कुसुमाग्रज, शांताबाई आणि कालिदास

पृष्ठ २
 
आता कुसुमाग्रजांच्या अनुवादाला ही कसोटी लावू. थोडक्यात, त्यांनी अनुवादिलेल्या शब्दांची एक एकसंध रचना कशी बनते, व गाळलेले शब्द त्या रचनेच्या बाहेर कसे पडतात, ते पाहू. नीट पाहिल्यास लक्षात येईल, की हे गाळलेले शब्द श्लोकात वर्णिलेल्या घटनेचे तपशील सांगतात. म्हणजे श्लोकात एक घटना सांगितली आहे, की एका यक्षाला आपल्या सेवेत हलगर्जीपणा केल्यामुळे एक वर्ष घरापासून दूर राहण्याची शिक्षा मिळते. कुसुमाग्रजांनी केवळ प्रमादामुळे घरापासून वर्षभरासाठी दूर राहणारा यक्ष अनुवादात दाखवला आहे. शिक्षा कुणी दिली, शिक्षेचे इतर परिणाम काय झाले वगैरे तपशील त्यांनी वगळलेले आहेत. कुसुमाग्रजांच्या अनुवादातले इतर श्लोक पाहिले, तर त्यांनी बऱ्याच ठिकाणी असेच तपशील गाळलेले दिसतात. परंतू वर दिलेला श्लोक हा काव्याचा पहिला श्लोक असल्याने, त्याचे महत्त्व वेगळे आहे. काव्याच्या पहिल्या श्लोकात कथावस्तुचे निवेदन व पात्रपरिचय केला जातो, अशावेळी त्यातले तपशील गाळला तर त्याचे पडसाद पुढे पूर्ण काव्याच्या बांधणीवर पडतात.

असे असतानाही शब्द गाळण्याच्या कुसुमाग्रजांच्या निर्णयाचे कारण त्यांच्या एका लेखात सापडते. त्यात त्यांनी मेघदूताविषयी व त्यांच्या मेघदूताकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाविषयी लिहिले आहे. संस्कृत साहित्यशास्त्रानुसार मेघदूताला 'खंडकाव्य' मानले जाते. 'खंडकाव्य' म्हणजे 'महाकाव्या'चे छोटेखानी रुप! त्याची श्लोकसंख्या, कथेचा जीव, पात्रसंख्या सर्वच कमी असते. परंतू महत्त्वाची गोष्ट म्हणजे सबंध खंडकाव्य एका कथासूत्राने बांधलेले असते. मेघदूताची कथा इथे थोडक्यात सांगते. एक यक्ष एकदा आपल्या कामात मोठी चूक करतो. त्याची शिक्षा म्हणून त्याचा मालक कुबेर त्याला एक वर्ष तडीपार करतो. वर्षभरासाठी घरापासून व आपल्या प्रिय पत्नीपासून दूर रहावे लागल्याने यक्ष खूप व्याकुळ होतो व पहिल्या पावसाच्या पहिल्या मेघाला आपला दूत बनवून आपल्या पत्नीकडे आपला निरोप घेऊन धाडतो. आपल्या गावी जायचा रस्ता मेघाला सांगतो. अशी नाट्यपूर्ण कथा असली, तरीही मेघदूत वाखाणले जाते, ते त्यातील निसर्गाच्या रमणीय व कल्पक वर्णनांबद्दल! मेघदूताची पात्रसंख्या फारच लहान आहे- एक् यक्ष, मेघ आणि यक्षाची पत्नी. मेघदूताचा जीवही लहान, साधारण १२० श्लोकांचा फक्त. या लक्षणांनुसार मेघदूत हे खंडकाव्य ठरते.

