ट्रॅव्हल्स

भाग ३

क्रायटन आणि त्याची पत्नी लॉरेन इस्ट आफ्रिकेत गेले असतानाच्या त्याच्या आठवणी विलक्षण आहेत. तिथे त्याला दोन सांबरू जातीच्या बायका भेटल्या होत्या. ही जमात थोडीफार भटकी. डोकी भादरलेली, कान टोचलेले, कानाच्या पाळ्यांची भोके एकदम ताणून मोठठी झालेली, चेहेर्‍यावर व अंगावर सर्वत्र माशा व त्या उडवायची तसदीही घेत नसलेल्या अशा या बायका होत्या. क्रायटन त्यांच्याकडे त्या स्त्रिया आहेत या नजरेने बघायचा प्रयत्न करतो पण त्यात त्याला यश येत नाही. आपल्यात फार मोठी दरी आहे हे त्याला जाणवते आणि आपण या बायकांकडे साधे मनुष्यप्राणी म्हणूनही बघू शकत नाही ही खंत त्याला भासते. एके काळी मानववंश शास्त्र शिकलेले आपण असे दुसर्‍याकडे माणूस म्हणूनही बघू शकत नाही याची जाणीव त्याला भयप्रद वाटली. यात त्याने लिहिले आहे की आपण असा वेगळाच विचार करत असतो तेव्हा आपल्याला पटकन वाटते की हे समोरच्याच्या लक्षात येईल का, की आपण त्याच्याविषयी असा काही विचार करतो आहे ते. पण इथे तसंही काही घडले नाही कारण या बायका मनुष्यप्राणीच नाहीत असे वाटत होते. त्यातच पुढे मसाई मुली अगदी हसत खिदळत फिरायला, मजा करायला जावे तसे, क्लिटोरोडेक्टोमी करून घ्यायला (शिश्निका कापून घ्यायला) चाललेल्या असतात तो ही एक प्रसंग आहे. ती क्रायटन आणि त्याच्या बायकोसाठी अगदी नवलाईची गोष्ट असते. पुढे हे दोघे खाण्यासाठी थांबतात तेव्हा एक मसाई मुलगा जवळ येतो त्याला ते एक सॅंडविच देतात. दुसरा एक मुलगा धावत येतो आणि क्रायटन स्वतःशीच चरफडून स्वत:ला नको असलेले सॅंडविच त्याला देऊ या म्हणून शोधू लागतो तेवढ्यात पहिला मुलगा स्वतःचे अर्धे तोडून दुसऱ्याच्या हातात ठेवतो आणि क्रायटनला स्वत:चीच लाज वाटते. हळू हळू बरीच मुले गोळा होतात, त्याला सर्व बाजूंनी न्याहाळून त्याच्या चड्डीखालून वर बघायचा प्रयत्न करून कुजबुजू लागतात. थोडया वेळाने क्रायटनच्या ध्यानी येतं, तो खूप उंच ( जवळ जवळ ६ फूट ९ इंच ) असल्याने त्याचे बाकी सर्व अवयव प्रमाणबद्ध आहेत की नाहीत हे ते पहात असल्याचे. आणि त्याच वेळी त्याच्या ध्यानी येते की जसे त्याच्या मनात त्या सांबरू बायकांबद्दल त्या माणसेच नाहीत असे विचार होते तसेच काहीसे विचार या मुलांच्या मनात त्याच्या विषयी आहेत.

डोकी भादरलेली, कान टोचलेले, कानाच्या पाळ्यांची भोके एकदम ताणून मोठठी झालेली, चेहेर्‍यावर व अंगावर सर्वत्र माशा व त्या उडवायची तसदीही घेत नसलेल्या अशा या बायका होत्या. क्रायटन त्यांच्याकडे त्या स्त्रिया आहेत या नजरेने बघायचा प्रयत्न करतो पण त्यात त्याला यश येत नाही. आपल्यात फार मोठी दरी आहे हे त्याला जाणवते आणि आपण या बायकांकडे साधे मनुष्यप्राणी म्हणूनही बघू शकत नाही ही खंत त्याला भासते.

या नंतरचा भाग गोरिलांवर आहे. बहुतेक काँगो ही कादंबरी लिहिण्यासाठी त्याने हा प्रत्यक्ष अनुभव घेतला असावा. निकोल नावाची बेल्जीयन झूऑलॉजिस्ट त्याला सांगते की मी गोरिलांचा अभ्यास करणार नाही कारण ते माणूस असतात. त्याला वाटते की तिला नीटसे इंग्लिश बोलता येत नाही म्हणून ती असे म्हणतेय. गोरिलांचे निरिक्षण करताना ४०० पौंडांचा गोरिला त्याच्या अंगावर धावून येतो तेव्हा कशी घाबरगुंडी उडते आणि कसे आणि किती धैर्य एकवटावे लागते हे ही छान सांगितले आहे. पण शेवटी गोरिलांची एकंदरीत वागणूक बघून त्याला निकोल म्हणत असते ते पटतेच.

