वैचारिक क्षमतेवर पसरलेली श्रद्धेची गडद छाया
भाग १
माणूस हा एक विचित्र प्राणी आहे. या प्राण्याला नाविन्याची फार हौस आहे. त्याच्यात सर्जनशीलतेची क्षमता आहे. गुंतागुंतीच्या समस्यांना योग्य उत्तरं शोधण्याची हातोटी आहे. त्याने केलेल्या तंत्रज्ञानातील अफाट प्रगतीमुळे मानवी जीवन सुसह्य होत चालले आहे. स्वत:च्या आरोग्य स्थितीवर संशोधन करत तो आता जास्तीत जास्त वर्षे जगण्याचा प्रयत्न करत आहे. दुर्धर समजलेल्या रोगांवर औषधोपचार शोधल्यामुळे निरोगी आयुष्य जगणे त्याला आता शक्य होत आहे. परंतु एवढे करूनसुद्धा अजूनही तो अविचारांना, चुकीच्या विचारांना बळी पडतोच आहे.
अनेक प्रसंगी त्याच्या विचारातील, त्याने घेतलेल्या निर्णयातील विसंगती प्रकर्षाने जाणवू लागतात. या विसंगतींचे मूळ शोधल्यास त्याच्या विचारप्रक्रियेला श्रद्धेची पार्श्वभूमी लाभलेली असल्यामुळे साहजिकच त्याच्या विचारात व घेतलेल्या निर्णयात कमालीची तफावत जाणवते. किंबहुना त्याने जोपासलेल्या श्रद्धाच त्याचे निर्णय घेतात की काय असे वाटू लागते.
जो दृष्टीकोन पुरावा नसतानासुद्धा खरा आहे असा वाटत असतो त्यालाच सामान्यपणे आपण श्रद्धा म्हणतो. माणूस जोपासत असलेल्या श्रद्धा विविध मार्गाने आलेल्या असतात. काहीवेळा तो स्वत:हूनच आकर्षित झालेला असतो. काही श्रद्धा वाड-वडिलांपासून, काही मोठ्या लोकांच्या दबावामुळे, काही लहानांच्या प्रेमाखातर, काही शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक वातावरणामुळे त्याच्या मनात घर करून बसलेल्या असतात. स्वत:चाच दृष्टीकोन खरा आहे असा समज करून घेत असल्यास, त्याने घेतलेल्या निर्णयावर जोपासत असलेल्या त्याच्या श्रद्धा फार मोठ्या प्रमाणात परिणाम करू शकतात.
आपण रोज अनेक लहान - मोठे निर्णय घेत असतो, विविध प्रकारचे निर्णय घेत असतो. निर्णय घेत नसल्यास वा निर्णय घेणे टाळत असल्यास आपले जिणे खडतर झाले असते. निर्णय घेताना आपल्या हातून कळत न कळत चुकाही होत असतात. अनेक वेळा कुठेतरी चुकत आहोत हेसुद्धा कळत नाही. नंतर केव्हा तरी चूक उमगल्यास वेळ निघून गेलेली असती. या (घोड) चुका आपले श्रम, वेळ व पैसा वाया घालवत असतात. चुकीच्या निर्णयामुळे आपले आरोग्य धोक्यात येऊ शकते. प्रसंगी जीवावर बेतू शकते. देव - धर्म, तांत्रिक - मांत्रिक, बाबा - बुवा, फलजोतिषी, यांच्या क्षमतेवर आपली श्रद्धा असल्यास आपल्या काका - मामांचे भूत आपल्या मानगुटीवर बसले नाही ना , या विचाराने आपण अस्वस्थ होऊ लागतो. कुंडलीतील मंगळामुळे मन:शांती ढासळू लागते. बुवा - बाबांच्या नादी लागल्यामुळे घरातले वातावरण हळूहळू बिघडू लागते. जडी - बुटी, अंगार - धूप इत्यादींच्या उपचारामुळे आपण आपला जीव धोक्यात घालवतो. नवस - सायास, उपास-तपास, जत्रा - उरुस इत्यादीमुळे जीव हैराण होतो. श्रद्धेच्यापायी सारासार विचार करण्याची कुवतच हरवून बसतो.
