न्यू मेक्सिकोचे प्रवासवर्णन

नंदन होडावडेकर

मेक्सिकोच्या सीमेला लागून असलेलं 'न्यू मेक्सिको' हे नैऋत्य अमेरिकेतलं एक राज्य. वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक स्थानामुळे स्पॅनिश, मेक्सिकन आणि रेड इंडियन संस्कृतींचा पडलेला प्रभाव आणि मुख्यत्वेकरून वाळवंटी आणि डोंगराळ भूभाग; या दोन गोष्टींमुळे इतर अमेरिकन राज्यांपेक्षा तसे निराळेच. मुळात वेगळे राज्य म्हणून बऱ्याच उशीरा, म्हणजे १९१२ मध्ये न्यू मेक्सिकोला मान्यता मिळाली. आजही बव्हंशी अमेरिकनांना 'न्यू मेक्सिको' हे अमेरिकेचा नसून मेक्सिकोचा भाग आहे, असे वाटते. गेल्या ख्रिसमसच्या सुटीत, सॅन डिएगोपासून आखलेल्या सुमारे सव्वा-चार हजार किमीच्या रोड-ट्रिपमध्ये न्यू मेक्सिकोतली काही प्रेक्षणीय स्थळे पाहता आली, त्यांचे हे वर्णन

 
पृष्ठ १

मेक्सिकोच्या सीमेला लागून असलेलं 'न्यू मेक्सिको' हे नैऋत्य अमेरिकेतलं एक राज्य. वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक स्थानामुळे स्पॅनिश, मेक्सिकन आणि रेड इंडियन संस्कृतींचा पडलेला प्रभाव आणि मुख्यत्वेकरून वाळवंटी आणि डोंगराळ भूभाग; या दोन गोष्टींमुळे इतर अमेरिकन राज्यांपेक्षा तसे निराळेच. मुळात वेगळे राज्य म्हणून बऱ्याच उशीरा, म्हणजे १९१२ मध्ये न्यू मेक्सिकोला मान्यता मिळाली. आजही बव्हंशी अमेरिकनांना 'न्यू मेक्सिको' हे अमेरिकेचा नसून मेक्सिकोचा भाग आहे, असे वाटते. [त्यामुळेच की काय, फक्त याच राज्याच्या गाड्यांच्या नंबरप्लेटांवर न्यू मेक्सिको, यूएसए असे लिहिलेले असते. इतर ठिकाणी फक्त राज्याचे नाव असते.] गेल्या ख्रिसमसच्या सुटीत, सॅन डिएगोपासून आखलेल्या सुमारे सव्वा-चार हजार किमीच्या रोड-ट्रिपमध्ये न्यू मेक्सिकोतली काही प्रेक्षणीय स्थळे पाहता आली, त्यांचे हे वर्णन --

या सहलीत पहिला थांबा होता व्हाईट सँड्स नॅशनल मॉन्युमेंटचा. थरच्या वाळवंटात जशी भारतीय क्षेपणास्त्रांची चाचणी चालते, तसाच या श्वेतमरूभूमीला लागून अमेरिकेतला सर्वात मोठा, सुमारे ८००० चौरस किमीचा क्षेपणास्त्र चाचणी विभाग आहे. (इथल्याच ट्रिनीटी साईट ह्या जागेवर पहिल्या अणुबाँबची चाचणी झाली. ओपेनहायमरना जे दृश्य पाहून गीतेतले श्रीकृष्णाचे उद्गार आठवले, ती जागा मात्र वर्षातून केवळ दोनदाच आम जनतेसाठी खुली असते - एप्रिल आणि ऑक्टोबरच्या पहिल्या शनिवारी.) त्याला लागूनच या पांढर्‍या वाळूच्या छोट्या टेकड्या पसरल्या आहेत. साधारण २५ कोटी वर्षांपूर्वी या भागात असणारा उथळ समुद्र आटला. पावसाच्या पाण्यात विरघळून समुद्रात वाहून नेले जाणारे जिप्सम (कॅल्शियम सल्फेट डायहायड्राईट) मग तिथेच सेलेनाईट स्फटिकांच्या रुपात साठून राहू लागले. विषम हवामानामुळे त्यांची झीज होऊन तयार झालेली ही पांढऱ्या रंगाची बारीक वाळू मग वाऱ्याबरोबर वाहत येऊन आताच्या या वाळूच्या टेकड्या तयार झाल्या आहेत. या प्रक्रियेबद्दल अधिक माहिती येथे वाचता येईल.

या प्रक्रियेचा परिणाम म्हणून जे निर्माण झाले आहे, त्याचे स्वतःचे असे एक अनलंकृत सौंदर्य आहे. वर निरभ्र निळे आकाश आणि खाली चारी बाजूंना क्षितिजापर्यंत पसरलेली पांढरीधोप वाळू. भर उन्हातही सामान्य वाळूसारखी न तापणारी. एक टेकडी कुठे संपतेय आणि दुसरी कुठे सुरू होतेय, हे नजरेला उमगू नये असा सर्वव्यापी शुभ्र रंग. त्यावर वाहत्या वाऱ्‍याने उमटवलेल्या चुण्यांसारख्या आपल्या पाऊलखुणा. उतारात कुठे खळ पडून तयार झालेल्या सावल्यांनी रंगात बदल केला तर तेवढाच.

