वैचारिक क्षमतेवर पसरलेली श्रद्धेची गडद छाया

प्रभाकर नानावटी

भाग ३

आपण नेहमीच आपल्या परिस्थितीचे व आपल्या भोवतालच्या जगाचे चुकीचे आकलन करतो

काही वर्षापूर्वी दिल्लीत "एक माकडसदृश माणूस प्राणी रात्रीच्या वेळी माणसांना जखमी करत आहे, त्याची लांब लांब नखं आहेत, उंच इमारतीवरून उड्या मारत आहे, लोकांना ओरबाडून रक्तबंबाळ करत आहे, " अशा बातम्या वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर छापून आल्या. आज अमुक गल्लीत माकडांनी हल्ला केला, तमुक बाजारात माकडांनी ओरबाडले, अमुक इतके लोक दवाखान्यात उपचार घेत आहेत, अशा बातम्यांना ऊत आला. लोक घाबरून रात्रीच्या वेळी बाहेर पडेनासे झाले.

आपले ज्ञानेंद्रिय आपल्याला कधीच दगा देणार नाहीत यावर आपली अढळ श्रद्धा असते. परंतु वास्तव परिस्थितीच्या चुकीच्या आकलनामुळे साध्या दोरीला साप म्हणून भुईवर थोपटत असतो. भुता-खेतावर विश्वास ठेवणाऱ्यांना भूत हमखास दिसतात व शपथेपूर्वक सांगण्याची त्यांची तयारी असते. परंतु आपल्याला भास होऊ शकतात याची पुसटशी जाणीव त्यांच्यात नसते.

काही वर्षापूर्वी दिल्लीत "एक माकडसदृश माणूस प्राणी रात्रीच्या वेळी माणसांना जखमी करत आहे, त्याची लांब लांब नखं आहेत, उंच इमारतीवरून उड्या मारत आहे, लोकांना ओरबाडून रक्तबंबाळ करत आहे, " अशा बातम्या वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर छापून आल्या. आज अमुक गल्लीत माकडांनी हल्ला केला, तमुक बाजारात माकडांनी ओरबडले, अमुक इतके लोक दवाखान्यात उपचार घेत आहेत, अशा बातम्यांना ऊत आला. लोक घाबरून रात्रीच्या वेळी बाहेर पडेनासे झाले. माकडांना पकडण्यासाठी पोलीस फौज संघटित झाली. कसल्या तरी अलौकिक शक्तीमुळेच अशा घटना घडत आहेत अशी जनसामान्यांना खात्री होऊ लागली. व त्यातच टीव्ही व वृत्तपत्रांनी भर घातली.

परंतु काही विवेकवादी संघटनांनी तपास केल्यानंतर मानवी वेषातला वानर वा वानराच्या वेषातला मानव असा कुठलाही प्रकार नसून काही विघातक गुंडांच्या टोळ्यानी आपापसातील हेवेदावे मिटवण्यासाठी एकमेकावर छुपे हल्ले करत आहेत, हे लक्षात आले. अंगावर घोंगडी पांघरून इमारतींच्या छतावरून गुंड पळापळी करत असल्यामुळे रात्रीच्या अधारात बघणाऱ्यांना (व तसे शपथेपूर्वक सांगणाऱ्यांना) ते खरोखरच माकड वाटत होते. गुंडांच्या टोळींवर पोलीसांनी बडगा उगारताच चोवीस तासात सारे कसे शांत शांत झाले.

विचारामध्ये चुकीच्या आकलनांचा शिरकाव होऊ लागल्यास आपल्या समोरील समस्यांच्या संख्येत भर पडत जाते. समस्या जास्त गुंतागुंतीचे होतात. आपल्या इच्छा-आकांक्षावर त्यांचा दुष्परिणाम होतो. मुळातच आपल्या अपेक्षांच्या आक्रमकतेमुळे वास्तवतेचे भान रहात नाही. सत्य परिस्थितीचे योग्य आकलन नसल्यामुळे अफवावर, अनैसर्गिक अशा गोष्टीवर, चमत्कारसदृश घटनांवर विश्वास ठेवण्याची मानसिकता बळावते. त्याप्रमाणे आपले वर्तन बदलत गेल्यास शेवटी आपलेच नुकसान होते. वैयक्तिक अनुभवावर ठेवलेली श्रद्धा - विशेषकरून अलौकिक, अद्भुत व अतिंद्रिय शक्तीवरील श्रद्धा - गाढ होत जाते. विचारात तफावत जाणवू लागते. विचारांची साखळी तुटू लागते. व त्यातून चुकीचे निर्णय घेण्याची सवय जडते.

