विज्ञान आणि तत्त्वज्ञान यांच्यात फरक काय? (उंबेर्तो एको यांचे मत)

धनंजय

आपल्या अनुभवविश्वात असंख्य तपशील असतात. त्या सर्वांची काही व्यवस्था लावायची उर्मी आपणा सर्वांत असते. खरे तर अशी काही व्यवस्था लावली नाही, तर आपण किंकर्तव्यविमूढ होऊ. या व्यवस्थेची उदाहरणे बघितलीत तर लोक दुहेरी वर्गीकरण करतात. उदाहरणार्थ भौतिकीत एकीकडे न्यूटनचे कायदे तर दुसरीकडे ऍरिस्टॉटलचे विवेचन, संस्कृत भाषेच्या अभ्यासात एकीकडे पाणिनीचे नियम तर दुसरीकडे भर्तृहरीचे वाक्यपदीय, समाजातल्या वागणुकीबद्दल एकीकडे कायद्याकानूंचा उहापोह तर दुसरीकडे नीतिशास्त्र. पैकी प्रत्येक जोडीत प्रथम अभ्यासाला लोकांत विज्ञान म्हटले जाऊ शकते, तर दुसऱ्या अभ्यासाला तत्त्वज्ञान म्हटले जाऊ शकते. या "विज्ञान" आणि "तत्त्वज्ञान" वर्गीकरणात काही मूलभूत फरक आहे काय?

 
पृष्ठ १

प्रस्तावना

आपल्या अनुभवविश्वात असंख्य तपशील असतात. त्या सर्वांची काही व्यवस्था लावायची उर्मी आपणा सर्वांत असते. खरे तर अशी काही व्यवस्था लावली नाही, तर आपण किंकर्तव्यविमूढ होऊ. या व्यवस्थेची उदाहरणे बघितलीत तर लोक दुहेरी वर्गीकरण करतात. उदाहरणार्थ भौतिकीत एकीकडे न्यूटनचे कायदे तर दुसरीकडे ऍरिस्टॉटलचे विवेचन, संस्कृत भाषेच्या अभ्यासात एकीकडे पाणिनीचे नियम तर दुसरीकडे भर्तृहरीचे वाक्यपदीय, समाजातल्या वागणुकीबद्दल एकीकडे कायद्याकानूंचा उहापोह तर दुसरीकडे नीतिशास्त्र. पैकी प्रत्येक जोडीत प्रथम अभ्यासाला लोकांत विज्ञान म्हटले जाऊ शकते, तर दुसऱ्या अभ्यासाला तत्त्वज्ञान म्हटले जाऊ शकते. या "विज्ञान" आणि "तत्त्वज्ञान" वर्गीकरणात काही मूलभूत फरक आहे काय? की केवळ अधिक कामचलाऊ (प्रॅक्टिकल) अभ्यासाला "विज्ञान" म्हणावे, आणि केवळ सैद्धांतिक अभ्यासाला "तत्त्वज्ञान" म्हणावे? या वर्गीकरणात काही स्पष्ट सीमारेषा आहेत का? असे प्रश्न मनात येऊ शकतात. याविषयी एका विचारवंत लेखकाचे विवेचन येथे देत आहे. उंबेर्तो एको (जन्म १९३२) हे इटालियन भाषेतले कादंबरीकार, समीक्षक, चिह्नशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आहेत. Semiotics and the Philosophy of language (चिह्नशास्त्र आणि भाषेचे तत्त्वज्ञान; Indiana University Press, Bloomington, IN , १९८४) या पुस्तकाच्या प्रास्ताविक प्रकरणात त्यांनी या मुद्द्याला हात घातला आहे. चिह्नशास्त्रातील "चिह्न" हा प्रकार वैज्ञानिक मानावा की तत्त्वज्ञानातील संकल्पना? हे विवेचन करताना या दोहोंमध्ये सामान्यपणे वर्गीकरण कसे करावे, हा ऊहापोह त्यांनी केला आहे. त्याच्यावर मी केलेले भाष्य समजण्याकरिता मुळातल्या परिच्छेदांचे मराठी भाषांतर येथे देत आहे.

