ट्रॅव्हल्स
भाग १
"ज्युरासिक पार्क" या स्टीवन स्पिलबर्गने दिग्दर्शित केलेल्या सुप्रसिद्ध सिनेमामुळे मूळ कथालेखक मायकेल क्रायटनचे नाव सर्वांना माहीत आहे. अर्थात ज्युरासिक पार्क सोडून "काँगो", "द लॉस्ट वर्ल्ड", "द ग्रेट ट्रेन रॉबरी" अशा अनेक प्रसिध्द पुस्तकांचाही तो जनक आहेच. अधूनमधून अति विश्लेषण, खूप शास्त्राधारित माहिती-स्पष्टीकरणे लिहिल्यामुळे क्रायटनची पुस्तके वाचणे माझ्यासारख्या सामान्य ( म्हणजे शास्त्रात विशेष गती नसलेल्या ) वाचकाला रटाळ वाटू शकते. परंतु मूळ कथानकाचा गाभा आणि शैली अतिशय चित्ताकर्षक, नावीन्यपूर्ण असल्याने पुस्तक पटकन बाजूला ठेवले जात नाही. काँगोसारख्या कादंबर्या तर दोनदोनदा वाचूनही समाधान होत नाही, एवढया चित्तथरारक आहेत. एकदा एखादा लेखक आवडला की त्याची मिळतील ती सारी पुस्तके वाचून काढायची, ही माझी पद्धत - त्यामुळे त्याचे "ट्रॅव्हल्स" हे पुस्तक दिसताच ते तत्काळ घेतले गेले. त्यात नक्की काय आहे हे माहीत नसतानाही. अर्थात ते काही कथा-कादंबर्या अशात मोडणारे नव्हते हे घेताना समजले होतेच.
वाचायला सुरुवात केली आणि क्रायटन थोडाफार उलगडत गेला. त्याच्याबद्दल चक्क विस्मय वाटू लागला. विस्मयाबरोबरच त्याच्या अफाट, समृद्ध अशा अनुभव विश्वाबद्दल किंचित असूया, आणि त्याच्या विचारशक्तीबद्दल, प्रत्येक गोष्ट सुव्यवस्थितरीत्या शब्दात उतरवण्याच्या त्याच्या हातोटीबद्दल, रोखठोक तरीही नर्मविनोदी डूब असलेल्या त्याच्या शैलीबद्दल आदर, अशा संमिश्र भावनांचा कल्लोळ मनात उमटू लागला. एक नाही, दोन नाही चक्क तीन वेळा पुस्तक वाचून काढले. ज्याला त्याला सांगत तर सुटलेच परंतु त्याबद्दल लिहावेसेही वाटले.
याला जरी "ट्रॅव्हल्स" असे नाव असले तरी यात बहुतेक चित्रण हे क्रायटनला आलेल्या किंवा त्याने मुद्दाम घेतलेल्या, जीवनातील बहुविध अनुभवांचेच आहे. तसा त्याने अगदी विविध आणि चित्रविचित्र ठिकाणचाही प्रवास केला होता, परंतु या "ट्रॅव्हल्स" मध्ये बाह्य प्रवासाच्या अनुषंगाने त्याचा जो आंतरिक प्रवास झाला, त्यावर अधिक प्रकाश टाकला गेलाय. किंबहुना या पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्याने म्हटलेच आहे -
"प्रत्यक्षानुभव" हाच सर्वात बहुमूल्य अनुभव आहे. आपल्यावर सतत मतांचा, तत्त्वांचा आणि विविध माहितीचा इतका वर्षाव होत असतो की नैसर्गिक इंद्रियांद्वारा मिळणारी प्रत्यक्षानुभूती आपण विसरत चाललो आहोत. त्यामुळे आपण खरे कोण आहोत, आपले आयुष्य कशासाठी आहे, हेच सर्वजण विसरून जातात.
