भरवश्याची ऐशी तैशी!
भाग २
माणूस जसा स्खलनशील प्राणी आहे तसाच तो भरवश्यावर जगणारा प्राणी आहे. आपला मेंदू कायमचाच इतरांशी संबंध प्रस्थापित करण्याच्या खटाटोपात असतो. त्यामुळेच काही वेळा तो शोषणाचा बळी ठरू शकतो. विशेषकरून आपल्या समोरच्या व्यक्तीत काही मिळती जुळती गुणधर्म - भाषा, वय, लिंग, चेहरापट्टी, पोषाख, प्रदेश इ.इ. - आढळल्यास आपल्यातील विश्वास दाखवण्याची सहज प्रवृत्ती उचंबळून येते. मेंदूतील माहिती प्रक्रियेला चालना देते. त्यामुळे आपण जरूरीपेक्षा जास्त माहिती ओतत राहतो. जर या माहितीतील काही महत्वाचे धागे मतलबी व्यक्तींच्या हातात पडल्यास आपण गोत्यात सापडतो. तरीसुद्धा पुढच्याला ठेच, मागचा शहाणा असे येथे कधीच घडत नाही. झाले गेले विसरून पुन्हा एकदा अजून एका तिर्हाइतावर विश्वास ठेवतो. यात कधीही खंड पडत नाही. ये रे माझ्या मागल्या....!
आपल्या निर्णय शक्तीला वाकड्यात नेणार्या या वृत्तीमुळे आपल्याला जे अपेक्षित असते तेच आपण इतरांमध्ये पहात असतो. या सवयींमुळे विरोधातील मुद्दे आपण बाजूला सारतो व जे पुरावे आपल्या भरवश्याला अनुकूल वा पूरक ठरतील त्यांचाच फक्त विचार करू लागतो. एकदा विश्वास ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचा पुनर्विचार करायला हवे याला आपण सहसा तयार होत नाही. हीच मानसिकता आपल्याला धोकादायक ठरू शकते. भरवश्याला तडा गेल्यानंतरसुद्धा काही जण त्यातून लवकर बाहेर पडू शकत नाही. कारण त्यांना आपला भरवसा म्हणजे एक सुरक्षित, अभेद्य कवच आहे असे वाटत असते. आपल्याला कुणीतरी फसवत आहे हे लक्षात आल्यानंतरसुद्धा त्याविरुद्ध बंड करण्याचा विचारही त्यांना शिवत नाही.
मॅडॉफचे प्रकरण हे यासंबंधातील एक उत्कृष्ट उदाहरण ठरू शकेल. पहिल्यांदा आपला घामाचा पैसा त्याच्या स्कीममध्ये गुंतवत असताना थोडा फार विचार केला असला तरी त्यानंतरच्या त्याच्या घोटाळ्याच्या बातम्यांकडे बहुतेक सपशेल दुर्लक्ष करत राहिले. यातील प्रत्येकाला आपला पैसा सुरक्षित असून दुसर्याच कुणाच्या तरी पैशाचा तो घोळ करत आहे असे वाटत होते. अशी समजूत करून घेणार्यामध्ये केवळ सर्व सामान्य नव्हे तर नावाजलेले अर्थतज्ञ, गुंतवणूक क्षेत्रातील अनुभवी, मोठमोठे बँकर्सही होते. परंतु त्यातील एकालाही आपण धोक्याची घंटा वाजवायला हवी असे वाटले नाही. एली वीसल या नोबल पारितोषक विजेत्यानी मॅडॉफच्या स्कीममध्ये आपली पुंजी गुंतवली होती. आम्ही प्रत्येक वेळी त्याच्या गुंतवणूकदारांच्या यादीकडे बघत होतो. त्यातील प्रत्येक जण नावाजलेले अर्थतज्ञ होते...... तरीसुद्धा हा घोटाळा झाला.... मानसिकदृष्ट्या कितीही क्लेशदायक असले तरी आपण ज्यावर विश्वास ठेवला आहे त्याचा पुनर्विचार करणे, त्याचा वेळोवेळी आढावा घेणे, त्याची चिकित्सा करणे हे फार मोठे आव्हान आहे व हे आव्हान स्वीकारण्याची मानसिकता आपल्यात नसते. परंतु जेव्हा आपल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवतो तेव्हा हे पथ्य पाळायला हवे.
