रंग आणि संगीत

किरण देशपांडे

रंगाचा किंवा संगीताचा साक्षात्कार कोणत्या क्षणी कसा होईल हे सांगता येत नाही. एखादा नारिंगी सूर्यास्त पाहताना, एखाद्या पक्ष्याचे गाणे ऐकताना, चित्रकाराचे चित्र पाहताना किंवा जगजीत सिंगची सुंदर गझल ऐकताना! अशी कल्पना करा की तुमचा एखादा दिवस खूप वाईट गेलाय (बॉसने 'दम' भरल्यामुळे म्हणा किंवा ऑफिसमध्ये तुमचा 'पोपट' झाल्यामुळे). संध्याकाळी निराश मूडमध्ये घरी आल्यावर जर तुम्हाला फ्लॉवरपॉटमध्ये टवटवीत गुलाबाची फुले दिसली किंवा टीव्हीवर तुमचे सर्वात आवडते गाणे लागले असले, तर तुमचा चेहरा लगेच खुलतो. आणि मग स्वारी एकदम 'रंगात' येते. रंग व संगीत या दोन्हींमध्ये, निराश माणसाला प्रसन्न बनवण्याची ताकद आहे.

 
पृष्ठ १

रंग आणि संगीत हे आपल्या सगळ्यांनाच हवेहवेसे वाटणारे. जरा विचार करा, आपल्या जगात जर संगीत आणि रंग दोन्ही नसतील तर जगणे अगदी नीरस होईल - एखाद्या भकास वाळवंटासारखे (किंवा 'राहूल रॉय'च्या थोबाडासारखे:-)). अगदी गुहेत चित्रे काढणार्‍या आणि जंगलात हाके घालणार्‍या आपल्या पूर्वजांपासून आत्तापर्यंतच्या मानवी संस्कृतीमध्ये या जोडीने वेगळेच रंग भरले आहेत. रंगपंचमीसारख्या सणापासून ते 'सवाई गंधर्वा'सारख्या संगीतोत्सवापर्यंत, रंग आणि संगीत हे सतत आपल्याभोवती फिरत असतात.

रंगाचा किंवा संगीताचा साक्षात्कार कोणत्या क्षणी कसा होईल हे सांगता येत नाही. एखादा नारिंगी सूर्यास्त पाहताना, एखाद्या पक्ष्याचे गाणे ऐकताना, चित्रकाराचे चित्र पाहताना किंवा जगजीत सिंगची सुंदर गझल ऐकताना! अशी कल्पना करा की तुमचा एखादा दिवस खूप वाईट गेलाय (बॉसने 'दम' भरल्यामुळे म्हणा किंवा ऑफिसमध्ये तुमचा 'पोपट' झाल्यामुळे). संध्याकाळी निराश मूडमध्ये घरी आल्यावर जर तुम्हाला फ्लॉवरपॉटमध्ये टवटवीत गुलाबाची फुले दिसली किंवा टीव्हीवर तुमचे सर्वात आवडते गाणे लागले असले तर तुमचा चेहरा लगेच खुलतो. आणि मग स्वारी एकदम 'रंगात' येते. रंग व संगीत या दोन्हींमध्ये, निराश माणसाला प्रसन्न बनवण्याची ताकद आहे.

पण रंग आणि संगीतात काही साम्य जाणवते का तुम्हाला? या दोन्हींचे काही नाते आहे का?

पहिल्यांदा कलाकाराच्या नजरेतून काय सापडते का, ते पाहू. तुम्ही शाळेत असताना इंद्रधनुष्याचे सात रंग पाठ केले असतीलच. 'तां-ना-पि-हि-नि-पा-जा' किंवा 'जा-तां-ना-ही-पा-नि-पी'! तुम्हाला हेही माहीत आहे की संगीतातदेखील सात मूळ स्वर असतात. 'सा-रे-ग-म-प-ध-नि-सा' किंवा पाश्चात्य संगीतातले 'A-B-C-D-E-F-G'. मूळ रंगांपासून (उदा. निळा, लाल इ.) रंगांच्या वेगवेगळ्या छटा तयार करता येतात: उष्ण रंगसंगती, शीत रंगसंगती वगैरे. त्याचप्रमाणे संगीतातले मूळ स्वर वापरून वेगवेगळे 'शास्त्रीय राग' तयार करता येतात.

