पृष्ठ २
कुठे रहाल? - कार्ल्सबाड शहर (अंतर सुमारे ४० मैल)
विशेष सूचना - मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असल्याने गुहेत खाण्यापिण्याची, प्रसाधनगृहांची उत्तम व्यवस्था आहे. रेंजर गायडेड टूर्स लोकप्रिय असल्याने आगाऊ नोंदणी केल्यास उत्तम.
उत्तरेकडं असणारं सँटा फे हे शहर न्यू मेक्सिको राज्याची राजधानी आहे. खरं तर, राजधानी असल्याचा आळ येऊ नये इतकं सुरेख आणि टुमदार. जेमतेम ७०,००० लोकवस्तीचं. समुद्रसपाटीपासून ७००० फूट उंचावर वसलेलं असल्यानं हवामान उन्हाळ्यात अतिशय सुखद. हिवाळ्यातही माफक हिमवर्षाव सोडला तर काही त्रास नाही.
मूळ प्वेब्लो जमातीच्या रेड इंडियन जमातीची वस्ती असणारे हे शहर पुढे मग स्पॅनिशांच्या अधिपत्याखाली आलं. 'सँटा फे' अर्थात पवित्र धर्म (होली फेथ) या नावाने इ.स. १६०८ मध्ये वसलेली ही राजधानी, हे आधुनिक अमेरिकेतलं तिसरं सर्वात जुनं शहर. बारा वर्षांचे प्वेब्लो जमातीचे बंड वगळता, स्पॅनिश सत्ता अबाधित राहिली ती १८२१ मध्ये मेक्सिको स्वतंत्र होईपर्यंत. मात्र नंतर पंचवीस-एक वर्षांतच तत्कालीन अमेरिकन संघराज्याशी झालेल्या युद्धानंतर आताच्या नैऋत्य अमेरिकेचा भूभाग तहाद्वारे मेक्सिकोला गमवावा लागला.
या साऱ्या उलथापालथीच्या काही खुणा अजूनही सँटा फेच्या अंगावर दिसतात.मूळ रहिवाशांची घरं अडोबी पद्धतीने - म्हणजे चिखल, माती आणि गवत यांचं मिश्रण उन्हात शेकून मग बांधलेली. मोठ्या, कडेला गोलाकार वळण दिलेल्या भिंती; धाब्यासारखे सपाट छत; अर्धवर्तुळाकार कापलेल्या आणि बांधकामाला आधार देणाऱ्या लाकडी पन्हाळी भिंतीत जागोजाग रोवलेल्या आणि साध्या पण भक्कम जाडीच्या लाकडी दारे-खिडक्या हे या बांधकामपद्धतीचं वैशिष्ट्यं. स्थानिक हवामानाच्या आणि उपलब्ध साधनांच्या दृष्टीने पाहिलं तर, आदर्श पद्धत.
या पद्धतीची तत्त्वं कायम ठेवून, काही बदल करत आपल्या शहर वसवण्याच्या परंपरेप्रमाणे स्पॅनिशांनी मुख्य चौक, चर्च आणि गव्हर्नरचे घर शहराच्या केंद्रभागी ठेवून सँटा फे नव्याने वसवले.प्वेब्लो जमातीच्या बंडानंतर शहराचा बचाव करण्यासाठी स्पॅनिशांनी मग बांधकामे अधिक भक्कम करत नेली. पुढे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला 'प्वेब्लो रिवायवल आर्किटेक्चर' नावाची शैली उदयाला आली. आज सँटा फेच्या डाऊनटाऊन विभागातील बव्हंशी इमारती याच शैलीतल्या आहेत.
इतिहास, बांधकामाची शैली याबरोबरच सँटा फे हे रसिक, कलाप्रेमी शहर म्हणूनही प्रसिद्ध आहे. एवढ्याशा शहरात अगदी शेकड्याने खायच्या जागा आहेत. कॅफे पास्कल हे साऊथवेस्टर्न आणि नूवो लॅटिनो, अर्थात दक्षिण अमेरिका खंडातले पदार्थ पेश करणारे, हे शहरातल्या उत्कृष्ट रेस्तराँपैकी एक. सदैव गर्दीने फुललेले, तरीही खिशाला परवडणारे. मोठ्या कम्युनिटी टेबलवर बसून एकत्र जेवताना, अनोळखी माणसांशीही सहज गप्पा रंगतात, क्वचित वादविवादही होतात. हा अनुभव इतर शहरांत तसा दुर्मिळच.