१९८२ साली क्रायटन कॅलिफोर्नियात इन्स्टिटयुट ऑफ मेंटलफिजिक्स या संस्थेत ब्रू जॉन या डॉक्टरने घेतलेल्या एका जवळ जवळ २ आठवडयांच्या कॉन्फरन्सला गेला होता. ब्रू जॉन्स हा डॉक्टर जॉन्स हॉपकिन्स व मेयो क्लिनिक अशा नामवंत हॉस्पिटलमध्ये ट्रेनिंग घेतलेला डॉक्टर, पण हळू हळू ध्यान धारणा, व्यक्तिमत्त्व विकास अशांकडे वळलेला. राम दासचे पुस्तक वाचल्यापासून क्रायटनला स्वत: अशा स्वरूपाचे अनुभव घेउन पहाण्याची इच्छा होतीच. एडविन डिंगल, जे १९२० साली तिबेट इथे जाऊन आयुष्य जगण्याची बिनचूक पध्दत शिकून आले होते, त्यांनी स्थापन केलेली ही संस्था होती. या सेमिनारमध्ये एकूण ४० लोक होते व त्यातले बरेचसे डॉक्टर व सायकॉलॉजिस्ट होते. तिथल्या वेगवेगळ्या पद्धती आणि प्रयोग अनुभवून ते करताना क्रायटनने काढलेले निष्कर्ष अधिक महत्त्वपूर्ण आहेत. एक तर त्यांना चाकोरीत कधीही बसवले गेले नाही. रोज असेच होईल अशी अपेक्षा निर्माण होता होता वेगळेच काही घडे. यातल्या विविध प्रयोगात एखादी वस्तू आपला गुरु म्हणून शोधून त्याच्याशी संवाद साधणे - यात तो स्वत: एक निवडुंग निवडतो - आपल्या विवेकी बुद्धीला हे सगळे वाचताना शुद्ध वेडेपणा आहे असेच वाटते, तरीही क्रायटनने केलेले वर्णन, त्याला आलेले भासमय अनुभव आणि त्याचा त्याच्या जीवनावर झालेला परिणाम वाचनीयच आहे. एकमेकांविषयी काय वाटते ते सांगणे, तेजोवलय अनुभवणे, हे सगळे एखाद्या सायकेडेलिक अनुभवासारखेच (मेंदूवर परिणाम करणारी औषधे घेऊन विविधरंगी भासमय दृश्ये पहाण्यासारखेच) होते असे त्याने म्हटले आहे. एकमेकांना शक्ती पास करणे (रेकीसारखे) या सगळ्यांचे अनुभव त्याने सविस्तर वर्णन केले आहेत. त्याला स्वतःला हाताला तेजोवलय जाणवू लागते पण त्याचा त्यावर विश्वास बसत नाही. पण दुसर्‍या एका सायकिअट्रिस्टला ते दिसत असते, तिच्या सहायाने तो खात्री करून घेतो - आणि मग त्याचा विश्वास बसतो. क्रायटनसारखा सुशिक्षित, बुद्धीवान, ख्यातनाम लेखक व दिग्दर्शकच हे सगळे वर्णन करतो आहे, त्यामुळे त्यावर विश्वास ठेऊन ते वाचावेस वाटते. अर्थात आपल्याही मनात काही शंका डोकावल्यावाचून रहात नाहीत. पण नुसतेच हे वर्णन नाही तर तो स्वत:च स्वत:ला अधिकाधिक कळत कसा गेला, तिथे २ दिवसांचा उपास होता, त्याने तिथे किती किटकिट केली, धूसफूस केली, कसा रडला हे ही त्याने निःसंदिग्ध शब्दात लिहिले आहे. शेवटी प्रत्येकातच काही न काही दोष असतात, तेव्हा स्वत:शी फार कठोरपणे वागू नये, स्वतःच्या मता-श्रद्धांनी स्वतःलाच फार दु:खी करून घेऊ नये, हा ही सल्ला आहेच. चक्र, टॅरो कार्ड, ई चिंग या सगळ्यांचा प्रयोग व त्यावर भाष्य आहे. टॅरो कार्ड मुळे कुठलीही परिस्थिती नानाविधपणे, सर्व बाजूंनी पहायला शिकवले गेले, असे त्याने म्हटले आहे. ई चिंगमध्ये तर त्या पुस्तकात कसलीही शक्ती नाही, तुमचे अव्यक्त मनच तुम्हाला हवे ते उत्तर देते. यामुळेच कार्ल युंग आणि जॉन ब्लोफेल्ड सारखे पंडित या उत्तरांकडे आकर्षले गेले, असे त्याने म्हटले आहे. मात्र हे दोन आठवडे संपता संपता त्याला तिथून निघण्याचे व एक बिग मॅक खाण्याचे वेध लागतात. तिथून निघाल्यावर मॅकडोनाल्ड काही दिसत नाही पण तत्सम दुसर्‍या दुकानात जाऊन तो बर्गर वगैरे मागवतो, पण प्रत्यक्ष समोर आल्यावर काही खाऊ शकत नाही. किंबहुना ते नकोच होते असे त्याला वाटते. घरी परत आल्यावर आपले घर किती विलक्षण सुंदर आहे, आणि आतापर्यंत त्या सौंदर्याकडे दुर्लक्ष करून आपण किती तक्रारी करत होतो हे त्याला जाणवते. ध्यान केल्यामुळे सतत हलणार्‍या कॉम्प्युटर स्क्रीनचा किती त्रास होतो हे ही लक्षात येते. प्रथम त्याला वाटते की आपल्यात काहीच लक्षणीय सुधारणा झालेली नाही, काहीच लाभ नाही, आपण फक्त आधुनिक नव्या युगातले, मोठया माणसांचे उन्हाळी शिबीर करून आलो आहोत. पण खूप कालावधी लोटल्यावर मागे वळून पहाताना त्याला जाणवते की त्या काळात त्याच्या आयुष्यात अतोनात बदल घडले. किंबहुना आयुष्यात जे जे बदलू शकते ते सगळेच तेव्हा बदलले. तो त्यातच बुडलेला असल्याने त्याला ते जाणवले नाही इतकेच. आणि दुसरा एक महत्त्वाचा बदल म्हणजे तो जिथे जिथे रहायचा तिथे तिथे तो एक निवडुंग जवळ बाळगू लागला.

