वर्ल्ड ट्रेड सेंटर बिल्डिंग क्र. ७

चित्रा

पृष्ठ २

तपासप्रक्रिया आणि निष्कर्ष


वर्ल्ड ट्रेड सेंटर ७ चे ABC News वरील चित्र

या तपासात मुख्य महत्त्वाचे काम म्हणजे योग्य प्रश्न विचारणे. प्रश्न कोणता आणि कसा विचारला जातो यावर पुढच्या तपासाच्या गोष्टी अवलंबून राहतात. या समितीसमोरील महत्त्वाचा प्रश्न असा होता की ही इमारत का आणि कशी पडली? ह्याचाच अर्थ असा, आधी इमारत पडण्याच्या विविध शक्यतांचे संकलन करायचे (शब्दांत मांडायचे) हे प्रथम काम. आणि त्यानंतर त्यापैकी कुठची शक्यता ही प्रत्यक्षाजवळ नेते, हे विविध शक्यतांचे मूर्तीवर रोपण करून तिचा त्या प्रत्येक शक्यतेसंबंधी प्रतिसाद कसा असेल याची सूत्रे संगणकाच्या आधारे मांडून तपासून पहायचे. आणि यापैकी ज्या शक्यता या प्रत्यक्ष पुराव्यांशी मेळ खात नाहीत त्या दूर सारायच्या. उदा. जसे विविध मजल्यांवर लागलेल्या आगीचा परिणाम म्हणून पतनक्रियेचे (कोलॅप्स) विस्तारण (प्रोग्रेशन) होत होत इमारत कोसळली ही एक शक्यता होती, तर दुसरीकडे ज्वालाग्राही पदार्थांच्या साठ्यांना आग लागल्याने इमारत पडली अशी अजून एक शक्यता विचाराधीन होती. येथे आग हे एक प्रमुख कारण असल्याने आग, तिची तीव्रता, तिचे विविध वस्तूंवर होणारे परिणाम, घटनाक्रम, सुरूंगांमुळे होणारे स्फोट, आदी अनेक गोष्टींचे संगणकाद्वारे मूर्तीकरण (मॉडेलिंग) केले गेले.

फेटाळलेल्या शक्यता

वट्रेसें ७ मध्ये खालच्या मजल्यांवर इंधनाचे साठे होते. या इंधनांच्या साठ्यांना आग लागून इमारत पडली असती असा निष्कर्ष निघता, तर दोष आणि पुढील तपासाची तसेच सुचवण्यांची दिशा वेगळी झाली असती. पण या तपासाच्या दरम्यान काढण्यात आलेल्या निष्कर्षांप्रमाणे जर खालील मजल्यांवरचे हे इंधनाचे साठे जळले असते, तर त्यांच्यामुळे लागलेली आग सायंकाळपर्यंत टिकली नसती, धूर दिसला असता (जो दिसला नाही) आणि काही महत्त्वाचे उभे खांब (कॉलम) पडण्याइतकी तीव्र अशी ही आग नसती. यामुळे समितीने असा निष्कर्ष काढला की इमारत पडण्याचे कारण हे या इंधनांचे जळणे हे नव्हे.

याखेरीज ही इमारत गोंधळाचा फायदा घेऊन मुद्दाम कपटी हेतूने सुरूंग लावून पाडली असावी ही शक्यताही समितीने विचारात घेतली. ह्या शक्यतेचा विचार करण्यासाठी समितीवर अनेकांकडून दबावही आला असावा. पण समितीच्या म्हणण्याप्रमाणे असे सुरूंग लावले गेले असते तर तेथील महत्त्वाच्या खांबांना उद्ध्वस्त करण्यासाठी जेवढा कमीतकमी सुरूंग लागला असता, त्यामुळे निदान अर्ध्या मैलाच्या परिसरातील लोकांना जोरदार आवाज ऐकू गेला असता. असा आवाज ऐकू आल्याची साक्ष देणारे साक्षीदार आणि घटनास्थळी चित्रित केलेल्या ध्वनिफिती/चित्रफिती यांत असा आवाज न ऐकू आल्याने पुराव्यांअभावी समितीने या दगाबाजी किंवा कारस्थानी हेतूंनी ही इमारत पडण्याच्या शक्यतेस अमान्य केले.