तिर्हाइताच्या शब्दाखातर
इतरांवर विश्वास ठेवणे हे उत्क्रांतीतील एक महत्वाचे पाऊल असून मनुष्यप्राण्याला त्याचा फार मोठा फायदा झाला आहे. त्यामुळे परस्परांवर विश्वास ठेवण्यात आपण फार मोठी चूक करत आहोत असे म्हणता येणार नाही. फक्त आपल्या मनातील स्टिरिओटाईप (गैर) समजुतींमुळे आपण काही वेळा शोषणाचे बळी ठरतो. वय, लिंग, भाषा, प्रदेश इत्यादी प्रकारच्या गोष्टींवरून इतरांवर विश्वास ठेवणे काही वेळा धोक्याचे ठरू शकते. समोरचा माणूस चेहर्यावरून साळसूद, प्रामाणिक, विश्वासार्ह वा आपल्या जवळचा असे मानसिक ठोकताळे बांधत असल्यास नुकसान होण्याची शक्यता असते. या गोष्टी आपल्याला योग्य निर्णय घेऊ देत नाहीत. हे ठोकताळे उपलब्ध पुराव्यांना धूसर बनवतात. आपली मानसिकता वरवरून पाहता निरुपद्रवी असते. माणसांची विभागणी कशी करावी यासंबंधीची सूचना देत असते. परंतु हीच मानसिकता इतरांवर मर्यादेबाहेर विश्वास ठेवण्यास भाग पाडू शकते. त्यामुळे आपले आर्थिक नुकसान होऊ शकते. आपल्याला मनस्ताप सोसावा लागतो.
याचबरोबर आपण सामान्यपणे स्वत:ला इतरांपेक्षा वेगळे (स्मार्ट, चाणाक्ष...) अशी समजूत करून घेत असतो. दुसरा जसा चूक करू शकतो तशी चूक मी करणार नाही या अहंभावात आपण वावरत असतो. विश्वासाच्या संदर्भात घेत असलेल्या निर्णयाबाबत ही गोष्ट फार प्रकर्षाने जाणवते. एम बी एच्या वर्गातील विद्यार्थ्यांची चाचणी घेत असताना त्यांच्यातील सुमारे 95 टक्के विद्यार्थी त्यांच्याच वर्गातील इतरांपेक्षा वरच्या पातळीवर आहोत असे नोंद करत होते. 77 टक्के विद्यार्थ्यांनी वरच्या 25 टक्के गटात व 20 टक्के विद्यार्थी वरच्या 10 टक्क्यामध्ये आपली गणना व्हावी अशी आग्रहाची मांडणी करत होते. यावरून आपण एखादा निर्णय घेत असताना आपल्या क्षमतेविषयी अवाजवी समजूत करून घेत असतो. त्यामुळे हा अहंभाव प्रामाणिकतेचा मुखवटा चढवलेल्यांना तुम्हाला त्यांच्या जाळ्यात अडकवण्यास उत्तेजन देऊ शकते.
विश्वासाच्या संदर्भात आपण नेहमीच अजून एक मोठी चूक करत असतो. ती म्हणजे तिर्हाइतांची मते ग्राह्य धरणे. या तिर्हाइतांचेच मत आपल्याला अनोळखी माणसाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघण्यास भाग पाडते. आपल्या जाणिवा, आपले उपजत शहाणपण नेमके त्या वेळी बधिर होतात व चुकीच्या सुरक्षिततेचा आभास निर्माण करतात. त्याच्या सामाजिक वर्तुळात मॅडॉफ अत्यंत प्रामाणिक आहे असा गवगवा होता. या मौखिक जाहिरातीमुळे तो आपल्याला कधी काळी फसवू शकेल असा विचारच कुणाच्या डोक्यात आला नाही.
धोक्याची कल्पना
आपण स्वत:विषयी विचार करत असताना आपल्यापर्यंत धोका पोचणार नाही याच गुर्मीत असतो. धोक्याचा अंदाज घेताना धोक्याचे प्रमाण कमीत कमी ठेवण्याच्या प्रयत्नात असतो. आपल्याला (व आपल्या पैशाला!) काहीही होणार नाही या भासमय जगात आपण नेहमी वावरत असतो. आयुष्यातील दु:खमय घटना आपल्याला स्पर्श करणार नाही याच कल्पना विश्वात आपण तरंगत असतो. परंतु वास्तव फार भीषण असते. वास्तवात धोका अगदी जवळ येऊन ठेपला तरी आपण वेळीच जागे होत नाही.
