जैन तत्त्वांबद्दल हा लेख आहे आणि नाही - विरोधाभासी स्याद्वाद आणि सांख्यिकी
भाग १
जैनांच्या "स्याद्वाद" शब्दाशी माझी ओळख करून दिली ती पु. ल. देशपांडेंच्या आचार्य पोफळेंनी. "तुझं आहे तुजपाशी" नाटकातला प्रसंग आहे. काकाजींच्या बेवक्तशीरपणाला आचार्य "आदिमानवाइतके मागसलेपण" म्हणतात. तर काकाजी शंका काढतात - आदिमानवापासून आतापर्यंत झाली ती प्रगती की अधोगती? आचार्य पोफळे अशा संशयाची नास्तिक आणि स्याद्वादी म्हणून निर्भर्त्सना करतात. नाटकात काकाजींचे पात्र समतोल आहे, आणि आचार्यांचे पात्र आक्रसताळे आहे. त्यामुळे अर्थातच आचार्यांकडून टीका म्हणजे स्याद्वादाची प्रशंसाच! तरी स्याद्वाद नेमका काय आहे, त्याबद्दल तेव्हा मला काही कळले नाही.
पुढे मला प्राचीन भारतीय दर्शनांविषयी रस उत्पन्न झाला. आणि स्वतंत्रपणे सांख्यिकीच्या शास्त्राचाही व्यवसायामुळे अभ्यास करावा लागला. हल्लीच त्या दोन्ही क्षेत्रांना जोडणारा प्रशांत चंद्र महलानविस यांचा स्याद्वादाबद्दल लेख वाचण्यात आला. त्या लेखाचे थोड्या संक्षेपाने भाषांतर मी येथे देणार आहे. त्याआधी काही प्रास्ताविक मुद्दे.
"स्याद्" म्हणजे संस्कृतात "असावे", किंवा "असू शकेल", किंवा "शक्य आहे". कुठल्याही एका धारणेकडे "असे असू शकेल", "तसे असू शकेल" अशा वेगवेगळ्या दृष्टिकोनांमधून बघायची पद्धत जैन तत्त्वज्ञानात सापडते. हे पैलू सुरुवातीला विरोधी भासले, तरी विचाराअंती ते सर्व एकत्र येऊ शकतील, असे जैनांचे म्हणणे आहे. जैन तर्कशास्त्राप्रमाणे कुठल्याही चिकित्साविषयाची सात प्रकारे फोड करता येते (सप्तभंगी). त्याचे विस्तृत वर्णन पुढे येणार आहे, पण एक उदाहरण आपण इथेच बघूया.
आपल्यापुढे प्रश्न आहे - हे जे तुम्ही आता वाचत आहात, तो "जैन तत्त्वांबद्दल लेख" आहे का?
(१) एका प्रकारे विचार केला तर हा "जैन तत्त्वांबद्दल लेख" आहे - स्याद्वादाबद्दल लेखन या पाठ्यात आहे.
(२) हा "जैन तत्त्वांबद्दल लेख" असा नाही - पुढे एक भाषांतरित लेख आहे, हे पाठ्य तर केवळ त्या लेखाचे प्रास्ताविक आहे.
(३) हा आधी "जैन तत्त्वांबद्दल लेख" आहे आणि नंतर हा लेख नाही - म्हणजे माझ्या विचारांचा हिशोब केला तर लेख आहे, पण पुढच्या भाषांतरित लेखाच्या संदर्भात हा लेख नाही.
(४) सांगता येत नाही की हा "जैन तत्त्वांबद्दल लेख" आहे - मुळात हा वाचकाने पूर्ण वाचलाच नाही, पुढील भाषांतरही वाचले नाही. तर हा "जैन तत्त्वांबद्दल लेख" आहे की नाही हे आता सांगताच येत नाही.
(५) हा "जैन तत्त्वांबद्दल लेख" आहे आणि ते सांगता येत नाही - म्हणजे अजून सांगता येत नाही, तरी जेव्हा केव्हा सांगता येईल, तेव्हा जाणवेल की हा "जैन तत्त्वांबद्दल लेख" आहे.
(६) हा "जैन तत्त्वांबद्दल लेख" नाही आणि ते सांगता येत नाही - म्हणजे अजून सांगता येत नाही, तरी जेव्हा केव्हा सांगता येईल, तेव्हा जाणवेल की हा "जैन तत्त्वांबद्दल लेख" नाही.
(७) हा एका दृष्टिकोनातून "जैन तत्त्वांबद्दल लेख" आहे, अन्य दृष्टिकोनातून "जैन तत्त्वांबद्दल लेख" नाही, आणि अजून काही सांगता येत नाही.
पण मग लेखाच्या शीर्षकातल्या सांख्यिकीचा संबंध काय? तो पुढच्या भाषांतरात येईल. त्याचे मूळ लेखक प्रशांत चंद्र महलानविस (१८९३-१९७२) हे भारतातले एक अग्रणी सांख्यिकी-अभ्यासक (स्टॅटिस्टिशियन) होते. त्यांनी १९३२ साली इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापना केली. त्यांच्या शास्त्रातील अनेक योगदानांपैकी एका संकल्पनेला तर त्यांचे नावच दिलेले आहे - महलानविस अंतर (महलानोबिस डिस्टन्स). स्वातंत्र्योत्तर काळात ते भारताच्या योजना आयोगाचे सदस्य होते. त्यांना कला, तत्त्वज्ञान, समाजकारण, या सर्व विषयांत रस होता. त्यांना जैन तर्कशास्त्राची तत्त्वे सांख्यिकीच्या (स्टॅटिस्टिक्सच्या) विचारसरणीशी समांतर असल्याचे जाणवले. त्यांच्या लेखाचे भाषांतर थोडा संक्षेप करून येथे देत आहे.