या पुस्तकात जवळजवळ पहिल्या अर्ध्या भागात क्रायटनने आपल्या शिक्षणाबद्दल लिहिले आहे. तो चक्क वैद्यकीय डॉक्टर होता. सुरुवातीला त्याला हार्वर्डमध्ये जाऊन लेखक होण्याची इच्छा होती. तसा त्याने प्रवेश घेतलाही होता. परंतु त्याच्या लेखनकौशल्यावर तिथे टीकाच केली गेली व दर वेळी त्याला "C" किंवा "C+" असेच शेरे मिळत. मग एकदा भीत भीत त्याने "जॉर्ज ऑरवेल" चा निबंधच स्वत:च्या नावाने देऊन बघितला. पण त्यालाही "B-" शेरा मिळाल्यावर त्याने तो नाद सोडून "मानववंशशास्त्र" (ऍंथ्रॉपॉलॉजी ) शिकायचे ठरवले. त्याचीही खात्री न वाटून त्याने वैद्यकपूर्व प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम सुरू केला. वैद्यकशास्त्र हे रोग्यांची काळजी घेणारे आहे. शिवाय शास्त्रीय बैठक तर आहेच. तेव्हा ते अगदी आखीव, बांधीव असे नसेल तर लवचिक, खुल्या दिलाचे असेल, आणि अशा प्रकारे काम करणे मनोरंजक ठरेल असे वाटून त्याने तिथे प्रवेश घेतला. अर्थात हे सर्व अगदी सरळसोट घडलेले नाही. त्या आधी तो एक वर्ष युरोपातही राहून शिकून आला होता. परंतु, "ट्रॅव्हल्स" हे काही ओळीने लिहिलेले आत्मचरित्र नसल्याने कुठलाही भाग सलग असा आलेला नाही. मध्येच कधीतरी त्याने केंब्रिज युनिवर्सिटीत शिकवल्याचाही उल्लेख आलेला आहे.
त्याचे बालपण बघता त्याचे वडील हे पत्रकार होते. क्रायटन अगदी लहान असताना , म्हणजे १३/ १४ वर्षांचा असतानाच, त्याच्या आईवडिलांच्या उत्तेजनाने त्याने छोटया-छोटया कथा, प्रवासवर्णने इत्यादी साहित्य न्युयॉर्क टाइम्ससारख्या वृतपत्रांना पाठवलेले होते, व ते प्रसिद्धही झालेले होते. कॉलेजमध्ये असतानाही तो लेखन करतच होता. एवढेच नव्हे तर वैद्यकीय शिक्षणाचा खर्च ही त्याने रहस्यमय कादंबर्या लिहून भागवला.
यातच एक गंमत म्हणजे त्याने अशीच एक कादंबरी टोपण नावाने लिहिली. ( अ केस ऑफ नीड ) ती हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील काही लोकांवर व घटनांवर आधारित होती. तिला सर्वोत्तम रहस्यकथा म्हणून "एड्गर" पारितोषिक मिळाले. इथपर्यंत सगळी गंमतच होती. परंतु बक्षीस जाहीर झाल्यावर क्रायटन हादरला. ते घ्यायला जाणार कोण आणि कसे ? त्याचे नाव पुढे आले असते तर सर्वांनाच समजले असते. कारण "हार्वर्डची इतकी बारकाईने माहिती आहे असा कॉलेजमध्ये हा कोण लेखक" असल्या चर्चेतही त्याने हिरिरीने भाग घेतलेला होता.
वॉर्डात अपघातग्रस्त बघितल्यावर, सर्जरी बघताना किंवा पेशंटच्या अंगातून रक्त काढताना तो चक्कर येऊन पडत असे. हे बदलायलाच हवेय हे त्याला समजले. पेशंटविषयी योग्य तेवढी सहानुभूती बाळगणे पण त्याच वेळी त्याच्याविषयीच्या कणवेने भारावून न जाणे यातला समतोल ज्याला साधतो तोच उत्तम डॉक्टर होऊ शकतो हे त्याला उमगले. आणि बर्याच कालावधीनंतर त्याला हे समजले की डॉक्टरच्या ज्ञानाइतकेच, तो पेशंटशी कसा वागतो हेही महत्त्वाचे आहे. हे जाणवले तेव्हा त्याला अजून पुढे कळायचे होते की त्याच्या या विषयातील तक्रारी या डॉक्टरांच्या ज्ञानाविषयी नसून त्यांच्या रुग्णाविषयी ते जो भावनिक पवित्रा ( ऍटीट्युड ) घेत, त्याबद्दलच असणार होत्या . हळू हळू चार वर्षे वैद्यकाच्या शिक्षणात गेल्यावर त्याला समजले की कोणीही त्यांना मरणोन्मुख पेशंटबद्दल, अगदी अनौपचारीक रीत्या सुद्धा काहीही सांगत नव्हते. जेव्हा एखादा मृत्यू जवळ येई तेव्हा त्या व्यक्तीला काय हवे, काय नको, किंवा तो कशा परिस्थितीतून जातो आहे, याची कोणीच दखल घेत नसे. एवढेच नव्हे तर त्याला तपासणार्या, औषधोपचार देणार्या या डॉक्टरांना जे काय वाटत असे, भीती म्हणा, असहायता म्हणा, अपयशाची भावना म्हणा, त्याकडेही कोणाचे लक्ष नसे. आणि अर्थातच त्या वेळी अशा पेशंटशी वागताना, बोलताना क्रायटनला स्वतःचीच चिंता अधिक वाटत असे, हे त्याने प्रामाणिकपणे सांगितले आहेच.
