दामोदर धर्मानंद कोसंबी
भाग ३
आर्यांशी संपर्क आणि उत्पादनाच्या पद्धतीत झालेले संक्रमण/बदल

हडप्पा येथील मातीचा माठ
सिंधू नदीच्या खोर्यातील या शहरांचा नाश होण्याचे एक कारण तेथील सत्ताधार्यांचे जमिनीच्या योग्य सिंचनाकडे, कालव्यांकडे झालेले दुर्लक्ष असे ते सांगतात. इंद्राने वृत्रासुराला मारल्याचे जे वर्णन सांगितले जाते तो असुर नसून आर्य असलेल्या इंद्राने "वृत्र" म्हणजे धरणे/बंधारे फोडून या शहरांमध्ये असलेली सिंचनाची असलेली व्यवस्था अनुपयुक्त करून टाकल्याचेही सांगितले आहे (C. Benveniste, L. Renou या भाषांच्या अभ्यासकांचे हे मत असल्याचे कोसंबी यांनी नमूद केले आहे). असे असले तरी आर्यांनी आणलेली संस्कृती ही ठरवून "लादलेली" संस्कृती नसल्याचे ते सांगतात (पृष्ठ. क्र. ८४); यावेळी अशी परिस्थिती तयार झाली की उत्पादनाच्या पद्धतीत आमूलाग्र बदल घडला, उत्पादनाची तंत्रे आणि नवीन प्रदेश उपलब्ध झाले. अंकित समाज हा दास गणला जाऊ लागला, तरी तो "गुलाम" नसे आणि मिश्रविवाह होत असत. पहिले ब्राह्मणही दोन्ही (आर्य आणि सिंधू) संस्कृतीतील "प्रीस्ट" किंवा "पुजारी" वर्गांच्या संपर्काने (इंटरऍक्शन) तयार झाले असे कोसंबी सुचवतात (पृष्ठ १०२). यासाठी काही अशा दोन संस्कृतींचा संकर होऊन जन्मलेल्या ब्राह्मण संततीच्या नावात आईचेही नाव देण्याची पद्धती ते उधृत करतात (आर्यांच्या पितृसत्ताक पद्धतीत मुलाचे नाव सांगताना केवळ वडिलांचे नाव दिले जाई). या संस्कृतीचे वर्णन आणि आर्यांमुळे उत्पादनाच्या प्रक्रियांमध्ये झालेला बदल ह्याचे उत्तम चित्र यामुळे तयार झालेले दिसते.
प्राचीन नाण्यांचा अभ्यास
तरीही कोसंबींचे संशोधक म्हणून वेगळेपण स्पष्ट दिसून येते ते म्हणजे प्राचीन काळापासून चालत आलेल्या नाण्यांचा गणिती पद्धती वापरून केलेल्या अभ्यासातून. नाण्यांवरची चिन्हे ही तत्कालिन समाजस्थितीचे आणि सत्ताधिशांचे प्रतिक असतात.
पण नाण्यांचा वापर किती झाला आहे हे त्या नाण्यांच्या निव्वळ चिन्हांच्या अभ्यासाने समजत नाही. यासाठी कोसंबी यांनी नाण्यांच्या पाठीमागील बाजूवर असलेल्या चिन्हांचा (खुणांचा) अभ्यास केला. तत्कालिन नाणी ही खाजगी टाकसाळीतूनही काढता येत असत (जोवर वजन तेच आहे तोवर एखादा धातूचा तुकडाही नाणे म्हणून चालत असे). ही चिन्हे तत्कालिन व्यापारी मुद्रित करीत असत, ज्यायोगे ती नाणी चलनास योग्य असल्याचे सिद्ध होत असे. कोसंबी यांनी यासाठी १२,००० नाण्यांची स्वतः वजने करून त्यांचा सांख्यिकी अभ्यास केला. जितकी या नाण्यांच्या पाठची चिन्हे अधिक, तितके वजन कमी आणि तितकी ती नाणीदेखील अधिक काळ वापरात असण्याची शक्यता असू शकते. या अभ्यासातून असेही लक्षात बहुदा मगध राजांनी ही पद्धत बंद केल्याचे दिसते कारण जसा व्यापार वाढला तसे नाणी बनवण्याचे काम हे राजांनी स्वतःकडे घेतले, व्यापार्यांचे पूर्वीचे हक्क कमी झालेले दिसतात. चिन्हे कोणती वापरली गेली आहेत यावरून राजांच्या वंशांमधील हिंसक (व्हायलंट) बदल - जसे एखाद्या राजाची सत्ता बळाने काबीज करणे - हे ते मांडतात. (जर राजसत्तेत झालेले बदल हे सौम्य असतील, तर बरीचशी परंपरागत/वांशिक चिन्हे मागील पिढ्यांप्रमाणेच राहतात, राजसत्तेत जर हिंसक बदल झाले असतील तर वेगळीच चिन्हे नंतरच्या काळातील नाण्यांवर दिसतील.)