थोडक्यात महलानवीस चर्चा करतात की "आहे आणि नाही, ते अजून सांगता येत नाही" म्हणजे तात्त्विक पद्धतीने सांखिकीचीच विचारसरणी आहे. आधुनिक सांख्यिकीने या शक्यतांचे मोजमाप आणि त्यांचे गणित सांगितले आहे, त्याच्याशिवाय सांख्यिकीचा फारसा व्यावहारिक उपयोग नाही - ते गणित प्राचीन जैन शास्त्रांत नाही, खरे. पण कुठल्याही गणिताला अर्थ देणारी अशी काही गुणात्मक धारणा असते, ती धारणा जैन तत्त्वज्ञानात सापडते, असे विवेचन महलानवीस करतात. विशेष म्हणजे सांख्यिकीशी काही संबंध नसलेल्या जैन तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकांची अनेक उद्धरणे ते देतात. सांख्यिकीच्या संदर्भातला नवीन अर्थ सांगताना बाकीच्यांना जैन तत्त्वज्ञानातील स्पष्ट अर्थांचा अनर्थ करत नाही आहोत, अशी काळजी महलानवीस घेतात.
- - - - - - - - - - - - - - -
भारतीय जैन स्याद्वाद - शक्यतागणिताशी (probability) संबंध
प्रशांत चंद्र महलानवीस
लेखाचे मूळ प्रकाशन : Mahalanobis, P.C. (1954) : The foundations of statistics. Dialectica 8, 95-111.
१ स्याद्वादाचा संक्षिप्त इतिहास
१.१ भारतीय जैन तर्कशास्त्रातील "स्याद्वाद" नावाची जी संकल्पना आहे तिचा शक्यता-गणिताशी घनिष्ठ संबंध जाणवतो. सांख्यिकीच्या पायाबद्दलच्या माझ्या स्वतःच्या निरीक्षणांना त्या शास्त्राची सहज पार्श्वभूमी होते. १५००-२००० वर्षांपूर्वीच्या तर्कशास्त्रातल्या, तत्त्वचिंतनातल्या पारिभाषिक शब्दांचे नेमके अर्थ निश्चित कळणे कठिण आहेत. शक्यतागणिताची आधुनिक संकल्पना स्याद्वादात ओळखलेली होती असा काही दावा मी करत नाही. (आणि असा दावा योग्य नाही असे माझे मत आहे.) तरी सांख्यिकीच्या युक्तिवादांच्या संबंधात स्याद्वादातल्या शब्दप्रयोगांचे विशेष औचित्य जाणवते.
१.२ आधी मी स्याद्वादाबद्दल ऐतिहासिक माहिती संक्षेपाने देतो आहे. जैनांचा महान प्रणेता महावीर (ई.स.पूर्व ५९९-५२७) बौद्धधर्माचा प्रणेता बुद्ध याचा समकालीन होय. महावीराच्या काळात जैन धर्म आणि तत्त्वज्ञान अग्रेसर झाले. स्याद्वादाचा सर्वात प्राचीन उल्लेख भद्रबाहूच्या लिखाणात दिसतो - स्याद्वाद म्हणजे "स्याद्" = "असावे, शक्य आहे" अधिक "वाद", असे स्पष्टीकरण त्याने दिले असे मानतात.(१, पृ. १६७)
...(अनुवादकाची टीप: येथे "असावे/नसावे/..." वगैरे सत प्रकार, "सप्तभंगि"ची यादी आहे, ती पुढे पुन्हा आली आहे.)
१.३ भद्रबाहू नावाचे दोन ग्रंथकार होऊन गेले, त्यांच्यापैकी आदल्याचा काळ ई.स.पूर्व ४३३-३५७ वर्षे, तर पुढल्याचा काळ साधारणपणे ई.स.पश्चात ३७५ वर्षांच्या सुमारास आहे. वरील स्पष्टीकरण हे आदल्या भद्रबाहूने दिले की पुढल्या हे निश्चित माहीत नाही, पण सामान्यपणे त्याचे श्रेय ई.स.पूर्व चवथ्या शतकातल्या भद्रबाहूला दिले जाते.(१, पृ. १६७) सिद्धसेन दिवाकर (ई.स. ४८०-५५०) याच्या न्यायावतारात स्याद्वादाचा निर्विवाद उल्लेख आहे.(१, पृ. १८१) थोड्याच काळाने (ई.स.६०० च्या आसपास) सामंतभद्र आपल्या आप्तमीमांसेत सात भाग असलेल्या स्याद्वादाचे, म्हणजे सप्तभंगिनयाचे पूर्ण विवरण देतो.(१, पृ. १८२-१८४) ई.स.च्या सहाव्या शतकापर्यंत स्याद्वाद बराच प्रगत झाला होता, आणि भारतीय तर्कशास्त्राच्या मध्ययुगात स्याद्वादाकडे बरेच लक्ष दिलेले दिसते. उदाहरणार्थ मल्लिषेणाची स्याद्वादमंजिरी (ई.स. १२९२) त्याच सिद्धांताविषयीचा पूर्ण ग्रंथ आहे.(२, खंड २, पृ. १७९) अर्थात विमल दासाच्या सप्तभंगितरंगिणीसारखे त्यापुढचेही ग्रंथ आहेत, आणि मध्ययुगीन आणि आधुनिक भाष्ये मोठ्या प्रमाणात आहेत. भारतीय दर्शनातला जैन तर्कशास्त्राचा मौलिक वाटा असलेले एक सुपरिचित विचारसूत्र मी हाताळतो आहे तर.(३, पृ. १९१)
पुढे: पृष्ठ २