जैन तत्त्वांबद्दल हा लेख आहे आणि नाही - विरोधाभासी स्याद्वाद आणि सांख्यिकी
भाग २
२. सप्तविध विधानांचे वादतंत्र
२.१ आता मी सप्तविध विधानाचे (सप्तभंगिनयाचे) मूळ संस्कृत पाठ्य देतो :
(१) स्यादस्ति - शक्य आहे, की ते आहे,
(२) स्यान्नास्ति - शक्य आहे, की ते नाही,
(३) स्यादस्ति नास्ति च - शक्य आहे, की ते आहे, आणि ते नाही,
(४) स्यादवक्तव्यः - शक्य आहे, की ते अवक्तव्य आहे,
(५) स्यादस्ति चावक्तव्यश्च - शक्य आहे, की ते आहे, आणि अवक्तव्य आहे,
(६) स्यान्नास्ति चावक्तव्यश्च - शक्य आहे, की ते नाही, आणि अवक्तव्य आहे,
(७) स्यादस्ति नास्ति चावक्तव्यश्च - शक्य आहे, की ते आहे, नाही, आणि अवक्तव्य आहे.
२.२ "स्याद्" या शब्दाचे इंग्रजी भाषांतर "शक्य आहे - may be" असे केले आहे, पण यातून "स्याद्"चा सांगोपांग अर्थ प्रकट होत नाही. या संस्कृत शब्दात एक शक्यता सांगितली जाते, पण त्यात अन्य शक्यतासुद्धा आहेत हेसुद्धा ध्वनित होते. "अस्ति" या संस्कृत शब्दाचा अर्थ "ते आहे", किंवा "ते अस्तित्वात आहे" किंवा "त्याचे अस्तित्व आहे"; आणि नकारात्मक "नास्ति" म्हणजे "ते नाही", "ते अस्तित्वात नाही", किंवा "त्याचे अस्तित्व नाही". तिसऱ्या कलमात ते असण्याच्या आणि नसण्याच्या शक्यतेचे विधान केले आहे. पहिली तीन कलमे परिचित "क्लासिकल" तर्कशास्त्राच्या कलमांच्या चौकटीत आहेत, आणि समजायला सोपी आहेत.
२.३ चवथे कलम "अवक्तव्य" याचे इंग्रजी भाषांतर मी "indeterminate" - "निश्चिती नसलेले" (पडताळणी न झालेले) असे केले आहे. अन्य लेखकांनी "indescribable"-"अवर्णनीय", "inexpressible"-"अनभिव्यक्तव्य", किंवा "indefinite"-"अनिश्चित" असे केले आहे.(उदाहरणार्थ संदर्भ ३, वगैरे) उदाहरणार्थ सत्कारी मुखर्जी विवरण करतात : "The inexpressible may be called indefinite..."(३, पृ. ११५) परंतु मी "निश्चिती नसलेले" असे भाषांतर निवडले, कारण मला अभिप्रेत असलेल्या अन्वयाच्या ते अधिक निकट पोचते.
२.४ या ठिकाणी एक उदाहरण उपयोगी ठरावे. नाणेफेकीची कल्पना करूया, आणि समजा त्यात छाप पडला आहे. तर आपण म्हणू शकतो
(१) [आता] छाप आहे.
यातून अर्थापत्तीने येते (२) [दुसऱ्या कुठल्या प्रसंगी] छाप नाही.
यांचे संश्लिष्ट (संश्लेषण केलेले=synthetic) विधान म्हणून तिसरे कलम मिळणेही कठिण नाही (३) छाप आहे, अणि नाही.
चवथे विधान आहे की छापकाट्याबद्दल स्थितीची अजून (४) निश्चिती नाही.
२.५ तरी विधानांच्या किंवा ज्ञानाच्या विधांच्या शक्यता संपत नाहीत. उदाहरणार्थ, जर आपल्याला माहीत असेल, की आपल्यापाशी जे नाणे आहे, त्याच्या एका बाजूला छाप आहे, उलट्या बाजूला छाप नाही, आणि कधीतरी त्यातून एक तर छाप पडेल, नाहीतर छाप नाही पडणार, तर आपण विधान करू शकतो,
(५) आता जी निश्चिती नाही, ती वरील चार विधानांमध्ये लय पावण्याची शक्यता आहे.
