दामोदर धर्मानंद कोसंबी

चित्रा

आपल्याला ज्ञात असतो तो इतिहास म्हणजे मुख्यत्वे राजेरजवाडे आणि त्यांचे वंश, त्यांच्यातील लढाया आणि त्यांच्या सनावळ्या यांचा असतो. त्यातही भारतीय इतिहासाचे लेखन हे गेल्या काही शतकांपासून मुसलमानी सरदारांच्या स्वार्‍यांपासून सुरू होई, त्यानंतर हळूहळू त्याआधीदेखील इतिहास घडला होता हे काही इतिहासकारांच्या ध्यानी आल्यामुळे या इतिहासाच्या अभ्यासात गुप्त राजे, अशोकाचे आणि चंद्रगुप्ताचे साम्राज्य अशी भर पडत गेली.

 
भाग १

डी. डी. कोसंबी उर्फ दामोदर धर्मानंद कोसंबी हे नाव भारतीय इतिहासाचा अभ्यास करणार्‍यांना सुपरिचित असे आहे. डी. डी. कोसंबी यांचा जन्म गोव्याचा - १९०७ सालचा. अतिशय बुद्धिमान अशा कोसंबींना त्यांच्या बुद्धीचा वारसा त्यांचे वडिल धर्मानंद कोसंबी यांच्याकडून नक्कीच मिळाला असला पाहिजे. या दोन्ही बुद्धिमान पितापुत्रांनी भारतीय इतिहासाच्या लेखनाच्या दृष्टीने मोठे योगदान दिलेले आहे. धर्मानंद कोसंबी हे बौद्ध धर्माचे गाढे अभ्यासक होते. पाली भाषेतील अनेक बौद्ध जातक कथा तसेच बौद्ध धर्मविचार यांचे अर्वाचीन भारतीय भाषांमध्ये पुर्नलेखन, आणि अहिंसेचे मनुष्यजातीसाठी असलेल्या उपयोगाच्या दृष्टीने केलेले (प्रसंगी विद्रोही किंवा स्वप्नरंजन करणारे वाटू शकतील) असे स्वतः मांडलेले विचार, हे धर्मानंदांचे मुख्य योगदान समजले जावे. याचमुळे पाली भाषेतील बौद्ध वाङ्मयाचे अभ्यासक म्हणून धर्मानंदांना अमेरिकेत हार्वर्ड युनिव्हर्सिटी येथे आमंत्रण मिळाले, आणि ते आपला मुलगा, म्हणजे डी. डी. कोसंबी, आणि कन्येसोबत १९१८ साली अमेरिकेत आले. यामुळे डी. डी. कोसंबींचे साधारणपणे कुमारवयापासूनचे पुढील शिक्षण हे अमेरिकेतील मॅसॅचुसेटसमध्ये हार्वड या सुप्रसिद्ध विद्यापिठात झाले. यानंतर बनारस हिंदू युनिव्हर्सिटी आणि अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी या दोन्ही विद्यापीठांमध्ये त्यांनी प्रत्येकी साधारण दोन वर्षे प्राध्यापकी केली. यानंतर त्यांनी फर्गुसन कॉलेजमध्ये जवळजवळ १३ वर्षे प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रीसर्च या संस्थेत गणितज्ञ प्रोफेसर म्हणून निवृत्त होईपर्यंत काम केले. कोसंबी यांचे गणिती शास्त्रातील योगदानही मोठे आहे, परंतु त्यांचे मन खरे रमले ते भारतीय इतिहासात, असे समजण्यास जागा आहे.

