दामोदर धर्मानंद कोसंबी

भाग २

कोसंबी यांच्या कामाचा भर

कोसंबी यांचा मुख्य भर समाजाच्या चित्रणावर आहे. हे समाजाचे चित्रण त्यांनी सर्वसाधारणपणे उत्पादन-साधने आणि नैसर्गिक स्थितीचे चित्रण, चालिरीतींचे चित्रण, उत्पादनाचा अधकाव /सरप्लस (आणि त्याची कारणे), त्यातून निर्माण होणारे व्यापारी संबंध, आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून होणारे समाजातील घटकांचे तयार होणारे प्राबल्य किंवा कमकुवतपणा असे केलेले आढळते. ह्यामुळे नंतर त्यांच्याकडून सत्ताधार्‍यांचे वर्णन आले तरी ते या सर्व संबंधांचा परिपाक किंवा समाजस्थितीचे फलित म्हणून, ड्रायव्हिंग फोर्स किंवा चेतना म्हणून नाही.


संशोधन पद्धती

संशोधनातील अडचणी - संशोधनाच्या साधनांचे वैविध्य

या संशोधनात अनेक अडचणी आहेत: यापैकी प्रमुख म्हणजे कसल्याही मुख्य घटनांच्या नोंदी नसणे, किंवा त्या वेगवेगळ्या वाङ्मयात वेगवेगळ्या नावांनी असणे. ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणी झालेले उत्खननही संपूर्ण काळाचे चित्रण करण्यास पुरेसे असेलच असे नाही. त्यातच चोर्‍यामार्‍यांच्यामुळे असलेले काही पुरावेही हातचे जातात. उदा. मोहेंजोदारो येथील काही ऐतिहासिक बांधकामाच्या विटांची झालेली चोरी, किंवा जुन्या मोलाच्या वस्तूंना चोरबाजारात मिळालेली वाट. सर्वच भारतीय इतिहास संशोधकांसाठी ही मोठी डोकेदुखी असावी. यामुळेच अशा काळाचे चित्र उभे करण्यासाठी एकतर काही मिथकांचा किंवा काही भाषाशास्त्राचा वापर करण्याची प्रथा आहे. इंडो-युरोपियन भाषांमधली साम्यस्थळे शोधून त्यानुसार आर्यांच्या मूळ स्थानातील चालीरितींशी त्याचे समीकरण जुळवणे हेही काही जण करतात. परंतु कोसंबी यांनी याबद्दलचा संशय एका गंमतीशीर उदाहरणाने दाखवला आहे, ते असे : संस्कृतमधील "दुहिता" (कन्या/मुलगी) या शब्दाशी साम्य असलेले अनेक इंडो-युरोपियन शब्द आहेत - जसे इंग्लिश "डॉटर". पण या संस्कृत शब्दातील धातूचा म्हणजे "दुध्" चा संबंध "दुधाशी" असल्याने सकाळी आर्यांच्या मूळ निवासस्थानातील घरच्या मुलींचे काम गाईचे दूध काढणे असावे असा निष्कर्ष काढला गेला. पण मुळात दूध हा शब्द इंग्रजी "मिल्क" शी साम्य साधत नाही हेच लक्षात राहिले नाही! त्यामुळे अशा काळाचे वर्णन करण्यासाठी वरील दोन्ही पद्धती उपयुक्त नाहीत असे त्यांचे मत असल्याने त्यांनी ज्या पद्धतीचा वापर केला त्याचा संबंध तात्विक दॄष्ट्या उत्पादनाची साधने आणि त्यांचे संबंध यांच्याशी होता. आणि यासंबंधीचा विदा/संकलित माहिती गोळा करण्यासाठी त्यांनी बर्‍याच प्रमाणात एथनोग्राफी ही पद्धती वापरली. ही पद्धत कोसंबींच्या समकालीन काही इतिहासकारांनी - युरोपमध्ये वापरली आहे. एथनोग्राफी या पद्धतीमध्ये एकच-एक ठराविक पद्धती अवलंबलेली नसून प्रश्नाप्रमाणे लागतील त्या पद्धती स्विकारल्या जातात - जसे एका देशातील चालिरीतींचे मूळ माहिती असल्यास दुसर्‍या, भौगोलिक दृष्ट्या विलगही असेल, अशा प्रदेशातील तत्सम चालिरीतींचा, किंवा तेथे मिळालेल्या प्राचीन सामग्रीचा मागोवा घेणे. पण भारताच्या बाबतीत अशा नव्या-जुन्याची इतकी सरमिसळ झाली आहे की आधुनिक भासणार्‍या नक्की कुठच्या चालिरीती या प्राचीन काळापासून चालत आल्या आहेत त्यांचा शोध घेण्याचीही गरज कोसंबींना वाटली कारण याच शोधातून पूर्वीच्या समाजाचे चित्र तुकडे-तुकडे जोडून उभे करता येऊ शकते असे लक्षात आले. ह्यामुळेच त्यांनी दगडा-धोंड्यांच्या देवांची विविध रूपे (जसे वेताळ, काळभैरव), त्यांच्याशी असलेला मृत्युचा, नाशाचा संबंध, प्राचीन काळातील बळीची पद्धत आणि त्या कल्पनांचे वैदिक काळात झालेले रूपांतर किंवा मीलन (असिमिलेशन) (जसे शंकर, हनुमान, गणपती) समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या सर्वासाठी त्यांनी ज्या अनेक पद्धती अवलंबल्या त्यातील मुख्य पद्धतींचे वर्गीकरण खालील चित्रात केले आहे. फील्डवर्क किंवा खरोखरची पायपीट, पुरावे गोळा करणे यासाठी कोसंबी प्रसिद्ध आहेत.