प्रसिद्ध चित्रकार जॉर्जिया ओ'कीफची सॅंटा फे ही अनेक वर्षे कर्मभूमी होती. तिची चित्रे गाजू लागल्यावर अनेक चित्रकार, लेखक, शिल्पकार सँटा फेच्या शांत, रम्य परिसराकडे आकृष्ट झाले. तिच्या कारकीर्दीचा आलेख मांडणारे जॉर्जिया ओ'कीफ म्युझियम तर आवर्जून भेट देण्याजोगे आहेच, पण कला, इतिहास यांना वाहिलेली अनेक संग्रहालये डाऊनटाऊनच्या त्या छोट्याशा परिसरात आहेत. रस्त्याने चालत असतानाही अवचित एखादं सुबक शिल्प दिसतं, नक्षीदार सज्जे दिसत राहतात.
सँटा फेमधला कॅन्यन रोड, हा असाच बोहेमियन रोड म्हणून प्रसिद्ध आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला चित्रांची, शिल्पांची प्रदर्शने आणि छोटी दुकाने आहेत. आमच्या सुदैवाने आम्ही ख्रिसमसच्या आदल्या दिवशी सँटा फे मध्ये होतो. त्या रात्री तो रस्ता वाहतुकीला बंद करण्यात आला होता. रस्त्यावर माणसांचे जथे गप्पा मारत, खिदळत, कुठे ख्रिसमस कॅरल्स गात फिरत होते. साऱ्या आर्ट गॅलरीज त्या रात्री उघड्या होत्या. कुठे खुद्द चित्रकारच उत्साहाने आपल्या चित्रांबद्दल सांगत होता, तर कुठे एखादा रंगीत काचेचे सुबक आकार तयार करणारा कारागीर लोकांना आपली कला दाखवत होता. सुबक शिल्पांचे प्रदर्शन, अस्सल पर्शियन गालिच्यांचे दुकान - सारी उत्सवी गर्दीने ओसंडून वाहत होती. मालक अगत्याने लोकांना आत बोलवत होते. सण असल्याने प्रत्येक ठिकाणी एगनॉग, कॉफी, कुकीज, हॉट चॉकलेट देऊन स्वागत होत होतं. या साऱ्यांत भर पडली होती ती रोषणाईची. नेहमीचे विजेचे दिवे तर होतेच, पण जोडीला मंद प्रकाशाच्या फॅरोलितांच्याही रांगा होत्या. छोट्या खाकी पिशवीत तळाशी वाळू घालून आणि मध्ये मेणबत्ती लावून तयार केलेल्या या फॅरोलिताजची रोषणाई आपल्या दिवाळीची वारंवार आठवण करून देणारी.
आसपास काही पाहण्याजोगे
-
अल्बुकर्की हे न्यू मेक्सिकोतले सर्वात मोठे शहर तासाभराच्या अंतरावर आहे. दुसऱ्या महायुद्धातले अणुबाँबनिर्मितीचे मॅनहॅटन प्रोजेक्ट जिथे घडले, ते लॉस अलामोसचे प्रसिद्ध संशोधन केंद्रही सँटा फेपासून चाळीस मैलांवर आहे, मात्र सध्याच्या सुरक्षिततेच्या उपायांमुळे तिथे प्रवेश मिळणे सहज शक्य नाही.
उत्तरेला सुमारे ७० मैलांवर टाओस नावाचे छोटे शहर आहे. तेथील स्कि रिसॉर्टबरोबरच युनेस्कोच्या पारंपरिक स्थळांच्या यादीत असलेली टाओस प्वेब्लो ही टिवा-भाषक रेड इंडियन जमातीची अजूनही वस्ती असलेली वसाहत आहे. त्यांची घरे, राहण्याची पद्धत, पारंपरिक वेष आणि नाचाच्या पद्धती येथे पाहता येतात. स्पॅनिशांच्या अंमलात सार्या जमातीचे धर्मांतर झाले आहे. तेव्हा ख्रिसमसच्या दिवशी गेल्याने त्यांचे विशेष प्रसंगीच होणारे समूहनृत्य पाहता आले.
सँटा फे ते टाओस हा रस्ता बराचसा ओसाड असला, तरी वाटेत रिओ ग्रांदे नदीचे खोरे लागते. उंचावर बांधलेल्या पुलावरून खोल घळईत दिसणारी नदी आणि बाजूच्या बर्फ भुरभुरलेल्या दर्या फार सुरेख दिसतात.
...
नेहमीच्या साचेबद्ध अमेरिकन शहरांपेक्षा न्यू मेक्सिकोचा अनुभव अगदी निराळा आहे. हिवाळ्याच्या सुट्टीत अमेरिकेतील उत्तर भाग बर्फाने गोठलेला असतो, तर कॅलिफोर्निया आणि फ्लोरिडासारख्या ठिकाणी त्यावेळी फिरायचा खर्चही अधिक असतो. (अलोट गर्दीचा भाग वेगळाच.) अशावेळी न्यू मेक्सिकोसारखी निसर्गरम्य पण थोडी दुर्लक्षलेली जागा, हा अतिशय उत्तम पर्याय होऊ शकतो.
[समाप्त]