ट्रॅव्हल्स
भाग ४
युरी गेलर ज्यासाठी प्रसिद्ध होता, तो चमचे वाकवण्याचा प्रयोग स्वतः प्रत्यक्ष केल्याचेही क्रायटनने वर्णन केले आहे. त्यात असेही म्हटले आहे की या सगळ्या सायकिक अनुभवात सुरुवातीला त्याला खूप उत्साह आणि रहस्यमयता वाटे. पण जसेजसे ते नेहमीचे, सततचे होत जाते, तसेतसे ते कंटाळवाणे होत जाते. चमचे वाकवण्याबद्दल एम आय टी ह्या संस्थेतील एका प्रोफेसरशी चर्चा करताना त्याने एका ठिकाणी म्हटले आहे, की जगातील प्रत्येक गोष्ट का घडते हे काही तो शोधायला जात नाही, ते त्याचे कर्तव्यही नाही. अनुभव घेऊन त्या अनुभवांचे वर्णन करणे व त्याचा त्याच्यावरचा परिणाम हेच त्याच्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे.
परत एकदा क्रायटन ऑरा किंवा तेजोवलय बघण्याच्या २ आठवडयांच्या सेमिनारला गेला होता. त्यातही ऑरा प्रत्यक्ष पाहिल्याचा अनुभव त्याने वर्णिलेला आहे. पण या अनुभवापेक्षा त्याला वाटणारी प्राण्यांची भिती, त्याच्या मनात उमटलेली चलबिचल, इतर लोकांचे वागणे, आणि या सर्व अनुभवांचा एकत्रितरीत्या त्याच्यावर झालेला परिणाम, या सर्वांचे वर्णन अधिक सुरस आहे. असे विविध अनुभव घेऊन तो स्वत:च स्वतःला कसा अधिक उलगडत गेला हे वर्णनही छान आहे. इथे भारतात इतके लोक ध्यान धारणा वगैरे करतात, पण सहसा कोणी असले वर्णन करताना दिसत नाही, पण या लोकांना निव्वळ दोन आठवडयातच कसे काय हे सगळे दिसू शकते अशी शंका आपल्या चिकित्सक बुद्धीमध्ये हे वाचताना उदभवल्याखेरीज राहू शकत नाही.
मात्र यापुढचा भाग सर्वसाधारणरीत्या विवेकबुद्धीचा वापर करणार्या कोणालाही न पटेल असाच आहे. अतींद्रिय प्रवाहांना प्रवाहित करायला शिकवणारा गॅरी हा क्रायटनला "एंटीटी" बद्दल सांगतो, आणि बेथ नावाच्या एका बाईच्या सहाय्याने ते क्रायटनला त्यापासून मुक्त करतात. थोडक्यात "एक्सोरसिझम " . हा सगळा लेख वाचताना पूर्वी "माझी साइन निऑन" सांगणार्या क्रायटनचे असे कसे इतके मत/हृदय-परिवर्तन झाले, असे आपल्याला वाटल्याखेरीज रहावतच नाही. पण नाही, ते त्याला सगळे पटतेच असेही नाही. पण काही काही गोष्टी आश्चर्यकारकरीत्या खर्याही ठरल्याचे त्याने सांगितले आहे. हे सगळे करून त्याच्या मनाची घडण त्या वेळी कशी होते, त्याला त्याबद्दल काय वाटते हे त्याने प्रामुख्याने मांडले आहे. आणि नंतर हा प्रसंग तो एका सायकॉलॉजिस्टला सांगतो तेव्हाची तिची प्रतिक्रियाही मनोरंजक आहे.
सगळ्यात शेवटच्या ’प्रत्यक्षानुभूती’ या लेखात या सगळ्याबाबतची क्रायटनची मनोभूमिका त्याने मांडली आहे. ती अत्यंत मनोरंजक आणि उद्बोधक आहे. आपल्याला असे वेगवेगळे अनुभव का घ्यावेसे वाटले, अलिकडे कसलाही प्रत्यक्ष अनुभव न घेता केवळ रिव्ह्यू वाचून किंवा दुसऱ्यांची मते/चर्चा वाचून लोक आपले मत कसे बनवतात याचाही उहापोह त्याने केला आहे. असे दुसर्याचे बोलणे ऐकल्याने आपली स्वतःची मनोभूमिका कशी बदलत जाते याचेही स्वतःच्या बाबतीतील प्रसंग सांगून एक सुंदर उदाहरण दिले आहे.
मात्र असा प्रत्यक्ष अनुभव घेताना किंवा काही गोष्टींकडे लक्षपूर्वक बघताना माणूस स्वतःचे आडाखे बांधून स्वतःचीच एक थीयरी कशी निर्माण करतो याबद्दल त्याने क्लॅरिज हॉटेलच्या स्टाफचे एक गमतीशीर उदाहरण दिले आहे. हे हॉटेल ग्राहकाच्या लहानसहान वैयक्तीक खोडी/बाबी लक्षात ठेवून तशी "पर्सनलाइज्ड सर्विस" देण्याबाबत प्रसिद्ध आहे. एक स्क्रीन प्ले लिहिण्यासाठी क्रायटन कित्येक आठवडे तिथे राहिलेला असतो. त्याला बरीच पाने टाईप करून , कापून एकत्र चिकटवायची असतात. टेपचे मशीन मिळत नाही आणि हाताने टेप तोडणे त्रासदायक वाटते म्हणून तो टेपचे मोठमोठे तुकडे करून ड्रॉवरच्या मुठींना चिकटवतो व लागेल तसतसे तोडून घेतो. एक वर्षाने परत त्याच हॉटेलमध्ये गेला असता त्याच्या खोलीच्या ड्रॉवरना आणि त्यांच्या मुठींना तसेच टेपचे लांब लांब तुकडे चिकटवलेले त्याला आढळतात. आधी त्याच्या लक्षात येत नाही, पण मग डोक्यात प्रकाश पडल्यावर "या हॉटेलच्या नोकरवर्गाने आपल्याबद्दल काय समज करून घेतला आहे" याचे त्याला हसू येते.