उद्यानाच्या टोकाला पाच-एक मैलांची अल्कली फ्लॅट ट्रेल आहे. त्या दिशा हरवून टाकणार्‍या शुभ्रतेत रस्ता कळावा म्हणून थोड्या थोड्या अंतराने वाळूत लोखंडी पट्ट्या रोवलेल्या आहेत. डोळ्यांना खुपणार नाहीत इतक्याच, पण कोणी रस्ता चुकणार नाही याची दक्षता घेऊन योग्य अंतरावर असलेल्या. सल्ला द्यावा तर असा.

ट्रेलमध्ये रूढ अर्थाने प्रेक्षणीय असे काही नाही. निवांत शांतता मात्र अनुभवता येते. वाळूच्या टेकड्या हळूहळू पुढे कशा सरकतात, त्याचे चक्रही अधूनमधून दिसते. एकाच वेळी अख्खी टेकडी अर्थातच स्थलांतर करत नाही. वारा हळूहळू वाळूचे कण टेकडीच्या शिखराकडे ढकलत नेतो. शिखराचा जमिनीशी असणारा कोन पुरेसा निमुळता झाला, की मग गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाने ती टेकडी ढासळते आणि पुढे सरकते. निसर्गाची तत्त्वं माणसाच्या जगण्यातही कशी लागू पडतात, याचं हे छोटेखानी प्रात्यक्षिक अधूनमधून दिसत राहतं.

कुठे रहाल? - लास क्रुसेस किंवा अलामोगोर्डो या शहरांत अनेक हॉटेल्स उपलब्ध आहेत.

आसपास काही पाहण्याजोगे - हायवे ७० वरच असलेले रॉसवेल हे छोटे शहर तेथे सापडलेल्या तथाकथित यूएफओ साठी प्रसिद्ध आहे. आंतरराष्ट्रीय यूएफओ संग्रहालय आणि संशोधन संस्थाही या शहरात आहे.
विशेष सूचना - शेजारीच क्षेपणास्त्र चाचणी केंद्र असल्याने जवळ पासपोर्ट अथवा तत्सम कागदपत्रे बाळगल्यास उत्तम. (अनिवार्य नाही)

Carlsbad_Caverns_122307 008

लास क्रूसेसपासून साधारण दोनशे मैलांवर, न्यू मेक्सिको राज्याच्या आग्नेय कोपऱ्यात असणाऱ्या कार्ल्सबाड गुहा हा पुढचा टप्पा होता. जमिनीच्या खाली ७५० फुटांवर असलेल्या या गुहांचा शोध जेम्स व्हाईट नावाच्या सोळा वर्षांच्या काऊबॉयने १८९८ साली लावला. खूप मोठ्या प्रमाणावर वटवाघळे पाहून या ठिकाणी गुहा असावी, असा संशय त्याला आला. काही दिवसांनी मोठ्या धाडसाने एकट्याने कुऱ्हाड, दोरखंड इ. साहित्य घेऊन तो गुहेत शिरला आणि आतली चुनखडीची ती शिल्पे पाहून दिपून गेला. आता शंभराहून अधिक वर्षांनी, दरवर्षी सुमारे तीन लाख लोक या गुहांना भेट देतात.

गुहेत प्रवेश करण्यासाठी दोन मार्ग आहेत. उद्वाहकाने थेट साडेसातशे फूट खोल गुहेच्या मुख्य भागात (बिग रूम) जाता येते, किंवा नॅचरल एन्ट्रन्स मार्गाने, गुहेत आत उतरणाऱ्या पक्क्या बांधलेल्या वाटेवरून साधारण अर्ध्या तासात तुम्ही बिग रूमपर्यंत पोचू शकता. शारीरिकदृष्ट्या काही व्यंग/अडचण नसेल तर हा नैसर्गिक प्रवेशाचा मार्ग अधिक उत्तम. गुहेच्या तोंडाकडेच अर्धवर्तुळाकार ऍम्फिथिएटर आहे. मे (मेमोरिअल डे) ते ऑक्टोबरच्या दरम्यान येथे बॅट फ्लाईट शोज होतात. मावळतीच्या वेळेला एकाच वेळी चार-साडेचार लाख वटवाघळे आपला दिवस सुरू करायला बाहेर पडतात.

