घराजवळ आलेले महाजाल

देविदास देशपांडे

युनिकोडच्या प्रसारामुळे महाजालाची व्याप्ती अनेकपटींनी वाढली हे मराठी आणि इंग्रजीतील ब्लॉग्जच्या वाढत्या संख्येवरून दिसून येतच आहे. मराठी किंवा कोणत्याही भारतीय भाषेत इंटरनेट वापरू इच्छिणार्‍या व्यक्तींना त्यामुळे खूपच फायदा झाला आहे. शिवाय केवळ यासाठी इंग्रजी शिकण्याची गरजही राहिली नाही. मात्र आता इंटरनेट येत आहे सर्वच लोकांच्या स्वतःच्या भाषेत. जागतिकीकरणाची ही दुसरी बाजू असून, जागतिकीकरणाला स्थानिक संदर्भांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, याची ही चुणूक आहे.

 

युनिकोडच्या प्रसारामुळे महाजालाची व्याप्ती अनेकपटींनी वाढली हे मराठी आणि इंग्रजीतील ब्लॉग्जच्या वाढत्या संख्येवरून दिसून येतच आहे. मराठी किंवा कोणत्याही भारतीय भाषेत इंटरनेट वापरू इच्छिणार्‍या व्यक्तींना त्यामुळे खूपच फायदा झाला आहे. शिवाय केवळ यासाठी इंग्रजी शिकण्याची गरजही राहिली नाही. मात्र आता इंटरनेट येत आहे सर्वच लोकांच्या स्वतःच्या भाषेत. जागतिकीकरणाची ही दुसरी बाजू असून, जागतिकीकरणाला स्थानिक संदर्भांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, याची ही चुणूक आहे.

महाजालाचे नियंत्रण असणार्‍या आयकॅन (International Corporation on Assigned Names and Numerals) या संस्थेची ३१वी परिषद जानेवारी महिन्यात भारतात झाली. या परिषदेचा विषयच मुळी स्थानिक भाषांमध्ये टॉप लेवल डोमेन नेम्सना (संकेतस्थळांच्या येणारे .org, .com इ. संज्ञा, टीएलडी) परवानगी देण्यासंदर्भात होता. महाजालाच्या संदर्भात हा क्रांतिकारी विषय होता आणि दोन वर्षांपासून त्यावर चर्चा चालू होती. पुण्याच्या सी-डॅक येथील महेश कुलकर्णी यांनीच याबाबतीतील सादरीकरण परिषदेत केले होते.

त्यावेळी कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, धोरणात्मक आणि तांत्रिक अशा दोन्ही पातळ्यांवर हा मुद्दा आव्हानात्मक होता. यासाठी आयकॅन आणि भारत सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाला काही धोरणात्मक बदल करण्यासाची सूचना तंत्रज्ञांनी केली होती. यासंबंधीचे काही मुद्दे खालीलप्रमाणेः

भाषा आणि लिपींची अधिकता. भारतात २२ भाषा आणि ११ लिप्या आहेत. काही भाषा एकाहून अधिक लिपींत लिहिल्या जातात तर ५४ भाषा देवनागरी लिपीत लिहिण्यात येतात. त्यांचे सुसूत्रीकरण करणे महाकठीण आहे.

उपायः एका भाषेसाठी एकाच अक्षराला मान्यता देणे. याबाबत भारत सरकारचा अंतिम निर्णय अद्याप व्हावयाचा आहे.

काही भाषांमध्ये काही अक्षरे समान आहेत. यामुळे फिशिंग साइट्सना मोकळे रान मिळण्याची शक्यता आहे.

उपायः महत्त्वाच्या संकेतस्थळांसाठी (उदा. सरकारी विभाग, बँका) काही अक्षरे राखीव ठेवणे. सी-डॅकने यासाठी सर्व भाषांच्या अक्षरांसाठी एक वेरिएंट टेबल (मराठी शब्द माहीत नाही) केले आहे.

काही भाषांमध्ये काही शब्द समान उच्चार तर काही समान लिखाणाचे असतात. यामुळे संकेतस्थळाशी संपर्क करणे अवघड होऊ शकते तसेच धोकादायकही.