पण असेही असू शकते, की आपल्या चर्चेचा विषय नाणे नसून वेगळाच काही आहे, म्हणजे वरील पद्धतीची ही अनिश्चिती असूच शकत नाही.
तर आपण सहाव्या प्रकारचे विधान करू शकतो की (६) पहिल्या चार प्रकारांत सुटू शकणारी ही अनिश्चिती नाही.
सरतेशेवटी ज्ञानाची सातवी विधा अशा विधानातून आपण सांगू शकतो, की (७) कधीकधी अनिश्चिती सोडवण्याची शक्यता (पाचव्या प्रकाराप्रमाणे) आहे, तर कधीकधी अशी शक्यता (सहाव्या प्रकाराप्रमाणे) नाही.
२.६ स्याद्वादाप्रमाणे वरील सात प्रकार आवश्यक आहेत आणि ज्ञानाच्या सर्व शक्यता व्यापण्यासाठी पुरेसे आहेत. स्याद्वादामध्ये एक अल्पसंख्याक दृष्टिकोन असा की आणखी एक शक्यता आहे : (८) वक्तव्यश्चावक्तव्यश्च. अनुक्रमे पाचव्या, सहाव्या आणि सातव्या प्रकारांबरोबर एका प्रकारची द्विगुणित अनिश्चिती, आणि त्यातून संपणाऱ्या विधांचा अनुक्रम. पण बहुमत असे की हा प्रस्तावित प्रकार चवथ्या प्रकाराच्या समान आहे, त्यामुळे सातापेक्षा अधिक प्रकारांची गरज नाही.
२.७ येथे मला अधोरेखित करायचे आहे, की चवथा प्रकार म्हणजे अस्तित्वाच्या तीन मूलभूत विधांचे संश्लेषण आहे - "ते आहे" असे अस्तित्वाचे विधान, "ते नाही" असे अभावाचे विधान, आणि "आहे" किंवा "नाही" या पर्यायांत लय पावू शकणाऱ्या "अनिश्चिती"चे विधान. या विधानामध्ये आधुनिक शक्यता-गणितासाठी तार्किक पाया मिळतो. नाणेफेकीचे उदाहरण मनात आणा. त्यात छाप मिळायची शक्यता आहे (ते आहे), छाप न मिळण्याची शक्यता आहे (ते नाही), कधी छाप आहे आणि कधी छाप नाही, अशी शक्यता आहे; आणि छाप आहे किंवा नाही यांची अजून पडताळणी न झालेली अनिश्चितीची स्थिती. जैन तर्काप्रमाणे ज्ञानाची पाचवी विधा अनिश्चितीचे विधान करते (आधुनिक भाषेत आपण म्हणू की "शक्यतांचे क्षेत्र" ="probability field" अस्तित्वात आहे). सहावा प्रकार शक्यतांच्या क्षेत्राच्या अभावाचे विधान करते. सातवा प्रकार वरील सर्व पर्यायांना व्यापतो.