कोसंबी यांना इतिहासाचे बाळकडू आपल्या वडिलांकडून मिळाले असले तरी दुसरा एक विचार त्यांच्या या संशोधनामागे मोठ्या प्रमाणावर असावा - आणि तो म्हणजे त्यांच्या मते तत्कालिन (बहुतांशी अभारतीय) लेखकांचे भारतीय भूतकाळाबद्दलचे असलेले अज्ञान. कोसंबी यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर - "थोड्या चेष्टेनेच म्हटले जाते ते 'भारतात काही घटना घडल्या असे सांगता येते, पण भारताला इतिहास असा नाहीच' हे म्हणजे (खरे तर) काही अभारतीय लेखकांची भारतीय भूतकाळाच्या बाबतीत अभ्यास, पकड, बुद्धिमत्ता यांची वानवा असल्यामुळे सारवासारव (करण्याप्रमाणे) आहे." कोसंबी यांचे यापुढील म्हणणे असे आहे की खरे तर या घटनाच भारतात नोंदी म्हणून शिल्लक नाहीत. म्हणजे जसे हीरोडोटस, आणि तत्सम ग्रीक किंवा पाश्चिमात्य आद्य इतिहासकालीन लेखकांनी युद्धांच्या नोंदी ठेवल्या आहेत आणि त्याला आधारित असे पुरातत्वीय आधार उपलब्ध आहेत, तसे भारतीय इतिहासात काहीच मिळत नाही. त्यामुळे कोसंबी यांच्या मते भारतीय इतिहासाची रचना ही युरोपियन इतिहासापेक्षा वेगळ्या पद्धतीने करायला हवी. कुठल्याही इतिहासाचा अभ्यास करणार्‍याने तो अभ्यास करतानाची त्यांची भूमिका ही समजून घेण्यासारखी आहे. या भूमिकेलाच अनुसरून हा अभ्यास त्यांनी इतिहासाच्या तत्कालिन पद्धतींना बाजूला सारून, आणि प्रसंगी स्वतःच्या चिंतनातून गणिती पद्धतींचा इतिहासाचा शोध घेण्यासाठी केला असे दिसून येते. प्रस्तुत लेखाचा उद्देश हा कोसंबी यांनी प्रदर्शित केलेल्या मतांचा आढावा घेणे, त्यातील बरोबर-चूक दाखवणे हा नसून या शोधांच्या विविध पद्धतींचा धावता आढावा घेणे, आणि शक्य असल्यास या पद्धती दृष्टीरूप करणे (व्हिज्युअलायझेशन) असा आहे. अशी अपेक्षा आहे की या आढाव्यामुळे कोसंबी यांचे इतिहासावरचे वैविध्यपूर्ण लेखन समजून घेणे सोपे जाऊ शकते. यासाठी प्रामुख्याने त्यांच्या "अ‍ॅन इंट्रोडक्शन टू दी स्टडी ऑफ इंडियन हिस्टरी" या ग्रंथाचा आधार घेतलेला आहे (पॉप्युलर प्रकाशन, दुसरी आवृत्ती, १९७५, पुनर्मुद्रित २००८)

येथे एक सूचना देणे आवश्यक आहे ती म्हणजे कोसंबी यांनी अशा प्रकारे एकाच वेळी विविध विषयांना हाताळल्यामुळे त्यांच्या या पुस्तकातील लेखन हे नदीला फाटे फुटत जावे पण तरी नदी एकाच दिशेने वाहत राहावी तसे वाटू शकते, यामुळे गांगरल्यासारखे झाले तरीसुद्धा आपल्या हाती बरीच नवी माहिती गवसत राहण्याचा आनंद मिळतो. या लेखाचा उद्देश हा कोसंबी यांच्या लेखनाशी आणि कार्यपद्धतीशी ओळख एवढाच अतिशय मर्यादित आहे, कारण एका कालखंडासंबंधी त्यांची तपशीलवार मते पहायची म्हटले तरी हे काम एक-दोन लेखांमध्ये संपणार नाही. (लेखातील भारतीय इतिहासासंबंधीचे सगळे संदर्भ आणि वाक्ये ही कोसंबींच्या "अ‍ॅन इंट्रोडक्शन टू दी स्टडी ऑफ इंडियन हिस्टरी" या ग्रंथातूनच घेतलेली आहेत, इतर संदर्भ वापरलेले/तपासलेले नाहीत).