उंबेर्तो एको यांचे पाठ्य

(एखाद्या शास्त्रातल्या संकल्पना सांगितल्या जात असताना, ते) शास्त्र (science) विज्ञानासारखे नव्हे, तत्त्वज्ञानासारखे (philosophy) कार्य करते. जसे तत्त्वज्ञान अमूर्त संकल्पना प्रतिपादित करते - अनुभव घेणारा (subject) , चांगले-वाईट (good and evil), सत्य, क्रांती, वगैरे. आता तत्त्वज्ञान हे विज्ञान नव्हे, कारण त्याची प्रतिपादने (assertions) प्रात्यक्षिकाने (empirically) तपासता येत नाहीत. या अशक्यतेचे कारण असे - तत्त्वज्ञानातील संकल्पना या आधीच ओळखू येणाऱ्या वर्णनात्मक विद्याची ('etic' data) व्यवस्था लावणाऱ्या सारसंकल्पना ('emic' definition) नसतात, अशा कुठल्या ओळखीच्या गोष्टीचे कार्य किंवा आकारही त्या नव्या संकल्पनेत नसतो. तत्त्वज्ञानातल्या संकल्पना त्या तत्त्वज्ञानात *प्रतिपादित* (posited) केलेल्या असतात, म्हणूनच काय अस्तित्वात येतात. ती तत्त्वप्रणाली प्रत्यक्ष अनुभूतीची काही व्यवस्था लावते - त्या चौकटीबाहेर तो सर्व विसंवादी विदा एकत्र येत नाही.

चालणे, संभोग करणे, झोपणे, काहीतरी करण्यापासून स्वत:ला रोखणे, दुसऱ्याला अन्न देणे, शुक्रवारी बीफ खाणे - या सर्व गोष्टी भौतिक घटनांचा भाव किंवा अभाव आहेत. पण *कुठल्यातरी एका तात्त्विक चौकटीमध्ये* या सर्व गोष्टी कुठल्या एका संकल्पनेची (म्हणजे पाप, पुण्य, वगैरे संकल्पनेची) उदाहरणे होतात. त्या तात्त्विक चौकटीबाहेर बीफ खाण्याची क्रिया संभोगाच्या क्रियेपेक्षा सर्वथा वेगळी असते. आणि संभोग करणाऱ्या व्यक्ती लग्नाच्या असोत वा नसोत, संभोगाची क्रिया साधारणपणे एकसारखी असते. पण कुठलीतरी एक तात्त्विक चौकट निवडली तर शुक्रवारी बीफ खाणे, आणि कोण्या क्ष व्यक्तीशी संभोग करणे या दोन्ही क्रिया "पाप" या संकल्पनेची विशिष्ट उदाहरणे होतात. त्याच प्रकारे कोणास तेच अन्न दान करणे, आणि कोण्या य व्यक्तीशी संभोग करणे ही "पुण्य" संकल्पनेची विशिष्ट उदाहरणे होतात.

चांगले आणि वाईट ही सैद्धांतिक गृहीतके आहेत, आणि त्या तत्त्वज्ञानाच्या निर्णयाने कित्येक विखुरलेली, अत्यंत वेगळी तथ्ये किंवा कृत्ये *एकच वस्तू* बनतात. भौतिक विज्ञानात "पिंड" (object), "घटनाक्रम" (phenomenon), "प्रकार" (natural kind) या ज्या संकल्पना वापरतात, त्या अशाच तत्त्वज्ञानातल्या आहेत, ही रोचक बाब आपल्या लक्षात यावी. कुठल्याही विशिष्ट भाषेचे चिह्नशास्त्रीय विश्लेषण करताना (specific semiotics), किंवा कुठल्या विशिष्ट समाजाचे मानववंशशास्त्रीय (cultural anthropology) विश्लेषण करताना, असे नसते. (अशा कुठल्या तात्त्विक संकल्पना प्रतिपादित केल्या जात नाहीत, या अर्थी - अनुवादकाची टीप). मानववंशशास्त्रात जेव्हा कोणी "मेहुणा" ही संकल्पना सांगतो, तेव्हा आधीच समजत असलेल्या काही तथ्यांचे सारभूत संकलन करत असतो. या विज्ञानाने तसे संकलित प्रतिपादन केले नसते, तरीही त्या समाजात त्या व्यक्तीची तीच भूमिका असती. एका पुरुषाला बहीण आहे, त्या बहिणीचे दुसऱ्या एका पुरुषाशी लग्न झाले आहे. काही विशिष्ट सामाजिक परिस्थितींमध्ये असा पुरुष काही विशिष्ट कार्ये करतो. ते कार्य करण्यास त्याच स्त्रीचा एकाशी बहीण-भाऊ संबंध, आणि एकाशी लग्नसंबंध कारणीभूत असतो. आता मेहुण्याच्या कार्यांचे विश्लेषण करताना मानववंशशास्त्रज्ञ चुकू शकेल म्हणा - कुठल्यातरी अनावश्यक तपशिलाकडे लक्ष देईल कदाचित (म्हणजे ते कार्य मेहुणीही करू शकत असेल कदाचित). किंवा कुठल्या आवश्यक तपशिलाकडे चुकून दुर्लक्ष करेल (कदाचित स्त्रीचा वडील बंधूच ते कार्य करू शकत असेल). काही का असेना. पण तो मानववंशशास्त्रज्ञ काही वादातीत वर्णनात्मक तथ्यांपासून सुरुवात करत असतो. अशा संबंधांत तीन व्यक्ती असतात, एक स्त्री-पुरुष एकाच मात्या-पित्यापासून जन्मलेले असतात, आणि त्याच स्त्रीचा दुसऱ्या पुरुषाशी सह-वास असतो आणि शरीरसंबध जोडलेला असतो.

