भरवश्याची ऐशी तैशी!

भाग ३

नियम 1 - स्वत:विषयी जाण

भरवश्याच्या संदर्भात माणसांची दोन भागात विभागणी करणे शक्य आहे. काही जण पटदिशी इतरांवर नको तेवढा भरवसा ठेवतात. त्यांच्या मते हे संपूर्ण जग सज्जनांनीच भरलेले असून कुणीच कुणाचाही गैरफायदा घेत नाही वा कुणीही कुणाला त्रास देत नाही. त्यामुळे ओळख झालेल्या काही क्षणातच ही मंडळी आपले मन मोकळे करू लागतात. आपल्याबद्दलची इत्थंभूत माहिती देतात. बँकेसारख्या आर्थिक व्यवहारातील गुप्त माहितीसुद्धा त्यांच्या नकळत इतरापर्यंत पोचते. समोरच्यावर आपली छाप पडावी या खटाटोपात नको तेवढी माहिती, कुटुंबातील हेवेदावे, इतराबरोबर असलेले संबंध व दुरावा या सर्व गोष्टींची माहिती आपण सहजपणे समोरच्यांना पुरवत असतो. आपल्या या माहितीचा कुणीतरी दुरुपयोग करू शकेल हा विचारही आपल्या मनात येत नाही. हा अती विश्वास व वा बेफिकिरपणा कधी ना कधी तरी पश्चात्ताप करण्यास भाग पाडतो.

दुसर्‍या प्रकारातील माणसं कुठल्याही मानवी संबंधाकडे कायमच संशयग्रस्त नजरेने पहात असतात. त्यांना इतरांच्या प्रत्येक कृतीत वा हालचालीत वाईटपणाच दिसत असतो. त्यामुळे येथे अगदी साधी-सुधी, क्षुल्लक माहितीची पण देवाण घेवाण शक्य होत नाही. या प्रकारातील लोकांना नेहमीच आपण चुकीच्या, दुरुद्देश असलेल्यांशीच व्यवहार करत आहोत असे वाटत असते. यामुळे कदाचित यांच्या हातून फार कमी चुका होतही असतील. परंतु त्यांच्या या माणूसघाण्या, तुसड्या, संशयग्रस्त वृत्तीमुळे जीवनातील काही सकारात्मक अनुभवांना ते कायमचेच मुकतात.
त्यामुळे भरवसा ठेवत असताना आपण स्वत: कुठल्या प्रकारात मोडतो याचा विचार करावा. त्यावरून आपल्याला नेमके काय करायला हवे ते कळू शकेल. आपण इतरांवर नको तितका भरवसा ठेवणारे असल्यास आपल्याला वेळोवेळी मिळत असलेल्या इशार्‍यांबद्दल काळजीपूर्वक पाऊल ठेवावे लागेल. आपण इतरांशी तुसडेपणाने वागत असल्यास आपल्या वर्तनात बदल करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

नियम 2 - जागरूक सुरुवात

भरवश्यात धोका असतो हे मान्य असले तरी ते टाळता येणे शक्य नाही. मात्र त्यातून उद्भवणार्‍या धोक्याची पातळी कमीत कमी ठेवणे हे आपल्या हातात असते. मोठा घास घेण्यापेक्षा लहान लहान घास घेणे उत्तम. इतरांशी सुरुवातीला संबंध ठेवताना याचा फार उपयोग होवू शकतो. यालाच मानसतज्ञ ओघवता भरोसा (shallow trust) म्हणतात. यामुळे आपण दुसर्‍यावर विश्वास ठेवू शकतो, हा संदेश संबंधितांपर्यंत पोचतो. असे वागल्यामुळे परस्पर विश्वासाचा हा एक सकारात्मक पाऊल ठरतो. तुमचे एक पाऊल पुढे व त्यानंतर दुसर्‍याचे एक पाऊल पुढे असे टप्प्या टप्प्याने संबंध प्रस्थापित करत असल्यास धोका नगण्य ठरण्याची शक्यता असते. (तरी काही लुच्चे सुरुवातीला लहान सहान रक्कम परत करून विश्वास संपादतात व नंतर मोठा डल्ला घालतात) ही प्रक्रिया थोडीशी वेळखाऊ असली तरी धोका टाळण्यासाठी वा risk कमी करण्यासाठी योग्य ठरेल.

नियम 3 - संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग

संकटातून बाहेर पडण्याच्या उपाययोजनेसाठी काही तरतूद आगावू केलेल्यांना वा त्याची पूर्वकल्पना असलेल्यांना आपल्या व्यवहारात पूर्णपणे झोकून काम करणे शक्य आहे. सामाजिक वा आर्थिक व्यवहारात अनपेक्षित असे काही तरी नेहमीच घडत असते. त्यामुळे आपण पूर्वी बांधलेले आडाखे चुकतात. व्यवहारात खोट येवू शकते. अशा अनपेक्षित प्रसंगाचा यशस्वीरित्या सामना करण्यासाठी काही पर्याय उपलब्ध असल्यास व त्याचा विचार केलेला असल्यास धोका पत्करणे कठिण जाणार नाही.