गाण्यात जशा पट्टया असतात (काळी १, काळी २ इ.) तसेच रंगांनाही पट्टया असतात उदा. गडद निळा, हलका निळा. यालाच lightness of colour१ असे म्हणतात. वेगवेगळे रंग आपल्याला मूळ ३ रंगांपासून (लाल, हिरवा, निळा) बनवता येतात; तसेच संगीतातले स्वरसंयोग (chords)२ ३ किंवा अधिक स्वरांपासून बनतात.

संगीताचे वर्गीकरण करणे अवघड आहे. संगीतात काही मुख्य प्रकार आहेत - शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगम, जॅझ, रॉक, पॉप इ.; मात्र संगीताच्या अनेक शैली पाहिल्या की असे वाटते की हे प्रकार अपुरेच आहेत. त्याचप्रमाणे रंगांचे वर्गीकरण करणेही मुश्किल आहे. जगात असंख्य रंग आहेत (कॉम्प्युटरच्या मॉनिटरवर अंदाजे १.६७ कोटी रंग दिसू शकतात!). ठोकळपणे त्यांना लाल रंगाच्या छटा (Reds), निळया रंगाच्या छटा (Blues) असे म्हणता येईल.

काहीजणांचे असे म्हणणे आहे की रंगांचे नाते संगीताच्या शैलीबरोबर जोडता येते. उदा. शास्त्रीय संगीताचा संबंध हिरव्या रंगाशी जोडता येतो; Jazz संगीताचा संबंध जांभळ्या रंगाशी तर Pop संगीताचा हिरव्या-निळ्या रंगाशी (Cyan). अर्थात या फक्त उपमा झाल्या; यामुळे कोणतेही संगीत हे एखाद्या रंगाशी जोडता येते असे होत नाही. मग संगीताचा अभाव असणाऱ्या पुढाऱ्यांच्या 'भाषणां'चा रंग कोणता बरे? सोप्पंऽय.. त्यांच्या खादीसारखाच "पांढरा"! (म्हणजेच कोणत्याही रंगाचा अभाव).

गंमत पहा. रंगांची नावे आपल्याला संगीतामध्ये पहायला मिळतात. तुम्हालाही बरीच गाणी आठवतील. मग ते 'ऋतु हिरवा' किंवा 'श्रावणात घन निळा बरसला' यासारखे मराठी गाणे असो; 'लाल छडी मैदान खडी' सारखे हिंदी गाणे असो; वा Aerosmith चे 'Pink'३ असो. प्रत्येकाचे जसे काही आवडते रंग असतात तशीच आवडती गाणीही असतात. कधीकधी रंगांमुळे एखादे गाणे आठवते. मी जेव्हा जेव्हा निळ्या आकाशाचा कोणताही फोटो बघतो तेव्हा तेव्हा मला किशोर कुमारचे 'नीले नीले अंबर पर' आठवते; इंद्रधनुष्य पाहिल्यावर ए.आर.रहमानच्या 'रंग दे बसंती' गाण्याची झलक त्यात दिसते; आणि STD/ISD चा पिवळा डब्बा पाहिला की Beatles चे 'Yellow Submarine'४ गुणगुणावेसे वाटते.

रंग-संगीताची जोडी अगदी गळ्यात गळे घालतीय असे वाटले ना? पण थांबा. या नाण्याला दुसरी बाजू पण आहे. वैज्ञानिकाच्या दृष्टीने हे गणित कसे काय जमते ते बघू.