१९८२ मध्ये तिसर्‍या बायकोबरोबरचे, टेरीबरोबरचे नातेसंबंध जवळ जवळ संपुष्टातच आले असताना तिच्याबरोबर तो जमैकाचा एक दौरा करतो. त्यात एक म्युझीयम बघायला जात असताना एक खुनीच त्यांच्या गाडीत गाईड म्हणून चढतो. तो सगळा प्रसंगच चित्तथरारक आहे. त्याला चुकवायचा प्रयत्न करूनही तो जात नाही. त्या वेळी क्रायटनने अगदी स्पष्ट म्हटले आहे की फक्त सिनेमातच लोकांनी उडी मारून कारमध्ये बसणे आणि अशा गुंडाला गुंगारा देणे हे होऊ शकते, खर्‍या आयुष्यात असे काही घडू शकत नाही. त्यावरून त्याचे टेरीशी भांडणही होते. मात्र नंतर ते दोघेही त्या प्रसंगात असे का वागले याचे विश्लेषण त्याने स्वत: केले आहे. स्वत:मधले, स्वतःच्या वागण्यातले दोषही मान्य केले आहेत. एवढे सगळे होऊनही त्याचे आणि टेरीचे संबंध , दोघांची इच्छा असूनही तुटता तुटत नाहीत. चिडचिड होतच रहाते. अखेर दोघे मेक्सिकोला एका छोट्या ट्रिपसाठी गेले असता, मानसिक दृष्टया तो स्वत:ला वेगळे करतो. ती असमाधानी, दुःखी (अनहॅपी) असतानाही प्रयत्नपूर्वक तो स्वत:चा मूड चांगला ठेवतो. अखेर एकदा ध्यानात बसलेला असताना, मन अतीव शांततेने भरून गेलेले असताना त्याला ती एखाद्या वेगळ्याच माणसासारखी भासते. त्याच क्षणी तिलाही त्याच्या चेहऱ्यावर काय दिसते कोणास ठाऊक, पण तिथेच त्यांचे संबंध पूर्णतया मिटतात.

