यंत्रे तयार करणारी यंत्रे - १

आनंद घारे

कापड, भांडी, कागद वगैरे साध्या गोष्टींपासून ते फ्रिज, टीव्ही, काँप्यूटर वगैरेपर्यंत घरात, ऑफिसात किंवा दुकानात आजकाल दिसणार्‍या बहुतांश वस्तू निरनिराळ्या यंत्रांद्वारे कारखान्यांमध्ये निर्माण केलेल्या असतात. त्या कारखान्यांमधली ही यंत्रे कशा प्रकारची असतात, ती कशी चालतात, वगैरेंबद्दल सर्वसामान्य माणसांना काही कल्पना नसते. त्याच्याही पलीकडे जाऊन ही यंत्रे कशी निर्माण केली जात असतील हा विचार सहसा कोणाच्याच मनात येत नसेल.

 
भाग १

कापड, भांडी, कागद वगैरे साध्या गोष्टींपासून ते फ्रिज, टीव्ही, काँप्यूटर वगैरेपर्यंत घरात, ऑफिसात किंवा दुकानात आजकाल दिसणार्‍या बहुतांश वस्तू निरनिराळ्या यंत्रांद्वारे कारखान्यांमध्ये निर्माण केलेल्या असतात. त्या कारखान्यांमधली ही यंत्रे कशा प्रकारची असतात, ती कशी चालतात, वगैरेंबद्दल सर्वसामान्य माणसांना काही कल्पना नसते. त्याच्याही पलीकडे जाऊन ही यंत्रे कशी निर्माण केली जात असतील हा विचार सहसा कोणाच्याच मनात येत नसेल. पण मला मात्र लहानपणापासून अशा प्रकारचे खूप कुतूहल होते. साबण, बल्ब, चमचा असल्या रोजच्या वापरातल्या वस्तू कशापासून आणि कशा तयार करतात असले प्रश्न विचारून मी मोठ्यांना भंडावत असे. कारखान्यांमध्ये त्यांची मशिने असतात असे मोघम उत्तर मिळे. मशीन किंवा यंत्र म्हणजे काही तरी अगडबंब धूड असेल, खडखडाट करीत वेगाने फिरणारी अनेक चक्रे त्यात असतील, त्यातून धूर, वाफ, उग्र वास असे काही भयानक निघत असेल आणि त्याच्या जवळ गेल्यास आपल्याला कदाचित दुखापत होईल, चटका बसेल, कपडे तर नक्कीच घाण होतील असा सार्वत्रिक समज होता. त्यामुळे शहाण्या माणसाने कसल्याही प्रकारच्या यंत्राच्या जवळपास फिरकू नये असे लोकांना वाटत असे. त्या काळात घड्याळ, रेडिओ वगैरेंची गणना 'यंत्र' या सदरात केली जात नव्हती. त्यांच्याखेरीज आमच्या घरात आपल्या आप चालणारे कोणतेही यंत्र नव्हते. साधा विजेचा पंखासुध्दा नव्हता. मिक्सर, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, वगैरेंतले काहीसुध्दा ठाऊक नव्हते. पिठाची गिरणी हे माझ्या पाहण्यातले एकमेव 'यंत्र' होते. त्या चक्कीतून भुरूभुरू निघणा-या पिठाप्रमाणेच साखरेचे दाणे, साबणाच्या वड्या, पेन्सिली, ताटे, वाट्या वगैरेसुध्दा त्यांच्या त्यांच्या यंत्रांमधून बदाबदा खाली पडत आहेत असे एक काल्पनिक दृष्य त्या वेळी माझ्या डोळ्यासमोर येत असे. ते तसे अगदीच चुकीचे नव्हते. लहानपणी कोठलेही यंत्र जवळून पाहिलेले नसतांनातासुध्दा कुतूहलापोटी माझ्या मनात यंत्रांच्याबद्दल ओढ निर्माण झाली होती. सुदैवाने मला पुढील आयुष्यात अनेक प्रकारची अद्ययावत यंत्रे पहायला मिळालीच, पण तशी खास यंत्रे तयार करवून घेणे हेच माझे मुख्य काम झाले. त्यामुळे यंत्रे तयार करणा-या यंत्रांची ओळख झाली आणि गट्टी जमत गेली.


यंत्रांचे विविध प्रकार

आजकाल जन्माला येण्याच्या आधीपासून बालकाची सोनोग्राफीने तपासणी होणे सुरू होते. आरोग्याचे परीक्षण, विकाराचे निदान आणि त्यावर वैद्यकीय उपचार करण्यासाठी आता यंत्रांची मदत घेतली जातेच, चांगले आरोग्य राखण्यासाठी व्यायामसुध्दा जिममधील यंत्रांच्या सहाय्याने केला जातो. आवश्यकता पडल्यास कृत्रिम श्वासोच्छ्वास, रक्ताभिसरण आणि रक्ताचे शुध्दीकरण यांच्यासाठीसुध्दा यांत्रिक सोयी उपलब्ध झाल्या आहेत. अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा आणि शिक्षण, प्रवास, कला, क्रीडा, मनोरंजन वगैरे सर्वच बाबतींतील असंख्य प्रकारच्या वस्तू आणि सेवा पुरवण्यासाठी आज यंत्रांचा उपयोग केला जातो. पाणी आणि हवा या नैसर्गिक गोष्टीसुध्दा आपल्याला हव्या तशा मिळवण्यासाठी आता यंत्रांची कास धरली जाते. मुठीत धरता येण्याजोग्या घड्याळापासून ते प्रचंड इमारतींच्या बांधकामाच्या जागी दिसणार्‍या अगडबंब जायंट क्रेन्सपर्यंत अनेक प्रकारची आणि विविध आकारांची यंत्रे आता आपल्याला जाता येता दिसत असतात.

साखरेच्या कारखान्यात उसापासून साखर तयार होईपर्यंत अनेक प्रक्रिया केल्या जातात. उसाचे मोठेमोठे तुकडे होतात, त्यांचे बारीक तुकडे करून त्यांना चेचून त्यातला रस बाहेर काढतात, रस आणि चोथा वेगळा करतात, उसाच्या रसात काही रसायने मिसळून त्यांना वेगाने घुसळल्यावर त्यातून मळी बाहेर निघते. स्वच्छ रस तापवून त्यातल्या पाण्याची वाफ करून तिला वेगळे करतात आणि अखेरच्या टप्प्यात त्या दाट झालेल्या द्रावापासून साखरेचे दाणे तयार होऊन घरंगळत बाहेर पडतात. या सगळ्या प्रक्रिया अनेक टप्प्यांमध्ये केल्या जातात आणि त्यासाठी निरनिराळ्या प्रकारची यंत्रे लागतात. शिवाय मागील टप्प्यावरून पदार्थ पुढील टप्प्याकडे वाहून नेण्याचे कामसुध्दा खास यंत्रांकरवीच (कन्व्हेयर्सने) केले जाते. या सगळ्या प्रकारच्या यंत्रांची निर्मिती करण्याचा एक मोठा उद्योग उभा राहिला आहे. या उद्योगातील यंत्रांना मशीन टूल्स असे म्हणतात.

१ |