वैचारिक क्षमतेवर पसरलेली श्रद्धेची गडद छाया

भाग २

मुळातच आपल्या समाजात चिकित्सेचा पूर्ण अभाव आहे. एवढेच नव्हे तर चिकित्सकतेबद्दल सुप्त घृणा आहे. चिकित्सा करणारे म्हणजे छिद्रान्वेषी, चांगल्या कामात खो घालणारे, नकारात्मक आयुष्य जगणारे, उत्साहावर पाणी टाकणारे अशी त्यांच्याबद्दलची एक प्रतिमा सश्रद्धांच्या मनात घर करून असते. या समाजात सश्रद्धांचाच वरचष्मा असल्यामुळे चिकित्सक नामोहरम होत असतात. बदनामीच्या भीतीमुळे चिकित्सकांना बहुतेक वेळा गप्प बसावे लागते. खरे पाहता चिकित्सक विश्लेषकाची भूमिका बजावत असतात. संभाव्य धोक्यांचा इशारा देत असतात. चिकित्सकता या गुणविशेषाची संवर्धन करण्याची खरी गरज आहे. त्यामुळे आपले निर्णय अचूक होतात. नियोजनपूर्वकपणे त्या निर्णयांची अंमलबजावणी करता येते. अडचणीवर मात करता येते. श्रद्धेच्या जगात चिकित्सेला स्थान नाही. कारण चिकित्सक प्रत्येक श्रद्धाविषयांचा अभ्यास करून उलटतपासणी घेत त्यातील विसंगती उघडे पाडतो. आपल्या अविचारी वर्तनावर बोट ठेवतो. चिकित्सा हे शहाणपणाचे लक्षण आहे. पुराव्याविना कुठलिही गोष्ट चिकित्सक सहजासहजी स्वीकारत नाही.

श्रद्धेची गडद छाया असलेली ही मानसिकता कशा कशामुळे घडत असावी याचा थोडासा जास्त खोलात जाऊन विचार करू लागल्यास पुढे नमूद केलेल्या गोष्टी ठळकपणे दिसू लागतील.

आपण प्रत्यक्ष आकडेवारीपेक्षा ऐकीव माहिती व मनोरंजक गोष्टीवर विश्वास ठेवतो

माणसांना त्यांच्या आदिम अवस्थेपासूनच गोष्टी सांगण्याची वा गोष्टी ऐकण्याची सवय जडलेली आहे. उत्क्रांत काळातील ही सवय अजूनही टिकून आहे. रानटी अवस्थेतील माणूस गुहेपाशी, उघड्यावर जाळ करून आपल्या टोळीतील लोकांपुढे गोष्टी सांगत वा ऐकत असे. आजचा आधुनिक माणूस क्लबमध्ये, टीव्हीसमोर, गोल्फच्या मैदानावर, चहा - कॉफी - दारूचे घुटके घेत घोळका करून गप्पा रंगविण्यात वेळ घालवत आहे.

माणसांना त्यांच्या आदिम अवस्थेपासूनच गोष्टी सांगण्याची वा गोष्टी ऐकण्याची सवय जडलेली आहे. उत्क्रांत काळातील ही सवय अजूनही टिकून आहे. रानटी अवस्थेतील माणूस गुहेपाशी, उघड्यावर जाळ करून आपल्या टोळीतील लोकांपुढे गोष्टी सांगत वा ऐकत असे. आजचा आधुनिक माणूस क्लबमध्ये, टीव्हीसमोर, गोल्फच्या मैदानावर, चहा - कॉफी - दारूचे घुटके घेत घोळका करून गप्पा रंगविण्यात वेळ घालवत आहे. जसजसे प्रसार माध्यमांचा - मौखिक, हस्तलिखित, मुद्रित, फोन, रेडिओ, टीव्ही, संगणक, इंटरनेट, मोबाइल फोन, - विकास होऊ लागला, तसतसे आपल्यातील गोष्टीवेल्हाळपणाला ऊत येत आहे. त्यामुळे बिनबुडाच्या गोष्टीसुद्धा खरे आहेत असे वाटू लागतात. गप्पा - गोष्टी मनोरंजन करतात, कल्पनाशक्तीला वाव देतात हे मान्य करतानाच त्यांचा पुरावा म्हणून स्वीकारता येत नाही. माणूस हा सामाजिक प्राणी असल्यामुळे एकमेकातील नातेसंबंध घट्ट करण्यासाठी अनुभवजन्य गोष्टींच्या देवाण - घेवाणीला पर्याय नाही, हे आपण समजू शकतो. परंतु त्यांनाच पुरावे म्हणून मान्यता देत असल्यास आपली तार्किकशक्ती कुंठीत होत जाईल व आपले निर्णय चुकीचे ठरू लागतील. ज्या माहितीच्या आधारे आपण निर्णय घेत असतो, ती माहितीच चुकीची, अर्धवट, सापेक्ष वा बिनपुराव्याची असल्यास आपल्या निर्णयामुळे अनेक कटकटी निर्माण होण्याची शक्यता असते.

