वर्ल्ड ट्रेड सेंटर बिल्डिंग क्र. ७

चित्रा

अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन टोलेजंग इमारती आणि ९/११ चे अतिरेकी हल्ले हे आंतरराष्ट्रीय घडामोडींची बातमी ठेवणार्‍यांच्या स्मरणात असेलच. पण ज्यावेळी ह्या दोन इमारती कोसळल्या, त्याच्याच नंतर काही तासांमध्ये जवळ असलेली एक दुसरी इमारत म्हणजे वर्ल्ड ट्रेड सेंटर इमारत क्र. ७ पडली ते आता काहीसे विस्मृतीत गेले आहे. पण मोठी वृत्तपत्रे तसेच दूरचित्रवाणीकेंद्रांच्या वाहिन्यांचे लक्ष जेव्हा बाकीच्या दोन टोलेजंग इमारतींकडे लागले होते त्या धुमाकुळात दुर्लक्ष झालेली ही तिसरी इमारत पडली, त्यानंतर त्यामागे काही वेगळेच कारस्थान त्याच्यामागे आहे किंवा काय अशीही एक कल्पना चर्चिली जाऊ लागली होती, आणि या इमारतींवर विमाने नेऊन ती पाडली गेली नसल्याने ती नक्की कशामुळे पडली या प्रश्नाची उलगड करण्यासाठी एक वेगळी समिती नेमली गेली.

 
पृष्ठ १

अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन टोलेजंग इमारती आणि ९/११ चे अतिरेकी हल्ले हे आंतरराष्ट्रीय घडामोडींची बातमी ठेवणार्‍यांना स्मरणात असेलच. पण ज्यावेळी ह्या दोन इमारती कोसळल्या, त्याच्याच नंतर काही तासांमध्ये जवळ असलेली एक दुसरी इमारत म्हणजे वर्ल्ड ट्रेड सेंटर इमारत क्र. ७ पडली ते आता काहीसे विस्मृतीत गेले आहे. पण मोठी वृत्तपत्रे तसेच दूरचित्रवाणीकेंद्रांच्या वाहिन्यांचे लक्ष जेव्हा बाकीच्या दोन टोलेजंग इमारतींकडे लागले होते त्या धुमाकुळात दुर्लक्ष झालेली ही तिसरी इमारत पडली, त्यानंतर त्यामागे काही वेगळेच कारस्थान त्याच्यामागे आहे किंवा काय अशीही एक कल्पना चर्चिली जाऊ लागली होती, आणि या इमारतींवर विमाने नेऊन ती पाडली गेली नसल्याने ती नक्की कशामुळे पडली या प्रश्नाची उलगड करण्यासाठी एक वेगळी समिती नेमली गेली. या समितीचा अहवाल, नुकताच म्हणजे २००८ च्या ऑगस्ट महिन्यात जाहीर झाला. भारतीयांच्या दॄष्टीने एक विशेष आकर्षणाची गोष्ट म्हणजे या समितीचे काम ज्या व्यक्तीच्या देखरेखीखाली चालले होते, ती व्यक्ती एक पूर्वाश्रमीची भारतीय व्यक्ती आहे- डॉ. श्याम सुंदर. श्यामसुंदर यांच्या समितीने मांडलेले महत्त्वपूर्ण निर्णय आणि त्यावरील चर्चा अजूनही अनेक वर्षे सुरू राहील, परंतु त्यानिमित्ताने अशा पद्धतीच्या तपासाच्या मागच्या काही संशोधनात्मक प्रक्रिया तसेच मानवी घडामोडी लोकांच्या नजरेसमोर आणून देण्याचा हा प्रयत्न आहे.


वर्ल्ड ट्रेड सेंटर ७
ट्विन टॉवर्सच्या मागे डावीकडे

पूर्वपीठिका

वर्ल्ड ट्रेड सेंटरची बिल्डिंग क्र. ७ ही आकाराने समलंब चौकोनाप्रमाणे (३२९ आणि २४७ फूट ही या चौकोनाच्या समांतर बाजूंची मापे , १४४ फूट इमारतीची रूंदी (लंबरेषेचे माप), तर ६१० फूट ही उंची असलेली) होती. ही इमारत वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या मुख्य भागाशी एका पादचारी मार्गाने तसेच एका छोट्या प्लाझाने जोडलेली होती. एका आधी अस्तित्वात असलेल्या वीजेच्या उपकेंद्राच्या डोक्यावर नंतर ही इमारत बांधण्यात आली होती. इमारतीचा सांगाडा स्टीलचा होता, आणि मजल्यांची जमीन मिश्र पद्धतीच्या (काँपोझिट) म्हणजे स्टीलच्या आधारावर घातलेल्या काँक्रिटच्या लाद्यांनी सामान्यतः बनवतात तशा प्रकारची होती. आधीच्या वीज उपकेंद्राच्या डोक्यावर बांधलेली ही इमारत १९८७ साली बांधून पूर्ण झाली. मजल्यांच्या इमारतीमध्ये अनेक उद्योग, आर्थिक संस्था, बँका यांची तसेच अमेरिकेच्या गुप्तचर खात्याची कार्यालये होती.

