विज्ञान आणि तत्त्वज्ञान यांच्यात फरक काय? (उंबेर्तो एको यांचे मत)

धनंजय

पृष्ठ २

अनुवादकाचे भाष्य

वाचताना उंबेर्तो एको यांचे म्हणणे पटू लागते. मात्र त्यांनी दिलेल्यापेक्षा वेगळ्या उदाहरणांचा विचार करता मला तरी त्यांचे विचार लागू करता येत नाहीत. विज्ञानात आधीच ओळखू येणाऱ्या विद्याचे सारभूत वर्णन करणाऱ्या संकल्पनांची व्याख्या केली जाते, असे ते म्हणतात. पण मग ते स्वत:च ओळखतात, की "पिंड", "घटनाक्रम", वगैरे, विज्ञानातील कल्पना तत्त्वज्ञानाच्या आहेत, कारण व्याख्या करण्यापूर्वी अशी काही संकल्पना कळूनच येत नसते. बरे त्यांना असे म्हणायचे असेल, की काही मूलभूत संकल्पना दिल्यानंतर विज्ञानात पुढच्या संकल्पना स्पष्ट विद्यासाठी सारमय व्याख्या असतात. पण मग पाप, पुण्य वगैरे नवकल्पनांच्या व्याख्या केल्यानंतर धर्मशास्त्रे पुढे त्या चौकटीत स्पष्ट दृश्य गोष्टीच व्यवस्थित लावतात. एको यांचे उदाहरण आहे की "पाप" या संकल्पनेत "शुक्रवारी बीफ खाणे" आणि "बिनलग्नाचा संभोग करणे" या विसंवादी वस्तू एकत्र माळल्या जातात. पण मग न्यूटनच्या विवेचनात गुरुत्वाकर्षणाचे वस्तुमान आणि त्वरणासाठीचे वस्तुमान (gravitational mass and intertial mass) या दोन अत्यंत विसंवादी गोष्टींचे "वस्तुमान" (mass) असे एकत्र ग्रहण केले जाते (हे आइन्स्टाइन यांनी लक्षात आणून दिले), हे तरी काय वेगळे? एको म्हणतात की तत्त्वज्ञानात पूर्वी समसमान भासणाऱ्या वस्तूंना वेगळे म्हणून सांगितले जाते - म्हणजे संभोग लग्नाच्या अंतर्गत असला तर हा लग्नाविना संभोगापेक्षा वेगळा, एक पुण्य तर एक पाप, असे वेगळे सांगितले जाते. पण रसायनशास्त्रात रंगहीन वायू ऑक्सिजन हा रिऍक्टिव्ह मानला जातो, तर रंगहीन वायू आर्गॉन हा इनर्ट मानला जातो - हे काय वेगळे? एको म्हणतात की "मेहुणा" शब्द "एक स्त्री-तिचा एक भाऊ-तिचा एक नवरा" या तिहीतून सहज उद्भवतो. त्याच प्रकारे "एक प्रेषित-एक प्रभुसंदेशावली-एक कृत्य" यांच्यातून प्रभु-आज्ञापालन आणि प्रभु-आज्ञा-अवमान या संकल्पना सहज उद्भवतात. एको म्हणतात की अभियांत्रिकी शक्ती असलेली विज्ञाने भाकिते सांगून वास्तू उभारू शकतात. तत्त्वप्रणाली नवविश्वनिर्माण करू शकत असल्या तरीही भाकिते करू शकत नाहीत. मार्क्सवादाने मार्क्सवादी राज्यांचा नवनिर्माण केला, पण ती राज्ये कशी असतील त्याचे भाकीत मार्क्सवादात झाले नाही, असे उदाहरण त्यांनी दिले आहे. पण चूक ठरू शकतील अशी भाकिते करणे, यातच विज्ञानाचे मूळ आहे. तसे प्रयोग करता ती भाकिते चुकलेली आहेत, असेही कित्येकदा दिसून येते, आणि त्या चुकण्यातूनच विज्ञानाची प्रगती आहे असे मानले जाते. उदाहरणार्थ न्यूटनच्या विवेचनाने इलेक्ट्रॉन कसे मार्गक्रमण करेल याचे भाकीत दिले जाते, आणि तशा प्रयोगांचा नवनिर्माण होतो. ते भाकीत चुकलेले आहे, असे दिसून येते. न्यूटनने तसे भाकीत केले, म्हणूनच तो प्रयोग घडून आला - नाहीतर तो कोणाला सुचणार होता? आणि तो प्रयोग करता जे विश्व दिसले, त्याचे वर्णन न्यूटनच्या विवरणात दिसतच नाही.

फार फार तर विज्ञानाचा तात्त्विक पाया त्या मानाने दीर्घ काळ बदललेला नाही, आणि विविध देशांमध्ये पुष्कळसा एकसारखा दिसून येतो, अन्य शास्त्रांचा तात्त्विक पाया प्रत्येक संस्कृतीत अतिशय भिन्न दिसून येतो. असे काही बदलून एको यांचे म्हणणे मला पटते. जे काही का असेना, एको यांचे या विषयावरील लेखन मला फार विचारप्रवर्तक वाटले.

लेखकाविषयी माहिती : धनंजय वैद्य बॉल्टिमोर, यू.एस.ए. येथे राहतात
त्यांना विज्ञान, तत्त्वज्ञान आणि साहित्याच्या रसग्रहणात आनंद वाटतो.