आपण एखादी कार घ्यायची ठरवत असल्यास कारसंबंधीची इत्थंभूत माहिती गोळा करण्याच्या मागे लागतो. वेगवेळ्या कंपनीच्या कार्सची, त्यांच्या मॉडेल्सची व आपल्या अपेक्षेची (कुवतीची!) चिकित्सक व तुलनात्मकरित्या अभ्यास करतो. कंपनीची बाजारातील पत, देखभालीची सुविधा, विक्रीपश्चात सेवा, गॅरंटी, वॉरंटी इत्यादी अनेक मुद्द्याचे विश्लेषण करून पूर्ण विचारांती अमुक कंपनीचे अमुक मॉडेल घेण्याच्या निर्णयापर्यंत पोचतो. सहज म्हणून गप्पांच्या ओघात एखाद्या मित्रासमोर आपल्या निर्णयाचा उल्लेख केल्यावर "ती गाडी ना! अजिबात घेऊ नकोस. तसली गाडी घेऊन मला पश्चात्ताप झाला. एकदा क्लच बदलावा लागला. ब्रेकचे प्रॉब्लम्स आहेतच. त्याऐवजी ही गाडी घे. एकदम फर्स्ट क्लास! " यावर आपली प्रतिक्रिया काय असणार? बहुतेक जण मित्राच्या वैयक्तिक अनुभवावर विसंबून आपले निर्णय बदलून टाकतील. मित्रानी शिफारस केलेली गाडी घेतील.

खरे पाहता आपला आधीचा निर्णय अधिक वस्तुनिष्ठ, आकडेवारी व प्रत्यक्ष पुराव्यावर आधारित होता. परंतु आपली मानसिकताच कचखाऊ असल्यामुळे शेवटच्या क्षणी निर्णय फिरवून मित्राच्या अनुभवावर श्रद्धा ठेऊन भलताच निर्णय घेतो. मित्राचा अनुभव वैयक्तिक स्वरूपाचा होता. त्यानी घेतलेल्या गाडीत खरोखरच क्लच वा ब्रेकच्या समस्या असू शकतील. म्हणून सर्वच गाड्या तशाच असावेत हा समज अत्यंत चुकीचा आहे. अनुभवाचे बोल, आकर्षक संभाषण शैली, जाहिरातबाजी, आकडेवारीची जागा घेऊ शकत नाहीत. आकडेवारीचे विश्लेषण कंटाऴवाणे, दुर्बोध, वा अमूर्त असे वाटले तरी त्याच्यातून मिळणारी माहिती अचूक व निर्णय घेण्यास अत्यंत उपयुक्त असते. आपण मात्र आकडेवारी बाजूला सारून भलत्याच अनुभवाच्या ऐकीव गोष्टीवरून आयुष्यातील अत्यंत महत्वाचे निर्णय घेत असतो. कारण आपली मानसिकताच श्रद्धेच्या गडद छायेत अडकून पडलेली असते.