पेशंटचे रक्त तपासणीसाठी काढून घेणे हे क्रायटनसाठी अवघडच काम होते. कारण त्याला रक्त बघूनच चक्कर येत असे. कसेबसे रक्त काढून खिडकी उघडून ताजी मोकळी हवा घेणे त्याला आवश्यक वाटे, आणि त्यामुळे थंडी वाजे म्हणून बाकीचे पेशंट आरडाओरडा करत. अखेरीस त्याला स्वतःचेच नव्हे तर शेजारच्या पेशंटचेही रक्त अगदी सफाईदार रीत्या काढून देणारा एकजण भेटला. पुढे त्याला समजले की तो चक्क एक "व्यसनाधीन" ( "ड्रग ऍडिक्ट" ) रुग्ण होता. मानसोपचार, प्रसूती (सायकिऍट्री, डिलीवरी) इत्यादी वेगवेगळ्या वॉर्डातील अनुभवाबद्दलची, तिथल्या कारभाराबद्दलची त्याची वर्णने मुळातूनच वाचण्यासारखी आहेत. केवळ वर्णनेच नव्हे, तर त्यावरची मार्मिक टिप्पणी सुद्धा.
मेडिकलच्या शेवटच्या वर्षात येईपर्यंत ते सोडून देण्याचा त्याचा निर्णय अगदी पक्का झाला होता. म्हणून त्याला त्या वर्षांचा अधिकाधिक फायदा करून घ्यायचा होता. त्या वेळी इंटर्नल मेडिसीन हॉस्पिटलमध्ये २/३ हून अधिक पेशंट हार्ट ऍटॅकने आजारी होते. क्रायटनने पूर्वी, १९३० मधे आल्प्समध्ये प्रॅक्टिस करत असलेल्या एका स्विस डॉक्टरचे अनुभव वाचले होते. त्यात त्याने लिहिले होते की स्कीईंग करताना पाय कसा मोडला, अपघात कसा झाला याचे उत्तर जवळजवळ सगळ्यांनी स्कीईंगमधले कोणतेही कारण न देता मानसशास्त्रीय कारण दिले होते. त्याच धर्तीवर क्रायटनने या हार्ट ऍटॅकच्या पेशंटना, "तुम्हाला हार्ट ऍटॅक का आला ?" असे विचारायला सुरुवात केली. जवळजवळ सर्वांची उत्तरे त्याला मानसिक कारणावरच आधारित आढळली. तेव्हा बरेचसे आजार हे मानसिक दृष्टिकोणातील बदलानुसार शरीराची प्रतिकारक्षमता कमी झाल्याने होतात असे त्याला वाटू लागले. मात्र १९६० या कालखंडात याची फार कोणी गांभीर्याने दखल घेईल अशी परिस्थिती नव्हती. याबाबत क्रायटन चीफ ऑफ मेडीसीनशी बोलला असता, त्यानेही क्रायटनच्या अनुमानाबद्दल सहमती दाखवली, पण तरी त्याचे म्हणणे असे होते की शारिरिक आणि मानसिक दोन्ही गोष्टी बघणे महत्त्वाचे आहे. जरी कारण मानसिक असले तरी एकदा का हार्ट ऍटॅक येऊन हृदयाचे स्नायू दुखावले की त्यावर औषधोपचार केले पाहिजेत. परंतु क्रायटनचे असे म्हणणे होते की जर मानसिक अवस्थेने हार्ट ऍटॅक येत असेल, तर त्या हृदयाची दुरुस्तीही मानसिक प्रक्रियेनेच झाली पाहिजे. निदान त्या दृष्टीने आपण पेशंटला प्रोत्साहन दिले पाहिजे. या घटनेनंतर कैक वर्षांनी - वैद्यक सोडूनही कित्येक वर्षांनी - क्रायटनला एक त्याला पटेल असा दृष्टिकोन आढळला, की मनुष्याला होणारे आजार हे स्वनिर्मितच असतात आणि त्याची जबाबदारी ही सर्वस्वी त्या मनुष्यावरच असते. मग त्याला असेही वाटले की जर जबाबदारी स्वतःवरच असेल तर आपण त्या परिस्थितीवर अधिकारही गाजवायला हवा, म्हणजे भीती कमी होऊन बरे होण्यासाठी काहीतरी प्रयत्नही सुरू होतील. एखाद्या डॉक्टरची खरी भूमिका काय हे लक्षात ठेवायला हवे. डॉक्टर हा कोणी जादूगार नाही, तो फक्त एक तज्ज्ञ सल्लागार आहे.
