संकीर्ण

धनंजय वैद्य, मन

काहीतरी'च' काय?

धनंजय वैद्य

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळीचा किस्सा आहे. "मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे" मागणीबाबत यशवंतराव चव्हाणांनी म्हटले, "तुमच्या वाक्यातला 'च' काढून टाका." त्यावर आचार्य अत्र्यांनी जवाब दिला "चव्हाणांच्या नावातून 'च' काढून टाकला तर?" शब्दाच्या अंतर्गतच्या 'च'चा अर्थ आणि शब्दाच्या शेवटी जोडलेल्या 'च'चा अर्थ वेगळाच असतो, हे जाणवून तो विनोद आपल्याला मजेदार वाटतो. पण या शब्दाला 'च' जोडण्याचा अर्थ आहे तरी काय?

"च" (संस्कृतात "एव") हा "निपात" आहे. निपात तार्किक कारके (="लॉजिकल ऑपरेटर") असतात. "च" जर क्रियापदाला जोडला, किंवा नामाला-विशेषणाला जोडला, तर त्याचे तर्कशास्त्रीय भाषेत भाषांतर वेगवेगळे होते. (पुढील विवेचन नागेशभट्टाच्या परमलघुमंजूषेचा आधार घेऊन लिहिलेले आहे.)

"देखणी मुलगी आज आली" या वाक्यात वेगवेगळ्या अवयवांना "च" जोडून होणारे अर्थ बघितले, तर तार्किक कारक कुठले ते कळते :

१. देखणीच मुलगी आज आली.
अर्थ : देखणी मुलगी आज आली + देखणी-पेक्षा-वेगळी मुलगी आज आली ही शक्यता मनात आणून त्या शक्यतेचे खंडन.

२. देखणी मुलगीच आज आली.
अर्थ : देखणी मुलगी आज आली + देखणी-मुलगी-पेक्षा-वेगळी व्यक्ती आज आली ही शक्यता मनात आणून त्या शक्यतेचे खंडन.

३. देखणी मुलगी आजच आली.
अर्थ : देखणी मुलगी आज आली + देखणी मुलगी आजपेक्षा वेगळ्या दिवशी आली ही शक्यता मनात आणून त्या शक्यतेचे खंडन.

४. देखणी मुलगी आज आलीच.
अर्थ : देखणी मुलगी आज आली + देखणी मुलगी आज आली नाही ही शक्यता मनात आणून त्या शक्यतेचे खंडन. (१, २, ३ मध्ये "+"नंतरचे विधान द्विरुक्तीचे नव्हे, पण ४ मधील द्विरुक्तीचे आहे. क्रियापदाला "च" लावण्यात हा तार्किक फरक आहे. द्विरुक्तीने जोर येतो, हे त्या "च"चे प्रयोजन आहे.)

(नकारार्थी वाक्यात) :
५. देखणी मुलगी आज आलीच नाही.
अर्थ : देखणी मुलगी आज आली नाही + देखणी मुलगी आज आली ही शक्यता मनात आणून त्या शक्यतेचे खंडन. ("+' नंतरच्या विधानात नवीन माहिती नाही, पण जोर येतो. खुद्द वक्त्याची अपेक्षा होती, पण ती भंग पावली, असा भाव व्यक्त होतो.)

६. देखणी मुलगी आज आली नाहीच.
अर्थ : देखणी मुलगी आज आली नाही + देखणी मुलगी आज आली ही शक्यता दुसर्‍या संवादकाने व्यक्त केली असते, किंवा दुसर्‍या संवादकाची तशी धारणा असल्याचे वक्त्याला माहीत असते, त्या शक्यतेचे थेट आणि जोरदार खंडन.

याच प्रकारे "देखणीच मुलगी आज आली नाही"-> देखणीपेक्षा वेगळी मुलगी आली; "देखणी मुलगीच आज आली नाही"-> देखणी-मुलगी-वेगळी-वक्ती आज आली; "देखणी मुलगी आजच आली नाही"-> देखणी मुलगी आजपेक्षा वेगळ्या दिवशी आली... अर्थाचा तार्किक विस्तार केला तर हे आशय कसे समजतात ते स्पष्ट होते.

"काहीतरी" आणि "काहीतरीच!" यांच्या अर्थांतला फरक आता कळलाच असेल

तुम्हाला हे ठाऊक आहे का?

मन

१९४८ला स्थापना झाल्यापासून १९७४ पर्यंत इस्राइल ह्या देशाला चार पंतप्रधान लाभले. मात्र १९७४ला प्रथमच पंतप्रधान बनणारे यित्झॅक राबीन हे पहिलेच स्थानिक ज्यू(इस्राइल मध्ये जन्म झालेले) होते. त्यापूर्वीचे सर्व पंतप्रधान मूळचे रशिया किंवा तुर्कस्थानी साम्राज्यातल्या भागातून आलेले होते. म्हणजे जवळजवळ पहिली पंचवीसेक वर्षे इस्राइली शासन प्रमुख हा स्थलांतरित होता, स्थानिक नाही. ही जगातली एकमेव घटना असावी.

