भरवश्याची ऐशी तैशी!

प्रभाकर नानावटी

गेल्या दोन तीन दशकाच्या जागतिक आर्थिक परिस्थितीवर ओझरती नजर टाकल्यास अर्थव्यवस्थेचे इंजिन वेगाने पुढे जाण्यासाठी एकमेकावरील भरवसा हा वंगणासारखा प्रत्येक ठिकाणी काम करत आहे असे दावे केले जात आहेत, हे लक्षात येईल. परस्परांच्या शब्दावरील विश्वास, नेटवर्किंग, घरबसल्या माहितीची देवाणघेवाण इत्यादींमुळे सर्व संबंधितांना त्याचा लाभ होत गेला. एखाद्याने दिलेला शब्द हा शंभर टक्के खात्रीशीर आहे या भरवश्याच्या पायावर मजलेच्या मजले बांधले गेले. परस्परावरील विश्वासामुळे बाजारव्यवस्थेला मिळणारे बळ व या विश्वासातून घडलेल्या चमत्काराचे गुणगान गाणारी शेकडो पुस्तकं बाजारात याच कालखंडात आली. (व रद्दीतही गेली!) विशेषज्ञ म्हणवून घेतलेल्यांनी विश्वासातून मिळणार्‍या फायद्यावर ढीगच्या ढीग संशोधनपर निबंध लिहिले. व्यवस्थापन कौशल्य, विश्वासार्ह नैपुण्य, प्रगतीचा वाढत चाललेला चढता आलेख, डोळे दिपवून टाकणारे नेटवर्किंग इत्यादींनी ही किमया केली असे तथाकथित तज्ञ ऊर बडवत सांगत सुटले.

भाग १

गेल्या दोन तीन दशकाच्या जागतिक आर्थिक परिस्थितीवर ओझरती नजर टाकल्यास अर्थव्यवस्थेचे इंजिन वेगाने पुढे जाण्यासाठी एकमेकावरील भरवसा हा वंगणासारखा प्रत्येक ठिकाणी काम करत आहे असे दावे केले जात आहेत, हे लक्षात येईल. परस्परांच्या शब्दावरील विश्वास, नेटवर्किंग, घरबसल्या माहितीची देवाणघेवाण इत्यादींमुळे सर्व संबंधितांना त्याचा लाभ होत गेला. एखाद्याने दिलेला शब्द हा शंभर टक्के खात्रीशीर आहे या भरवश्याच्या पायावर मजलेच्या मजले बांधले गेले. परस्परावरील विश्वासामुळे बाजारव्यवस्थेला मिळणारे बळ व या विश्वासातून घडलेल्या चमत्काराचे गुणगान गाणारी शेकडो पुस्तकं बाजारात याच कालखंडात आली. (व रद्दीतही गेली!) विशेषज्ञ म्हणवून घेतलेल्यांनी विश्वासातून मिळणार्‍या फायद्यावर ढीगच्या ढीग संशोधनपर निबंध लिहिले. व्यवस्थापन कौशल्य, विश्वासार्ह नैपुण्य, प्रगतीचा वाढत चाललेला चढता आलेख, डोळे दिपवून टाकणारे नेटवर्किंग इत्यादींनी ही किमया केली असे तथाकथित तज्ञ ऊर बडवत सांगत सुटले.