तसा हे मेडिकल शिक्षण सोडून देण्याचा त्याचा विचार अगदी प्रथम वर्षापासूनच चालू झालेला होता. पण सायकॉलॉजिस्टशी बोलून त्याने अजून थोडी वाट पहायची ठरवली. आणि असेच प्रत्येक वर्षी होत होत अखेर शेवटी ४/५ वर्षांचा कोर्स पूर्ण व्यायला आल्यावर तो त्या सायकॉलॉजिस्टला सांगतो - आता मी डिग्री घेऊन हे सोडतोच आहे. अर्थात हे सोडण्यामागची अनंत कारणे त्याने दिलेली आहेतच. बाईला हवा असलेला गर्भपात कायद्याने अमान्य असणे, पेशंटला स्वत:चे काही हक्क, अगदी स्वत:च्या उपचारांबद्दल बोलण्याचेही नसणे, मृत्यूपंथाला लागलेल्या पेशंटवर जबरदस्तीने उपचार करणे, शिवाय डॉक्टरांची पेशंटला वागवण्याची, तपासण्याची पद्धत, इतर मेडिकल विद्यार्थ्यांना मेडिसीन सोडून अन्य कोणत्याही शाखेत अजिबात रस नसणे, इतर प्रॅक्टिसिंग डॉक्टरांना आपण पेशंटला खरोखरच काही मदत करतो आहोत असे न वाटणे, इत्यादि असंख्य गोष्टी होत्याच. शिवाय आधी म्हटल्याप्रमाणे क्रायटनची लहानपणापासूनची लिखाणाची हौस आणि आकांक्षाही कारणीभूत होतीच. त्याचे वडील एक पत्रकार आणि संपादक होते. त्यांच्याशी त्याचे तितकेसे पटत नव्हते परंतु त्यांचा प्रभाव तर त्याच्यावर होताच. त्यांच्या आग्रहानेच तो १२ व्या वर्षी उत्तम रीत्या टंकलेखन करू शकत होता. तो आणि त्याची तीन भावंडे यापैकी तिघांनी आतापर्यंत ( हे पुस्तके लिहिते वेळी ) पुस्तके प्रसिद्ध केली होती आणि चौथ्याचे काम चालू आहे. ही गोष्ट हेच दर्शवते की लिखाण हे या कुटुंबाच्या रक्तातच होते. आधी म्हटल्याप्रमाणे क्रायटनने त्याचे वैद्यकीय शिक्षण हेरगिरीच्या कादंबर्या आणि सस्पेन्स थ्रिलर्स लिहून पूर्ण केले. त्याच्यावर जेम्स बॉंडच्या कादंबर्यांचा प्रभाव होता. आणि एकदा तर त्याने तसली एक कादंबरी केवळ ९ दिवसात लिहून पूरी केली होती. पण हे सगळे फक्त शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठीच होते.
त्याला जेव्हा त्याच्या टोपण नावाने लिहिलेल्या कादंबरीसाठी बक्षीस मिळाले आणि त्यासाठी जेव्हा तो कॉलेजमध्ये रजा मागण्यासाठी गेला, त्याबद्दलचे वर्णन वाचताना त्याची शैली अगदी अप्रतिम, किंचित विनोदाचा स्पर्श असलेली आणि तरीही अत्यंत प्रामाणिकपणाची डूब असलेली अशी आहे. त्या वेळी रजा मागण्यासाठी आजी किंवा आजोबा गेले अशी थाप मारायची पद्धत होती, मग त्यांना अगदी ३ /४ वेळा का मरावे लागेना. पण त्याने मात्र आवंढा गिळत गिळत खरे कारण सांगितले. त्या प्रसंगाचे त्याचे वर्णन अगदी खुमासदार आहे, आणि तो त्या वेळी जे दुहेरी आयुष्य ( विद्यार्थी व लेखक असे) जगत होता त्याविषयीचे ही!
पुढे: पृष्ठ २