Carlsbad_Caverns_122307 034

ही गुहा कशी तयार झाली, तिच्या वेगवेगळ्या विभागांची नावं काय, वायुवीजनामुळे गुहेतले तपमान कसे आपोआप नियंत्रित राहते, चुनखडीचे हे वेगवेगळे आकार कसे तयार झाले, याची सचित्र माहिती, गुहेत उतरताना जागोजागी आहे. सुमारे सहा कोटी वर्षांपूर्वी, भूगर्भातील तेल आणि नैसर्गिक वायुंच्या साठ्यात सापडणार्‍या हायड्रोजन सल्फाईड वायुचा पाण्याशी संयोग होऊन तयार झालेल्या सल्फ्युरिक आम्लाची, येथे असलेल्या प्रचंड चुनखडीच्या खडकावर प्रक्रिया झाली आणि त्याचा काही भाग विरघळून आत पोकळ्या निर्माण झाल्या. लाखो वर्षे ही क्रिया सुरू राहिली. पोकळ्या मोठ्या होत गेल्या आणि आतल्या छताचा काही भागही ढासळत गेला. अलीकडच्या काळात मग चुनखडीच्या आतून पाणी झिरपून त्या खडकाचे अनेक आकर्षक आकार तयार झाले. (उदा. - सिंहाच्या शेपटीसारखा हा आकार)

या सव्वा मैलाच्या उतरंडीवर दोन्ही बाजूला मक्याच्या दाण्याइतक्या आकारापासून प्रचंड शिळेच्या आकाराचे, कमीअधिक गुंतागुंतीच्या नक्षीचे हे नैसर्गिक आकार लक्ष वेधून घेत असतात. या आकारांना सरसकट स्पीलिओथेम्स (शब्दशः ग्रीक अर्थ गुहेतले आकार/अवशेष) अशी संज्ञा असली तरी छतापासून लोंबकळारे ते स्टॅलाक्टाईट्स आणि जमिनीतून उगवून आल्यासारखे दिसणारे ते स्टॅलाग्माईट्स अशी त्यात विभागणी आहे (लक्षात ठेवायचे असेल तर स्टॅलाक्टाईट्स मधला सी सीलिंगचा आणि स्टॅलाग्माईट्समधला जी ग्राऊंडचा). काही ठिकाणी दोघांची गळाभेट झाली की अखंड कॉलम तयार होतो. बाकी आकारांप्रमाणे सोडा स्ट्रॉज, ड्रेपरीज, पॉपकॉर्न अशी वेगवेगळी नावं आहेत.

Carlsbad_Caverns_122307 064

कार्ल्सबाड गुहेचा सर्वात प्रेक्षणीय आणि लोकप्रिय भाग म्हणजे बिग रूम. एखाद्या कलादालनातून प्रदर्शन पाहत हिंडावे, इतक्या सहजतेने वेगवेगळे आकार या तासाभराच्या फेरीत समोर येतात. देवळात एखादा नक्षीदार खांब असावा तसे प्रचंड मोठे कॉलम्स, जिचा तळ दिसत नाही अशी 'आ' वासून पडलेली बॉटमलेस पिट, जायंट डोम, रॉक ऑफ एजेस सारखी मोठी खडकशिल्पे. डोक्यावर शेकडो टांगत्या तलवारी असाव्यात असे ठिकठिकाणी दिसणारे छत.

Carlsbad_Caverns_122307 056

छायाचित्रांनी किंवा शब्दांनी हा अनुभव दुसऱ्यापर्यंत पोचवणे अशक्यच. तिथली शांतता, मंद प्रकाशामुळे त्या आकारांना येणारे एक प्रकारचे गूढत्व हे सारे अनुभवण्याजोगे. बिग रूम सारख्याच स्पायडर केव्ह, किंग्ज पॅलेस, स्लॉटर कॅन्यन सारख्या रेंजर गायडेड, अर्थात उद्यान अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली ठराविक वेळी होणाऱ्या टूर्स आहेत. आम्ही नेमके ख्रिसमसच्या दोन दिवस आधी पोचल्याने, किंग्ज पॅलेसची शंभर वर्षांपूर्वी कंदीलाच्या प्रकाशात होत असे तशी सुरेख सफर करायला मिळाली. एका प्रशस्त नैसर्गिक तळघरात पोचल्यावर सारे दिवे विझवून संपूर्ण काळाकभिन्न अंधार केला गेला. एरव्ही जमिनीवर असताना कृत्रिम नसला तरी चंद्रताऱ्यांचा प्रकाश तरी असतोच. तेव्हा असा निखळ, सघन काळोख कधी 'पाहता' येत नाही. जमिनीच्या आठेकशे फूट खाली, जिथे बाहेरच्या प्रकाशाला आत काहीच मार्ग नाही; तिथे असा हा जवळजवळ स्पर्श करता येईल असा गडद अंधार, प्रकाशाचा संपूर्ण अभाव भोगणे; हा वेगळाच अनुभव होता. खानोलकरांच्या शब्दांत सांगायचे तर 'शेकडो अमावस्यांच्या जन्मस्थानी' असावा असा. संपूर्ण शुभ्रतेच्या कालच्या अनुभवचित्रांवर अधिकच गडदपणे उठून दिसणारा.

 

पुढे: पृष्ठ २