जगातील पहिल्या तीन महिला पंतप्रधान असणारे देश आशियाई होते. १९६० ला सिरिमओ बंदरनायके श्रीलंकेत, १९६७ ला इंदिरा गांधी भारतात तर गोल्डा मेयर १९६९ नध्ये इस्राइलला सत्तेत आल्या.

सर्वात जुनी विद्यमान लोकशाही म्हणवल्या जाणाऱ्या आणि १९व्या व २० व्या शतकातील महासत्ता असणाऱ्या ब्रिटनमध्ये लोकशाही जरी सातेकशे वर्षे जुनी असली, तरी महिलांना मताधिकार १९१८ नंतर म्हणजे केवळ मागच्या ऐंशी एक वर्षातच मिळाला. तो पर्यंत जवळपास ५०% जनतेला, महिलांना मताधिकारच तिथे नव्हता.

आधुनिक जगातील सर्वात जुनी विद्यमान लोकशाही ज्या देशाची आहे, त्याच देशाचे राजघराणे हे आजही कायम आहे, जगातील सर्वात जुने राजघराण्यांपैकी एक म्हणून. इंग्लंडचे राजघराणे ९२५मध्ये सत्तेत आले, ते आजतागायत हजार वर्षाच्या वरही कायम आहे.

मंगोल आक्रमण व सत्ता ह्या सर्वाधिक हिंस्र/क्रूर सत्तांपैकी एक म्हणून इतिहासात गणल्या गेल्या. १२१९ ते १२२१ च्या दरम्यान (तिमुजीन)चंगीझ खानाने तत्कालीन इराणी साम्राज्य म्हणवल्या जाणाऱ्या ख्वुरेज़्मी सत्तेवर हल्ला करून ती नष्ट केली.

त्यानंतर काही वर्षातच इराणमध्ये दीर्घकाळ वास्तव्यास असणाऱ्या चंगीझ च्या नातवाने १२५० च्या आसपास पुन्हा नृशंस नरसंहार मांडला. जवळपास निम्म्याहून अधिक स्थानिक पर्शियन साम्राज्यातले नागरिक मारले गेले. ही मनुष्यहानी इतकी होती की पुन्हा मंगोल-पूर्व लोकसंख्येचा आकडा गाठायला त्यांना विसाव्या शतकाचा मध्य उजाडावा लागला! मध्ययुगातून अर्वाचीन काळात येताना बहुसंख्य मानवसमुहांची जनसंख्या सतत वाढत गेलेली दिसते. (उदा:- चीन, भारत, युरोपातील प्रमुख देश) लोकसंख्या मूळ पदावर येण्यास सातेकशे वर्षे ही ह्या ज्ञात जगातील एकमेव घटना म्हणता यावी.

एखाद्या अणुस्फोटाने झाला नसेल एव्हढा नरमेध केवळ तलवारीच्या जोरावर करण्यात आला. ह्याची तुलना केवळ दुसर्‍या महायुद्धादरम्यान नाझींनी केलेल्या ज्यूंच्या हत्याकांडाशीच होउ शकेल.

जगाची धार्मिक विभागणी आज आपल्याला दिसते तशीच ती मध्ययुगात नव्हती. युरोप हे प्रामुख्याने ख्रिश्चनच असेल आणि तुर्कस्थान व लगतचा मध्यपूर्वेचा भूभाग प्रथमपासूनच मुस्लिमबहुल असेल असे वाटू शकते. पण अवघ्या साडेचारशे वर्षापूर्वीपर्यंत युरोपमधील स्पेन व पोर्तुगाल ह्या प्रमुख देशांवर मुस्लिम सत्ता होती! आठव्या शतकापासून ते पंधराव्या शतकाच्या मध्यापर्यंत म्हणजे सलग सातशे वर्षे ह्या देशातला बराचसा भूभाग अल-अंदालुस ह्या नावाने मूर सत्तेचा किंवा उमय्याद-अब्बासिद खलिफांच्या साम्राज्याचा भाग होते. १४९२ ला आज नकाशात दिसतात त्यासारखी स्पेन-पोर्तुगाल ही ख्रिश्चन राष्ट्रराज्ये(nation states) बनली.

तुर्कस्थान आणि तिथला पहिल्या महायुद्धापर्यंतचा खलिफा/ ऑटोमन तुर्कांचे साम्राज्य ह्याबद्दल आपण खिलाफत चळवळीच्या निमित्तानं ऐकलेलं असतं. ऑटोमन तुर्कांच्या राज्यातला तुर्कस्थान हा इस्लामच्या उदयापाठोपाठ सगळ्या मध्यपूर्वेसमवेत, अरब जगतासमवेत सातव्या आठव्या शतकातच तुर्कस्थानही मुस्लिम झालाय असे आपणास वाटू शकेल. पण थांबा.....

इ स १४५३ पर्यंत तुर्कस्थानमधील काँस्टंटिनोपल किंवा इस्तंबूल ही बायझेंटिअन ह्या प्राचीन रोमन सत्तेचा थेट वारसा सांगणाऱ्या ख्रिश्चन राज्याची राजधानी होती! म्हणजे आजचा मुस्लिम बहुसंख्या असलेला तुर्कस्थान हा केवळ चारेक शतकांपासूनच आहे. जगाचे लोकसंख्या संतुलन आणि भूगोल(demographics and geopolitical structure) सतत बदलत असते ते असे.