आपण समस्यांचे योग्य उत्तर शोधण्याऐवजी त्यासाठीच्या पळवाटा शोधण्याच्या प्रयत्नात असतो

आधुनिक दैनंदिन जीवन दिवसे न दिवस फार गुंतागुंतीचे होत चालले आहे. दिवसभरात एकाचवेळी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अनेक गोष्टी हाताळावे लागतात. निर्णयापर्यंत पोचण्यासाठी अनेक घटकांची तपासणी करावी लागते. आधुनिक तंत्रज्ञानाने आपल्या समोर माहितीचा डोंगरच उभा करून ठेवला आहे. त्यातून नेमकी माहिती शोधणे अत्यंत जिकिरीचे ठरत आहे. उपलब्ध माहितीचे विश्लेषण करताना मनस्ताप होतो. यामुळे शेवटी वैतागून काही शॉर्टकट्स शोधत, पळवाटा शोधत वेळ मारून नेण्याच्या प्रयत्नात आपण असतो. आजचे मरण उद्यावर ढकलण्याची ही घाई अत्यंत धोकादायक असते, हेच आपण लक्षात घेत नाही. या पळवाटा आपल्याला धोक्याच्या खाईत लोटतात. वर्षभर अभ्यास न करता ऐन परिक्षेच्या वेळी सिद्धी विनायकाच्या रांगेत (ताटकळत!) उभे राहून गणेशाची आळवणी करत असल्यास शेवटी नापासच होण्याची पाळी येते. टीव्हीच्या पडद्यावरील चित्तथरारक खेळ बघत असताना आपल्यालाही तसेच करावेसे वाटू लागते. परंतु पडद्यावर सोप्या करून सांगितलेल्या गोष्टी मुळातच फार गुंतागुंतीच्या असतात, याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतो. अशा प्रकारच्या खेळासाठी भरपूर सराव करावा लागतो. अशा खेळातील संभाव्य धोक्यांचा विचार न करता माहितीचे जुजबी विश्लेषण करून तसे प्रयत्न करू लागल्यास अपघाती मृत्यू येण्याचा संभवच जास्त. समस्यांचे सुलभीकरण धोकादायक ठरू शकते. सुलभीकरणामुळे काही वेळा श्रम व पैसा वाचण्याची शक्यता असली तरी, ही मानसिकता तशीच राहिल्यास आपण गोत्यात येऊ शकतो. स्वत:वरील फाजील विश्वास केव्हा दगा देईल त्याचा नेम नाही. या फाजील विश्वासाचेच हळूहळू श्रद्धेत रूपांतरित होत जाते. मुळात सर्व श्रद्धा एका प्रकारे पळवाटाच असतात. व या पळवाटा कामचलाऊ निर्णयच देऊ शकतात.

आपली स्मृती दगा देऊ शकते

आपण आपल्या मेंदूला संगणकसदृश मानतो. आपल्या आयुष्यभरात जे काही घडत असते ती सर्व माहिती जशीच्या जशी आपल्या मेंदूत जाऊन बसते व जेव्हा पाहिजे तेव्हा आपण ती माहिती तशीच्या तशीच आपल्या समोर उभे करू शकतो, असे वाटत असते. परंतु स्मृतीपटलावरील माहितीत बदल होऊ शकतो हे आपण लक्षात घेत नाही. काही (कडू) आठवणी किंवा आठवणीतील काही (नको असलेला) भाग पुसून जातात. आपल्या श्रद्धा-विचारामुळे त्यात बदल होऊ शकतात. या आठवणी जशाच्या तशा परत येतात याची पण काही खात्री देता येत नाही. त्यामुळे केवळ स्मृतीला ताण देऊन किंवा त्यावर विसंबून राहून निर्णय घेत असल्यास काही वेळा निर्णय चुकीची ठरण्याची शक्यता असते.

आपल्या स्मृतीपटलावर संग्रहित झालेली माहिती आपल्या श्रद्धा विषयांशी निगडित असतात. श्रद्धेला तडा देणाऱ्या आठवणी लगेचच पुसून जातात. त्यामुळे एकदा फसलो गेलो तरी पुन्हा पुन्हा फसतच जातो. अनुभवांती शहाणपण हे फार कमी लोकांना जमते. संमोहनावस्थेतच असल्यासारखे आपण वावरत असतो. पुढच्याला ठेच मागचा शहाणा असे क्वचितच घडते.

अशा प्रकारे आपल्यातील निर्णयक्षमतेला मगरमिठीत पकडून ठेवलेल्या श्रद्धाविषयांशी दोन हात केल्याविना आपण आपल्या पूर्ण क्षमतेने जीवन जगू शकत नाही. ही मगरमिठी सैल करत गेल्यास अचूक निर्णयांच्या जवळपास जाण्याची शक्यता वाढते. आपल्यासमोरील समस्यांना अचूक उत्तर शोधणे सुलभ होते. यासाठी श्रद्धेच्या अंधारातून बाहेर पडण्याशिवाय गत्यंतर नाही.वैचारिक क्षमतेच्या संवर्धनासाठी श्रद्धेचे कवच भेदणारी मानसिकता विकसित करणे ही त्याची पहिली अट ठरेल.

समाप्त.

लेखक इंग्रजी थॉट ऍण्ड ऍक्शन नियतकालिकाचे संपादक, एआरडीई मधून निवृत्त शास्त्रज्ञ.