रंग आणि संगीत

किरण देशपांडे

पृष्ठ २

तुम्हाला रंग बदलणारा शेमेलियन (chameleon) सरडा कदाचित माहीत असेल. 'रंग' हेसुद्धा या सरड्याप्रमाणे स्वत:चे रंग बदलतात! ही अतिशयोक्ती नाही. तुम्ही कपड्याच्या दुकानात नवा शर्ट घ्यायला जाता तेव्हा १० वेळा शर्टाचा रंग तपासून घेता (खरंतर बायकांच्या साडीखरेदीचे उदाहरण जास्त योग्य आहे). आणि तोच रंग घरातल्या प्रकाशात पाहिला तर वेगळा दिसतो, सूर्यास्ताच्या उजेडात अजून थोडा वेगळा दिसतो. इतकेच काय, पण रंगाची पार्श्वभूमी (background) बदलली तरी रंग एकदम वेगळा दिसू शकतो. उदा. खालील आकृती पहा.


रंग-भ्रम (colour illusion): A आणि B हे चौकोन एकाच रंगाचे आहेत.
(स्त्रोत: Edward Adelson)१५

त्यातील चौकोन A आणि चौकोन B या दोन्ही चौकोनांचा रंग एकच आहे. तरीही त्या चौकोनांच्या भोवती असणार्‍या इतर चौकोनांमुळे आणि हिरव्या सिलेंडरच्या सावलीमुळे हे २ चौकोन आपल्याला भिन्न रंगाचे वाटतात. यालाच रंग-भ्रम (colour illusion) असे म्हणतात. संगीतातल्या स्वरांचे मात्र असे नाही. पार्श्वभूमीवर काही वाजत असले (background music) तरी कोणताही स्वर हा 'त्या' स्वरासारखाच ऐकू येतो. उदा. 'सा' हा स्वर जरी वेगवेगळ्या वाद्यांनी वाजवला तरी तो 'सा' पेक्षा वेगळा वाटत नाही.

म्हणजे एकंदरीत रंग आणि संगीत यांच्यात 'रक्ताचे नाते' नाही तर...

म्हणून काय झाले? मैत्री तरी आहे ना. एक मजेशीर योगायोग बघा. 'सायनेस्थेशिया' (Synaesthesia)१६ या अवस्थेमध्ये माणसाच्या इंद्रियांच्या संवेदना (उदा. ऐकणे आणि पहाणे) एकमेकांत मिसळतात. हा तसा दुर्मीळ अनुभव आहे. ज्या लोकांना सायनेस्थेशिया असतो, त्यांना गाणे ऐकताना चक्क रंग दिसतात. थोडक्यात काय, तर ऐकू येणारा 'आवाज' आणि डोळ्यांना दिसणारा 'प्रकाश' यांच्यामध्ये गफलत होते. त्यांच्या मेंदूला या वेगवेगळ्या संवेदनांचे संश्लेषण (synthesis) करता येत नाही. काही संगीतज्ञांना स्वर हे रंगांसारखे 'दिसतात'. असे लोक अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच.

पण तुम्हांलाही जगाचे वेगवेगळे रंग कधी ना कधी दिसले असतील. आठवून पहा. रडियोवर 'पहला नशा' ऐकताना त्यातल्या पियानोचे स्वर हे सोनेरी धुक्यासारखे वाटले असतील... एखाद्या ठुमरीच्या लग्गीतली जलद तान ऐकताना ट्रॅफिक सिग्नलचे लाल, हिरवे, निळे रंग दिसले असतील... 'बॉम्बे थिम'१७मधील बासरीचे संथ सूर ऐकताना निळ्याशार समुद्राची आठवण आली असेल.... 'दिल चाहता है' मधले 'कैसी है ये ऋत के जिसमें' ऐकताना एखाद्या तळ्याच्या पाण्यावर पडलेले हिरवे पान दिसले असेल.... किंवा पं. हृदयनाथांचे 'शूर आम्ही सरदार' ऐकल्यावर भगवा झेंडा फडकताना दिसला असेल... अशा वेळी वाटते, की सगळे जग कसे संगीतमय रंगांनी भरून गेले आहे!!

किरण

रंगुनी रंगात सार्‍या रंग माझा वेगळा - सुरेश भट.

संदर्भ:
१ http://en.wikipedia.org/wiki/Value_(colorimetry)
२ http://en.wikipedia.org/wiki/Chord_(music)
३ http://en.wikipedia.org/wiki/Pink_(song)
४ http://en.wikipedia.org/wiki/Yellow_Submarine_(song)
http://en.wikipedia.org/wiki/Optiks
http://en.wikipedia.org/wiki/Color_wheel
७ http://en.wikipedia.org/wiki/Image:Newton's_colour_circle.png
http://en.wikipedia.org/wiki/Color_science
९ http://en.wikipedia.org/wiki/Value_(colorimetry)
१० http://en.wikipedia.org/wiki/Colorfulness
११ http://en.wikipedia.org/wiki/Music_psychology
१२ http://en.wikipedia.org/wiki/Melody
१३ http://en.wikipedia.org/wiki/Harmony
१४ http://en.wikipedia.org/wiki/Rhythm
१५ http://web.mit.edu/persci/people/adelson/checkershadow_illusion.html
१६ http://en.wikipedia.org/wiki/Synaesthesia
१७ http://en.wikipedia.org/wiki/Bombay_Theme#Music