आपण आपल्या श्रद्धा-विचारांशी पूरक असलेल्या गोष्टीच फक्त लक्षात ठेवतो

आपण नेहमीच आपल्या विधानांच्या पूरक अशा गोष्टींच्यांच शोधात असतो. आपला फलजोतिषावर विश्वास असल्यास जोतिषाने सांगितलेली एखादे क्षुल्लक भाकित खरे ठरले तरी आपण त्याची वाहवा करत राहणार. त्याच्यावरील श्रद्धेत भर पडतच राहणार. त्यानी सांगितलेल्या इतर हजारो भाकिते खोटे ठरल्या तरी आपल्या श्रद्धेला अजिबात तडे जाणार नाहीत. आपल्या श्रद्धेला धक्का लावणाऱ्या गोष्टी आपल्या खिजगणतीत नसतात. त्यामुळे यश आपल्या लक्षात राहते व अपयश स्मृतीच्या अडगळीच्या कोपऱ्यात जाऊन पडते.

आपल्या ओळखीतला एखादा माणूस दानशूर आहे असे आपल्याला मनोमन वाटत आल्यास त्यानी एखाद्या गरजू संस्थेला दिलेली क्षुल्लक देणगी आपल्याला फार मोठी वाटते. तो कायमचाच सर्वाना अशीच देणगी देत असेल अशी खूणगाठ आपण मनातल्या मनात बांधत असतो. परंतु प्रत्यक्षात तो हजारो पीडितांना रिकाम्या हाताने परत पाठवत असला तरी त्याच्याविषयीची आपली श्रद्धा अचल राहते. त्या देणगीदाराच्या विरोधातील एकही शब्द ऐकून घेण्याच्या स्थितीत आपण नसतो. आपल्या (श्रद्धेच्या) विश्वातच रमणाऱ्या या कूपमंडूक वृत्तीमुळे आपले जबरदस्त नुकसान होऊ शकते, याचीसुद्धा आपल्याला भान नसते. त्यामुळेच आपल्या विधानांची, वर्तनांची वा निर्णयांची चिकित्सा करणारे शत्रू समान वाटू लागतात.

योगायोग व चान्समुळेही गोष्टी घडू शकतात याचा आपल्याला (सोईस्करपणे) विसर पडलेला असतो

जगात काही वेळा योगायोगाने पण गोष्टी घडू शकतात, हे आपण नेहमीच विसरतो. कावळा बसायला व झाडाची फांदी मोडायला कारण योगायोग असतो, कावळ्याची किमया नव्हे. शेअर बाजारातील एकाद्या कंपनीचे समभाग कायमचेच तेजीत आहेत अशी जाहिरात वाचून आपण त्या कंपनीत फार मोठी गुंतवणूक करत असल्यास ते महागात पडण्याचीच शक्यता जास्त. कारण त्या विशिष्ट कंपनीची कार्यक्षमता त्या कालावधीत चांगली असेल. परंतु यानंतरसुद्धा ती तशीच राहील याची खात्री देता येत नाही. योगायोगामुळे त्या समभागावर कित्येकांनी प्रचंड नफा कमविला असेलही. परंतु याचा अर्थ तो नफा तुम्हालाही मिळू शकेल किंवा समभागामधील गुंतवणूक आदर्शवत आहे असे ठामपणे सांगता येणार नाही. नाणे उडवून छाप - काटा ठरवायचे असल्यास सतत पाच-सहा वेळा छाप येण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु यानंतरसुद्धा छापच येईल वा छापच येत राहील याची खात्री कुणीच देवू शकत नाही.

आपण तीन - चार कंपन्यांच्यात गुंतवणूक केल्या केल्या भाव वधारला की त्या विषयात तज्ञ झालो ही समजूतसुद्धा एक श्रद्धा आहे. त्यावरून कंपन्यामध्ये सर्व पैसा गुंतवण्याचा सपाटा लावल्यास पश्चात्तापाची वेळ येईल. कारण मुळातच अशा गोष्टी योगायोगाने घडत असतात याचा मागमूसही आपल्याला नसते. आपल्या 'शहाणपणा'वर आपली नितांत श्रद्धा असल्यामुळेच अशाप्रकारचे जीवघातकी निर्णय आपण घेत असतो व नंतर कर्जबाजारी होतो. खुल्या मनाने थोडा वेळ तरी विचार करण्याची तसदी घेतल्यास त्यामागील कार्य-कारणभावामध्ये योगायोग व चान्स हेसुद्धा कारण असू शकतील हे नक्कीच लक्षात येईल व आर्थिक नुकसान टाळू शकेल.

 

पुढे: पृष्ठ ३