर्माण करणारा भांडवलवाद पण घातकच असतो. असा भांडवलवाद हा डार्विनच्या सिद्धान्तातील अस्तित्वाचा लढा तयार करतो. करतो ते करतो त्याला अनंत सामाजिक फाटे फोडतो... भारतात तर असे फाटे फुटणे अनिवार्य आहे. त्याचे कारण जसे हजारो वर्षाच्या सामाजिक दरी असलेल्या इतिहासात आहे तसेच त्याचे मिश्रण विशेष करून गेल्या ५०-६० वर्षात समाजवादी व्यवस्थेने वृद्धिंगत झालेल्या पण त्याही आधीपासून असलेल्या तामसिकतेतील आळसात पण आहे. "चलता है" संस्कृतीत आजचे स्वतःचे पोट भरताना, "आता कशाला उद्याची बात" म्हटले गेले. थोडक्यात प्रवास बराच झाला आहे पण अजून विकसित होण्यासाठी अनेक टप्प्यांना पार करायचे आहे. ते पण नुसते सरकारी धोरण म्हणून नाही तर सामाजिक जाणीवेने...

परिपूर्ण होण्यात नक्की कुठले अडथळे आहेत?

वरील परिच्छेदात अनास्था, फरक, अभाव, घातक व्यवस्था, अस्तित्वाचा लढा, सामाजिक फूट आदी अनेक शब्द आले आहेत. जसे "घोडा का अडला? पान का सडले? भाकरी का करपली" या प्रश्नांची उत्तरे जशी "फिरवली नाहीत" म्हणून आहे, तसेच आपल्यातील कमीपणाचे मूळ हे आपल्या सामाजिक स्वार्थ न ठेवण्याच्या अज्ञानात पण आहे. जेव्हा समाजात कुठेही अस्वस्थता असते तेव्हा त्याचे तत्कालीन कारण काही असले तरी मूळ हे अवास्तव विषमतेत असते. अशी विषमता जेव्हा अवाजावी होते तेव्हा त्याचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतात. मग ते कधी राजकीय घटनांत दिसतात - उदा. पंजाब प्रश्न हा केवळ जनसामान्यांनाच भोवला नाही तर इंदिरा गांधीना पण भोवला, तीच कथा राजीव गांधींची... तेच प्रदूषणासंदर्भात - आज अनेक राजकीय/सामाजिक/औद्योगिक नेते पण कॅन्सर आणि तत्सम प्रदूषणाच्या परिणामांची फळे चाखत आहेत. प्रत्यक्ष चाखत नसतील तर किमान त्यांना स्वतःची नको इतकी काळजी घ्यावी लागते... विचार करा आज आपल्यातील किती जण पाणी पिताना गाळून पितो अथवा बिसलेरीतील पितो? तशी अवस्था अमेरिकेत अथवा इतरत्र होते का? (मार्केटिंग केल्याने बाटल्यातील पाणी पिणे वेगळे! ). असे अजून बरेच काही सांगता येईल. पण मूळ मुद्दा इतकाच की आज आपण "जाणीवेने" आणि एकत्रितपणे कशाचाच विचार करत नाही आहोत. ते जेव्हा होईल त्या दिवशी हे प्रश्न संपणार नाहीत पण उत्तरे मिळायला लागतील आणि गाडी योग्य मार्गाला लागेल.