मॅडॉफच्या कुर्‍हाडीचे घाव

हे सर्व घडत असतानाच लेहमन ब्रदर्स व बर्नार्ड (बर्नी) मॅडॉफची (http://en.wikipedia.org/wiki/Bernard_Madoff) कुर्‍हाड आर्थिक जगतावर कोसळली. बघताबघता होत्याचे नव्हते झाले. बर्नीच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला त्याचे आकर्षक व्यक्तिमत्व, त्याची जनमानसातली प्रतिमा, त्याचा घरंदाजपणा, त्याची सोज्वळ जीवनशैली या गोष्टी भुरळ पाडण्यासारख्या होत्या. भरवसा देणार्‍या होत्या. 6500 कोटी डॉलर्सची अफरातफर करणारी त्याची 'पाँझी स्कीम' ((http://en.wikipedia.org/wiki/Ponzi_scheme) अफलातून होती. फसवणुकीच्या इतिहासातील सर्वात मोठी व अत्यंत यशस्वी अशी स्कीम ती ठरली. वरवरून पाहिल्यास यशस्वी उद्योजक होण्यासाठी लागणारे एकूण एक सर्व गुणविशेष त्याच्याकडे होते. यशस्वी कारकीर्द, दिपवून टाकणारी वैयक्तिक माहिती, समाजमान्यता, आर्थिक जगातील पत, मोक्याच्या ठिकाणी असलेली नात्यातली व मैत्रीतली माणसं. त्यामुळेच स्वत:ला आर्थिक व औद्योगिक क्षेत्रातील 'दादा' अशी समजूत करून घेतलेले कित्येक जण त्याच्या महाजालात फसले व त्यांनी करोडोंचे नुकसान करून घेतले. मॅडॉफच्या बरोबर आर्थिक व्यवहार करताना, त्याच्या आर्थिक सुरक्षिततेचा निव्वळ भास असलेल्या पाँझी स्कीममध्ये लाखोंनी पैसे गुंतवताना संमोहितावस्थेतच असल्यासारखे ते वावरत होते. अशा प्रकरणाकडे पश्चात बुद्धीने बघत असताना भरवश्याच्या नावाखाली आपण आपले उपजत शहाणपण कसे काय हरवून बसू शकतो याचे आश्चर्य वाटू लागते.

मॅडॉफ ही काही फसवणुकीच्या जगातली एकमेव वा पहिलीच अशी व्यक्ती नव्हती. गेल्या वीस पंचवीस वर्षातील फसवणुकीचा पाढा वाचल्यास एन्ऱॉन, वर्ल्डकॉम, टायको, लेहमन ब्रदर्स, सबप्राइम मॉर्टगेज कंपन्या, दावू, बार्लो क्लोव्ज, एआयजी, इ.इ. बहुराष्ट्रीय कार्पोरेट्सनी घातलेल्या घोटाळ्यांना सीमा नव्हती. आपल्या येथेसुद्धा सत्यम् कॉम्प्युटर्स, हर्षद मेहता, तेलगी, केतन पारिख, .... अशा लुबाडणाऱ्यांची लांबलचक मोठी यादी करता येईल. म्हणूनच डोळे झाकून आपण इतरावर ठेवत असलेल्या भरवश्याबद्दल पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे.

संशोधनाचा विषय

रॉड्रिक क्रेमर (https://gsbapps.stanford.edu/facultyprofiles/biomain.asp?id=23435009) हे सामाजिक मनोवैज्ञानिक असून गेली वीस वर्षे भरवश्याची बलस्थाने व त्याच्या मर्यादा यावर ते अभ्यास करत आहेत. आपल्या भरवश्याला ठोकर देणार्‍या अनेक घोटाळ्याबद्दल रोज रोज आपल्या वाचनात येत असतात. ब्रेकिंग न्यूज म्हणून आपल्या डोळ्यासमोर दाखविले जातात. या बातम्या फक्त वाचून विसरण्यासाठी नसतात. त्यांचे दूरगामी दुष्परिणाम होत असतात. लाखो करोडोंचे मनस्वास्थ्य धोक्यात येते. त्यामुळे क्रेमरच्या मते या विश्वासासंबंधी पुन्हा एकदा आमूलाग्र विचार करणे गरजेचे असून आपल्या दैनंदिन व्यवहारात आपण कितपत, कुणावर व केव्हा भरवसा ठेवावा यासंबंधीची काही मार्गदर्शक तत्वे आखता येतील का याचा विचार ते करत आहेत.

मुळात माणूस प्राणी अगदी लहानपणापासूनच कुणाच्या ना कुणाच्या तरी भरवश्यावरच जगत आला आहे. कदाचित कुणावर तरी विश्वास ठेवण्याची जनुकं आपल्यात असावीत. मेंदूतील अशा प्रकारच्या जनुकांचे हार्ड वायरिंगच आपल्या तगण्याला पूरक ठरत असेल. तरीसुद्धा हा आपला इतरांवरील (आंधळा) विश्वास आपल्याला अनेक वेळा गोत्यातही आणू शकतो.