असे काही होऊ नये म्हणून या लेखात क्रायटनने चक्क आवाहन केले आहे : अंतर्प्रवास करताना केवळ तो किंवा दुसरे कोणी काही म्हणत आहे म्हणून तुम्ही चक्र, ऑरा, शक्ती यावर विश्वास ठेऊ नका, तर अगदी चिकित्सक बुद्धीने स्वतःच अनुभवून बघा. आणि तसे करण्याबाबत बर्याच उपयुक्त सुचनाही त्याने दिल्या आहेत. सगळ्यात शेवटी तो पॉल मॅक्क्रेडो नावाच्या एका एरॉनॉटिकल एंजीनीयरला भेटतो. अनेक खास शोध लावलेल्या या पॉलचे मत पॅरानॉर्मल, सायकिक हे सगळे भोंदू, खोटे आहे असे असते. तसा मायकेलचाही हस्तरेखाशास्त्र, ज्योतिष, उडत्या तबकडया असल्या बर्याच गोष्टींवर विश्वास नसतोच. पण त्याला खटकणारी मोठठी बाब म्हणजे हे लोक कशालाही विरोध करताना दुसऱ्यांवर गलिच्छ आरोप करायलाही मागेपुढे पहात नाहीत, त्यांचा रोखही जास्त व्यक्तिगत असतो. ज्या विरोधी निबंधात तत्वज्ञान किंवा बुद्धी यावर जोर दिसत नाहीत त्यात क्रायटनला रस नव्हता. चर्चेत पॉल त्याला सांगतो की तो "कमीटी फॉर द सायंटिफिक इन्वेस्टिगेशन ऑफ क्लेम्स फॉर पॅरानॉर्मल" याचा सदस्य आहे. या कमिटीसमोर येऊन मायकेलने भाषण करावे. त्यासाठी मायकेल बरीच उदाहरणे घेऊन एक मोठ्ठे भाषण तयार करतो. सायन्समधेही फ्रॉड कसे असतात, प्रत्येक नवा शोध लागताना तो आधी मान्य कसा होत नाही, आता लागलेले शोध आणि उदो उदो झालेल्या कल्पना कधी कधी कालांतराने कालबाह्य कशा ठरतात, फ्रॉईड आणि युंग यांच्या विचारसरणीतील फरक, आर्ट आणि सायन्स यांच्या विचारसरणीतील फरक, कोणताही विचार मांडताना तो असंख्य पातळीवरून कसा वेगळा ठरू शकतो असले अनेक मुद्दे घेऊन भले जंगी भाषण करतो. त्यात सर्वात अखेरचे वाक्य असे आहे की हे सगळे तयार करून त्याला त्या कमिटीकडून आमंत्रणच येत नाही त्यामुळे तो ते भाषण देऊच शकत नाही.
हा सगळा झाला क्रायटनचा प्रवास, आयुष्याचा, अनुभवांचा, मानसिकतेचा, अन्तर्विश्वाचा! आणि स्वतःच स्वतःला घडवण्याचा देखील. थोडेसे भलत्याच वळणावरून जाणारे पुस्तक पण वेधक ठरते ते मुद्दाम जाणीवपूर्वक ठरवून घेतलेल्या अनुभवामुळे. त्या अनुभवातील वैविध्य-वैचित्र्यामुळे आणि क्रायटनच्या विचक्षण बुद्धीमत्ता-संवेदनाशीलता यांमुळे. त्याचे सर्व गोष्टींना सदैव सामोरे जाणारे मन, चौफेर विचार करण्याची क्षमता, स्वतःचे चुकले हे प्रामाणिकपणे कबूल करण्याची वृत्ती यामुळे हे पुस्तक नुसतेच चित्तवेधक न ठरता वाचनीय आणि आगळेवेगळेही ठरते.
हे असे अनुभव आहेत की आपल्यासारखे मध्यमवर्गीय लोक सहजासहजी घेऊ शकणार नाहीत. पैसे, वेळ, विवेकबुद्धी, लोकलज्जा असल्या शेकडो गोष्टी आपण असे अनुभव घ्यायला गेलो तर आड येतील. त्यामुळे क्रायटनने कितीही प्रत्यक्षानुभूती घ्या असे कळकळीने सांगितले तरी आपल्याला मात्र पुस्तक वाचूनच असल्या वेगळ्याच विश्वांची त्याचे शब्द हेच प्रमाण मानून आस्वाद आणि अनुभूती घ्यावी लागते. सतत प्रत्यक्षानुभूतीचा सल्ला देणारा क्रायटन स्वत: मात्र या भन्नाट पुस्तकात आपल्याला अप्रत्यक्षपणे विविध अनुभवांनी आणि त्यावरच्या मार्मिक आणि सखोल भाष्यांनी समृद्ध करतो.
समाप्त.
उमा पत्की मुंबईत वास्तव्यास असून गेली २६ वर्षे व्यवसाय करीत आहेत. त्यांना वाचनाची आणि क्वचित लेखनाची आवड आहे.