पण तसे व्हायचे असेल तर आपल्याला समाजातील दरी काढून टाकावी लागेल. आज अशी अनेक प्रकारच्या दर्‍या आपण अनुभवतो - जातींमुळे, धर्मांमुळे, भाषांमुळे. या दर्‍या राहण्याचे कारण जर आज काही असेल तर ते केवळ इतिहासातील भडक वास्तव नाही आहे. कारण आज कायद्याने सर्व समान आहेत. तशी तरतूद होऊनही आज ५०-५५ वर्षे झाली. माझ्यामते त्याचे कारण आहे, जाणीवेने पोसलेला द्वेष. हा द्वेष जात, धर्म आणि भाषांच्या संदर्भात बर्‍याचदा राजकारणी पोसतात आणि तुम्ही आम्ही त्याला बळी पडतो. इतके की त्यावर तावातावाने विचार करत असताना आपल्याला प्यायचे पाणी कसे मिळत आहे, अंधारात चाचपडत बसावे लागत आहे ह्याचा देखील विसर पडतो. खरेच अशा वेळीस वाटते की नक्की आपले प्राधान्य कशाला आहे? बरे ज्याला आपण प्राधान्य देत आहोत, किमानपक्षी त्याला तरी आपण न्याय देत आहोत का? की निव्वळ स्वत:च्या आणि इतरांच्या मनात द्वेष तयार करत आहोत? त्यात अजून एक गंमत असते की आपण परकीय जसे आहेत तसे, त्यांच्या बापजाद्यांनी आपल्यावर केलेले अन्याय विसरून स्वीकारायला मागे पुढे पाहत नाही. पण तेच जेव्हा आपलीच त्वचा, आपलेच रक्त, आपल्याच मातीतील आपलीच माणसे असतात, आपल्याच भाषा असतात, आपलेच धर्म असतात तेव्हा हलाहलासारखा द्वेष उफाळून येतो... याची खरेच गरज आहे का?

थोडक्यात...

आज जर आपण कुठल्या अंध:कारात चाचपडत असलो तर ते सरकारी भारनियमनाने आणलेल्या वीजकपातीच्या अंधारामुळे नाही. त्यामुळे नक्कीच आपण २०२० साली विकसित होणार नाही आहोत. त्या आणि इतर साठी जर वाटेल तशी वाटेल तेथे ऊर्जा तयार करायचे घिसाडघाईने निर्णय घेतले तर आपला विकसितपणा तर अजून लांबेल असेच वाटते. पण या सामाजिक द्वेषाच्या तिमिरातून मात्र, आपण ना स्वत:चे भले करत आहोत ना आपल्या पुढच्या पिढ्यांचे ना समाजाचे ना देशाचे. कारण नक्की आपला स्वार्थ कशात आहे हेच समजेनासे झाले आहे... याला इतर कोणापेक्षा तशा प्रचाराला बळी जाणारे आपणच जबाबदार आहोत...

... ज्ञानेश्वरांची सर्वमान्य कथा अशी आहे की ज्यात ह्या कुलकर्णी कुटुंबाला कर्मठपणाला तोंड द्यावे लागले. ह्या लहान भावंडांना अतोनात हाल सहन करावे लागले. तरी देखील त्याला संयमाने उत्तर देत ही भावंडे तथाकथित बुद्धिवादाला वास्तव बुद्धिवादाने तोंड देत राहिली. तसे तोंड देत असताना ज्ञानेश्वरांनी अक्षर वाङमय तर तयार केलेच पण शेवटी ह्या संयमाचा कळस म्हणून पसायदान लिहिलेच पण देवाकडे प्रार्थनेत विनंती केली, तर "दुरितांचे तिमिर जावो. " ही वाक्ये जरी ज्ञानेश्वरांची असली तरी तो एक समान धागा आपल्या संतपरंपरेत दिसून येईल... संतांचे काय चांगले आणि काय वाईट यावर तुम्ही-आम्ही सर्वच त्यांच्या एक टक्कापण काम न करता, बोलत असतो, लिहीत असतो, पण त्यांच्यातील अढी न ठेवण्याची, द्वेष न करण्याची वृत्ती आत्मसात करणे लांब राहूदेत, नुसती ओळखण्याकडे पण महत्त्व न समजून दुर्लक्ष करतो.

म्हणून आज लक्ष लक्ष दिवाळीचे दिवे सर्वत्र लागलेले असताना, माझ्या आणि तुमच्या मनातील, कुठल्याही कारणाने सामाजिक दूरी ठेवणारे तिमिर निघून जावोत ही प्रार्थना!