काही व्यवहारात भरवसा वाढण्याऐवजी त्याला तडा जातो की काय असे वाटण्याची शक्यता असते. आपल्याजवळ पर्याय असल्यास इतरही तुमच्याशी व्यवहार करताना बिनधोक राहतात. (जर तुमचा दुसर्‍यावर विश्वास नसल्यास दुसर्‍यांनी तुमच्यावर का म्हणून विश्वास ठेवावा?) अनपेक्षित धोक्यातून बाहेर पडण्यासाठी काही पुरेशी तजवीज केलेली असल्यास नंतरचा मनस्ताप टाळता येईल.

नियम 4 - प्रबळ संदेश

छोट्या छोट्या गोष्टीतून विश्वास दृढ होत जातो व त्यातून व्यापक बांधिलकीची वीण घट्ट होत जाते. परंतु त्यासाठी आपल्याला सर्व संबंधितांपर्यंत आपला आवाज पोचवण्याची गरज आहे. अनेक वेळा आपल्या सामाजिक वर्तुळात आपल्याविषयी जास्त माहिती नसते. इकडून तिकडून ऐकीव गोष्टीवरून, जुजबी माहितीवरून आपल्याला इतर तोलत असतात. आपण स्वत विश्वासार्ह आहोत, व आपण इतरावर विश्वास ठेवू शकतो ही जाणच इतरामध्ये नसते. आपण संवादात कुठेतरी कमी पडतो. आपण प्रबळ संदेश पोचवत नाही हेही त्याचे एक कारण असू शकेल. (लबाडी करणारे मात्र कायमच रेटून बोलत असतात व त्या बोलघेवड्यापणावर आपण भुलतो.) त्यासाठी इतरांचे आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी काही विशेष प्रयत्न करण्याची जरूरी आहे. यात प्रामुख्याने आपण इतरांना फसवत नाही, फसवणार नाही याची हमी ध्यावी लागते. आपला प्रामाणिकपणा सिद्ध करावा लागतो. व्यवहारात पारदर्शकता असावी लागतो.

आपण आपल्या भरवश्याचे स्ट्राँग सिग्नल्स पाठवत असल्यास आपल्याशी व्यवहार करू इच्छिणारे जागरूक राहतात. आपले योग्य मूल्यमापन करू शकतात. त्याचबरोबर लुच्च्या- लफंग्यांना आपल्याविषयी एका प्रकारची भीती वाटू लागते. आपण लेचापेचा नसून जशास तसे वागू शकतो, याबद्दल एकदा लोकांना कळून चुकल्यानंतर इतरांना आपल्याशी कसे संबंध ठेवावेत याचा पुनर्विचार करावा लागेल.

आपण छोट्या छोट्या गोष्टीमधून विश्वासार्हता प्रदर्शित करत असतानाच आपल्याला फसवणार्‍याशी वेळप्रसंगी कठोरपणे वागू शकतो हे पण इतरांच्या लक्षात आणून द्यायला हवे. आपण फक्त साधे भोळे, चांगले असणे हे पुरेसे नसून, वेळ प्रसंगी गुन्हेगारांना धडा शिकवू शकतो हे पण त्यांना कळायला हवे.

नियम 5 - व्यक्तीचे व व्यक्तीच्या कार्याचे मूल्यमापन

एका अभ्यासानुसार व्यक्तिगत संबंधांच्यावरतीच भरवश्याची इमारत उभी राहते.याचा अर्थ व्यक्तीचा पूर्वेतिहास वा त्याच्या हातातील सत्ता वा नेतृत्व गुण हेच फार महत्वाचे ठरतात, असे नाही. आपण एखाद्या इंजिनीयरवर विश्वास ठेवतो याचे कारण तो केवळ इंजिनीयर नसून त्यानी बांधलेल्या इमारती, बांधत असताना घेतलेले कष्ट, इमारतीची गुणवत्ता, त्यांनी वापरलेले इंजिनीयरिंगचे अद्यावत व उपयुक्त ज्ञान, यावर आपण विश्वास ठेवत असतो. आपण व्यक्तीबरोबरच व्यक्तीच्या कार्याचेही मूल्यमापन करून निर्णय घेत असतो. वैयक्तिक अनुभव, खात्रीशिर नैपुण्य, व त्यामागील प्रेरणा यांचीच गोळाबेरीज विश्वासार्हतेत सापडत असते.