तत्त्वज्ञानात कथा वेगळी असते. हेगेलच्या (Hegel) मतात जे "सत्य" असते ते तार्स्कीच्या (Tarski) मतातल्या "सत्या"पेक्षा आमूलाग्र वेगळे असते. आणि कॅथोलिक शालाशास्त्री (Schoolmen) जेव्हा म्हणाले की सत्य म्हणजे मूर्त आणि बुद्धिगताचा एकवद्भाव (adaequatio rei et intellectus), तेव्हा त्यांच्या तसे म्हणण्याआधी त्यातील घटक गोष्टी आपल्या ओळखीच्या नव्हत्या. त्यांच्या व्याख्येतूनच आपल्याला समजते की "मूर्त वस्तु" (rei) कशाला म्हणायचे, "बुद्धिगत समज" (intellectus) कशाला म्हणायचे, "एकवद्भाव" (adaequatio) कशाला म्हणायचे.

याचा असा अर्थ नव्हे की तत्त्वज्ञानाला घटनाक्रमाचे स्पष्टीकरण देता येत नाही. तत्त्वज्ञानाला *स्पष्टीकरणाची शक्ती* (explanatory power) भरपूर आहे, कारण विखरून पडलेला विदा एकत्रित विचारात आणण्यासाठी तत्त्वज्ञान मार्ग देते. विज्ञान जेव्हा "संवेदनात्मक विदा" (observable datum) आणि "योग्य संवेदना" (correct [or true] observation) या व्याख्यांपासून सुरू होते, तेव्हा तात्त्विक संकल्पनांचे प्रतिपादन करूनच सुरू होत असते. तरीसुद्धा एखादे वैज्ञानिक वर्णन ज्या प्रकारे तथ्यात्मक (true) असू शकते (त्याची मूळ गृहीतके तत्त्वज्ञानातल्या का असेनात), त्याप्रमाणे काही तत्त्वज्ञान तथ्यात्मक असू शकत नाही. तत्त्वज्ञानातले तथ्य काय तर जगास काही सुसूत्र चौकट देण्याची गरज ते भागवते, आणि त्या तत्त्वज्ञानाच्या अनुयायांना जगात सुसूत्रपणे व्यवहार करण्यास मार्ग देते.