इतिहासविषयक विचारांची बैठक


समाजाच्या चित्रणासाठी लागणारी माहिती

आपल्याला ज्ञात असतो तो इतिहास म्हणजे मुख्यत्वे राजेरजवाडे आणि त्यांचे वंश, त्यांच्यातील लढाया आणि त्यांच्या सनावळ्या यांचा असतो. त्यातही भारतीय इतिहासाचे लेखन हे गेल्या काही शतकांपासून मुसलमानी सरदारांच्या स्वार्‍यांपासून सुरू होई, त्यानंतर हळूहळू त्याआधीदेखील इतिहास घडला होता हे काही इतिहासकारांच्या ध्यानी आल्यामुळे या इतिहासाच्या अभ्यासात गुप्त राजे, अशोकाचे आणि चंद्रगुप्ताचे साम्राज्य अशी भर पडत गेली. परंतु या राजेरजवाड्यांचा इतिहास हा केवळ भारताचा इतिहास आहे असे नाही, तो इतिहासाचा एक महत्त्वाचा असा भाग आहे, पण त्याहीपेक्षा अधिक म्हणजे भारतातील सामान्य जनतेचा इतिहास, तिची जडणघडण यावर इतिहासकार अनेकदा बोलत नाहीत. ज्याबद्दल थोडी तरी माहिती उपलब्ध आहे तोही भारतीय इतिहासाच्या बाबतीत पूर्णपणे सुस्पष्टपणे मांडता येत नाही, कारण ऐतिहासिक स्थानांची, व्यक्तींची पुरेशा पुराव्याअभावी निश्चिती करणे अवघड जाते, असे कोसंबी काही उदाहरणे देऊन सांगतात.

यासाठी कोसंबी यांनी इतिहासाची परंपरेला सोडून नवी व्याख्या केली ती अशी की " इतिहास म्हणजे उत्पादनाच्या साधनांमध्ये आणि संबंधांमध्ये होणार्‍या संक्रमणाचे घटनाक्रमांनुसार सादरीकरण." ही व्याख्या डायलेक्टिकल मटेरियलिझम (किंवा मार्क्सवाद म्हणतात) त्याला धरून आहे. ही व्याख्या स्विकारण्याचे कारण म्हणजे कोसंबी यांच्यावर मार्क्सवादाचा प्रभाव होता एवढेच नसून त्यांची "मार्क्सवाद हा रोजच्या आयुष्यात उपयुक्त ठरणारा तसेच त्यातून निघालेली अनुमाने (प्रेडिक्शन) ही तपासून पाहता येईल अशी पद्धती देणारा आहे" अशी खात्री झाली होती. कोसंबी म्हणतात की ब्रिटिशांनी दिलेल्या आगगाडीमुळे अणि यांत्रिकी उत्पादनामुळे भारतात जे काही बदल घडतील आणि ब्रिटिश सत्तेवर काय परिणाम होईल (तत्कालिन भारताचे ब्रिटिश सत्तेपासून वेगळे होणे) याचे चित्र मार्क्सने पूर्वीच रेखाटले होते.