कुणावर विश्वास ठेवावे व कुणावर ठेवू नये यासाठी आपल्याजवळ कुठलेही निकष नाहीत. एक प्राणीजात म्हणून मनुष्यप्राण्याचे जग परस्परांवरील विश्वासावर चालत असले तरी व्यक्तीपातळीवर विश्वासाला तडा गेल्यास त्या व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे व्यक्ती म्हणून व्यवहार करताना विश्वास कुणावर, कितपत, व कसा ठेवायचा यासंबंधीची जाण हवी. अशा प्रकारच्या विश्वासाला क्रेमर जागरूक विश्वास या नावाने संबोधतात. परंतु हा जागरूक विश्वास आपोआप कधीच येत नाही. त्यासाठी आपल्याला काही प्रश्न विचारावे लागतील, त्या प्रश्नांना अचूक उत्तरं शोधावी लागतील. हा जीवनभराचा अभ्यास असून ती एक विकास प्रक्रिया असते हे लक्षात ठेवायला हवे. यासाठी प्रथम आपण विश्वासाचे बळी का ठरतो याचा विचार करावा लागेल.

विश्वास ठेवणे - मानवी गुणविशेष

शरीराच्या आकारमानाच्या तुलनेने इतर कुठल्याही प्राण्यापेक्षा जास्त मोठा असलेला मेंदूच माणसाच्या या गुणविशेषाला कारणीभूत ठरत आहे. जन्मल्याक्षणी शारीरिकदृष्ट्या अत्यंत कमकुवत असल्यामुळे व दीर्घ काळच्या बाल्यावस्थेमुळे याला याच्या आवती भोवती काळजी घेणारे कुणी ना कुणी तरी लागतात. अगदी जन्माच्या वेळेपासूनच आपल्यातील हार्डवायरिंग सामाजिक - कौटुंबिक संबंध प्रस्थापित करण्याची चुणूक दाखवते. या हार्डवायरिंगचे पुरावे अत्यंत आश्चर्यचकित करणारे आहेत. जन्माच्या तासाभरातच बाळ डोके मागे घेत त्याच्याकडे टक लावून पहाणार्‍यांच्या डोळ्यांना डोळे भिडवते. काही तासातच आईच्या आवाजाच्या दिशेत डोळे फिरवू लागते. एवढेच नव्हे तर काळजी घेणार्‍यांचे अनुकरण करण्याच्या प्रयत्नात बाळ असते. म्हणूनच बाळाची आई बाळाच्या भावनांना बोबडे बोलत प्रतिसाद देते.

थोडक्यात मनुष्य प्राणी अगदी जन्मल्यापासून सामाजिक प्राणी म्हणून वावरत असतो. आपण इतरांच्या बंधनात व इतराना आपल्या बंधनात अडकून ठेवत असतो. ढोबळमानाने विश्वास म्हणजे एकमेकाशी प्रस्थापित केलेला संबंध असे म्हणता येईल. हे बंधनच आपल्याला अस्तित्वाच्या लढाईत फायदेशीर ठरले. एका सामाजिक विश्लेषणतज्ञाच्या मते अपत्य - पालक यांच्यातील अतूट नातं, परस्पर सहकार भावना, व इतर सामाजिक सलोख्याचे गुणविशेष माणसात उपजतच असून त्यांच्यामुळेच मेंदूचा विकास होत गेला असावा. माणूस प्राणीजगतात यशस्वी ठरला असावा. आपण व्यक्त करत असलेला परस्पर विश्वासच उत्क्रांतीच्या इतिहासाला काही अर्थ प्राप्त करून देत असावा.