या प्रकल्पात २०० तंत्रज्ञ सहभागी झाले होते. ८५ जण निस्ट या संस्थेतील तर इतर १२५ जण हे खाजगी क्षेत्र आणि शिक्षण संस्था यांच्यातर्फे काम पाहत होते. या सर्वांनी मिळून या प्रकल्पासाठी हजारो कागदपत्रे पालथी घातली, हजाराहून अधिक लोकांच्या मुलाखती घेतल्या, चलचित्रफितींचे ७००० तुकडे, ७००० छायाचित्रे तसेच स्टीलचे २३६ तुकडे यांचा अभ्यास केला असे सांगितले गेले आहे.

मग नक्की काय झाले असावे?

निस्टच्या समितीच्या मते ही इमारत पडण्याचे कारण असे आहे, की आग ही तत्कालिन कारणामुळे - म्हणजे मुख्य जलवाहिनीकडून होणारा पाणीपुरवठा थांबल्याने अनियंत्रित झाली आणि आगीच्या प्रभावामुळे पतनक्रियेचा जलदगतीने आणि मोठ्या प्रमाणावर एकाएकी विस्तार झाला. अनियंत्रित आगीच्या प्रभावामुळे हळूहळू मजल्यांचे अनेक भाग कमकुवत झाले, एकमेकांपासून सुटे झाले आणि शेवटी तुटले. एका बाजूला असलेल्या खांबाला लागून असलेला मजला असाच कमकुवत होऊन खाली दुसर्‍या मजल्यावर कोसळला. त्यामुळे कमकुवत झालेले खालचे काही मजले कोसळले. मजल्यांमुळे खांबांना एक प्रकारचा स्तरीय आधार (लॅटरल सपोर्ट) मिळतो. उभी उंच काठी जशी मधल्यामधे वाकवता येते त्याप्रमाणे अचानक मधील आधार एकाएकी नाहीसा झाल्याने एक महत्त्वाचा खांब वाकला. ह्या वाकण्याने त्याच्या आजूबाजूचा इतरही मजल्याचा भाग खाली कोसळला. आणि याच क्रियेचे विस्तारण होत इमारतीच्या आतील खांबही एकापाठोपाठ एक कोसळले, आणि सगळी इमारत काही क्षणांमध्ये जमीनदोस्त झाली. अशा प्रकारे अनियंत्रित आगीचा परिणाम म्हणून इतकी उंच इमारत जमीनदोस्त होण्याची ही पहिलीच वेळ असे सांगितले जाते. ह्या वेळी इमारतीच्या संगणकीय प्रतिमेतील भागांचा पडण्याचा क्रम आणि घटना स्थळी काढलेल्या घटनाक्रमाची चित्रफित यात साम्य असल्याने हीच पडण्याची क्रिया प्रत्यक्षात घडली असावी अशा निष्कर्षापर्यंत समिती आली.

पुढे काय?

निस्टच्या समितीचे निष्कर्ष हे अजूनही काही लोकांना पटलेले नसावे असे समजण्यास जागा आहे. परंतु समितीच्या कामावर टीका करणा‍ऱ्या लोकांनाही हे मान्य करावे लागेल की हे काम अत्यंत क्लिष्ट, वेळखाऊ आणि कठीण होते आणि त्यातून जे विचारमंथन पुढच्या दृष्टीने होते, तेही महत्त्वाचे आहे.

निस्ट समितीच्या मते सर्वच उंच इमारतींना असाच धोका आहे असे समजण्याचे कारण नाही. याचे कारण म्हणजे ज्या कारणास्तव ही इमारत जळली आणि जळत राहिली तशी परिस्थिती क्वचितच निर्माण होऊ शकते. अर्थात यामुळे बेसावध न राहता ह्या संधीचा फायदा घेऊन उंच इमारती भविष्यात अधिक सुरक्षित व्हाव्यात यासाठी निस्टच्या समितीने आंतरराष्ट्रिय बिल्डींग कोड (आयबीसी) मध्ये काही सुचवण्या केल्या आहेत, यापैकी काही मान्य केल्या गेल्या आहेत. जसे आग लागली असता इमारतीतून सुरक्षित बाहेर पडण्यासाठी सध्याच्या कायद्यात बदल करून एका अधिक मार्गाची व्यवस्था, इमारतीच्या जिन्याच्या रुंदीत ५०% वाढ, तसेच इमारतीत लावलेल्या अग्निविरोधक पदार्थाच्या अधिक कडक तपासण्या असे काही बदल आता २००९ च्या कोडमध्ये समाविष्ट झाले आहेत. आणि ही बदलाची प्रक्रिया अजून काही वर्षे चालू राहील असे वाटते आहे.