त्याच्या एका मैत्रीणीचे ऐकून क्रायटन लिंडा नावाच्या एका ध्यान करणार्‍या बाईला भेटायला जातो. त्याने असे ऐकलेले असते की ती ध्यानात रंग बदलते, तिच्या शरीराचा आकार बदलतो. त्याला खराच तसा अनुभवही येतो. पण त्या अनुभवापेक्षाही क्रायटनची त्या अनुभवाकडे पहाण्याची दृष्टी - अशा तर्‍हेच्या सिद्धींची फक्त एक साइड इफेक्ट म्हणून वर्णन करणे, आणि ती तिचे जीवन कशा तर्‍हेने जगते आहे हे समजून घेणे अधिक मोलाचे ठरवणे - यातून त्याचा स्वतःच्या जीवनाविषयीचा दृष्टीकोनही आपल्यासमोर उलगडत जातो.

क्रायटनची संवेदनशीलता आणि अनुभव टिपण्यातील सूक्ष्मता आणि तरलता कमालीची आहे. तसेच अनुभवग्रहणात मुद्दामहून आणलेली आणि सहज योगायोगाने आलेली विविधताही अफाटच आहे.

मध्येच एका ’दे’ नावाच्या लेखात एक विचारवर्तुळही पूरे झालेले दिसते. आपण नेहमी पुरुषांनी स्त्रियांचा उपयोग/वापर करून घेतला असे जे वाचतो, तसाच क्रायटनला एकदा स्त्रीने त्याचा वापर करून घेतल्याचा अनुभव येतो. त्या संदर्भात स्त्रियांचा बराच अनुभव असलेल्या एका मित्राशी चर्चा करत असताना तो मित्र त्याला पटवून देतो की स्त्रिया पुरुषांपेक्षा कशा वेगळ्या असतात, आणि आता स्त्री आणि पुरुष हे रोल कसे बदलून गेलेले आहेत, भूमिकांची कशी अदलाबदल झालेली आहे. क्रायटनने या सर्वांचे वर्णनही मजेदार केले आहे. शिवाय स्वत: ऐकलेले काही उद्गार, बघितलेली काही दृश्ये यांनी ते खुलवलेही आहे. त्यातच मध्ये एकदा एका डिनर पार्टीत लोक स्वत:कडे कसलीही जबाबदारी न घेता "त्यां"नी अमुक चूक केले, "त्यां"नी तसेच केले, "ते" असेच करतात असे ऐकून ऐकून तो कंटाळून एक उपदेशपर भाषण ठोकतो. हे असे सतत म्हणण्यापेक्षा आणि "त्यां"ना दोष देण्यापेक्षा आपण त्यातला भाग घेतला पाहिजे. पण अखेरशेवटी खूप विचारमंथन करकरून तो याच निष्कर्षाला येतो की स्त्री आणि पुरुष असा भेदभाव न करताच आपण सगळ्यांचा विचार केला पाहिजे. शेवटी दोघे सारखेच. यात स्वत:च्या झालेल्या चुकांचेही तो मन:पूर्वक विश्लेषण करतो आणि यातच त्याचे एक विचार वर्तुळ पूर्ण होते.

यानंतर लगेचच अगदी वेगळे अनुभव व त्या प्रसंगांचे वर्णन येते. न्यु गीनेतील टोळ्यांमधे रहाणाऱ्या लोकांचे. त्याची सुरुवातच मुळी त्या जमातीच्या मुख्याच्या बायकोने स्वत:चे बोट कापून टाकण्याने होते. क्रायटनची संवेदनशीलता आणि अनुभव टिपण्यातील सूक्ष्मता आणि तरलता कमालीची आहे. तसेच अनुभवग्रहणात मुद्दामहून आणलेली आणि सहज योगायोगाने आलेली विविधताही अफाटच आहे. आदल्याच दिवशी तो शांग्रिला नावाच्या सिंगापूरमधल्या हॉटेलमध्ये होता. तिथे इंटरनॅशनल डेटलाईन ओलांडून प्रवासी येत म्हणून दररोज हॉटेलच्या कार्पेटवर दिवस लिहिलेला असायचा. जगातील सर्व ठिकाणची वेळ दाखवणारी डिजीटल घडयाळे होती. दुसर्‍याच दिवशी तो अशा ठिकाणी होता जिथे लोकांना त्यांचे वयसुद्धा माहिती नव्हते आणि वेळेची तर कसलीच फिकीर नव्हती. तिथल्या संस्कृतीची ओळख करून घेत घेत तिथल्या टोळीयुद्धाची , त्या टोळीतील लोकांच्या कौशल्याची वर्णने करत करत क्रायटन जगातील संस्कृतीतील विभिन्नता सहजरीत्या डोळ्यासमोर आणतो.

 

पुढे: पृष्ठ ४