पृष्ठ १
जगातल्या अनेक साहित्यकृतींचे एकाहून अधिक भाषांत अनुवाद झालेले आहेत. त्यातील काहींचे तर एकाच भाषेत वेगवेगळ्या कालखंडांत वेगवेगळे अनुवाद झाले आहेत. उदाहरणार्थ मेघदूत, 'कविकुलगुरू' कालिदासाने इ.स. ४थ्या शतकाच्या आसपास संस्कृत भाषेत रचलेले अभिजात काव्य. अनेक आधुनिक भारतीय भाषांतच नव्हे, तर काही परदेशी भाषांतही मेघदूताचे अनुवाद केले गेले आहेत. एकट्या मराठीतच मेघदूताचे डझनभर अनुवाद आहेत. अर्थात, मेघदूताचे महत्त्वही तितकेच मोठे आहे. मेघदूत लिहिले गेल्यावर ते इतके प्रसिद्ध व लोकप्रिय झाले, की त्याकाळच्या इतर कवींनीही कालिदासाचे अनुकरण करायला सुरुवात केली आणि दूतकाव्यांची एक लाट आली. संस्कृत काव्यांचा काळ संपला पण मेघदूताची जनमानसावरची मोहिनी काही संपली नाही. वेगवेगळ्या देशांतल्या, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या अनुवादकांकडून आजवर झालेले मेघदूताचे अगणित अनुवाद त्याची साक्ष देतात.
एकाच साहित्यकृतीचे दोन अनुवाद पाहिले की वाटते, त्यांत फरक असून असून कितीसा असणार? शेवटी आशय तर एकच आहे, तो आशय एकाच भाषेत लिहून लिहून किती वेगवेगळ्या शब्दांत लिहिणार? परंतु वास्तव परिस्थिती मात्र काही वेगळेच दर्शवते. उदाहरणार्थ, मेघदूताचे सर्वच मराठी अनुवाद वैविध्यपूर्ण आहेत. सी. डी. देशमुखांचा अनुवाद समछंदी आहे तर वसंत बापटांचा मुक्तछंदात आहे. कुसुमाग्रजांचा अनुवाद १९५६ सालचा आहे तर शांताबाईंचा अनुवाद १९९४चा. वृत्त आणि निर्मितीचा काळ हे दोन्ही अनुवादांच्या बाबतीतले महत्त्वाचे घटक असले, तरीही दोन काव्यानुवादांतला फरक केवळ त्यापुरताच सीमित नसतो. अनुवादकाची पार्श्वभूमी, संवेदनशीलता, प्रतिभा, अनुभवविश्व, त्या साहित्यकृतीकडे पाहण्याचा स्वतंत्र दृष्टीकोन या सर्वांचेच प्रतिबिंब त्याच्या अनुवादात पडते व परिणामी इतर अनुवादांपेक्षा त्याचा अनुवाद वेगळा होतो. कुसुमाग्रज आणि शांताबाईंनी मेघदूताच्या केलेल्या अनुवादांची जेव्हा मी तुलना केली, तेव्हा ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली.
या दोघांच्या साहित्यिक व शैक्षणिक पार्श्वभूमीची तुलना करता लक्षात येते, की दोघांपैकी केवळ शांताबाईंनाच साहित्यकृतींच्या अनुवादाचा मोठा अनुभव होता. त्यांनी आसामी, जपानी, बंगाली, हिंदी, इंग्रजी अशा विविध भाषांतील काव्यांचे मराठीत अनुवाद केले होते. याखेरीज त्यांनी आपले पदवीचे व पदव्युत्तर शिक्षण संस्कृत साहित्य हा विषय घेऊन पूर्ण केले होते. याचा अर्थ असा नव्हे की कुसुमाग्रजांना संस्कृत येत नव्हते किंवा त्यांनी कधीच अनुवाद केले नव्हते. पण या दोन्ही बाबतींत शांताबाईंना त्यांच्याहून अधिक अनुभव होता, हे मात्र नक्की.
या सर्वांचे पडसाद उमटले ते अनुवादात. शांताबाईंनी अनुवादाच्या वेळी प्राधान्य दिले ते कालिदासाच्या शब्दांना व त्याने वापरलेल्या त्याकाळच्या सामाजिक संदर्भांना. याउलट कुसुमाग्रजांनी शब्दांवर व संदर्भांवर भर न देता, त्यांतून व्यक्त होणार्या काव्यावर आपले लक्ष केंद्रित केले.
म्हणजे काय, ते कळण्यासाठी पुढील श्लोक व अनुवाद पाहू.
शापेन अस्तंगमितमहिमा४ वर्षभोग्येण५ भर्तु:|
यक्ष:६ चक्रे जनकतनयास्नानपुण्योदकेषु७
स्निग्धच्छायातरुषु८ वसतिं रामगिर्याश्रमेषु९||
- मूळ मेघदूतातला पहिला श्लोक
पत्नीच्या विरहामुळे दु:सह झालेल्या; ५- वर्षभरासाठी भोगावयाच्या ;
भर्तु: शापेन- मालकाच्या शापाने; ४- सर्व अतिमानवी शक्ती नष्ट झालेला
; ६- यक्ष; ७- सीतेने स्नान केल्याने पवित्र झालेले पाणी / तलाव असलेल्या
; ८- दाट सावली देणार्या वृक्षांनी वेढले गेलेल्या; ९- रामगिरीवरील
आश्रमांत; वसतिं चक्रे- वसती करता झाला .