न्यूटनचे रंग-चक्र (स्रोत: Wikipedia)

अगदी पायथागोरस, ऍरिस्टॉटलपासून ते लिओनार्डो द विंचीपर्यंत बर्‍याच जणांनी रंग आणि संगीतातला दुवा शोधण्याचा प्रयत्न केला. इसवी सन १७०४ मध्ये न्यूटनने त्याच्या 'Optiks'५ या पुस्तकात, रंगांची harmony आणि संगीतातील harmony यांची तुलना केली. न्यूटनने इंद्रधनुष्यातील मुख्य सात रंगांचे रंग-चक्र (colour wheel)६ बनवले आणि संगीतातील सात स्वर (A to G) या रंग-चक्रात बसवले. त्याने A ह्या स्वराला हिरव्या आणि निळ्या रंगांच्या मध्ये जागा दिली (घरमालक जशी भाड्याने जागा देतो तशी :-)). अशा पद्धतीने सात रंगांना सात स्वर वाटून दिले आणि रंग-संगीताचे सांकेतिक चक्र तयार झाले.

तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण 'रंग विज्ञान' (Colour Science)८ ही विज्ञानाची एक वेगळी उपशाखा आहे. कोणत्याही एका रंगाची दुसर्‍या रंगाशी तुलना करता येते (वैज्ञानिक पद्धतीने). त्या रंगांचा lightness९ (कांती - म्हणजेच तो रंग किती 'हलका' आहे) आणि chroma१० (वर्ण - म्हणजेच तो रंग किती 'शुद्ध' आहे) यावरून त्या दोन रंगांतील फरक कळतो. दोन उदाहरणे देतो. पिवळा रंग हा लाल रंगापेक्षा हलका वाटतो (lightness difference); तर हिरवा रंग हा तांबूस (तपकिरी) रंगापेक्षा जास्त शुद्ध आणि तजेलदार वाटतो (chroma difference).

संगीत आणि संगीताचा अनुभव याचा वैज्ञानिक अभ्यास हा 'संगीत मानसशास्त्र' (Music Psychology)११ या शाखेत होतो. संगीताच्या प्रकारांची तुलना त्यांच्या मधुरतेवरून (melody)१२, एकतानतेवरून (harmony)१३ आणि लयीवरून (rhythm)१४ करता येऊ शकते. भावगीतांमध्ये छान melody असली तरी लय साधीच असते. तर Rap संगीत हे लयीने ठासून भरलेले असले तरी melody शून्य! (इथे कोणत्याही संगीताला नावे ठेवलेली नाहीत.)

इतके असूनही रंग-संगीताच्या या तुलनेला बर्‍याच शास्त्रज्ञांनी धाब्यावर बसवले. कारण रंग (प्रकाश) आणि संगीत (ध्वनी) यांच्या तरंग-लहरींमध्ये (frequencies) खूप फरक आहे. आपल्याला दिसणाऱ्या प्रकाशाच्या लहरी ह्या ४०० ते ७५० terahertz मध्ये असतात तर ध्वनी-लहरींचा अवाका २० ते २०,००० hertz इतकाच आहे.

समजा तुम्ही एखादे गाणे ऐकत आहात; एकाच वेळी पियानो, बासरी, गिटार अशी वाद्ये वाजत आहेत. एकाच वेळी ऐकलेले या वाद्यांचे वेगवेगळे स्वर तुम्हाला कळू शकतात. (अर्थात पु.लं.सारखा एखादा पेटीवादक असेल तर त्याला यातील प्रत्येक स्वर कोणता हे ओळखता येईल). आपल्या कानांमध्ये या वेगवेगळ्या ध्वनी-लहरी ऐकण्यासाठी स्वतंत्र संग्राहक (sound receptors) असतात. पण अशा प्रकारची सोय आपल्या डोळ्यांमध्ये नाही. प्रत्येक रंग हा प्रकाशाच्या वेगवेगळ्या लहरींनी बनलेला असतो; पण त्या वेगवेगळ्या लहरींनुसार आपल्या डोळ्यांमध्ये स्वतंत्र रंग ग्रहण केला जात नाही. उलट रंग ओळखण्यासाठी डोळ्यांमध्ये फक्त तीनच संग्राहक (colour receptors) असतात.

 

पुढे: पृष्ठ २