उपायः प्रत्येक अक्षराचा युनिकोड संच तयार करण्यात आला आहे, तसेच फारसे वापरात नसलेली अक्षरेही डोमेन नेम्समध्ये नसतील.

सर्वात गंभीर गोष्ट म्हणजे काही अश्लील व विकृत शब्दही संकेतस्थळासाठी वापरात येण्याचा धोका आहे. त्यावर उपाय म्हणून अशा शब्दांची एक यादीच तयार करण्यात आली आहे. या यादीतील शब्द वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.

कुलकर्णी यांच्या मते, या सर्व सव्यापसव्याचा परिपाक म्हणजे लोकांना त्यांच्या भाषेत, पक्षी मराठीत इ-मेल आयडी तयार करता येतील. आता गेल्या महिन्यात आयकॅनने या संबंधांतील घोषणा तर केलीच, शिवाय आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. स्थानिक किंवा प्रादेशिक भाषांसोबतच त्या त्या भौगोलिक स्थानांशी संबंधित टीएलडींची नोंदणी करण्याचाही निर्णय़ घेतला आहे.

यामुळे होणार काय की, समजा माझा उद्योग पुण्यात आहे आणि मला पुण्याशी संबंधित उद्योगच करायचा आहे. तर मी माझ्या संकेतसस्थळाचे नाव .पुणे असे लिहू शकेन. केवळ शहरांशी संबंधित संकेतस्थळाच्या संदर्भात ही मोठी सोय आहे. myjobsinpune.com, punetech.com ही अशा संकेतस्थळांची काही प्रातिनिधिक उदाहरणे. आयकॅनचे माध्यम सल्लागार जॅसन किनन यांनी इ-मेलद्वारे पुरविलेल्या माहितीनुसार, ‘आम्ही लोकांना त्यांनी काय नोंदणी करावी हे सांगणार नाही. मात्र अशा रितीने .पुणे अस्तित्वात येणे सहज शक्य आहे.’ याचा अर्थ असा, की कशा प्रकारच्या शहरांना त्यांची संकेतस्थळे नोंदविता यावीत, याची आधी एक सूची करावी लागणार आहे. उदा. दहा हजार लोकसंख्येचे शहर, औद्योगिक ओळख असलेले शहर इ.

अगदी भविष्यात्मक वाटत असली तरी ही घटना फार दूर नाही आहे. या संबंधीच्या आयकॅनचे धोरण जानेवारी २००९ मध्ये प्रकाशित होणार आहे. पुढील वर्षीच्या उत्तरार्धात प्रत्यक्ष संकेतस्थळांची नोंदणी सुरू होण्याची शक्यता आहे. किनन यांच्या शब्दात, “नव्या टीएलडीच्या नोंदणीबरोबरच स्थानिक भाषांमधील टीएलडी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे जगभरचे लोक आपल्या भाषेत टीएलडीची मागणी करू शकतील.”

अन् जाता जाता, सी-डॅकने अगदी अलीकडे त्यांच्या बॉस (भारत ऑपरेटिंग सिस्टम सोल्युशन्स) या ऑपरेटिंग सिस्टिमचे अनावरण केले आहे. यात तर अगदी संपूर्ण प्रणालीच १६ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध केली आहे. मुख्य म्हणजे ओपन सोर्स आधारित असल्याने ही प्रणाली जवळपास निःशुल्क आहे (केवळ दोनशे रुपये वार्षिक सेवाशुल्क). शैलेश खांडेकर यांनी मराठीतील आज्ञायनाबद्दल अलीकडेच लिहिले आहे. त्यामुळे तोही मुद्दा मार्गाला लागलेला आहे.

त्यामुळेच तो दिवस दूर नाही, जेव्हा एक मराठी माणूस संपूर्ण मराठी संगणक प्रणाली चालवून मराठीतच लिहिलेला एक विरोप दुसऱया मराठी माणसाला मराठी आयडी वापरून पाठवू लागेल. त्यादृष्टीने महाजाल प्रत्येक मराठी माणसाच्या घराजवळ आले आहे.