परकी ग्रंथांचा उपयोग
मध्ययुगीन काळातील संशोधनासाठी विविध भाषांमधील ग्रंथांचा वापर त्यांनी केलेला आढळतो. पण जनतेचे चित्रण करण्याच्या दृष्टीने भारतीय ग्रंथांचा, विशेषतः संस्कृत ग्रंथांचा, उपयोग विशेष होऊ शकत नाही याचे कारण की यात सामान्य वर्गाचे यथार्थ चित्रण आढळत नाही. कोसंबी यांच्या मते कामगार वर्ग हा नेहमीच निरक्षर राहिला, त्यामुळे ग्रंथांमधल्या वर्णनांमध्ये आढळणारे वर्णन हे सुशिक्षितांनी केले आहे त्यामुळे ते बहुतांशी सुशिक्षित वर्गाचेच आहे. इतकेच नव्हे तर कोसंबी अशीही खंत व्यक्त करतात की तत्कालिन नाटकांमध्येही आजूबाजूला घडणार्या प्रमुख सत्ता-बदलांचे, लढायांचे किंवा धोक्यांचे कसलेही प्रतिबिंब पडलेले दिसत नाही - असे चित्रण त्यांना आक्रमकांच्या नोंदींमधून मिळवावे लागले आहे. उदा. महंमद बिन बख्तियार खिलजी याने लक्ष्मणसेन या भारतीय राजाला केवळ अठरा मदतनीसांसह त्याच्या वाड्यात जाऊन पकडले, याचा संदर्भ ते "तबाकत-ए-नासिरी" या ग्रंथातून घेतात. याचा अर्थ या राजाला वाचवण्यासाठी त्याच्या राज्यातील लोकांनी कसलेही प्रयत्न केले नाहीत, आणि म्हणजेच राजाबद्दल एक प्रकारची उदासीनता होती. तसेच कोसंबी यांनी खिलजीला उत्तरेत इतक्या सहज विजय मिळवता आला याबद्दल असेही एक अनुमान वर्तवलेले आहे की पूर्वी येऊन गटागटांनी स्थिरावलेल्या मुसलमानी व्यापार्यांनी यावेळी खिलजीला मदत दिली असावी. यावेळपर्यंत वरच्या वर्गातून आलेली सरंजामशाही (जमिनदारी) वृत्ती समाजाच्या खालच्या थरांमधून झिरपली होती आणि त्यामुळे लहान अंमलदारांची लहान-लहान भूप्रदेशांवर मालकी स्थापन करण्याची स्पर्धा सुरू झाली. अशा अंतर्गत भांडणांचा फायदा बहुदा बाहेरील आक्रमकांना मिळाला, इतकेच नाही तर अंतर्गतही धार्मिक समिकरणे बदलली. उदा. अशा प्रकारच्या सरंजामशाहीने ग्रासलेल्या बंगालमधील अनेक बौद्धांनी आपला धर्म सोडून इस्लाम स्विकारला आणि काही शतकांनंतर होणार्या बंगालच्या फाळणीला उपयुक्त वातावरण तयार झाले.
समारोप
कोसंबी यांनी प्रत्येक प्रश्नाची दिलेली सगळी उत्तरे आपल्याला समाधानकारक किंवा पुरेशी वाटतात का हा चर्चेचा वेगळा, स्वतंत्र विषय होऊ शकतो. तरी एका गोष्टीचे श्रेय त्यांना दिलेच पाहिजे आणि ते म्हणजे संशोधनाच्या साधनांचे वैविध्य आणि या संशोधनामागची प्रेरणा. ही प्रेरणा सामान्य माणसाच्या आयुष्याशी जवळून बांधलेली आहे. अनेक क्षुल्लक भासणार्या घटनांचा कोसंबी अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे आधुनिक काळातील अनेक भारतीय इतिहासकार त्यांचे ऋण मानतात यात नवल नाही, पण इतिहासात रस घेणार्या एखाद्या सामान्य वाचकालाही यातून इतिहासाकडे (आणि कदाचित भविष्याकडेही) पाहण्याचा एक कदाचित वेगळा असा दृष्टीकोन मिळू शकेल असे वाटते.
बाह्य दुवे आणि टिपा
हडप्पा येथील मातीचा माठ हे छायाचित्र म्युझियम ऑफ फाईन आर्टस बॉस्टनच्या संकेतस्थळावरून साभार (Large storage jar, harappa culture, Museum of Fine Arts Boston)
मौर्यांचे नाणे विकीपीडियावरून साभार
वेताळ स्तोत्र
वेताळेश्वर
समाप्त
चित्रा देशपांडे या अमेरिकेत बॉस्टन येथे राहतात. स्थापत्य, तंत्रज्ञान, नगर व्यवस्थापन आणि इतिहास हे आवडीचे विषय आहेत. गेली काही वर्षे अमेरिकेत शैक्षणिक तसेच खाजगी क्षेत्रात काम करीत आहेत.