३ सापेक्षवाद
३.१ जैन तर्कशास्त्राच्या आणखी काही संकल्पना विचार करण्यायोग्य आहेत. काही मुद्दे अधोरेखित केले पाहिजेत - जैन तत्त्वज्ञान निश्चितात्मिक (absolutist [अनुवादकाची टीप : यालाच संस्कृतात "व्यवसायात्मिक" म्हणतात]) नाही, तर सापेक्षात्मिक (relativist) आणि वास्तववादी (realist) आहे (म्हणजे मायावादी नाही - भाषांतरकाराची टीप). जैनांच्या शुद्ध तर्कशास्त्राबद्दल आजपर्यंत उपलब्ध असलेला सर्वात प्राचीन ग्रंथात, म्हणजे सिद्धसेन दिवाकर (ई.स. ४८०-५५०) याच्या न्यायावतारात स्याद्वादाचे (सर्व पैलूंच्या पद्धतीचे) विवेचन केलेले आहे. मूळ पाठ्य येथे देत आहे :
"स्याद्वाद म्हणजे शब्दशः शक्यतांचे विधान. यात वस्तूंचा अर्थ सर्व दृष्टिकोनांतून जाणून घेण्याचे ध्येय असते. वस्तू निश्चितपणे असतही नाहीत, निश्चितपणे नसतही नाहीत... "स्यात्" म्हणजे "असावे" यात सातही शक्यतांचा बोध होतो. म्हणजे वस्तूकडे सात वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून बघता येते, त्यावेगळा आठवा पर्याय नाही."(४, पृ. २९-३०)
३.२ असे वर्णन सापडते :
"जैन विचारवंतासाठी सर्व वस्तू ’अनेकांत’ (अनेक विधांच्या) असतात. वस्तूंच्या अनेक पैलूंमुळे अर्थातच सर्व निष्कर्ष सापेक्ष असतात - काही विशिष्ट परिस्थितीमध्ये सत्य असतात. निष्कर्ष सशर्त असतात, किंवा सत्यशोधनाचे प्रस्ताव असतात. त्यांचा सशर्त भाव दाखवण्याकरिता सर्व निष्कर्षांना ’असे असावे’ असे वचन जोडावे लागते. स्याद्वाद म्हणजे निष्कर्षांच्या सापेक्षतेचे तत्त्व आहे."(२, खंड २, पृ. २०५-२०६)
"वास्तवातील गोष्टी अनेकविध असतात, आणि त्यांना अगणित गुण, तऱ्हा, आणि संबंध असतात, यावर जैन जोर देतात. त्यांचे वस्तुत्व फरकामध्ये असते. वेदांती शुद्ध सत्य मानतात, आणि अनेकविधा नकारतात. जैनांच्या मते वास्तव गोष्टींच्या मध्ये गुंतागुंतीचे संबंध असतात, आणि ते शुद्ध सत्याला नकारतात. ते निरपेक्षाचा विरोध करतात. ते सापेक्ष अनेकवादाचे समर्थन करतात."(२, खंड २, पृ. २०८)
३.३ असाही निर्देश बघावा :
"अशा प्रकारे जैनांसाठी कुठलेही विधान किंवा निष्कर्ष स्वभावाने निरपेक्ष नसतात, प्रत्येक मर्यादित अर्थानेच सत्य असतात, आणि प्रत्येकाच्या बाबतीत (तंत्रात "सप्तभंगी" म्हटलेले) सात पर्याय लागू असतात. (स्वाद्वादमंजिरी आणि त्यावरील हेमचंद्राचे भाष्य बघावे). जैन म्हणतात की अन्य भारतीय दर्शनांपैकी प्रत्येक आपल्या स्वतःच्या दृष्टिकोनातून फक्त आपण एकच निरपेक्ष दृष्टिकोन असल्याचे प्रतिपादन करते. त्या अन्य दर्शनांना जाणवत नाही, कुठलेही विधान सशर्त असते हा सत्याचा स्वभावधर्म होय. फक्त काही मर्यादांच्या आत, काही परिस्थितींमध्ये, आणि काही विशिष्ट अर्थाने (उपाधींनी) विधान खरे असते. म्हणून निरपेक्ष, वैश्विक प्रमाण असलेले, असे विधान करणे अशक्य आहे. कुठल्याही निष्कर्षाबाबत असे सापडेलच, की त्याच्या विरुद्ध, त्याचे खंडन करणारे विधान दुसऱ्या कुठल्यातरी बाबतीत लागू आहे. सत्य हे काही प्रमाणात स्थायी आहे, आणि काही प्रमाणात बदलणारे आहे. जुने गुणधर्म हरवणारे, नवे गुणधर्म मिळवणारे आहे. सत्याचे नित्यत्वही सापेक्ष आहे, बदलणारे आहे. त्यामुळे सत्याबाबतची आपली सर्व विधाने फक्त सापेक्ष लागू, आणि सापेक्ष गैरलागू आहेत. असणे, नसणे, आणि अनिश्चित, हे तीन तार्किक प्रकार आणि त्यांच्या सर्व जोडण्या या सर्व शक्यता प्रत्येक निष्कर्षासाठी कुठल्यातरी तऱ्हेने सदैव समप्रमाणात उपलब्ध असतात..."(५, खंड १, पृ. १८०-१८१)
पुढे: पृष्ठ ३