आपण चुकीचा विचार का करतो, हा प्रश्न मनात आल्यास आपण खरोखरच मूर्ख तर नाही ना, असे वाटू लागते. सामान्यपणे तसे काही नसते. आपण मोठमोठ्या हुद्यावर असतो. अत्यंत जोखमीची कामं हाताळतो. आपल्या काही निर्णयामुळे हजारो हातांना रोजगार मिळतो, आपल्यामुळे गुंतागुंतीची यंत्रणा वा व्यवस्था विनातक्रार काम करत असते. अनेकांचे जीव वाचतात. तरीसुद्धा काही प्रसंगी आपल्यातील बहुतेकांच्या - डॉक्टर्स, इंजिनियर्स, उद्योगपती, नोकरदार यांच्यासकट शिकलेले सवरलेले व अशिक्षितांच्यासुद्धा - विचार करण्यात, विचार करण्याच्या पद्धतीत काही उणीवा राहिलेल्या जाणवतात. व या उणीवांचे मूळ आपण जोपासत असलेल्या श्रद्धापर्यंत पोचते. श्रद्धेमुळे माहितीचे विकृतीकरण होते. मुळातच आपली पुरावे शोधण्याची व हाती आलेल्या पुराव्यांचे विश्लेषण करण्याची पद्धतच चुकीची असते. काही वेळा वेळ मारून नेण्यासाठी किंवा पुराव्यांच्या अभावी समस्यांचे सुलभीकरण केले जाते. विषयाकडे पुरेशा गंभीरपणे बघितले जात नाही. तर्कशुद्ध विचार करण्याचे वा अचूक निर्णय घेण्याचे कौशल्य आत्मसात केलेले नसल्यामुळे आपण तोंडघशी पडू शकतो. आपल्या शिक्षणपद्धतीतच विचार करण्याचे, तर्कशक्ती लढवण्याचे, विश्लेषण करण्याचे साधे प्राथमिक धडेसुद्धा दिलेले नसतात. ही अकुशलता आपल्या आयुष्यावर फार दूरगामी परिणाम करू शकते, हेच आपल्याला माहीत नसते.
यांच्याच जोडीला विज्ञान व आभासी विज्ञान यातील फरक न कळल्यामुळे वा त्यांच्याबद्दलच्या चुकीच्या आकलनामुळे आपल्या विचारक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. टीव्हीसारख्या प्रसार माध्यमातून बहुतेक वेळा चुकीच्या, तर्कविसंगत, भ्रामक अशा गोष्टींचे उदात्तीकरण होत असते. आर्थिक लाभ हाच मुख्य उद्देश असलेल्या टीव्ही प्रसार माध्यमाच्या व्यवसायात फलज्योतिष, अतींद्रिय शक्तीचे (ओंगळ) प्रदर्शन, परामानसशास्त्राचे उदात्तीकरण, भूत - भानामतीसारख्या अंधश्रद्धांचा आक्रमक प्रसार, दैवीशक्तीबद्दलच्या अफाट कल्पनांचा बाजार, चमत्कारांची धूळफेक, इत्यादींची रेलचेल असते. वास्तवतेचा, वस्तुनिष्ठतेचा पूर्ण अभाव तेथे असतो. त्यामुळे पडद्यावरील सत्य हेच वास्तवातील सत्य आहे अशी समजूत करून घेतल्यामुळे आपण आपली विचार क्षमता हरवून बसतो. निर्णय घेत असताना अक्षम्य चुका होऊ लागतात. त्या चुका निस्तरता निस्तरता माणूस हैराण होतो. परंतु श्रद्धेच्या जबरदस्त मगरमिठीतून आपली सहजासहजी सुटका होत नाही. उलट अशा अवैज्ञानिक गोष्टींच्या माऱ्यामुळे आपल्या श्रद्धा जास्त बळकट होऊ लागतात व क्रमेण विचारशक्ती कुंठित होऊ लागते. कुठलिही चिकित्सा न करता कुठल्याही गोष्टीचा स्वीकार करण्याची सवय जडते. श्रद्धेच्या पूर्ण आहारी गेल्यामुळे विवेकी व तार्किक विचाराऐवजी रूढी, परंपरा, मानसिक समाधान, आत्मिक उन्नती, अध्यात्म, कथा-पुराणातील दाखले, इत्यादींच्या आधारावर आपल्या श्रद्धेचा मनोरा डोलत असतो. काही वेळा आपले आर्थिक व सामाजिक हितसंबंध गुंतलेले असतात. त्यामुळेसुद्धा आपण श्रद्धेच्या विरोधात भूमिका घेवू शकत नाही.
पुढे: पृष्ठ २