मार्क्सपासूनचा वेगळेपणा

तरीही हे लक्षात ठेवले पाहिजे की त्यांनी ही तत्वे स्विकारताना खुद्द मार्क्सची भारतातील प्राचीन व्यवस्थेबद्दलची मते मात्र स्विकारली असे नाही. उदा. मार्क्सचे म्हणणे की - "सरप्लस म्हणजे स्थानिक समाजाच्या गरजा भागल्यानंतर उरलेले उत्पादन हे खरेदीविक्रीला उपलब्ध होते. भारतीय खेड्यांमध्ये असे सरप्लस किंवा अधकाव उत्पादन कमी असावे, तेही तत्कालिन सरकार (सत्ताधीशांकडे) गेल्यावरच अशा प्रकारे उपलब्ध होत असेल" हे म्हणणे; किंवा "भारतीय समाजाला इतिहास आही, निदान माहिती असलेला इतिहास नाही. आपण ज्याला त्यांचा इतिहास म्हणतो तो (वास्तविक) (अशा) सातत्याने आलेल्या अतिक्रमण करणार्‍यांचा इतिहास आहे, (ज्यांनी) (ग्रामीण) समाजाच्या अविरोधामुळे आणि न बदलण्याच्या प्रवृत्तीमुळे (बिनविरोध) सत्ता प्रस्थापित केली", असे म्हणणे - कोसंबी मान्य करीत नाहीत. उदाहरणार्थ, वरील विधानातील तत्कालिन खेड्यांच्या समाजात अशी न बदलण्याची प्रवृत्ती असणे ही गोष्ट कोसंबी अमान्य करतात ते दोन प्रकारे: (१) शेतीसाठी नांगर/फाळाचा उपयोग केला गेला हेच मुळात उत्पादन प्रक्रियेत बदल होत होते याचे उदाहरण आहे असे सांगून आणि (२) खेड्यातील जनतेच्या जीवनात प्रसंगी खूप बदल झालेला नसला, तरी अशा स्वयंपूर्ण खेड्यांची संख्या आणि खेड्यांच्या संख्येची घनता वेगवेगळ्या भूप्रदेशांमध्ये कमी अधिक असू शकल्याने सर्वत्र एकच प्रकाराची शासनयंत्रणा असणे/टिकणे अशक्य आहे, आणि जमिनींची मालकी (आणि त्यानुसार आलेले हितसंबंध) देखील खेड्यांच्या घनतेनुसार बदलत असावी असे सुचवून. सरप्लसबद्दल मार्क्सचे जे विचार आहेत, त्यासंबंधी म्हणताना ते म्हणतात की धातू आणि मीठ ह्या स्थानिक पातळीवर प्रत्येक ठिकाणी तयार होणे अशक्य होते. त्यामुळे याची खरेदीविक्री तर होतच असावी. (त्यानुसार होणारे व्यवहार लोकांच्या माहितीचे असावे). त्यामुळे खेडी ही नुसतीच स्वतःच्या गरजा भागवण्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण राहिली, (व्यापाराने जोडली गेली नाहीत) असे मार्क्सचे साधारण मत त्यांना मान्य झालेले नाही. त्यांच्या इतिहासाच्या व्याख्येचाही संबंध ह्याच समजांचा पाठपुरावा करण्यासाठी असावा असे माझे मत झाले. याचे कारण कोसंबी यांनी जेव्हा इतिहासाची व्याख्या उत्पादनाशी निगडित केली गेली तेव्हा त्यांना तत्कालिन राजेरजवाड्यांपेक्षा ते उत्पादन करणार्‍या घटकांकडे म्हणजेच सामान्य जनतेकडे लक्ष वळवता आले. एखाद्या कालखंडातील जनतेच्या निर्माणप्रक्रिया, त्यांच्या आशा-आकांक्षा, त्यांची साधने यांचा शोध हा राजेशाहीपेक्षा अधिक महत्त्वाचा ठरला. इतिहासाचा संबंध उत्पादनाशी लावल्यामुळे त्यांना तत्कालिन सामान्य समाजातील बदल , किंवा उलटे म्हणजे, टिकून राहिलेल्या चालिरीती यांचा पाठपुरावा करता आला. त्याअर्थाने मार्क्सच्या भारताबद्दलच्या विचारांचा परामर्श घेण्यासाठी त्यांनी मार्क्सच्याच तात्विक विचारांचा पाया वापरला हे विशेष म्हणायला हवे.

 

पुढे: पृष्ठ २