घन वृक्षावळ वितरी शीतल तीरावर सावली
रामगिरीवर यक्ष वसे त्या शापांकित होऊनी
वर्षाचा निर्वास ललाटी- विव्हल विरहानली
- कुसुमाग्रजांनी केलेला वरील श्लोकाचा अनुवाद
प्रियावियोगे अधिकच दु:सह वर्षाचा त्या शाप मिळाला
जनकसुतेच्या स्नानांयोगे पावन झाले जिथें जलाशय
घनच्छाय त्या रामगिरीवर विविध आश्रमीं घेई आश्रय
- शांताबाईंनी केलेला वरील श्लोकाचा अनुवाद
शाब्दिक पातळीवर विचार करता लक्षात येते, की शांताबाईंनी मूळ श्लोकातला 'अस्तंगमितमहिमा' हा शब्द सोडता इतर प्रत्येक शब्दाचा अनुवाद केला आहे. कुसुमाग्रजांनी मात्र कश्चित् , स्वाधिकारात्प्रमत्त:, अस्तंगमितमहिमा, भर्तु:, आश्रमेषु असे तब्बल ५ शब्द अनुवादातून वगळले आहेत. 'अस्तंगमितमहिमा' गाळण्यासाठी शांताबाईंकडे चपखल प्रतिशब्द नसल्याचे किंवा प्रतिशब्द वृत्तात बसत नसल्याचे कारण होते. पण कुसुमाग्रजांनी जे शब्द गाळले आहेत, त्यांचे स्वरूप पाहता ही कारणे त्यांना लागू होणार नाहीत. अशा अनुवादांवर साधारणपणे मूळ साहित्यकृतीशी अप्रामाणिक असा शिक्का बसतो. पण आपण जरा वेगळ्या दृष्टीकोनातून पाहू-
पूर्वपक्ष- अनुवादकाने मूळ साहित्यकृतीतील प्रत्येक शब्दाचा व अर्थाचा अनुवाद करायला हवा; फारच अशक्य असल्यास एखादा शब्द सोडणे क्षम्य आहे, पण इतके शब्द गाळणे योग्य नाही.
उत्तरपक्ष- मूळ साहित्यकृतीतला एखादा शब्द गाळला तर काय होते?
पूर्वपक्ष- शब्दासोबत त्याचा अर्थही गाळला जातो.
उत्तरपक्ष- अर्थ गाळला गेला तर काय होते?
पूर्वपक्ष- तो शब्द ज्या वाक्यात/ साहित्यकृतीत आहे, तिचा नीट अर्थ लागत नाही.
उत्तरपक्ष- पण समजा, एकूण साहित्यकृतीचा अर्थ उमगण्यासाठी एखाद्या विशिष्ट शब्दाचा किंवा त्याच्या अर्थाचा फारसा उपयोग नसेल तर? मग तो शब्द गाळला तर काय फरक पडेल?
पूर्वपक्ष- ह्म्म्म्म्...
यातून दुसरा प्रश्न निर्माण होतो.
पूर्वपक्ष- एखादा शब्द व त्याचा अर्थ महत्त्वाचा आहे किंवा नाही, हे कसे ठरवणार?
उत्तरपक्ष- साहित्यकृती ही एखाद्या नक्षीदार कापडासारखी असते. कापडावर आखून घेतलेल्या भागात कलाकुसर केलेली असते व उरलेला भाग मोकळा ठेवलेला असतो. अशावेळी मोकळ्या भागात एखादे भोक पडले, तर ते तितकेसे नजरेत भरत नाही व ते झाकूनही टाकता येते. परंतू नक्षीतच भोक पडले, तर त्या नक्षीचे व परिणामी त्या संपूर्ण कापडाचेही सौंदर्य कमी होते. त्याचप्रमाणे कोणत्याही साहित्यकृतीत, विशेषत: काव्यांमधे, प्रत्येक शब्दाला वाक्यात एक विशिष्ट स्थान असते, त्याचे एक विशिष्ट कार्य असते. त्या शब्दाने त्या वाक्याचा, काव्याचा अर्थ व संदर्भ परिपूर्ण होत असतो. तो शब्द तिथून हलवला किंवा काढून टाकला तर सबंध वाक्य, किंवा काही वेळा तर सबंध काव्यही निरर्थक, संदर्भहीन, सौंदर्यहीन होण्याचा धोका असतो. त्यामुळे अनुवाद करताना एखाद्या शब्दाचा अनुवाद न करण्याचा निर्णय घेणे जोखमीचे असते. म्हणजेच एखादा शब्द महत्त्वाचा आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी आधी साहित्यकृतीतल्या अर्थाच्या, अलंकारांच्या छुप्या नक्षीदार रचना शोधून काढायला हव्यात. मग तो विशिष्ट शब्द त्या रचनेचा एक भाग आहे, की त्या रचनेच्या बाहेर आहे, हे समजून घ्यायला हवे. जर तो त्या रचनेचा भाग असेल, तर तो शब्द महत्त्वाचा आहे व गाळून चालणार नाही, अन्यथा चालेल.
पुढे: पृष्ठ २