काही वेळा आपण आपल्या मनात अशा धोक्यांचा आढावा घेतो. त्याचे परिणाम, त्याची व्याप्ती व मर्यादा यांचे गणित मांडतो व धोका पत्करायला हरकत नाही या निष्कर्षाप्रत पोचतो व याच समजुतीवरून एखाद्यावर विश्वास ठेवतो. आपण अनोळख्या गावात अंधार्या रात्री अनोळख्या ठिकाणी जाण्याचे धाडस कधीच करत नाही. कारण कुणीतरी आपल्याला लुबाडण्याचा धोका त्यात असतो. परंतु चार - आठ तासाच्या प्रवास काळात शेजारी बसलेला प्रवासी कॉफी पिण्याचा आग्रह करत असल्यास आपण त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून कॉफी पितो. परंतु त्या कॉफीत गुंगीचे औषध मिसळलेले असल्यास तो आपल्याला पूर्णपणे लुबाडून गुल्ल होतो. यात आपला अति शहाणपणाच नडतो. अशा प्रकारच्या अति भरवश्याच्या कारणांचा शोध घेताना एक गोष्ट लक्षात येते की मुळातच आपण स्वत:ला फार शहाणे समजत असतो.
खोटा आशावाद हाही विश्वासासंबंधीच्या आपल्या वर्तणुकीतील अजून एक उणीव असू शकते. जगातील सर्व चांगल्या गोष्टी आपल्यासाठीच आहेत याच तोर्यात आपण वावरत असतो. सुदीर्घ कौटुंबिक ऐषारामी जीवन, यशस्वी करीअर, दीर्घ व निरोगी आरोग्य, विनाश्रम (वा कमीत कमी श्रमात) बक्कळ पैसा, इ.इ. म्हणजेच आयुष्य अशी एक कल्पना आपल्या मनात रूजलेली असते. कुणीतरी याविषयी एखादा तरी अपशब्द काढला वा वाईट बोलले तरी आपला रागाचा पारा वर चढतो व त्याला/तिला काय कळते म्हणत आपण इतरांपेक्षा किती वेगळे आहोत याच गुंगीत असतो. प्रत्येक सामान्य माणसाला इतर सामान्यापेक्षा आपण वेगळे आहोत असेच वाटत असते. त्यामुळे वेळीच केलेल्या इशार्याकडे दुर्लक्ष केले जाते.
आपला साधेपणा (भोळसटपणा) हासुद्धा इतरांना आपल्याला फसवण्यास, लुबाडण्यास उत्तेजन देत असते. दुर्दैवाने विश्वासार्हता मोजण्यासाठी आपल्याकडे कुठलीही मोजमापे नाहीत. व जी आहेत ते निरुपयोगी ठरत आहेत. कारण लुबाडणार्यांना याची पूर्ण कल्पना असल्यामुळे आपल्याला ते सहजपणे manipulate करू शकतात. आपल्या चांगुलपणाचा फायदा घेऊ शकतात. त्यामुळे आपल्या अवती भोवती वावरणार्यात लुच्चे कोण व सच्चे कोण याचा थांगपत्ता लागत नाही. व लुच्च्यांना शोधणे वाटते तितके सोपे नाही.
जागरूक विश्वास
यासाठी प्रथम आपण ठेवत असलेल्या भरवश्याविषयी जागरूकता पाळावी लागेल. आपल्याशी संबंध ठेवू इच्छिणार्यांचे अंतस्थ हेतू काय आहेत, त्यामागील प्रेरणा काय आहेत, त्यांचे गुणविशेष काय आहेत, त्यांच्या योजना काय आहेत इत्यादीविषयी आपल्याला यानंतर अनभिज्ञ असून चालणार नाही. मुळात आपल्यासमोर दोन पर्याय आहेत -
- समोरच्यावर विश्वास ठेवणे - ज्यामुळे आपल्याला कुणीही फसवू शकेल किंवा
- समोरच्यावर अजिबात विश्वास न दाखवणे - ज्यामुळे विश्वासाचे फायदे मिळणार नाहीत
त्यामुळे विश्वासामागे कायमपणे एक संशयाचे भूत उभे राहते. मुळातच आपले व्यवहार इतक्या रोखठोकपणे बसवताही येत नाहीत. म्हणूनच या मानगुटीवर बसलेल्या संशयाच्या भुताची भीती कमी करण्यासाठी काही निश्चित पाऊले उचलण्याचा निर्धार केल्यास व प्रयत्न करत राहिल्यास आपल्या भरवश्यावरचा भरोसा वाढत जाईल. यासाठी आपल्याला काही नियम पाळावे लागतील.
पुढे: पृष्ठ ३