वट्रेसें १ आणि २ या इमारतींवर दोन विमानांनी अतिरेकी हल्ले केले गेले ते ९/११ रोजी सकाळच्या ९ वाजण्याच्या सुमारास. हे हल्ले इतके महाभयंकर भूतो न भविष्यति अशा स्वरूपाचे होते की त्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यानंतर इमारत क्र. १ मधील जळत्या वस्तू, इमारतीचे जळके भाग जसे इतस्ततः उडले तसेच ते वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारत क्र. ७ वरही पडले. यात इमारत ७ च्या अनेक मजल्यांना आग लागली. त्यातच इमारतीची खालच्या मजल्यांवरची अग्निशामक तुषार यंत्रणा त्या भागात जाणारी पाण्याची मुख्य वाहिनी आधीच्या इमारतीच्या कोसळल्यामुळे बंद पडल्याने पाण्याच्या पुरवठ्याअभावी काम करेनाशी झाली. त्यामुळे ७ क्रमांकाच्या इमारतीला लागलेली आग विझवता आली नाही. आणि तरीही ही जळणारी इमारत क्र. ७ संध्याकाळी पाच वाजून वीस मिनिटांपर्यंत उभी राहिली. आणि नंतर एकाएकी एखाद्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे सरळसोट खाली कोसळली. इमारत पडण्याआधीच त्यातील लोकांना सुरक्षित स्थळी नेल्यामुळे प्राणहानी झाली नव्हती हे मोठे सुदैव. तेव्हा मिळालेल्या दृष्य स्वरूपातील रेकॉर्डिंगवरून ह्या इमारतीच्या पडण्याची पद्धत जेव्हा एखादी जुनी इमारत पाडायची असेल तेव्हा सुरूंग लावून आणि त्यांचे नियंत्रण करून पाडली जाते त्याप्रमाणे भासली. त्यामुळे असे झाले की ही इमारत पडली नसून मुद्दाम पाडली गेली अशी एक वदंता उठली. याचवेळी या इमारतीत असलेल्या सिटी बँक, तसेच अमेरिकन गुप्तहेर खाते यांची कार्यालये जळून त्यातील काही महत्त्वाची कागदपत्रेही कायमस्वरूपी नाहीशी झाली. ह्यामुळे या वदंतेला मोठाच आधार मिळाल्याप्रमाणे झाले. या सर्व कारणांनी या इमारतीच्या पडण्याचे कारण निदान करण्यासाठी एक सरकारी समिती नेमली गेली. ही समिती नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्डस अँड टेक्नॉलॉजी (निस्ट) या अमेरिकेतील एका सरकारी संस्थेच्या अधिपत्याखाली तयार झाली. ह्या समितीचे काम गेली जवळजवळ पाच वर्षे नेटाने चालले होते आणि या काळातही समितीला लोकांच्या अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागले. समितीचे काम अनेक वर्षे रेंगाळले अशी त्यावर टीकाही झाली. पण गेल्या महिन्यात जो अहवाल बाहेर आला, त्यात म्हटल्याप्रमाणे हा वेळ फारसा मोठा म्हणता येणार नाही.

या इमारतीच्या संगणकीय प्रतिकृतीची रचना १ लाखाहून अधिक छोट्या भागांना जोडून केली गेली. तसेच प्रतिकृती तयार करताना इमारतीत वापरलेल्या घटकांवर वाढलेल्या तापमानाचा परिणाम झाला असणार असे गृहित धरून त्यांच्या या स्थितीतील गुणधर्मांचा समावेश केला गेला. जेथे काही पुरावे कमी पडत होते अशा ठिकाणी वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या प्रमुख दोन मनोर्‍यांवर ( इमारत १ आणि २)येथे मिळालेल्या पुराव्यांप्रमाणे गृहितके बांधून विश्लेषण केले गेले."