या अर्थाने तत्त्वप्रणालीला *कृतिशील शक्ती* (practical power) असते : त्यातून जग बदलण्यास हातभार लागू शकतो. या कृतिशील शक्तीचा विज्ञानात उपलब्ध असलेल्या आभियांत्रिकी शक्तीशी काहीही संबंध नाही. विज्ञान कुठल्या जनावराबद्दल, किंवा कुठल्या वाहातुक नियंत्रण चिह्नांबद्दल अभ्यास करू शकेल, पण त्यातून त्या अभ्यासवस्तूत बदल होणे आवश्यक नाही. वर्णनात्मक पायरीपासून त्या अभ्यासवस्तूत काही बदल घडवून आणण्याच्या निर्णयापर्यंत - म्हणजे जनुके बदलून त्या जीवजंतूत फरक घडवून आणणे, किंवा वाहतुक नियंत्रणासाठी अमुकतमुक नवीन चिह्ने तयार करणे - या निर्णयांमध्ये महदंतर आहे. तत्त्वज्ञानांची बात वेगळी. विचारी अनुभाव घेणारा (subject) या आधुनिक संकल्पनेच्या तत्त्विक दृष्टिकोनामुळे पाश्चिमात्त्य संस्कृती व्यक्तिसापेक्षतेच्या (subjectivity) अंगाने विचार करण्यास आणि वागण्यास उद्युक्त झाली. आर्थिक वर्गकलह (class struggle) आणि क्रांती या संकल्पनांमुळे लोक आर्थिक वर्गाच्या दृष्टिकोनातून व्यवहार करू लागले, तेही फक्त क्रांती करण्यासाठी नव्हे. या तात्त्विक संकल्पनेच्या कसोटीवर घासून इतिहासातल्या कुठले उठाव आणि कुठल्या दंगली क्रांती मानाव्यात, कुठल्या मानू नयेत, ते ठरवू लागले. पण तत्त्वज्ञानांना ही कृतिशील शक्ती असल्यामुळेच त्यांना *भाकिते करण्याची शक्ती* (predictive power) असूच शकत नाही. त्या तत्त्वप्रणालीने वर्णन केल्यासारखेच जर विश्व झाले, तर पुढे काय होईल, ते त्या प्रणालीला सांगता येत नाही. स्वतंत्र विद्याचे जवळजवळ तटस्थ विश्लेषण करून त्यातून कुठली अभियांत्रिकी क्रिया केली जाते, अशा प्रकारे तत्त्वज्ञानाची कृतिशील शक्ती उद्भवत नाही. ऐरणीवर घण पडल्यानंतरच तत्त्वज्ञानाला समजू शकते की आपण काय घडवून आणले. उदाहरणार्थ तत्त्वज्ञान म्हणून मार्क्सवादापाशी बऱ्यापैकी स्पष्टीकरणात्मक शक्ती आहे. त्याच्यापाशी सातत्याने कृतीशील शक्तीही आहे - त्याने जगातल्या अनेक कल्पना बदलल्यात, आणि काही राज्ये बदललीत. पण ते विज्ञान मानून भाकिते करण्याची शक्ती असल्याचा जेव्हा दावा झाला, तेव्हा ते कुचकामी ठरले : त्याने बदलेल्या कल्पना आणि बदललेली राज्ये ज्या दिशेने पुढे मार्गक्रमण करती झाली त्याचे त्या तत्त्वज्ञानाला नेमके पूर्वज्ञान नव्हते. वैश्विक दृष्टिकोन घेता, तत्त्वज्ञानाची कुठली प्रणाली स्टेजवरच्या नटाची भूमिका (अनुवादकाची टीप : तटस्थपणे दिलेली वाक्ये न बदलता म्हणत राहाणे, या अर्थी) वठवत नाही. अन्य तत्त्वप्रणालींशी, तथ्यांशी परस्पर परिणाम करते. जग कसे असावे याबद्दल एका प्रणालीची कल्पना बाकी प्रणालींच्या कल्पनांवर परस्पर परिणाम करते. आणि या परस्पर परिणामांतून काय निकाल लागेल ते ती प्रणाली सांगू शकत नाही. विश्वाच्या कुठल्याही संकल्पनेत विश्वातील बाकी सर्व गोष्टी अंतर्भूत होऊ शकतात - फक्त त्या संकल्पनेवेगळी कुठली स्पर्धक संकल्पना अंतर्भूत होऊ शकत नाही. वेगळ्या संकल्पनेला जागा मिळतेच तर तिच्यावर टीका करून तिच्यातील अंतर्गत तर्कदोष दाखवण्यापुरती. तत्त्वज्ञानाच्या प्रणाली मुळातच "एकोहम"भाव घेऊन जन्मतात. त्यामुळे ज्या विश्वाचा आराखडा त्या देतात, त्याबद्दल त्या सर्व काही सांगू शकतात. पण जे विश्व त्या घडवतात, त्यांच्याविषयी त्या फारच थोडे सांगू शकतात.

 

पुढे: पृष्ठ २