परंतु केवळ कार्याचा पूर्वेतिहास हा काही भरवश्याचा निकष होऊ शकत नाही. अनेक कंपऩ्या सुरुवातीला अत्यंत नेत्रदीपक कामगिरी करून दाखवत असतात. परंतु कालांतराने ते ढेपाळतात. गैरव्यवहार करू लागतात. कंपनी यशस्वी का अयशस्वी यापेक्षा कंपनी चालवणारी व्यक्ती व त्या व्यक्तीचे काम, त्याची हतोटी, त्याची बांधिलकी, प्रामाणिकपणा, यानाच महत्व देत निर्णय घ्यायला हवे.

नियम 6 - सखोल व अधून मधून चिकित्सा

आपल्याला जेव्हा सणकून भूक लागते तेव्हा आपल्यासमोरील खाण्याच्या पदार्थाव्यतिरिक्त दुसरा कुठलाही विचार सुचत नाही. पोट भरल्यानंतरच आपण दुसरा एखादा विचार करू शकतो. अशीच काहीशी अवस्था भरवश्याच्या बाबतीत होत असते. इतरांवर भरवसा ठेवत असताना आपण काही काळ त्यांच्या विश्वासार्हतेविषयी भरपूर विचार करतो. चौकशी करतो. परंतु एकदा निर्णय घेतल्यानंतर पुनर्विचार करण्याच्या भानगडीत पडत नाही. ही आपली मानसिकता फार धोकादायक ठरू शकते.

काही कारणामुळे वा भोवतालच्या परिस्थितीनुसार माणसं बदलू शकतात, हे आपण लक्षात घेत नाही. लक्षात आल्यानंतर वेळ निघून गेलेली असते. झालेले नुकसान अक्कल खाती जमा करण्याशिवाय आपल्या हातात काहीही नसते. मॅडॉफच्या पाँझी स्कीममध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी अनेकांनी चवकशी केली असेल. पैशाच्या सुरक्षिततेविषयी खात्री करून घेतली असेल. परंतु गुंतवणुकीनंतर मात्र बहुतेक जण बेफिकिर राहून आपापल्या दैनंदिन उद्योग व्यवसायात मग्न झाले. मॅडॉफच्या आक्रमक जाहिरातबाजीवर विश्वास ठेवून कुठलीही कृती करण्यास तयार झाले नाहीत. कारण मॅडॉफनी सादर केलेली यादीच इतकी जबरदस्त व आकर्षक होती की नोबेल पारितोषक विजेतासुद्धा बळी पडला.

ज्यांच्यावर आपण भरवसा ठेवला आहे त्याची अधूनमधून विचारणा करणे, प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष चौकशी करणे या गोष्टी मानसिकदृष्ट्या नकोसे वाटत असले तरी ते आव्हान स्वीकारून वेळीच काही उपाय केल्यास नंतर होणारा मानसिक त्रास, आर्थिक नुकसान टाळता येणे शक्य आहे. आपण ठेवत असलेल्या विश्वासात जागरूकता आणल्यास परिस्थितीतून निभावून जाण्याची शक्यता वाढते.

गुंतागुंतीच्या या समाजव्यवस्थेत भरवश्यासंबंधीची आपली जाण आपल्या अस्तित्वासाठी अत्यंत गरजेचे ठरत आहे. देशाच्या सामाजिक व आर्थिक स्थैर्यासाठी परस्पर विश्वासाचा किती मोठा सहभाग आहे हे आताच्या परिस्थितीने अधोरेखित केले आहे. परंतु संपूर्ण समाजगटाला जे हितकारक असू शकते ते एखाद्या व्यक्तीला हितकारक ठरेल याची शाश्वती नाही. त्यामुळे परस्पर विश्वासाचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्यासाठी जागरूक विश्वासाला पर्याय नाही. वर उल्लेख केलेल्या नियमांचे पालन केल्यामुळे फसवणुकीपासून आपण 100 टक्के सुरक्षित राहू असा दावा करता येत नाही. भरवसा हा विषय आता विज्ञानाच्या अखत्यारीत आला असून या क्षेत्रात मनोवैज्ञानिक, नसतज्ञ, वर्तन वैज्ञानिक संशोधन करत आहेत. नवीन प्रयोगांची रचना करत आहेत. मेंदूमधील लहान सहान बदलांची नोंद घेत आहेत. हे सर्व घडत असले तरी तातडीचे उपाय म्हणून या नियमांचे पालन करत असल्यास आपल्याला फसवणे तितकेसे सोपे ठरणार नाही.

समाप्त

 

लेखक इंग्रजी थॉट ऍण्ड ऍक्शन नियतकालिकाचे संपादक, एआरडीई मधून निवृत्त शास्त्रज्ञ.