परंतु कुसुमाग्रजांच्या मते मात्र मेघदूताला खंडकाव्य म्हणता येणार नाही, कारण त्याला कथाच नाही. जी काही कथेसदृश यक्षशापाची गोष्ट आहे, ती कालिदासाने पहिल्या श्लोकापुरतीच मर्यादित ठेवली आहे. पुढे त्या कथेकडे कालिदासाने शेवटच्या श्लोकांत सोडता निर्देश केलेला नाही. कुसुमाग्रजांच्या मते, खुद्द कालिदासालाही मेघदूतातून तेवढी कथाच फक्त सांगायची नव्हती. त्याला केवळ वेळोवेळी सुचलेल्या कल्पनांना शब्दरूप द्यायचे होते व पुढे अशा कडव्यांना एक निश्चित आकार मिळावा म्हणून त्यांना त्या कथेच्या सूत्रात बांधले, इतकेच! म्हणूनच कुसुमाग्रजांनीही त्या कथेला वाजवीपेक्षा अधिक महत्त्व न देता, सगळे लक्ष पहिल्या श्लोकातल्या काव्यात्मकतेकडे वळवले आहे. कथेच्या तपशीलांमधे शिरण्यापेक्षा श्लोकात वर्णिलेला मनोरम निसर्ग व त्याच्या पार्श्वभूमीवर नायकाची उदास मनस्थिती यांतला विरोधाभास टिपण्याला कुसुमाग्रजांनी प्राधान्य दिले आहे. हीच भूमिका त्यांनी अनुवादभर अंगिकारली आहे.

पुढे ते असेही म्हणतात, की मेघदूताला जर एखाद्या काव्यप्रकाराच्या चौकटीत बसवायचेच असेल, तर त्याला 'भावकाव्य' म्हणावे, कारण कालिदासाने त्यात श्लोकाश्लोकांतून भोवती निसर्गाचा चालणारा अद्भुत खेळ व तो पाहून मनात दाटून येणार्‍या भावभावना व कल्पना यांना मूर्तरूप दिले आहे. कुसुमाग्रजांच्या मते मेघदूतातला यक्ष म्हणजे स्वत: कालिदासच. कारण श्लोकांतून व्यक्त होणाऱ्या भावभावना त्याच्या स्वत:च्या आहेत. कालिदास हे संबंध काव्य प्रथम पुरुषातही लिहू शकला असता. (उदा.- मी मेघ पाहिला, मग मी त्याला बोलावले ... अशा प्रकारे) परंतु काव्य प्रथम पुरुषात लिहिणे हे त्याकाळच्या संकेतांना धरून नसल्याने त्याला तसे करता आले नाही, असे कुसुमाग्रजांचे म्हणणे. कुसुमाग्रज मेघदूताची तुलना उमर खय्याम यांच्या 'रुबायत' या ग्रंथाशी करतात. त्यांच्यासाठी रुबायांप्रमाणेच मेघदूतातला प्रत्येक श्लोक ही स्वतंत्र कविता आहे. म्हणूनच की काय, ते अनुवादित श्लोकांसाठी 'रुबाई'चाच साचा अनुसरतात. शिवाय एखाद्या श्लोकात आधीच्या श्लोकातील एखाद्या वस्तुचा / जागेचा संदर्भ सूचित केला असेल, तर अनुवादात तसे करणे कुसुमाग्रजांनी शक्यतो टाळलेले आहे. जेणेकरून प्रत्येक अनुवादित श्लोक हा स्वतंत्र कविता वाटावा व तो समजून घेण्यासाठी आधीचा अनुवादित श्लोक वाचण्याची गरज पडू नये. असे केल्याने कुसुमाग्रजांच्या अनुवादाला एक वेगळे वैशिष्ट्य प्राप्त झाले आहे. त्यांच्या अनुवादाचे कुठलेही पान मधेच उघडले आणि वाचायला सुरुवात केली तरी आधीचा श्लोक न वाचताही त्या श्लोकाचा आस्वाद घेता येतो.

