उपक्रमच्या सदस्यांनी पाठवलेली विविध विषयांवरील मनोरंजक माहिती
SOS
SOS हा मदतीच्या धाव्याचा संकेत हे "Save Our Souls" अथवा "Save Our Ship"चे संक्षिप्त रूप आहे असे सामान्यतः समजले जाते. परंतु ही समजूत चुकीची आहे. SOS हे जहाजांवरील बिनतारी दळणवळणात पूर्वापार वापरण्यात येणार्या मोर्स कूटात ... --- ... (डिडिडिट्-डाडाडा-डिडिडिट् किंवा मराठीत कडकडकड-कट्टकट्टकट्ट-कडकडकड, अर्थात तीन लघुसंकेत, तीन दीर्घसंकेत आणि पुन्हा तीन लघुसंकेत) असे होते. अर्थात आणीबाणीच्या प्रसंगी हे कूट संदेश पाठवणार्याला लक्षात ठेवण्याकरिता व संदेशग्राहकाला चटकन लक्षात येण्याकरिता अत्यंत सोपे असल्यामुळे त्याची योजना केली गेली. "Save Our Souls" अथवा "Save Our Ship" ही लक्षात ठेवण्याच्या सोयीसाठी (Mnemonics म्हणून) नंतर लादली गेलेली दीर्धरूपे आहेत.
टपाल तिकिटे
टपालशुल्क गोळा करण्यासाठी आणि ते गोळा केल्याचा पुरावा म्हणून पत्रावर टपालाची तिकिटे चिकटवण्याची प्रथा सर्वप्रथम ब्रिटनमध्ये सुरू झाली. अर्थात प्रथा सुरू झाली तेव्हा टपालतिकिटे जारी करणारा ब्रिटन हा जगातील एकमेव देश असल्यामुळे टपालतिकिटावर देशाचे नाव छापण्याची काहीच गरज नव्हती. आजतागायत टपालतिकिटावर देशाचे नाव छापण्याच्या जागतिक अटीतून सर्वानुमतीने वगळलेला आणि ते न छापणारा ब्रिटन हा जगातील एकमेव देश आहे.
'चाक्या म्हसोबा'
प्रवासी वाहतूक करणारी हिंदुस्थानातील पहिली आगगाडी १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई (बोरीबंदर) ते ठाणे या दोन शहरांदरम्यान धावली. साहेब, सिंध आणि सुलतान या तीन इंजिनांनी ओढलेल्या व १४ डबे जोडलेल्या या आगगाडीने २१ मैलांचा हा प्रवास १ तास व १५ मिनिटांत पूर्ण केला. या पहिल्यावहिल्या आगगाडीत ४०० आमंत्रित प्रवासी होते. साहेबाच्या अकली पोर्याने २१ तोफांच्या सलामीसह हाकलेल्या बिनबैलाच्या गाडीच्या या चमत्काराला स्थानिक लोकांनी 'चाक्या म्हसोबा' हे नाव बहाल केले.
वेगळे राष्ट्रध्वज
१. स्वित्झर्लंड आणि नेपाळ या दोन देशांचे राष्ट्रध्वज इतर राष्ट्रध्वजांप्रमाणे आयताकृती नाहीत. स्विस राष्ट्रध्वज चौरसाकृती असून नेपाळी राष्ट्रध्वज दोन त्रिकोणांच्या पताकेप्रमाणे दिसणारा आहे.
२. लिब्या या देशाच्या राष्ट्रध्वजावर कोणतेही चिन्ह, आकृती किंवा लिखाण नाही. हिरव्या गडद रंगात आणि संपूर्ण मोकळा असणारा तो एकमेव राष्ट्रध्वज आहे.
३. पराग्वेचा राष्ट्रध्वज दोन्ही बाजूंनी वेगळा आहे. ध्वजाच्या पुढील आणि मागील बाजूस वेगवेगळे शिक्के स्थानापन्न केलेले आहेत.
"A"
१ ते ९९९ पर्यंतच्या कोणत्याही इंग्रजी आकड्यात "A" हे अक्षर येत नाही. हे अक्षर आकड्यात येण्यासाठी हजार अंकांपर्यंत वाट पाहावी लागते. इंग्रजी एक हजार किंवा वन थाउजंड या शब्दात सर्वप्रथम "A" हे अक्षर वापरलेले आहे.
गॉल्फचा प्रचंड चेंडू
वॉल्ट डिस्नी रिझॉर्टच्या एपकॉट या पार्कातील सुप्रसिद्ध स्पेस अर्थ हे आकर्षण गॉल्फच्या चेंडूच्या आकाराचे आहे. हा प्रचंड चेंडू तटवायचा झाला तर योग्य परिमाणांनुसार तटवणार्या माणसाची उंची सुमारे २ मैल हवी.