कोसंबी यांच्या वर्णनाप्रमाणे जेव्हा वर्गविहीन (प्री-क्लास) समाज होता, तेव्हा हा समाज वेगवेगळ्या जमातींमध्ये (ट्राईब्ज) विभागलेला होता. या जमातींचे काही दैवते/उगमस्थाने (टोटम) असत - जशी झाडे, प्राणी, पक्षी इ. यामुळे अशा दैवतांचे रक्षण व्रते म्हणून केले जाई. (आधुनिक काळातील गाईचे मांस न खाण्याच्या संकल्पनेचा उगम अशाच जुन्या संकल्पनेतून झाला (जरी तो नंतर हिंदूधर्मातील एक विश्वास (टेनेट) म्हणून समजला गेला) असे कोसंबी म्हणतात. अजून एक असेच उदाहरण द्यायचे तर मोरे, गोडांबे, पडवळ हे ह्या आडनावांच्या कुटुंबांची (क्लॅन) अनुक्रमे मोर, आंबा, आणि पडवळ ही दैवते होती, त्यांच्याशी निगडित व्रते होती असेही कोसंबी सांगतात. या अशा चित्रविचित्र पद्धतींचा उगम शोधण्यासारखे कठीण काम त्यांनी सगळीकडे पायपीट करून, अगदी तळागाळातील लोकांशी थेट संपर्क साधून केले असावे. विसाव्या शतकातील कामकरी वर्गाचे (शेतकरी, कुंभार, त्यांची हत्यारे/साधने) यांची छायाचित्रे, त्यांच्याकडील माहितीचे संकलन पुढील संशोधनासाठी भरपूर विदा/डेटा गोळा करण्याचे काम त्यांनी केलेले आढळते.

हडप्पा/मोहेंजोदारो येथील शहरे आणि त्यांचा नाश

सिंधू नदीच्या खोर्‍यातली ही दोन्ही शहरे श्रीमंत होती, पण तरीही ह्या शहरांखेरीज इतर ठिकाणी अशीच शहरे मोठ्या संख्येने तयार झाली नाहीत. या खोर्‍यात शहरी वस्ती विरळ का राहिली असावी, याचे कोसंबींच्या मते याचे कारण असे की सिंधूच्या खोर्‍यातील उत्पादनाच्या पद्धती मेसोपोटेमियाप्रमाणे प्रगत नसल्याने विकता येईल असे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले नाही. यासाठी त्यांनी सिंधूच्या खोर्‍यात नक्की कोणती पद्धत शेतीची होती यावरून कसलीच नवीन माहिती मिळाली नसल्याचे सांगून, त्याकाळचे शिक्के (सीले) दाखवतात त्यावरून औत (plough) नसून फण/दंताळे (harrow) असावे असे मत दिले आहे. दंताळ्याने वरवरची मातीच पिकासाठी योग्य करता येत असे, त्यामुळे पिके घेण्याच्या पद्धतीत फारसा बदल झाला नाही आणि उत्पादनही वाढले नाही.

तरीही ह्या दोन्ही शहरांमधील वस्ती सधन होती, याचे कारण येथून धातूंचा आणि इतर अनेक वस्तूंचा व्यापार चालत होता. भारताचा हस्तिदंत, मोती, तांबे, माकडे या गोष्टींचा व्यापार असिरीयन राजांबरोबर होत असे याचे पुरावे मिळालेले आहेत. मोहेंजोदारो येथे मिळालेल्या हस्तिदंती फण्या बॅबिलॉनपर्यंत पोचत असाव्यात, कारण तेथील (व्यापारी) नोंदींमध्ये हस्तिदंती फण्या आढळतात. यावरून भारताचा दूरदेशीपर्यंत व्यापार चालत होता हे दिसून येते. मात्र हा व्यापार करता यावा यासाठी या समाजात 'वर्ग' असावेत असे त्यांचे मत आहे. उत्खननात सापडलेली लहान घरे, विटांच्या भट्ट्या ह्या अशाच कामकरी वर्गाच्या होत्या, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर (मास प्रॉडक्शन) विटा, मातीची भांडी बनवल्या जात असत. या लोकांकडून तयार होत असलेले उत्पादन (व्यापारासाठी) बळकावण्यासाठी त्याच समाजातील सधन, बलवान गटांनी धार्मिक अंधश्रद्धांचा वापर केला असावा (उदा. अमूक एक वस्तू इतक्या प्रमाणात दिली नाही तर अमूक देवतेचा कोप होईल), असेही ते सुचवतात. पुढे या शहरांचा आर्यांनी (ऋग्वेदातील इंद्राबद्दलच्या नोंदींवरून) नाश केला असेही ते सुचवतात.

 

पुढे: पृष्ठ ३