याऊलट शांताबाईंनी मात्र मेघदूताला 'खंडकाव्य' मानले जाण्याबद्दल आक्षेप व्यक्त केलेला दिसत नाही. त्यांच्याकरता मेघदूत हे एक कथासूत्रात बांधले गेलेले काव्य आहे हे काही गोष्टींवरून सहज दिसून येते. उदा.- मेघदूताच्या श्लोकांच्या खर्‍या क्रमाबद्दल बरेच मतभेद आहेत. काही विद्वान मेघदूताचे श्लोक ज्या क्रमात प्राचीन हस्तलिखितांतून सापडतात, तोच क्रम योग्य मानतात. तर इतर काही विद्वान काही विशिष्ट श्लोकांचा क्रम एका विशिष्ट प्रकारे बदलून निर्माण झालेला वेगळा क्रम योग्य मानतात. त्यांच्या मते त्या क्रमात श्लोक वाचल्यास त्यांचा अर्थ अधिक चांगल्या रीतीने स्पष्ट होतो, कारण ते श्लोक समजण्यासाठी आवश्यक ते संदर्भ त्या विशिष्ट क्रमातच उलगडत जातात. शांताबाईंनी श्लोकांचा हा दुसरा - श्लोकांच्या आशयाला व कथेच्या प्रवाहाला पूरक क्रम अनुसरला आहे. कुसुमाग्रज मात्र मूळ श्लोकक्रमाचेच पालन करतात, कारण त्यांच्या मतानुसार दोन श्लोकांत काहीच संबंध नाही, तेव्हा त्यांचा क्रम बदलल्याने काहीही फायदा किंवा तोटा होत नाही.

दुसरी एक गोष्ट म्हणजे, शांताबाईंचा अनुवादासाठी वापरलेला साचा हा रुबायांसारखा प्रत्येक श्लोकाची स्वतंत्रता अधोरेखित करणारा नसून, साध्या कवितेच्या कडव्यांसारखा कवितेची एकसंधता सूचित करणारा आहे.

आधी म्हटल्याप्रमाणे शांताबाईंनी अनुवाद करताना मूळ श्लोकांतील शब्द, त्यांचे वाक्यातील स्थान, आशय व तत्कालीन संदर्भ यांना महत्त्व दिले आहे. त्यामुळे मेघदूतात जे जे काही वर्णन केले आहे, त्याचा बराच मोठा अंश शांताबाईंच्या अनुवादात येतो. त्यांनी फार कमी शब्द / संदर्भ गाळलेले आहेत. याकरता शांताबाईंना सलाम; कारण एका अभिजात काव्यातील शब्दन् शब्द त्याच्या अर्थाच्या व संदर्भांच्या कंगोर्‍यांसहित, त्याच्या आशयाला मुळीच धक्का न देता, काव्यात्मक रीतीने कवितेतून मांडणे, याला अनन्यसाधारण प्रतिभा लागते.

आणखी एक रोचक गोष्ट म्हणजे, दोन्ही अनुवादांत वापरलेली वृत्ते. मूळ मेघदूतात 'मंदाक्रांता' नावाचे अक्षरगणवृत्त वापरले आहे. कुसुमाग्रजांनी माझ्या माहितीप्रमाणे 'साकी' नावाचे मात्रावृत्त वापरले आहे. अनुवादासाठी मात्रावृत्त वापरणे केव्हाही चांगलेच! कारण त्यामुळे लघु-गुरूची जाचक चौकट नसूनही मात्रांत बांधलेली सुंदर, लयबद्ध रचना करता येते. 'साकी' या वृत्तात लागणार्‍या मात्रांची संख्या व 'मंदाक्रांता' या वृत्तातील मात्रांची संख्या सारखीच, म्हणजेच २७ इतकी आहे. एक मात्रा म्हणजे एखादा नाद उच्चारण्यासाठी लागणारा विशिष्ट कालावधी. केवळ व्यंजन उच्चारण्यासाठी अर्धी मात्रा, एखादा लघु (र्‍हस्व) स्वर उच्चारण्यासाठी एक मात्रा, तर एखादा गुरू (दीर्घ) स्वर उच्चारण्यासाठी दोन मात्रा एवढा कालावधी लागतो. थोडक्यात, वृत्तबद्ध कवितेचा प्रत्येक चरण म्हणायला विशिष्ट कालावधी लागतो. 'मंदाक्रांता' आणि 'साकी' यांची मात्रासंख्या सारखीच असल्याने मेघदूत व कुसुमाग्रजांचा अनुवाद या दोन्हींत प्रत्येक ओळ उच्चारण्यासाठी सारखाच कालावधी लागतो. परंतु मेघदूतात ओळींतील लघु-गुरूंचा एक विशिष्ट क्रम आहे, तर साकीत तसे बंधन नसल्याने तेवढ्याच कालावधीच्या चौकटीत राहूनही कुसुमाग्रजांना अनुवाद करण्यासाठी तुलनेने अधिक स्वातंत्र्य मिळते.