रासायनिक प्रक्रिया

विश्वासाच्या संदर्भात आपल्यातील भाव-भावनांचे नियंत्रण करणार्‍या मेंदूतील रासायनिक स्रावांचा फार मोठा सहभाग असू शकतो. प्रसूतीच्या काळात व/वा बाळाला दूध पाजते वेळी आईच्या मेंदूत ऑक्सिटॉनिन या रासायनिक द्रव्याचा स्राव होत असतो. कदाचित हेच रसायन माणसा-माणसातील परस्परविश्वास व विश्वासार्हता वाढवण्यास प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या मदत करत असावी असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे. ऑक्सिटॉनिनचे 1-2 थेंबसुद्धा चवताळलेल्या हिंस्रपशूंना शांत करण्यासाठी, त्यांच्या आक्रमकतेला अटकाव आणण्यासाठी पुरेसे ठरतात, असे प्राण्यावरील नियंत्रित प्रयोगावरून सिद्ध झाले आहे. वैज्ञानिकांच्या मते माणसांमधील सकारात्मक भावना व सामाजिक संबंधांच्या वाढीसाठी हे रसायन कामी येते.

अगदी साध्या साध्या वाटणार्‍या गोष्टीतसुद्धा आपण चटकन विश्वास ठेवत असतो. आपल्या जवळपासची वा ओळखीची चेहरापट्टी असलेला आपल्याला विश्वासार्ह वाटतो. कदाचित तो आपला जवळचा वा लांबचा नातलग असू शकेल , हे कारण त्यामागे असेल. आपण इतर अपरिचित वा बाहेरच्यांच्यापेक्षा आपल्याच सामाजिक वर्तुळात असलेल्यांच्यावर जास्त भरवसा ठेवतो. ही जी गटाची बांधिलकी असते - गट किती लहान वा मोठा असू दे - ती प्रत्येकाला जाणवत असते व ती शेवटपर्यंत टिकून राहते. ऑक्सिटॉनिनचा हा परिणाम शेवटपर्यंत टिकून राहतो. अजून एका अभ्यासकाच्या मते एकमेकांनी केलेला शारीरिक स्पर्श विश्वास वाढण्यास पूरक ठरू शकते. म्हणूनच जगभरातील कित्येक समाजगटात अभिवादनासाठी हात हातात घेणे आलिंगन देणे, चुंबन देणे, कपाळावर ओठ टेकवणे, या प्रथा रूढ झाल्या असाव्यात.

माणूस हा भरवश्यावर जगणारा प्राणी

जरी माणसं आम्ही सहसा डोळे झाकून कुणावरही चटकन विश्वास ठेवत नाही असे छातीठोकपणे सांगत असले तरी त्यांची सामान्य वागणूक वेगळेच सांगत असते. आपण सामान्यपणे आपल्या नकळत नेहमीच इतरांवर विश्वास ठेवण्याच्या पावित्र्यात असतो. ही माणसाची एक सामान्य व रूढ स्थिती आहे. यासाठी काही विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. गुरुत्वाकर्षण शक्ती ग्रहांना सूर्याभोवती फिरवत ठेवते की नाही याबद्दल आपण कधीच प्रश्न विचारत नाही वा शंका घेत नाही. त्याचप्रमाणे आपण कुणावर विश्वास ठेवायचे की नाही याबद्दल जास्त विचार करण्याच्या फंदात पडत नाही. समोरच्यावर विश्वास ठेवणे ही एक प्रक्षिप्तक्रिया आहे की काय असे वाटते. व हा निःसंशय विश्वासच आपल्या नेहमीच्या उपयोगात पडत असतो. आपण सर्व अवती-भोवती असलेल्यावर, संघ - संस्थेवर विश्वास ठेवतच लहानाचे मोठे झालेलो आहोत व या अनुभवाची शिदोरीच आयुष्यभर पुरेशी ठरत असते. बहुतेक प्रसंगात इतरांवर विश्वास ठेवल्यामुळे आपले काही तरी चुकत आहे असे कधीच वाटत नाही. त्यामुळे विश्वास ठेवणे अविवेकीपणाचे लक्षण आहे असे मनाला कधीच शिवत नाही.

 

पुढे: पृष्ठ २