किचकट काम

पोलिस ज्याप्रमाणे गुन्हा घडला की पुरावे गोळा करून गुन्हेगाराला शोधून काढतात, किंवा डॉक्टर जशा विविध चाचण्या किंवा रोग्याच्या तपासण्या करून त्याच्या रोगाचे निदान करतात त्याचप्रमाणे इमारतींचे आहे. जसे डॉक्टर आजारपणाबद्दल विविध चाचण्यांचे निकाल गोळा करून एका एका रोगाची शक्यता कमी करीत अचूक रोगनिदान करतील तशीच काहीशी ही प्रक्रिया असते. त्यादॄष्ट्या पाहता निर्जीव आणि सजीव वस्तू यांत फरक असतात ते न नाकारताही बाकीचे तपासाचे काम हे तितकेच श्रमाचे, कष्टांचे आणि काटेकोर निदानाचे असते असे म्हणता येईल. त्यातच इमारती पडल्यानंतर तर कधीकधी तपासाचे काम अधिकच कठीण होते. कारण त्यासाठी लागणारा विदा बहुतांशी इमारतीच्या मूळ अभियंते-वास्तुविशारद-बांधकाम कंपन्या यांच्याकडील मूळ कागदपत्रे तसेच नंतर काही दुरूस्त्या, फेरफार केले गेले असल्यास त्या संबंधित अशा सर्व कागदपत्रांच्या छाननीपासून मिळवावा लागतो. असे असंख्य आराखडे डोळ्याखालून घालून इमारतीच्या बांधकामाविषयी माहिती गोळा करावी लागते, एवढे कष्ट करून मिळवलेल्या विदयाची सत्यासत्यता ही इमारतीच्या मिळालेल्या अवशेषांशी पडताळून पहावी लागते. याखेरीज बघे, तसेच इमारतीत काम करणारे कर्मचारी यांपासून ते पोलिस आणि अग्निशामक दलातील कर्मचारी यांच्यापर्यंत लोकांच्या साक्षी गोळा कराव्या लागतात. हे काम अर्थातच किचकट, वेळखाऊ आणि कठीण असे असते. पण नवीन काळाप्रमाणे या तपासाच्या प्रक्रियेतही मोठे बदल घडत आहेत. मुख्य बदल म्हणजे या कामात होणारा संगणकाचा वापर. संगणकाच्या सहाय्याने, मिळालेल्या विदयाच्या आधारावर त्या खऱ्‍या इमारतीच्या स्वभावाजवळ जाईल अशी एक क्लिष्ट अशी गणिती मूर्ती ( मॅथेमॅटिकल मॉडेल) तयार करता येते. अशा मूर्तीवर कार्य करू शकणार्‍या वेगवेगळ्या बलांचे किंवा क्रियांचे ( जसे जळण्याची क्रिया) परिणाम त्या मूर्तीच्या विविध अंगांवर कसे परिणाम करतील याची संगणकाच्या आधारे कल्पनाही करता येते. परंतु अशी ही गणिती मूर्ती तयार करणे तसे सोपे नाही. अनेकदा बांधकाम क्षेत्रात वापरल्या जाणार्‍या संगणकीय आज्ञावलींबाबतीत असे म्हटले जाते की गार्बेज इन गार्बेज आउट, म्हणजे त्या संगणकाला विदा म्हणून कचरा (चुकीची माहिती) दिला, तर कचराच (चुकीची उत्तरे) बाहेर पडणार. यामुळे ही मूर्ती तयार करताना योग्य विदा पुरवला जात आहे किंवा नाही हे तपासणे महत्त्वाचे असते. इमारत बांधत असताना अभियंते अनेक प्रकारचे पदार्थ वापरीत असतात जसे स्टील, काँक्रिट, किंवा सिमेंट. अशा पदार्थांसंबंधी अभियंत्यांकडे काही विशिष्ट तांत्रिक माहिती उपलब्ध असते, पण ती माहिती तशी अपूर्णच किंवा तंतोतंत प्रत्यक्षाशी मेळ खाणारीच अशी नसते. ती त्या इमारतीचे एक त्या इमारतीच्या स्वभावाच्या सर्वसाधारणपणे जवळ जाईल असे चित्र उभी करू शकते पण पूर्णत्वे ती इमारत उभी करू शकत नाही. जितकी ही माहिती खऱ्‍या इमारतीसाठी वापरलेल्या पदार्थांचे, तसेच त्यातील विविध भागांच्या जोडणीचे प्रत्यक्षाजवळ जाईल असे चित्र उभी करू शकेल, तितक्या प्रमाणात ही मूर्ती पुढील विश्लेषणासाठी उपयुक्त ठरते. या बाबतीत निस्टच्या समितीस त्रास झाला असावा, असे समजण्यास जागा आहे. याचे कारण इमारत क्र. ७ पडल्यानंतर तेथील अवशेष आणि राख हे ताबडतोब दुसऱ्‍या ठिकाणी हलवण्यात आले. इमारत क्र. ७ मध्ये वापरलेल्या स्टीलवर वट्रेसें च्या इतर दोन इमारतींप्रमाणे ओळखीच्या खुणा नव्हत्या. त्यामुळे या इमारतीची ही गणिती मूर्ती तयार करत असताना प्रत्यक्ष स्टीलचा पुरावा म्हणून उपयोग करता आला नाही आणि अभियंत्यांना केवळ जुन्या कागदपत्रांवर, आराखड्यांवर आणि मुलाखतींवर अवलंबून राहावे लागले असावे असे वाटते.

 

पुढे: पृष्ठ २