शांताबाईंनी सुद्धा मात्रावृत्तच वापरले आहे. त्यांनी वापरलेल्या वृत्ताचे नाव पादाकुलका. परंतु या वृत्तात मात्रासंख्या होते ३२. म्हणजे मंदाक्रांता व साकीच्या मात्रासंख्येहून अधिक. मूळ श्लोकाच्या वृत्ताहून अधिक मात्रासंख्या असलेले वृत्त अनुवादासाठी वापरणे ही शांताबाईंच्या अनुवादाची गरज होती. कारण त्यांना मेघदूतातील प्रत्येक बारीकसारीक तपशील अनुवादात टिपायचा होता. तसे करायचे असल्यास मूळ श्लोकाच्या वृत्ताच्या कालावधीतच, तितक्याच मात्रासंख्येत ते संपादन करणे कठीण. म्हणून अधिक मात्रासंख्या असलेले वृत्त निवडले, ज्यायोगे अधिक व्यंजने व स्वर वापरून शब्दसंख्या वाढवता येईल व ठरवलेल्या चौकटीत मेघदूतातील जास्तीत जास्त भागाचा अनुवाद करता येईल. याउलट कुसुमाग्रज बरेच तपशील गाळणार असल्यामुळे त्यांना तेवढ्याच मात्रासंख्येत रचना करणे जमण्यासारखे होते.

अशाप्रकारे दोन्ही अनुवादांची एकमेकांशी व मेघदूताशी तुलना केल्यास लक्षात येते की दोन्ही अनुवाद मेघदूताला सारखेच जवळचे असले तरी एकमेकांहून पूर्णतया भिन्न आहेत, कारण दोन्ही अनुवादकांचे अनुवादामागचे हेतू भिन्न आहेत. एकाला मेघदूतातील काव्यात्मकता पकडायची आहे तर दुसर्‍याला त्यातला आशय. अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर, अनुवाद करताना दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात- १- काय सांगितले आहे. २- त्यातून लेखकाला काय सांगायचे आहे. शांताबाई व कुसुमाग्रज या दोघांनीही या दोन्ही गोष्टी अनुवादात पकडायचा प्रयत्न केला असला, तरी शांताबाईंनी त्यांतल्या पहिल्या गोष्टीला झुकते माप दिले आहे, तर कुसुमाग्रजांनी दुसरीला!

पण म्हणून अमुक एकाचाच अनुवाद चांगला, तमुकच वाईट; असे मुळीच नाही. प्रत्येक अनुवादाचे यशापयश हे अनुवादकाने स्वत:समोर ठेवलेल्या ध्येयाप्रत तो कितपत पोहोचू शकला यावरून ठरवायचे असते. माझ्यामते हे दोघेही अनुवाद आपापल्या जागी अत्यंत सुंदर आहेत, कारण त्यांच्या अनुवादकांनी ठरवल्याप्रमाणेच ते अनुवाद उतरले आहेत. त्या ध्येयांनुसार त्यांचा वाचकवर्गही वेगवेगळा आहे. शांताबाईंचा अनुवाद हा संस्कृत किंवा प्राचीन भारतीय समाजाच्या अभ्यासकांसाठी मूळ मेघदूत वाचण्यापूर्वीची पहिली पायरी आहे, तर कुसुमाग्रजांचा अनुवाद हा काव्यप्रेमींसाठी मेघदूताचा मायबोलीतून आस्वाद घ्यायचे एक साधन आहे.

थोडक्यात काय, तर जर कोणी मला विचारले, या दोन्हींपैकी तुझा आवडता अनुवाद कोणता? तर माझं उत्तर असेल- 'दोन्ही!'